Sunday, May 13, 2012

आईची आई

ती अगदी म्हणजे कमालीचीच मऊसूत होती. नऊवारी साड्याही अशाच नेसायची; सुती, मऊ.. मखमल=लोणी=जिजाबाई हे समीकरणच बनलं आहे. तिची सर्वात मोठी नात, जिला आज्जी निटसं म्हणता येत नसे, ती तिला जीजी म्हणत असे. पुढे पुढे त्याचे जिजाई, जिजाबाई असे स्थित्यंतर होत गेले. पुढच्या सगळ्या नातवंडांनीही जिजाबाईचाच धोशा लावला आणि तेच नाव तोंडी झाले. ’आईची आई’ हे आजोळी पळण्याचे सर्वात मोठ्ठे आकर्षण होते.

’मळ्यातलं घर’ आणि गावातला वाडा दोन्ही गोष्टी तिने सांभाळल्या होत्या. आम्हाला जास्त आवडायचे ते मळ्यातले घरच! म्हणजे शेतीच्या जवळ असलेले घर! ज्याच्या अंगणात क्रिकेटच्या बाऊंड्री, सिक्सरच्या खुणा ठरवायला खूप वाव होता. चिक्कूच्या झाडापर्यंत चार रन्स, त्यापुढे पेरुपर्यंत सहा आणि फाटकाच्याही पुढे गेला, तर तुझा तू बॉल आणायचा! असे नियम होते. मोठ्ठ असलं तरी अंगण रोज व्यवस्थित स्वच्छ केलेले असे. बाहेर घराला जोडूनच आणखी छोटे घर बांधले होते. त्यालाही कौले होती. आई, मामा, मावशी मंडळी लहान असताना त्यांना खेळण्यासाठी म्हणून! मागच्या बाजूला जोडूनच गोठा, कडेला धान्याचे कोठार , परत त्याहीपलीकडे गवताचे भारे ठेवण्याची शेड.. या सगळ्याला निशिगंध आणि सदाफुलीची बॉर्डर.. हे सर्वच स्वच्छ, कमालीचे सुंदर आणि निर्मळ ठेवणारा हात माझ्या आजीचा होता. ती हाताला जितकी मऊ-मऊ लागे तितक्याच मऊसूत मनाची मालकीण होती. भोळेपणाकडे झुकणारा कोवळा स्वभाव होता तिचा. मी तिला कधीच कुणावर ओरडताना, रागवताना पाहिले नाही. फारतर पदराचे टोक डोळ्यांपर्यंत जाई, पण तिचा उंच स्वरातला आवाज आठवतच नाही. हाच शांतपणा, साधेपणा तिचे सौंदर्य बनून राहिला होता.

मे महिन्यातल्या एखाद्या रणरणत्या दुपारी, धूळ उडवत बस त्या ठराविक नाक्यापर्यंत आली की हुश्श्य होत असे. कोणीतरी न्यायला आलेले दुकानाच्या पत्र्याखाली उभे असे. मळ्यातले घर असे चट्कन दिसतच नाही. थोडे खोलगट भागात रानटी झाडांमधे लपलेले आहे. नैसर्गिक कंपाउंड! तिथल्या उतारावरुन जाताना वाढलेला वेग थेट दार येईपर्यंत कमी होत नसे. जाड्या माठातले थंड पाणी, सरबत, पन्हे सगळा मारा तिच्याकडून सुरु होई.

ऊन आणि सुट्टी चढत जाई, तश्या आमच्या करामतीही वाढत जात. तिने माझ्यासाठी स्वयंपाकघरातच एका कोपर्‍यात स्वतः छोटी चूल लिंपून दिली होती. ती पेटवण्यासाठी छोट्या काटक्या होत्या, फुंकणी होती. तिने मला पहिला चहा करायला शिकवला. कडवट झालेला, काळा चहा पिणारी जिजाबाई माझे पहिले गिर्‍हाईक होती.

नातवंडांमधे मुलांची मेजॉरिटी असल्याने मी एकटी पडले, तरी माझ्याशी कधीही खेळणारी ती माझी सख्खी मैत्रिण होती. दादा आणि अमोलदादा यांनी घरामागे भिंतीला लागूनच मुख्य पदार्थ-माती आणि इतरही बरेच चित्रविचित्र पदार्थ मिसळून एक छोटे घर केले होते. त्यावर कागद, काटक्या वगैरेंचे थरचे थर देऊन ते उन्हात वाळवले होते. त्यावर उभे राहून ’आमचे घर सर्वात मजबूत’ अशी आरोळीही ठोकली होती. या अनमोल कन्स्ट्रक्शन मधे मला सहभागी करुन घेण्यात आले नव्हते. त्या घराच्या मजबूतीवर जळून ’हे मला घेत नाहीत’ ची तक्रार मी जिजाबाईकडे नोंदवली होती. तिने परत अंगणात तिघांनी मिळून घर बांधण्याचे फर्मान काढले होते. त्याप्रमाणे ते तयार झालेही! यावेळी तर आत डायनिंग टेबल, खुर्च्याही केल्या होत्या. छोटा बल्ब आत सोडला होता. मला लहान बुटके होवून आत फेरफटका मारावा असे प्रकर्षाने तेव्हा वाटत असल्याचे अजूनही आठवते आहे.

रात्रीच्या वेळी चटया टाकून अंगणात गप्पाष्टके रंगत, तेव्हा जेवण झाले असले, तरी ती काहीबाही खायला आणायची. बडबडणार्‍या मुलां-नातवंडांकडे प्रेमाने बघत बसायची. ती मते मांडायची, पण वादविवाद घालणे तिच्या कोष्टकात बसतच नव्हते. मधेच कुणा लहानग्याच्या डोक्यावर हात ठेऊन ’ निजलीस काय?’ ची पृच्छा करायची. तिच्या मांडीवर झोपण्यासारखे सुख नव्हते. आयतीच मऊशार उशी! वरुन मुलायम हाताचे थोपटणे!

गोठ्याचे काम पहाणार्‍या बायका, गवळी, किराणा आणणारे कुणी-कुणी; काम झाले की निघाले, असे कधीच होत नसे. जिजाबाईची विचारपूस, सल्ले, भेटवस्तू आणि खाऊ कधी संपतच नसे. हे लोकं बराच वेळ रेंगाळत असत. आम्ही त्यांची गार्‍हाणी ऎकत असू. हा बहुदा सकाळचा वेळ असे. घराचे मुख्य दार पुढे असले तरी, स्वयंपाकघराचे दुसरे अंगणाला जोडून दार होते. जाळीचे आणि लाकडी. त्या जाळीच्या पायरीवर बसून सगळ्य़ांची तिच्याशी बडबड चाले. जिजाबाईचे सकाळचे आवरणेही पाहण्यासारखे असे. स्वच्छ साडी नेसलेली आज्जी तिचा पितळेचा पावडरीचा डबा काढत असे. या ठराविक हालचाली ठरलेल्या असायच्या.. लाकडी चौकटीत बसवलेला छोटा आरसा, त्या खालचा छॊटा ड्रॉवर, त्यातला डबा.. मग गोल मेण आणि कुंकू.. फणी काढून अंबाडा घालून ती त्यावर गोल जाळीही लावायची. असेल, तर एखादे फूल! गोरीगोरी जिजाबाई खूपच गोड दिसायची. दोन परड्या भरुन पूजेसाठी फुले काढायची. मग स्वयंपाक, जेवणे वगैरे आवरुन तिचा मोर्चा ’दुपारी पडायच्या’ खोलीकडे वळायचा. ही खोली अगदी टिपीकल झोपाळू खोली होती. स्वयंपाकघराला लागूनच! बाळंतिणीची खोली असते तशी.. अंधारी, गार आणि लगेच झोप आणणारी.. तिथे पडून मोठ्यांच्या 'गॉसिप्स’ ऎकण्यातली मजा वेगळीच!

खेळून थकल्यावर ’हातपाय धूवून देवापुढे बसा’ ची हाकाटी व्हायची. तिथे लाईट बरेचदा नसायचेच! देवघरापुढल्या पिवळ्या प्रकाशात शुभंकरोति, मंत्र म्हटले जायचे. प्रकाश, स्वर आणि सुवास यांचा निरामय मिलाफ सगळा शीण घालवून टाकायचा. देवघराजवळच असणार्‍या लोणी काढायच्या लाकडी खांबाला टेकून ती कधी वाती वळायची कधी काही वाचायची. तिच्या सात्विकतेने घर भरुन जायचे. ते बघूनच खूप छान वाटायचे.

तिचे जाणे, त्या मळ्यातल्या घराला अजिबतच रुचले नाही. त्यानेही मौन पत्करले. तिची आठवण म्हणून कदाचित, तिचा शांतपणा त्याने उचलला. अबोली, वाढायची म्हणून वाढते आहे. अजूनही फाटक ओलांडल्यावर दिसणारा समोरच्या कोपर्‍यातला चौकोनी हौद कधी पाण्याने भरुन वहात असेल, कधी कोरडा ठिक्क पडत असेल.. त्याला लागूनच असलेल्या मोठ्ठ्या, कठडा नसलेल्या विहीरीची तू मनात घालून दिलेली भिती कधीच जाणार नाही.. त्याच किर्रर्र भितीचे फक्त आता कारण बदलले आहे की आता तूच तिथे नसशील.

सौम्य, निर्मळ साईसारख्या जिजाबाईने आणि आजोबांनी आजोळचे सुख भरभरुन दिले. बालपण, सुट्टी, मजा, चर्चा, शिकवणी या सगळ्या गोष्टी मायेच्या गाठोड्य़ात गच्च बांधून समृध्द करुन दिल्या.
                 मातृदिनानिमित्य; माझ्या आईला बुध्दीमान मुलगी, अतिशय प्रेमळ, बहुश्रुत आणि कष्टाळू व्यक्ती, एक उत्तम स्त्री बनवणार्‍या तिच्या आईला लाख सलाम!

Wednesday, May 2, 2012

सय सावली

कुठल्या मातीवर कोणत्या सरी पडतील आणि कुण्या काळचा सुगंध दरवळू लागेल, सांगता यायच नाही. गुळासारखी साधीशी गोष्ट! तांबूस गोजिरवाणा, सुबक गूळ पाहून मी दुकानदाराला विचारले," अरे वा! कोल्हापूरचा गूळ आहे वाटतं!" तेव्हा शक्य तितक्या कुत्सितमिश्र कुचक्या स्वरात तो बोलता झाला " गूळ म्हणजे काय कोल्हापूरातूनच येतो की काय? इथे पण बरीच उसाची शेती आहे. आमाला काय म्हाईत कुटुन येतो? तुम्ही तरी ओळखू शकाल काय?"

"हो मग! नक्कीच ओळखेन.. असाच असतो तो! "
त्याच्यावर कुरघोडी करण्यासाठी काढलेल्या स्वराचा आणि शब्दांचा त्याच्यावर कोणताही परीणाम झालेला दिसला नाही. मख्खपणे त्याने पुढच्या गिर्‍हाईकाला हिणवण्याची तयारी सुरु केली. पण त्या छोट्याश्या वस्तूला पाहिल्यावर काय काय म्हणून तरळून जावे? शहराबाहेर दुतर्फा उसाची लांबच लांब शेती, गुर्‍हाळे, मंडईतल्या गुळाच्या वेगवेगळ्या आकाराच्या ढेपा, "घ्या की हो! खूप ग्वाड आहे आमचा गूळ!" चा आग्रह.. आणि गूळाचे मोदकही! थाळी प्रकारात भरपूर पदार्थ बर्‍याच प्रमाणात एकदम समोर आले की, गोंधळून काय खावं, आणि आपल्याला किती भूक आहे याचा अंदाजच येत नाही तसच काहीसं इथे होत असावं. मधुर,आंबट सगळ्या गोष्टी गोलाकार गर्दी करतात. हा संबंध निव्वळ वस्तूंशीही निगडीत नसतो. गंध, रंग, चव, स्वर, आवाज.. किती मोठा परीघ आहे! एकदा कुठल्या तरी घरी एका परिचित परफ़्यूमचा वास तरंगत आला, आणि कॉलेजचे दिवस उजळणी करुन गेले. त्यावेळी खूपच जपून वापरला होता तो! हाच.. सेम.. ह्या परफ्यूमची मूर्ती लहान असली, तरी किर्ती महान होती. घरातून निघण्याची तेव्हाची अकराची वेळ, उकळत्या आमटीचा वास, जेवणाची गडबड, आवडता निळा ड्रेस, छोट्या सॅकमधे कागद, झेरॉक्सची गर्दी, पर्समधले पैसे चेक करणे.. सनकोट, स्कार्फ वगैरे घालून डाकू बनून जाणे, हेss मोठ्ठ पार्कींग, रणरणत ऊन.. आणि तरीही गार झुळूकेसारखा, स्पेशल वाटायला लावणारा, आसपास घुटमळणारा मंद सुवास! त्यावेळची, आणि आता आऊट ऑफ टच असलेली मैत्रिण.. घरी येऊन फेसबुक चेक केले.. अजूनही तशीच गठ्ठ्या आहे..
अशाच जोड्या जुळवायच्या तर, प्रत्येक मुख्य वर्गिकरणाचे उपवर्गिकरण होईल आणि सगळे बाण शेवटी कोल्हापूरच्या आठवणींकडेच जातील.. सगळे मे महिने तर बालपणीच्या आठवणी खाऊन टाकतात.. आपल्या मर्जीचे आपण मालक असण्यातली श्रीमंती न कळण्याचे दिवस.. कोणत्याही वेळेचे वाटे नाहीत, बदलाचे प्रवाह बघत बसण्याची सक्ती नाही. फक्त आंब्यासारख्या रसरशीत, गोड आठवणी!
’आला गेला मनोगती’ मधे मारुतीच्या वेगाची तुलना मनाच्या वेगाशी केली आहे. भूत, भविष्यच्या पलीकडे, काल्पनिक काळातही संचार करुन क्षणभरात मन वर्तमानात परत येतं. आठवणीत फार काळ रमू नये म्हणतात.. असेलही कदाचित! पण या आठवणीच जर जिवाभावाच्या काही क्षणांची कडकडून भेट घडवून आणत असतील तर? अशी छटाकभर मिनिटेही तो पूर्ण प्रसंग, तो काळ; जिवंत करीत असतील तर?

चवीशी संबंधीत एक सुंदर प्रसंग Ratatouille मध्ये दाखवला आहे. रेस्टॉरंट क्रिटीक अ‍ॅन्टोन विशेष टिका-टिप्पणीसाठी शेफ गुस्ताँवच्या रेस्टॉरंटमधे येतो. तेव्हा छॊटा शेफ असलेल्या रेमी उंदराने बनवलेली Ratatouille डिश त्याला सर्व्ह करण्यात येते. ती दिमाखदार दिसत असते, रंगिबेरंगी दिसत असते.. तेव्हा आता हा साधासा पदार्थ बनवलाय तरी कसा, हे पहायला अ‍ॅन्टोन पहिला घास घेतो आणि थेट त्याच्या बालपणात जातो.. रडून, नाक पुसत घरी आलेल्या छोट्या अ‍ॅन्टोनपुढे गरमागरम Ratatouilleची डिश ठेवणारी त्याची आई त्याला आठवते आणि त्याचे कडक वाटणारे डोळे आठवणीत हरवून जातात. उंदरासारखा प्राणी इतकी ऑथेंटीक डिश बनवू शकतो ही कल्पना, त्याच्यातल्या टिकाकाराची तत्वे हलवून टाकते.

या आठवणींच्या मोहोळाला काही स्पर्शून गेले की बर्‍याच गोष्टी पंख फडफडवत येतात. काहीबाही परत शिकवूनही जातात. शेवटी वर्तुळ एकदाच थोडीच पूर्ण होते? ते गिरवत रहाण्यातली मजा वेगळीच आहे. रोजच्या उन्हातली ही एक इनोसन्ट सावलीच म्हणायची!

Thursday, May 12, 2011

मुक्तांगण


चैत्रांगणातल्या तोरणाची पाने काढताना हाक आलेली, " अगं ए, काय चाल्लय?" तापू लागलेल्या अंगणात चटचटणारे पाय गुलाबी झाक चढवू लागलेले. रांगोळीचा शेवटचा उकार काढायचा राहिला होता. लक्ष सगळं तिकडेच! प्रश्नकर्तीकडे ओळखीच हासू आणि आणखी एक उलट प्रश्न फेकून परत शेवटच्या पानाकडे! इथे आणखी काय असत बरं? हो, वेल. परत पानेच! तो वेल चौकटीला बिलगून वरपर्यंत चढतो. आणखी काय राहिलेय? मोरपिस? रणछॊडदास.. उगाचच लांबलचक नाव आठवते. सरळ सरळ श्रीकृष्ण म्हणायला काय जाते? नाहीच! रणछॊडदास.. कुण्या काळी माघार घ्यावी लागली म्हणून कायमचेच चिकटलेले बिरुद! मग, सहस्त्र वेळचा विजयही इथे ते नाव पुसू शकत नाही. बापरे! सहस्त्र बायका, प्रत्येकीची कशी तर्‍हा असेल? त्याने त्यांची सुटका केली, आणि मग पालनकर्ता म्हणून आपले नाव दिले वगैरे ठिक आहे, पण मग आठ बायका कशा सांभाळल्या असतील? पैकी खरंच ह्रदयातली कोणती आणि राजकारणातली कोणती? गरुड तर कधी नीट जमतच नाही. रणछोडदासाचेच वाहन! तुळशीकट्ट्यातली तुळस जरा जास्तच दणकट आलीय. कुंडी त्यामानाने केविलवाणी दिसतेय! कुणी केलीच चेष्टा तर सांगायचे, पाणी जास्त घातले म्हणून! नाग प्रकरण चांगले आहे. सोपे, सुटसुटीत. नागपंचमीत काढलेल्या रांगोळीचे बोन्साय वाटतेय!
चंद्र, चांदणी, शंख, चक्र कुठेही अ‍ॅडजस्ट होवून जाते. चंद्र पूर्ण काढतच नाही ना कधी.. चंद्रकोर असते नेहमी.. ओढाळ मनाचे प्रतिक! हे टिपीकल चक्र पाहिले की, बुध्दाचे दगडी वेटोळ्याचे केस आठवतात. खास तीच मूर्ती, तेच आकार. उभ्या संपन्न संसारातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पूर्ण रिता झालेला सिध्दार्थ! आणि संपूर्ण अर्थ उमगल्यागत दगडी मूर्तीतही गूढ भाव तसेच ठेवणारा बुध्द.. तो सगळंच सोडून आत कुठेतरी निघून गेला असावा.

When I give up the helm
I know that the time has come for thee to take it.
What there is to do will be instantly done.
Vain is this struggle

य़ेस.. वेन इज धिस स्ट्रगल! शेवटी काय मिळते यावरच स्ट्रगलची किंमत ठरत असेल तर, हे व्यर्थच आहे. & the sky gazes on its own endless blue and dreams. एन्डलेस ब्लू.. मस्त शब्द आहे.
बाकी काय उरले? कासव.. सोमेश्वर देवळाच्या चौकोनी तलावात कित्ती कासवे होती. छोटी, छोटी. फारशी गर्दी नसते तिथे. हिरव्या पाण्याचे चौकोनी कुंड, त्यात मध्यभागी देऊळ! देवळात जायला लहान रस्ता.. या कुंडात कुठेतरी जिवंत झरा असेलच. जिवंत झरा? हे काय प्रकरण आहे? मृत झरा कसा असतो आणि? जर पाणीच नसेल तर झरा म्हणणारच नाही ना..
"लई उश्शीर झालाय.. आत जा गो बाय.. "
होय. रांगोळी आवरली आहे. बाकी फाफटपसाराही आवरता घ्यायला हवा.. मनातल्या रांगोळ्य़ा काय; पसरत, फिस्कटत असतातच!

Thursday, April 14, 2011

गारपीट

मागच्या वर्षीचा पाऊस
असाच भसकन कोसळला होता
हलकेच दार वाजवून येण्याची रीत नाही,
असं बडाबडा बडबडू नये,
इतक्या मोठ्या आवाजात ओरडू नये,
याचं भान नाही..
असाच टवाळ, उनाड, मुक्त होता
मागच्या वर्षीचा पाऊस
तीच अधमुरी दुपारची वेळ
तसाच झुकत्या पागोळ्यांचा खेळ
गदगदलेलं आभाळ पुसताना
विस्कटलेला दिशादिशांमधला मेळ
गारांचा गजबजाट अन त्यांचे भंगलेले आकार
दाराशी उमटलेले ओल्या पावलांचे उकार
असाच नंतर शून्य होत गेलेला
मागच्या वर्षीचा पाऊस
नादही सारखाच तीन पावसांमधला
फक्त यंदा चिंब भिजवून गेला नाही
नाहीतर अगदी सारखाच हा आणि
मागच्या वर्षीचा पाऊस..


Tuesday, March 15, 2011

पडद्यामागचा पडदा

माध्यम हा एक अजब प्रकार आहे. जो केमिस्ट्रीमधे वापरतो आणि मानवी नातेसंबंधामधेही!मला एक फार गोड माध्यम मिळाले काही दिवसांपूर्वी! कर्नाटकातल्या एका लहानशा गावी जाणे झाले. मी बर्‍याच वर्षांपूर्वी आणि एक दोनदाच तिथे गेले असेन. आईच्या माहेरचे दुसरे गाव. तिथला मोठ्ठा वाडा आठवायचा मलाही अधून मधून.. धुळीने भरलेल्या निमुळत्या वाटेवरुन आणि निळी बस आली की मुकाट्याने रस्त्याबाहेर जाऊन थांबण्याची कसरत करत आम्ही पोहोचलो. वाटेत जरा मोकळे रान दिसले, की ’हा बाळोबाचा माळ! इथे रात्री भुते येतात असे आम्हाला सारुक्का सांगायच्या लहानपणी!’ इथून स्टोरीला सुरवात झाली. नंतर आधीच्याहून मोठे आणि वैराण असे तीन माळ आम्ही मागे टाकले आणि प्रत्येक वेळी आधीचा बाळोबाचा नव्हे हाच तो! हे कन्फर्म होत गेले. तिसर्‍या आणि शेवटच्या माळावर कुणीही वाद घातला नाही आणि तिथेच येऊन भुते नाचतात यावर शिक्कामोर्तब झाले.
’इथून वळून सरळ आलं लगेच!’ मधल्या ’लगेच’चा अर्थ दिड तास हे लवकरच कळून चुकले. दिड तासात शक्य तितकी धूळ आणि उन खात आम्ही मुक्कामापर्यंत पोहोचलो. फारसं काही बदललेलं नव्हतं. सरकारी योजना तळागाळात जाऊन जितके बदल करता येणं शक्य होतं तितकच! तोच रस्ता, निमुळता, रस्ता नसलेला रस्ता.. समोर वाडा.. या वेळी वाडा थोडा भकास वाटला. आम्ही आत गेलो.

थोडा वेळ गेल्यावर आजूबाजूचे बदल टिपत आईच्या गप्पा सुरु झाल्या. इथे आम्ही हे करत होतो, तिथे ते खेळत असायचो.. वगैरे.. घर दाखवताना मधल्या लहान सोप्यापाशी आलो. तिथे गौरी बसायच्या म्हणे! त्यांना करत असलेल्या कमानीची उंची हाताने दाखवत ती भराभर दारं उघडत आत गेली. काहीतरी शोधत, ते तिथे आहे का चाचपडत असल्यासारखी! काही गोष्टी मिळाल्या असतील.. बर्‍याच दिसल्या नसतील.

"हे आज्जीच कपाट! अजूनही आहे; लाकडी आणि मजबूत!"

ते पिवळट लाकडी कपाट, अडगळीत जाण्याच्या मार्गावर असलेलं.. तोंडावर भलमोठं कुलुप घेऊन कोपर्‍यात तिरकं बसल्यासारखं.. कधी आज्जीच्या बर्‍याच गोष्टी पोटात दडवल्या असतील त्याने! आकडे, मेणाचं कुंकू, हस्तिदंती पिना, नऊवारी कडक पोताच्या साड्या, क्वचित सोन्या-चांदीच्या वस्तूही.. घरातल्या मुली परकरात होत्या तेव्हाच एकदम नऊ बाळकृष्ण आणले होते म्हणे तिने.. सख्खं, चुलत वगैरे काही न मानता, सगळ्या मुलींचे जे असेल ते एकदमच! मुलांच्याही काही गोष्टी कधी दडल्या असतील त्यात! जमवलेल्या बिट्ट्या, गोटे, हातातले नाजूक कांकण.. आवडते पुस्तक किंवा लहान भावासाठी खाऊ!

"ही लहान खिडकी म्हणजे आमची हेरगिरी करण्याची जागा.. बाहेरचं सगळं दिसायच इथून.. पण बाहेरुन आत काहीच नाही.. चिकाचा पडदा असल्यासारखं!"

त्या खिडकीला आता जळमटांनी वेढले आहे. प्रयत्न करुन बघूयात म्हटले तरी, आतून आता बाहेर काही दिसणार नाही. बाहेरुन मात्र विणकाम करुन भरलेला मोर वरती लावलेला दिसतो.

"इथे आत्ता नुसती मोकळी जागा आहे, पण जुनं स्वयंपाकघर इथेच होतं. आणि सकाळची न्याहरी, पंगत इथेच असायची. आम्ही सगळे एकत्र..."

'एकत्रनंतरची पाच सेकंदांची इनोसंट गॅप मोठी आहे आणि उदास आहे.

"आणि हे देवघर! इथे रोज परसातल्या फुलांचा ढीग असायचा. आणि शेजारी हा लोण्याचा खांब"
"लोण्याचा? कुठे ते? काय ते?"
"म्हणजे ताक घुसळायचा खांब. तुझी आज्जी इथे ताक घुसळून झाल्यावर थोडे लोणी काढून या खांबाला लावून ठेवायची आणि मग नंतर ते लोणी खाण्यासाठी आम्ही ती जाण्याची वाट बघत बसायचो. तिने जास्तित जास्त लोणी खांबाला लावावे असे आम्हाला वाटायचे!"

तो सुबक नक्षिदार खांब अजूनही तुपकट होवून चमकतोय असं वाटलं. देवघरा शेजारीच त्याची जागा आहे.
"आणि मागे पाहिलंस का? खूप मोठ्ठी जागा आहे, म्हणजे होती.. आता काय झालंय कुणास ठाऊक!"

वाड्यामागची मोठ्ठी जागा मलाही आठवत होती.. संध्याकाळी सातनंतर तिथे भूत येते असं काहीस आमच्या मनावर ठसवण्यात आलं होतं मग खेळ अर्धवट सोडून आत यावे लागायचे.

"अग्गोबाई, चाफा आहे तसाच आहे, चैत्रात या चाफ्याची फुले वाहतात. आपल्या मळ्यातला लाल चाफा, तसा हा पांढरा चाफा! आणि ती बटणगुलाबाची फुले, आणि अबोली, मिरचीची रोपं.."

दिसेल त्या सगळ्या सोयर्‍यांना नावाने हाका मारुन झाल्या. त्यांचा ही पोहोचला असेल तिच्यापर्यंत!

"इथे कुठेतरी खरं का खोटं आज्जीचे घर होते ना आई?"
"हो.. तेच ते लहान खिडकी दिसतेय ते घर"
जवळच राहणार्‍या आज्जी.. प्रत्येक दोन वाक्यांनंतर त्यांना खरं का खोटं?’ असं विचारायची सवय होती.. त्याच नावाने त्या ओळखल्या जायच्या. लांबलचक असलं तरी बाकी मंडळींनी किंवा आम्ही त्यांचे पेट नेम घेण्यास कधीच कंटाळा केला नाही.

"झालं आता, बरीच वर्षे झाली त्यांना जाऊन! हे पाहिलंस का? टेबल टेनिसचं टेबल? आणि बंदूक?"
आजोबांच्या खास खेळाच्या खोलीत जुन्या भिंतीला मुटकुळं करुन टेकलेलं हिरवं टेबल आणि कोपर्‍यातली बंदूक.. त्या खोलीतल्या जुनेपणाच्या खुणा फ़्लॅट स्क्रिन टिव्हीला आणि नविन सजावटीला मुळीच सामावून घेत नव्हत्या. बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा इथे आले होते. तेव्हाही काही बदल असतील कदाचित, निरखून पाहिले नव्हते इतकंच!

आपण आपलं नॉस्टॅल्जिक होणं बरेचदा पाहतो.. कुणा माध्यमातून हे पाहणं, जसं रंगिबेरंगी धागे विणताना पहात त्यातलीच एक नक्षी होऊन जाणं.. तिच्या सांगण्यात मी कुठेच नव्हते पण तिथे फक्त मीच होते. घरभर फिरुन ओळखीचे काही नाद, रंग, हेरगिरीची खिडकी जिथे उघडते, त्या सोप्यातले काही उन्हाळ्याचे दिवस, माजघरातल्या पावसाळी रात्री, लाकडी जुन्या झोपाळ्याचे चार दोन झोके सगळं सगळं गोळा करुन ती म्हणाली, "आता जाऊयात आपण! उशिर होतोय.. "
थकलेल्या,वाकलेल्या काकी परत येण्याबद्दल बजावत होत्या. बाहेर दारातच मस्त अबोली फुलून आली होती.

"अबोली जरा जास्तच बोलतेय! "

आणि परतीच्या प्रवासात आईच्या गाठोड्यात आणखी एक बोलणारा रंग अधिक झाला होता. Wednesday, December 15, 2010

पोंगल

गोड पोंगल


साहित्य:-

 तांदूळ- १ वाटी,

 मूगडाळ- १/२ वाटी,

 गूळ- १ वाटी,

 दूध- ३ वाट्या,

 लवंग- ३,

 वेलदोडे- ४,

 काजू- १०-१२,

 बेदाणे- १०-१२

 तूप- ३ चमचे,

 ताजं खोबरं- भरपूर

कॄती-

  • प्रथम एक वाटी तांदूळ धुवून पूर्ण न निथळता किंचित पाण्यात एक तास पाण्यात भिजवावे. मूगडाळ एक चमचा तुपात लालसर भाजून घ्यावी. भाजतानाच त्यात लवंगा टाकाव्यात. नंतर डाळही धुवून पूर्ण निथळून एक तास भिजत ठेवावी. गूळ बारीक चिरुन ठेवावा. 
  • जाड पातेल्यात ३ वाट्या दूध, एक वाटी पाण्याबरोबर गरम करावे. उकळी आल्यावर त्यात तांदूळ व डाळ घालावी.
  • कमी आचेवर दूध पातेल्याला लागू न देता अधूनमधून ढवळत रहावे. (१० मि.)
  • आता एक वाटी गूळ घालावा.(जास्त गोडीसाठी दिड वाटी) गूळ विरघळून डाळ तांदूळ एकत्र झाल्यावर दोन चमचे तूप घालावे. नंतर काजू, बेदाणे, वेलदोडे, आणि दोन वाट्या खोबरं घालून मिसळावे.
  • एक वाफ आल्यावर परत थोडे खोबरे आणि १ चमचा तूप शिजलेल्या पोंगलमधे घालावे.
  • खोबरे जास्त घातले तरी छान लागते. अधिक नारळाचे दूधही वापरतात.


Friday, December 3, 2010

क्षणमात्र

वेळ तशी रहदारीची होती पण तो रोड फारसा गजबजलेला नव्हता. नसतोस बरेचदा! घरी जाताना नकळत वेग वाढलेला..मुख्य रस्त्याला थोड्या अंतराने दोन फाटे फुटतात त्यातल्या पहिल्या फाटयातून रहदारीच्या सर्व नियमांना फाटा देवून एक गाडी, बहुदा बोलेरो, जोरात वळण देऊन पुढे गेली. गाडीतल्या डॅशबोर्डवरचा छोटा टेडी आणि अंगावर येणारा करडा रंग मला स्मरतो. क्षणाचा अर्धा, पाव जो काही भाग असेल त्यात एक विचित्र जाणीव इतकी तिव्रतेने झाली, की तो लहानसा काळही तासभर घडत असल्यासारखा वाटला. मृत्यूची भिती असेल, अनपेक्षित गोष्टीचा धक्का असेल, इतक्या वेळेत नक्की काय करायचे न सुचून आलेली हतबलता असेल.. मी पडले नव्हते, पण काहीतरी मोठे घडल्यासारखे वाटत होते. थोडी थरथर थांबली, तेव्हा समोर पाहिले तो, पुढे जाऊन काही अंतरावर ती गाडी थांबली होती. मी जिवंत आहे व हालचाल करीत आहेसे पाहून पुढे निघून गेली. मला त्याला गाठून भांडायची ताकतच नव्हती. जाऊ दे, म्हणून तशीच घरी आले.

काल, दिवसभराच्या शेवटच्या उजळणीत तो प्रसंग आला आणि मनातल्या मनात काही अ‍ॅनालिसिस सुरु झाले. एखाद्या क्षणार्धात एवढा वेळ असेल असे कधी वाटले नव्हते. ’तो क्षण युगासारखा भासला ’, ’रात्र सरता सरत नव्हती ’, ’काळ थांबून राहिला होता ’ वगैरे वाक्ये पुस्तकात लय भारी वाटतात. तसे होते म्हणजे नक्की काय कधी समजले नव्ह्ते. हाही क्षण म्हणजे हीच वाक्ये असेही नाही पण बरिचशी जवळपास.. होय असंच काहीसं..

त्या अर्ध्या क्षणाचे आणखी तुकडे केले तर प्रत्येक तुकडा काही आठवणींचा होता. मला घर आठवले, काही काळज्या आणि एक मैत्रिण! स्पष्ट, लख्ख आठवण नाहीच म्हणता येणार, पण एखाद्या कडक शिस्तिच्या शाळेत मुलांची रांग लावताना पहिल्या मुलाला उभं केल्यावर मागच्यांनी आपोआपच पटापट मागे उभं रहावं, तशीच काहीशी , आठवणींची रांग! नुसते संदर्भ होते. स्प्ष्टीकरण मी मागाहून घुसडलं :)

परतीच्या वेळेत मला आठवला तृप्तीचा अपघात! तो खूपच वेदनादायी होता. नंतर महिनाभराच्या विश्रांतीसाठी ती इकडेच आली होती. तिचा हात प्लॅस्टरमधे होता, व्यवस्थित उपचार झाले होते. आठवड्याभरापूर्वीच्या अपघाताचे वर्णन सांगताना तेच ते प्रश्न उत्तर चालू होतं.. कधी, कुठे, कसं?? ट्रॅफिकचा काय भरवसा नाही वगैरे.. सगळी प्रश्नोत्तरे झाल्यावर ती माझ्याकडे आली. "काय म्हणतीस?" नेहमीचा सूचक प्रश्न टाकून झाल्यावर सूचक हसली. (या प्रश्नात आणखीही बरेच प्रश्न दडलेले असतात)
"खूप दुखतं आहे का गं?"

"आत्ता नाही, पण तेव्हा.. मला जाणवत होतं, आपलं हाड फ्रॅक्चर झालयं.. आणि हॉस्पिटलमधे ऑपरेशनपूर्वी तात्पुरतं प्लॅस्टर घालताना तर.. प्रचंड.. ब्रह्म आठवलं गं मीनू "
तिच्या काळ्या काळ्या डोळ्यात त्यावेळेच्या वेदनेचं पाणी आलं. तिला तो क्षण परत जागवून दिल्याबद्दल मला खूप अपराधी वाटलं. मग मात्र एकही प्रश्न न विचारता टिपी करत तिच्या हातावर झोकदार सही करुन शल्य कमी करण्याचा मी प्रयत्न केला.

तिला एका क्षणाचं जे ब्रह्म आठवलं, ते वेदनेच होत. माझ्या एका क्षणात आठवलेल्या ब्रह्माचा संदर्भ केवळ भितीशी होता का? माहित नाही...

विकल्या न गेलेल्या फुग्यांच्या एकत्र गाठी बांधून संध्याकाळी कुणी फुगेवाला सायकलवरुन परत जावा, आणि त्याच्यामागे हाss मुलांचा घोळका गलबल करत जाव तसं काहीसं झालं.. संध्याकाळच्या उजळणीत अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या गोष्टीही घोळका करुन कलकलाट करत आल्या. हेही आठवलं की प्लॅस्टर उतरवून आता तिला एक महिना होईल. आपण साधा फोनही केलेला नाही..

" मग, आणि काय म्हणतीस?"

तिचा फोनवरचा निरोप, सुरवातीच्या प्रश्नासारखाच असतो. तिला खूप आनंद झालेला दिसला.

"सांगते ना, येशिल तर खरं! जपून रहा गं.."

त्या एका क्षणाच्या नंतर शेपट्या फारच वाढल्या पण त्यामुळे जे मंथन झालं, ते नक्की लिहिता येणार नाही. आपल्या बाबतीत घडणार्‍या अघटिताचा आपण असा कितीसा विचार करतो? आणि का करावा? माहिती नसतं काय होणार आहे म्हणूनच ’अनपेक्षित’ शब्द वापरतात ना! पण असे काही प्रसंग दैनंदिन कामाच्या घोळात कुठेतरी लपून बसलेल्या महत्वाच्या गोष्टींना बाहेर ओढून काढतात. किंबहुना त्यासाठीच ते अनपेक्षितरित्या घडत असावेत का?  
हे फारसं लॉजिकल नाहीये, पण असंच होत असावं..