Thursday, December 24, 2009

पुढचा टॅग..

ही योगायोगाची साखळी खरचं मजेशीर आहे. तीन दिवसांपूर्वी कपाट आवरताना स्लॅमबुक मिळाली. परत वाचून काढली. विशेषत: 'opinion about me' ची वाक्ये. खाल्ल्या वडापावला जागून झाडून सगळ्यांनी चांगल्याच ओळी खरडल्या आहेत, पण बरं वाटत परत वाचताना.

श्रेयसीने लिहलेली सुंदर अक्षरातली पाने मात्र मनापासून लिहलेली आणि कवितेत भिजलेली! इतकी हळवी मुलगी मी कधीच पाहिली नाही. दुसर्‍या दिवशी ’काय गं, कशी आहेस’ असा फ़ोन आणि कधी भेटायच हा प्रश्न! मग त्यावरं आपण टेलीपथी असण्याबद्द्ल शेरा वगैरे.. आणि आज अजय चा टॅग केले असल्याचा ’बेधुंद’ मार्फ़त निरोप. मजाच आहे.

1.Where is your cell phone?

त्याच्या नविन पाऊचमधे

2.Your hair?

वाढायच्या विचारात दिसतात

3.Your mother?

सर्वात जवळची

4.Your father?

Brillient & Balanced

5.Your favorite food?

शाका.चमचमीत काहीही

6.Your dream last night?

रुट्स पुस्तकातला कुंटा आला होता स्वप्नात

7.Your favorite drink?

चहा

8.Your dream/goal?

World Tour yuppi..!

9.What room are you in?

स्टडी रूम
(एक मुलगी, बायको, आई, आजी वगैरे होत जाते तशी ही खोली renovation नंतर हॉल, गेस्टरुम, भावाची खोली, स्टडी रूम इ.स्थितंतरातून गेलेली आहे.तिसरा बदल तिच्यासाठी ज्यास्त कष्टप्रद असावा.)

10.Your hobby?

वाचन

11.Your fear?

पाल

12.Where do you want to be in 6 years?

ते... २०१२ चं काय झालं?

13.Where were you last night?

घरी

14.Something that you aren’t diplomatic?

नात्यातल्या, मैत्रीतल्या बर्‍याच काळजीवाहू व्यक्ती

15.Muffins?

चॉकलेट फ़्लेवरच अस्तित्व असलं म्हणजे झालं!

(इथे चॉकलेट्वाल्या व्यक्ती बर्‍याच दिसल्या)

16.Wish list item?

ते कधी संपतात का?

17.Where did you grow up?

कोल्हापूर

18.Last thing you did?

जी च्या ब्लॉग पर्यंत वाट काढली.

19.What are you wearing?

(ढगळ)कुर्ता व जीन्स

20.Your TV?

चॅनलप्रमाणे फ़िरत असतो सारखा, डिस्नेवर बरेचदा स्थिरावतो.

21.Your pets?

नाही

22.Friends

चांगले आहेत सगळे!

23.Your life?

मस्त चाललय.(लाकडाला स्पर्श)

24.Your mood?

झकास!

25.Missing someone?

हो ( विचारलं नाही म्हणून नाव सांगत नाही :-) )

अजयच वाक्य कॉपी केलयं फ़क्त ’णू’ दुसरा काढलाय.

26.Vehicle?

चित्रातली की चालवता ती?

27.Something you’re not wearing?

Tension

28.Your favorite store?

Ikea

Your favorite color?

खाकी सोडून सगळे

29.When was the last time you laughed?

काल

30.Last time you cried?

आठवत नाही

31.Your best friend?

http://gazali.blogspot.com/2009/06/blog-post.html

32.One place that you go to over and over?

नाईलाजाने- शिंपी (चारातले तीन ड्रेस बिघडवायचेचं असा अलिखित नियम असावा)
आनंदाने- लायब्ररी

33.One person who emails me regularly?

मॉन्स्टर जॉबवाले

34.Favorite place to eat?

प्रत्येक पदार्थासाठी वेगवेगळी आहेत.

मी सोमेश, मुग्धा, बहिर्जी नाईक, हरेकृष्णजी, योग, प्रविण  यांना टॅग करते आहे.

Monday, December 7, 2009

वर्तुळ

सरत्या मे महिन्यातील कोमट रात्र. चंद्राच्या दुधी प्रकाशात बाजूची शेवाळलेली पायरीसुध्दा उजळून गेलेली. उघड्या अंगणात सोलापुरी जमखान्यावर घरातल्या सगळ्या सुट्टीवाल्या चिल्ल्यापिल्यांना जमवून ताई गोष्ट सांगत होती.

" योशिहारा नावाचा व्यापारी होता. मुलगा काझुओ त्याचा जरा ज्यास्तच लाडका.. त्यावर्षी तो काझुओला घेऊन प्रथमच गावाबाहेर व्यापारासाठी घेऊन जात होता. चालत जाता जाता रात्र झाली आणि गच्च ढग दाटून आले. मुसळ्धार पाऊस सुरु झाला. अशा अवेळी थांबायचे कुठे? दूरपर्यंत फ़क्त एकच घर होते पण तिथे तर कोणी रहात नसते. आता काय करावे बरे? योशिहारा विचार करु लागतो. इकडे थंडी वाढत असते त्यामुळे काझुओला सर्दी होते..

" बाबा आपण तिथे का जात नाही? "

" अरे, तिथे एक राक्षस राहतो. तसा तो कुणाला त्रास देत नाही, पण त्याच्या घरापाशी येऊन कुणी शिंकले, तर तो त्या माणसाला खाऊन टाकतो आणि आता तुला तर सर्दी झाली आहे.  पण माझ्याजवळ एक युक्ती आहे. चल जाऊयात "

असे म्हणून जरा घाबरतच दोघे त्या घराच्या छपराखाली उभे राहतात.

"मगं, तो लाक्शस त्यांना खाउन टाकतो?"

"थांब रे निख्या, मधे मधे काही विचारु नकोस.."

हां, मग थोड्या वेळाने काझुओ शिंकतो. त्या घरातला राक्षस त्याला खायला येणार, एवढ्यात योशिहारा त्याच्या पाठीवर थाप मारुन म्हणतो,

" गॉड ब्लेस यू "

ते ऎकल्यावर मात्र राक्षस म्हणतो, " याने तर देवाचे नाव घेउन पाठीवर थाप मारली. आता याला कसे खाणार? हरकत नाही, या मुलाला सर्दी झाली आहे. कघी ना कधी तरी त्याचे वडील कंटाळतील किंवा झोपून जातील, तेव्हा मी याला खाईन."

" मग, आता लाक्शस त्याला खातो? "

" अरे निख्या, प्रश्नकुमारा ऎक तरी.!"

मग काझुओ रात्रभर शिंकत राहतो, जवळजवळ शंभर वेळा. पण प्रत्येकवेळी राक्षस येण्याआधीच योशिहारा न कंटाळता त्याला थाप मारुन आशिर्वाद देत राहतो आणि काय म्हणतो?

" गॉड ब्लेssस यूss "

बरोब्बर! शेवटपर्यंत राक्षस काही त्याला हात लावू शकत नाही. शेवटी रात्र संपते, पाऊसही संपतो. मग दोघेही सुखरुप दुसर्‍या गावात पोचतात.

मग कुणी शिंकले की काय म्हणायचे?

" गॉड ब्लेssस यूss "

गोष्ट ऎकल्यापासून आम्ही उगाचच शिंकू लागलो आणि ताई कडून प्रत्येकवेळी ’ब्लेस यू’ ची थाप घेऊ लागलो.

काही महिन्यांपूर्वीची ती रात्र मात्र सरत्या पावसाळ्यातली होती. भरनियमनाला समर्थन दिल्याप्रमाणे चंद्रानेही आपला हात (चेहरा) आखडता घेतलेला. कुठल्याश्या कार्यक्रमानिमित्य जमलेल्या नातेवाईकांच्या गप्पांत घर बुडून गेलेलं! रात्रीचे जेवण झाल्यानेंतर परत गोल करुन सुरु झालेल्या सुस्त गप्पा! तिथल्याच एका कोपर्‍यात एक चिमणा गोल, स्वतंत्र चिवचिवाट करत बसलेला! त्यातून एक नाजुक ’ऑssक्क्षी’ मला ऎकू आले.

" ब्लेस यू "

" ए मावछी, किती जोरात धपाटा मारलाश? "

" असच करायच असतं, तुला ती गोष्ट माहिती नाही? "

" कुठली गं? "

" अगं, तुझ्या आईनेच सांगितली होती.. एक किनई योशिहारा नावाचा व्यापारी होता. मुलगा काझुओ त्याचा जरा ज्यास्तच लाडका....

Wednesday, October 21, 2009

किर्लोस्करवाडी

UAE मध्ये अल्‌ एन अमिरात पाहताना हटकून कशाची आठवण झाली असेल तर किर्लोस्करवाडीची! ’मेलेमे बिछडी हुई जुडवा बहने’, एक मॉडर्न ज्यास्त श्रीमंत, तर दुसरी साधी पण सारख्याच चेहर्‍यामोहर्‍याची अगदी तस्सच.
महाराष्ट्रातील सगळ्यात आखीव रेखीव गावांमध्ये किर्लोस्करवाडीचा पहिला नंबर येण्यास काहीच हरकत नाही. हे गावच मुळी कारखान्याभोवती नियोजित पध्दतीने वसवले गेले आहे. हडप्पा संस्कृतीत सर्व रस्ते काटकोनात छेदत होते म्हणजे नक्की काय प्रकरण होते हे प्रत्यक्ष या गावातील रस्ते बघून समजले. वर्षातून एकदा तरी किर्लोस्करवाडीला जायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. द्राक्षांचे मळे एकापाठोपाठ दर्शन देवू लागले की समजायचे वाडी जवळ आले. स्थानकावर रिक्षा, टांगे तयार असायचे. रिक्षेची शिफारस आम्ही कधीच करणार नाही हे माहित असूनही बाबा विचारायचे " कस जायचं? रिक्षा की टांगा? "
" टांगाsss टांगाss"
मग हातातला रंगित चाबूक उडवत टांगेवाला म्हणायचा, " ४२६ टोपकर नां? चला सोडतो "
त्याच्याशेजारी कोण बसणार यासाठी स्पर्धा व्हायची. अंगभूत चापल्याच्या अभावामुळे मला बरेचदा मागे बसावे लागे. दादा ती ’पेशल’ जागा पटकवायचा. हे पुढे बसणे खरचं मजेदार असे. तो टांगेवाला रंगित चाबूक फ़िल्मी पध्दतीने हवेत फ़िरवायचा. टांग्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजात घोड्यांच्या टापांचा आवाज मिसळून जाई. खूप छान वाटायचे ते ऎकताना!
टांगेवाले काकांच्या "हुर्याss च्याक च्याक " केल्याने आणि जोराने लगाम उडवल्यानेही घोडा आपली गती अजिबात वाढवत नाही हा माझा वैयक्तीक शोध होता. रस्त्यावर फारशी गर्दी नसायचीच, त्यामुळे टांग्याच्या रबरी भोंग्याचा तसा उपयोग व्हायचा नाही. मग घर आल्यावर तो जोरजोराने वाजवून टांगेवाले काका पाहुणे आल्याची वर्दी देत.
एका कॉलनीतील घरे एकसारखी असत. गावातल्या गावातही आत्याला काहीवेळा कॉलनी, पर्यायाने घर बदलावे लागे. तिच्या प्रत्येक घराभोवती फुलवलेली सुंदर बाग सोडताना तिला परम दुःख व्हायचे. अगदी चित्रातल्यासारखी दिसणारी ती घरे फार सुरेख असायची. बहुतांशी घराबाहेर आंबा, नारळाची, शेंगांची झाडे सावली धरायची. घ.नं. ४२६ हे विशेष लक्षात राहीलेले. त्याच टॉयलेट मात्र घराबाहेर, मागच्या बाजूला होत. या वाटेवर नागमोडी रांगोळी काढल्यासारखे फरश्यांचे तुकडे टाकलेले होते. या निळ्या घराच्या मागे जंगलाची सुरवात होत होती. त्यामुळे मोरांचा केकारव तर अखंड कानी पडायचा. बरेचदा मोर परसदारी भटकायलाही यायचे.
भरपूर पदार्थ आणि गप्पा यातून वेळ मिळाला की खेळायला पळायचे. वरणभातातल्या मुलांबरोबर खेळताना खूप मजा यायची. ’ए चकली’ ’ए टकलू’ ही तिथली परमोच्च शिवी. कोल्हापूरी शिव्यांपुढे हे म्हणजे टिपू सुलतानने लिलिपुटच्या राजाबरोबर केलेली लुटूपुटूची लढाईच!
शेजारच्या दयानंदच्या आईला, ’दयानंदची आई’ म्हणूनच ओळखले जायचे. दयानंद हा खूप व्रात्य मुलगा होता. खाली पडलेल्या किंवा दगड मारुन मुद्दाम पाडलेल्या शेंगा चेचून त्याचा चेंडू बनविण्याचा कार्यक्रम असायचा. मग क्रिकेट! त्याचा तो चेंडू वाळेपर्यंत आमची परत निघायची वेळ यायची.
वाडीतल्या हवामानाने कधी आम्हाला आजारी वगैरे पाडले नाही तरी, तिथल्या एकमेव डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली ती ’फिटनेस सर्टिफीकेट’ आणण्यासाठी. तिथल्या पोहण्याच्या तलावाचा पास मिळवण्यासाठी, हे आवश्यक होते. गोळे डॉक्टर अगदी परदेशी माणसासारखे दिसायचे. उंच, गोरेपान.
" आता तुझा रक्तगट कळण्यासाठी तुझे रक्त घेतले पाहिजे "
" मला महिती आहे, ऒ " घाबरुन त्यांच्या हातातील सुई कडे पहात मी ठोकून दिले होते.
" अगं, पण ऒ पॉझिटीव्ह का निगेटिव्ह? "
उत्तरादाखल ’तडजोड करा ना आता काहीतरी’ या नजरेने मी त्यांच्याकडे पाहिले.
" ठिक आहे. ऒ पॉझिटिव्ह लिहतो "
त्यांना आवश्यक ती कृत‍‌‌ज्ञता दर्शवून सर्टिफीकेट हातात घेतले आणि मग कुठे तो पास मिळाला.
वाडीतल महिला मंडळ भलतच सक्रिय होतं. सणावाराला कार्यक्रम, स्पर्धा असायच्याच पण त्याव्यतिरिक्तही अनेक उपक्रम व्हायचे. काचेच्या नोटीसबोर्डवर नवनविन घोषणा जाहीर व्हायच्या. माझी आत्या बहुतेकदा पहिल्या तीन क्रमांकात असायची. शाळेत न मिळालेल्या बक्षिसांचा तिने इथे पुरेपुर वचपा काढला.
गावाच्या मध्यभागी मारुतीच देऊळ आहे. संगमरवरी गोंडस मारुती मी प्रथमच पाहिला. आत्याची अक्करकी असायची तेव्हा १२१ दिवे एकदम उजळून गेलेले फार सुंदर दिसायचे. त्यातल्या काही वेड्यावाकड्या दिव्यांना माझाही हातभार लागलेला असायचा. ती दुखर्‍या पायांनी प्रदक्षिणा घालायची तेव्हा, तिच्याऎवजी मी घातलेल्या प्रदक्षिणा मारुतीला नक्कीच चालतील हा मुद्दा तिला पटायचाच नाही.
आत्या, काकांनी किर्लोस्करवाडी सोडून आता बरीच वर्षे झाली. वाडीचा विषय निघाला तरी ती हळवी होते. आता म्हणे तिथे टांगे वगैरे नसतात. जुळुन आलेले मैत्र, जुन्या ओळखी कुठे कुठे बदली होऊन गेल्या. अतिशय शांत, सुसंस्कृत, रेखिव गावातली काही वर्षे तिच्या मनात गुंतून बसली आहेत. उगाच का माहेरच्या गावापेक्षा हे गाव प्रिय वाटते..?

Wednesday, October 14, 2009

आणखी एक मत

काल मतदान केंद्रात दुपारी दीडच्या सुमारास थोडाफार आळसावलेलाच माहौल होता. थोड्या कंटाळलेल्या मतदारांच्या रांगेत एक मध्यमवयीन माणूस आणि मिश्कील पोलीस यांनी हास्याची कारंजी उडवून दिली. झाले होते काय, की या माणसाने प्रवेशद्वारी मतदार क्रमांक तपासायला टेबल टाकलेले असते, तिथून हलायलाच वीस पंचवीस मिनिटे घेतली. प्रत्येकाला तुम्ही कुठे राहता? त्या देवळाच्या मागे होय? आपली खास ओळख आहे, आठवतय का? अस विचारुन भंडावून टाकत होता. आता या दारु पिऊन आलेल्या पात्राला ओळख द्यायला लोकं बिचकणारच! काही माणसांनी तिथून त्याला घालवले. थोडा नॉर्मल झाल्यावर तो आत आला आणि मोठ्या आवाजात पाण्याच्या, रस्त्याच्या तक्रारी सांगू लागला. त्याच्याकडे नजर टाकून दोन पोलीसांची नेत्रपल्लवी झाली आणि त्यातील एक याच्या मागोमाग आला. आता या दोघांचा संवाद फार मजेशीर होता. प्रथम पोलीसांनी विचारले,

" काय मतदानाला आला वाटतं? "

" मग्गं, इत काय भाजी इकाया बसलेत? "

" तस नव्हे साहेब, आपल्यासारखे व्यस्त लोकं, विसरतात कधीकधी "

" *** आपला खास मानूस आहे, आपन खार्‍याची जेवनं उडवनार, स्वत्ता भाषणं देनार, त्यांच मत्व पटवनार आनी जित्तून आननार "

" मग तर निवडून आलेच ते! "

" मला रांगेतन फुड जाऊ द्या "

" अहो थांबा, तुम्ही रांगेतून जायच शोभत काय? थांबा जरा "

" थांबतो, थांबतो चांगला संध्याकाळपर्यंत थांबतो. xxx,  इतकी वर्षे मद्दान केलं, पन कोनी अस आडावल नाय "

" अहो साहेब, रागावू नका तुमच्यासाठी काही थंड आणू का? आज येताना घेउन आलात ते आणण्याची व्यवस्था करु का? "

" नगं, तुमी विचारलात हेच खूप आहे "

" आपल्याला इथ बाकड्यावर बसल तर चालेल ना? की माझ्या ऑफिसमध्ये नेऊ? "

" म्हंजे काय तुरुंगात घालता का काय मला?

" काय साहेब, *** चे पाव्हणे तुम्ही, तुमाला कस तुरुंगात घालणार? पण माझा हिसकाच असा आहे ना, की तुरुंगाच्या आधी हॉस्पिटलातच जावं लागत बगा! त्यामुळ दंगा करु नका. गुमान मतदान करा आणि लवकर चालते व्हा. "

लोकांनी पटकन त्याला पुढे जाऊ दिले. नशेत कोणतेतरी बटन दाबले गेले,  आणि आणखी एक मतदान झाले..!

Monday, October 12, 2009

शिल्पा

कॉलेजच्या पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन ऑफीस बाहेर हिss गर्दी.. बावरलेलं फ़र्स्ट इयर, जरा आत्मविश्वासी सेकंड इयर, निर्ढावलेलं थर्ड इयर आणि बेफ़िकीर फ़ायनल इयर.. सगळी मंडळी उपस्थित होती. एक उंच मुलगी रंग गेलेल्या खांबाला रेलून उभी होती. एवढ्या गर्दीत तिच्याकडेच का चौकशी करायला गेले सांगता नाही येणार, पण मी काही विचारायच्या आधीच तिने सांगितले, की फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना उद्या रजिस्ट्रेशन करायला सांगितले आहे. मला वाटतं आमच्या समविचारांची सुरवात तिथेच झाली असावी.

काही दिवसांनी ती वर्गात दिसली. हो म्हणजे दिसलीच! जुजबी बोलण्यापलीकडे ओळख गेली नाही. तशी ती एकटीच असायची. काहींनी ती मिसळत का नाही पासून विचित्रच आहे पर्यंत कारण नसताना शेरे मारले पण तास संपल्यावर चालणार्‍या फ़ुटकळ गप्पांमधे तिला खरचं रस नव्हता. माझ्या एका इंग्रजाळलेल्या मैत्रिणीपुढे मी ’मराठीतील सौंदर्यस्थळे’ या विषयावर घसाफोड करत असताना तिने प्रथमच संभाषणात भाग घेतला. आवडत्या विषयावर शिल्पा भरभरुन बोलते, नव्हे माहितीपूर्ण आणि विनोदीही बोलते हा शोध नविन होता. सोबत मिळाल्यावर मीही मराठीला माफक विरोध करणारीला हाणून घेतले.

" आय डोन्नो तुमी लोकानी आज मलाच काय पकडलयं " म्हणून तिने माघार घेतली आणि शिल्पा बरोबर दुसर्‍या गप्पा सुरु झाल्या. विषयांतर होत होत राधाचा विषय निघाला.

" अगं शिल्पा, तुला याबद्दल काही माहिती आहे का, राधाकृष्ण जोडून नाव येते पण राधेच्या अस्तित्वाचा महाभारतानंतरच्या अनेक वर्षांनंतरच्या ग्रंथांमध्ये उल्लेख नाहिये. काही ठिकाणी असे काही ऎकले तरी लोक मारतील.. पण राधा इतकी जिवंत आहे की तिचे अस्तित्व नाकारणे धाडसाचे होईल. "

" खरं आहे. मी पण वाचलय की ही काल्पनिक व्यक्ती असावी पण लोकांवर या गोष्टीचा पगडाच इतका आहे की, ती नव्हतीच हे जरी सिध्द झाले तरी पचनी बाकी पडणार नाही. "

" खरी असो नसो, पण ही व्यक्तीरेखा किती गोड आहे नं.."

कँटीनमधे इंग्लिश चिमणी कडून 'हाउ कुड यू' ने सुरु होणारं कोणत तरी वाक्य येणार याची खात्री होतीच !

" तूमी पयल्यांदाच राधाच्या एग्झिस्टंट बद्दल कसे बोलू शकता? "

" अगं, जाउदेत तिला बरीच महिती आहे म्हणून विचारल "

" पण इतका वेळ मी काय करायचं? वर आणि मलाच बंबार्डींग केलंत "

" मग, मराठीत इतक काय आहे? असं का म्हणालीस? "

यानंतरही काही वादग्रस्त काही हलक्या विषयांवर गजाली होत राहिली. वाचनाव्यतिरीक्तचे तिचे व्यसन म्हणजे परिक्षा! उद्या माझा अमुकतमुक पेपर आहे हे वाक्य ऑडिओ सिग्नल्सनी बरेचदा माझ्यापर्यंत पोहोचवले आहे. ती अभियांत्रिकी शिकत आहे, बी. ए. पूर्ण केले आहे, बहिस्थ एम. बी. ए. करीत आहे. परवा एल.एल.बी.च्या प्रवेशासाठी खटपट करीत असल्याचे सांगत होती. त्यामुळे दर महिन्याला यांपैकी एका तरी विषयाचा पेपर असतोच. भरतनाट्यमची प्रथम परिक्षा आपल्यापेक्षा खूप लहान मुलींबरोबर देणे सोपी गोष्ट नाही. खेरीच प्रचंड वाचन, प्रवास, बागकाम, इतर उचापती चालूच असतात. जरबेरा घरच्या बागेतसुध्दा लावता येतो हे मला तिच्या बागेतली रंगिबेरंगी फुले बघेपर्यंत माहित नव्हते.

चंद्रपूरच्या आनंदवन आश्रमात राहण्याची तिला खूप इच्छा होती. मला तिच्याबरोबर जाणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर ती थोडी नाराज झाली. उत्तमोत्तम गोष्टी शेअर करण्याच्या भावनेने आमची मैत्री अधिक घट्ट केली. तिने हट्टाने मला वेगवेगळी पुस्तके वाचायला लावली. सुंदर चित्रपट दाखवले. Come September मी आपणहून कधी पाहिला नसता, तिने अगदी बघच म्हणून डिव्हीडी आणून दिली. शिल्पाने दिलेल्या पुस्तकांपैकी लक्षात राहिलेले एक म्हणजे ’चौघीजणी’. त्यावेळी परिक्षा अगदी तॊडावर होती. संध्याकाळी घाईघाईने घरी येवून तिने माझ्या हातात हे पुस्तक कॊंबले.

" आईने यावेळी मला अभ्यासाव्यतीरिक्तची पुस्तके वाचताना बघितले तर, परत कधीच ती पेपर पण वाचू देणार नाही, आणि पूर्ण वाचल्याशिवाय मला रहावणार नाही "

असे म्हणून हे कोलीत माझ्या हातात दिले आणि माझ्या परिक्षेचे तीन तेरा वाजले.

समान आवड हा प्रमुख धागा असला तरी मतभेद होतच नाहीत म्हणता येणार नाही. तिला कार्टून्स आवडत नाहीत, शाहरुख खान (अजूनही) बरा वाटतो, कधीतरी खूप आवडलेले चौघीजणी आता बाळबोध वाटते. ’कियानू रिव्ह्ज’ सर्वात देखणा अभिनेता (?) आहे ’ हे म्हणणे ती अजून माझ्या गळी उतरवू शकली नाही हे माझे यश मानते. कधीकधी तिच्या वागण्यात बेफ़िकीरीची झाक येते. अगदी काळजी वाटण्याइतपत! इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरला मॅथ्सचा अभ्यास करुन जाणारी, आणि त्याबद्दल विनोद करणारी माझ्या बघण्यातली ही पहिलीच. तिला रागावले तर निमूटपणे ऎकून घेते पण तशी पुन्हा वागणार नाही याची खात्री देता येत नाही.

शिल्पाला विचित्र म्हणणार्‍यांना ती नक्की कशी आहे हे समजावण्याच्या भानगडीत कधी मी पडले नाही, किंवा तिलाही याची फारशी पर्वा नव्हती. ज्या मैत्रीत आपण कसे आहोत, कोण आहोत ते दुसर्‍याला समजावून सांगावे लागते, ती खरी मैत्रीच नव्हे.
आधीच्या एका पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अभावितपणे मिळणार्‍या गोष्टींचा विशेष आनंद असतो. त्याला आणखी जोडून सांगायचे तर, अनपेक्षित, वेगळ्या आणि सुंदर गोष्टींमध्ये शिल्पाच्या मैत्रीचा नंबर खूप वरचा आहे.

Tuesday, September 22, 2009

पुस्तकातल्या जागा

कुठल्याशा दिवाळी अंकात आजोळच्या कानडी वाड्याचे वर्णन आले होते. लेखक श्री. जोशी, प्रथम नाव जाम आठवत नाहिये पण तपशिल लख्ख आठवतोय. पाय धुवायच्या छोट्याशा चौकोनापासून आजोबांची बैठक तिथला लाकडी झोपाळा, कोठार, आज्जीची खोली, देवघर, स्वयंपाकघर, परसदारी फ़ुललेली शेवंती केळी, विहीर अगदी ऎसपैस चौसोपी वाडा होता तो!


खूप वाटलं तिथे एकदतरी जाऊन याव. बरेचदा असं होतं. पुस्तकात वाचलेल्या अशा अगणित जागा असतात जिथ आपल्याला उपस्थित रहावस वाटतं. हॅरी पॉटरला नाही का ’ चेंबर ऑफ़ सिक्रेट ’ मधे डायरीत जाऊन जुनं हॉगवर्ड पहायला मिळाल? तशी संधी आपल्यालाही मिळाली तर? प्रथम कुठे जायचय बरं मला? हो, ज्योच्या खोलीत! तीच ती माळावरची छोटीशी खोली. ज्योने आपली पहिली गोष्ट इथेच लिहली, तर्‍हेतर्‍हेची नाटके बसवली, पिकविक क्लबची सदस्यता लॉरीच्या गळ्यात मारली. बाकीच्या तिघी बहिणींना चकवून लॉरी जेव्हा कपाटात लपून बसला होता आणि धुळीने खोकत माकत बाहेर आला तेव्हा त्या दोघांना पोटभरुन हसताना पहायचय!२२१ बेकर स्ट्रीटला भेट देता आली तर होम्सचे घर बघेनच, पण त्याच्या खोलीतला तो खास ड्रॉवर पण उघडून बघेन. त्यात त्याच्या आवडत्या वस्तू ठेवल्या आहेत म्हणे! बदकाच्या पोटात मिळालेला निळा महागडा खडा, लहान मोठी भिंग, त्याच जुनं सोन्याच्या चेनचं घड्याळ, सिगार, पत्यांची डायरी आणि हो, आयरीन ऍडलरचा फोटोसुध्दा... फारयप्लेसजवळ उभं राहून विचार करण्याची त्याला भारी खोड. त्याशेजारी पुस्तकांनी भरलेल कपाट आणि थेट रस्त्यावर नजर ठेवणारी खिडकी. वस्तूंची थोडी भाऊगर्दी झाल्यासारख्या त्या खोलीत दोघा मित्रांनी बनवलेल्या गुप्त योजनेत मलाही सामिल होता आले तर काय मजा येईल!


कार्व्हरची डायमंड ग्रोव्हमधली बाग आणि अलाबामा मधली चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली छोटी प्रयोगशाळा लssयं भारी असेल नाई? ’लाईफ़ ऍन्ड डेथ इन शांघाय’ मधील निएन चेंगच शांघायमधल मोठ्ठ घर, माओवाद्यांनी नासधूस कारायच्या कितीतरी आगोदरचं! एकदातरी जाता यावं तिथे.


पुलंच्या चाळीत जायची तर कित्ती कित्ती इच्छा आहे म्हणून सांगू? तशी बेळगावातल्या रावसाहेबांच्या बंगलीत संध्याकाळी जो अड्डा जमायचा तिथे दोन घटका जरी जाता आले तर अजि म्या ब्रह्म पाहिले असे होऊन जाईल.. काय भन्नाट जागा असेल ती! ते पान आठवले तरी बेळगावातली गार झुळूक अंगावरुन जाते.


शांताबाईंनी वर्णन केलेली माजघरातली खोली.. भरदुपारी गच्च करडा अंधार असणारी, गौरीच्या सणात पुरुषांच्या पंगतीमागून आरामात पुरणपोळी जेवून उठलेली बायकांची पंगत. डोळ्यांवर झोपेची गुंगी असूनही ’त्या’ बाईबद्दल हलक्या आवाजात बोलत माजघर जाग ठेवणार्‍या बायका. धान्याच्या पोत्यांमधे झोप घेणार्‍या बायका आणि आईला खेटून बसलेली छोटी शांता किती मजेशीर दिसत असेल नाई? मीही तिथे एक डुलकी मारुन यावी म्हणते!


’साद देती’ मध्ये वर्णन केलेली ती अद्भुत गुहा, बर्फाळ डोंगरातली उबदार स्वच्छ जागा.. वाघार्जिन, गरम दूध, वृध्द योगी काय सुंदर लिहल आहे याबद्दल! आपली काय पात्रता नाहिये बॉ तिथे जायची पण दोन क्षण जरी त्या गुहेत डोकावायला मिळेल का? अरविंद, योगानंद यांच्या साध्या शांत घरांच्या वर्णनात खासचं साम्य आढळतय. त्यांच्या अस्तित्वाचा वास्तूवर नक्कीच परिणाम होत असणार..


काळ आणखी मागे नेता आला तर थेट चाणक्यांची खोली पहायची इच्छा आहे. जिथे राजकीय कामासाठी राजाच तेल समईत जळत आणि खाजगी कामासाठी स्वखर्चाच! सुटलेल्या शेंडीची गाठ नक्की कुठे बांधली गेली माहित नाही पण इथे कोण्या एका रात्री आपल्या मोकळ्या केसांवरुन त्यांचा खिन्न हात नक्कीच फ़िरला असेल. विषकन्येला पाठवण्याचे खलबत इथेच ठरले असेल, राजमुद्रेचे खोटे खलिते तयार केले गेले असतील. किती गुप्त आणि सुरक्षित असेल ते आर्य दालन.


आता तर खरच लोभ सुटला आहे. इथे तिथे म्हणता म्हणता प्राचिन काळात जाण्याचे धैर्य आले की! तसे झाले तर, द्वारकाधीश कृष्णाच्या राजदरबारात उपस्थित राहता येईल का? वैभवात न्हायलेली ती कृष्णविभोर वास्तू काय देखणी असेल! पांडवांच्या मयसभेचे इतके कौतुक नाही जितके द्वारकेच्या कृष्णदालनाचे आहे. तिथे दान धर्म, यज्ञ याग घडले असतील, कोण्या कौरवाला समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या गेल्या असतील, द्रौपदीला सबूरीचा सल्ला दिला गेला असेल, कुणी सांगाव, तिथे अष्टनायिकांचा दुस्वासही झिरपला असेल!


गंमत म्हणजे व्यासांचे मूळ महाभारत अजून मी वाचलेलेच नाही पण महाभारतावरील टिका, त्याचा उत्तरार्ध, आणि त्यासंबंधीत बरीच काल्पनिक, वास्तव पुस्तके वाचली गेली. देसाई, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, वैद्य, पानसे यांनी महाभारतातील व्यक्तीच नव्हे तर शहरं वास्तूही बारीकसारीक तपशिलांसकट जिवंत केल्या आहेत.


काही वास्तव काही काल्पनिक अशा ह्या सगळ्या जागा आपण मनाने फ़िरुन आलो आहोत. खरचं काय भन्नाट आहेत हे लेखक! जादूने वा तत्सम प्रकाराने या ठिकाणी जायला मिळो न मिळो पण या लोकांच्या लेखणीच्या जादूने या जागा आणि जगाची सफ़र झाली आहे हे नक्की..!


काही वर्णनात्मक भाग व संदर्भासाठी साभार :-
चौघीजणी- शांता शेळके (Little Women- Louica Alcott), The Adventures of Sherlock Homes - Arthur Canon Dyan, एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर, पु.ल. देशपांडे- (सांगणे न लागे तरी पण) बटाट्याची चाळ व व्यक्ती आणि वल्ली, साद देती हिमशिखरे- श्री प्रधान, योगी कथामृत- परमहंस योगानंद, महाभारतातील व्यक्तीरेखा- श्री पानसे.

Friday, August 28, 2009

राजे

शेजारची रिद्धी गणपतीसाठी म्हणून कोल्हापूरला आली आहे. ती कराडला राहते आणि के.जी मधे आहे. बोबडं बोलत, आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतल्यावर ती नेहमीच्या गप्पांकडे वळली.

" आमत्या शालेत शिवाजीराजे भोसलेंचा पिक्चर दाखवला " हातातल्या पेढ्याकडे निरखून पहात ती म्हणाली.

" म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तो पिक्चरं ? " मला खरचं आश्चर्य वाटले.

" हं..तोच..ते घोड्यावरुन येतात तोच्च..आनि एक पेढा दे.."

" मगं आवडला का? आणि शिवाजीराजे कोण होते गं ? "

" हिरो.. "

" मग, टिचरने या हिरो बद्दल आणखी काहीच सांगितले नाही?? "

" नाई.. पेढा संपला. चॉक्केट आहे? "

तिला आणखीही खोदून प्रश्न विचारले पण ते फ़िल्म हिरो आहेत या पलिकडे तिला काही माहीत नाहीतसे दिसले. बाहेरुन किंवा घरी तिला राजेंविषयी काही माहिती मिळाली नाही ही गोष्ट अलहिदा ! पण शाळेतही शिक्षकांनी या विषयी काहीच माहिती देऊ नये? मुळात चार पाच वर्षाच्या मुलांना मराठी भाषिकांची दुखरी नस वगैरेवर बेतलेला चित्रपट दाखवणेच मला पटत नाही. त्याविषयी अधिक माहिती देण्याचे कष्टही शाळेने घेतलेले दिसले नाहीत. याचा अर्थ मुलांना फक्त कार्टून फ़िल्म दाखवावी किंवा त्यांना यातले काही कळत नाही असे नव्हे.. पण या संवेदनशील मनांपुढे विषय मांडताना निदान त्याची पूर्वमाहिती मुलांना द्यायला हरकत नाही. याऎवजी शिवाजीराजेंची डॉक्युमेंटरी, त्यांचा लढा यांविषयी कितीतरी सोर्स उपलब्ध आहेत आणि यांविषयी मुलांना माहित व्हायला हवं..
आज्जीच्या मऊ गोष्टींमधून मला शिवबा प्रथम भेटले. नंतर दादाने केरसुणीची तलवार करुन तक्क्या गाद्यांना झोडपून, राजे शत्रूंना कसे मारत असत, याचे प्रात्यक्षिक दाखवले. पुरंदरेंनी तर पुस्तकरुपाने खजिनाच उघड केला.
मुलांनी राजेंना प्रथम गड जिंकताना, दर्‍याखोर्‍या तुडवताना, राज्याभिषेक करुन घेतानाच पहावे अशी आपली माझी उगीचच इच्छा आहे..!

Tuesday, August 18, 2009

शुगरकोटेड

वेळ सकाळची. दाभोळकर कॉर्नरचा सिग्नल. हिरव्या दिव्याची वाट पहात थांबलेले बरेच दुचाकीस्वार, धूर सोडणाऱ्य़ा रिक्षा आणि तुरळक फ़ोर व्हिलर यांनी रस्ता गच्च भरलेला. माझ्या पुढे एक रिक्षा जिच्या मागे 'टेक्सास चिंगळी ’ असे ठळक अक्षरात लिहले होते आणि शेजारी, मागे बाईक्स. त्यातल्याच एका बाईकवरुन आवाज आला.

" जाऊ दे रे रोहन्या, आत्ता काम नाय झालं तर लगेच परत काय जातोस? आयुष्यात अस लगेच हरायच नसतयं भावा. टॉलस्टॉय म्हनतो तस वेळ आनि पेशन्स यांच्याशिवाय काम पूर्न होनार नाय. माजं नाय तर त्याच तरी ऎक! "

मी मघाशी बघण्यात चूक केली की काय अशी शंका वाटून शेजारच्या बाईकवर बसलेल्या जोडगोळीकडे पुन्हा नजर टाकली. लाल भडक पट्यापट्याचा टी शर्ट, त्यावर पिवळ्या फ़ुलांची नक्षी, मागे चंदेरी रंगात मॅग्नस की असच काहीस लिहलेलं. विटलेली जिन्स, कंगव्याशी फ़ारसं सख्य नसल्याच दाखवणारे केस, चेहऱ्य़ावर बेफ़िकीरीचा भाव आणि या ड्रायव्हारला साजेसा त्याच्यामागे एवढस तोंड करुन बसलेला रोहन्या!
या छोटेखानी मुलाकडून टॉलस्टॉय वगैरे शब्दांची अपेक्षाच नव्हती. आयुष्यावर टिपणी तर नाहीच नाही. त्यांच्या पुढच्या संवादाची मला भयंकर उत्सुकता होती पण सिग्नल सुटला आणि उजवीकडे उभी असलेली तमाम वाहने इंडिकेटर न दाखवता डावीकडे वळाली. नंबरप्लेटवर भगव्या रंगात ’ सिंहगर्जना ’ असे लिहलेली ही बाईकही भरधाव वेगाने स्टॅंडच्या दिशेने गेली.
पुढे दिवसभर हाच प्रश्न घुमत राहिला की आपण किती वरवरचा विचार करतो. काहीच्या काही ठोकताळयावरुन अंदाज बांधतो. सुंदर दिसण्याचा वगैरे हा मुद्दा नाहीच आहे. पूर्वग्रह किंवा काही वेगळ्याच कल्पना म्हणजे खूप हुशार विद्यार्थ्याने चश्मिस असलेच पाहिजे वगैरे मनात पक्क्या बसलेल्या कल्पनांविषयी आहे. फ़र्स्ट इंप्रेशनसाठी नेटके रहाणे चांगलेच पण तेवढ्यावरुन दोन चार मिनटात कुणाबद्दल पक्के मत बनवणेही बरोबर नाही. तसेही काय आपण फ़क्त ब्रॅंडेड वस्तूच वापरतो हे वारंवार सांगणारे आणि आत्मस्तुतीत दंग असणारे नमुने आजुबाजुला असतातच की! मग माणसे ओळखयची कशी ? श्रीयुत गोडबोले आतून श्रीयुत कडू असतीलही. मग बाह्यदर्शन आणि स्वभाव यांच्यात कायम तफ़ावत असते का? नाही तसेही नाही. व्यवस्थित छान असणाऱ्य़ा आणि स्वभावानेही गोड असणाऱ्य़ा माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत. म्हणजे उंट झाडपाला खातो म्हणून भाज्या खाणारे सगळेच उंट नव्हेत.

एक कुतुहल म्हणून बॉडी लॅंग्वेज आणि ’चेहऱ्य़ाच्या ठेवणीवरुन स्वभाव ओळख’ असली काही पुस्तक वाचून काढली होती. त्यात लिहले होते, भुऱ्य़ा डोळ्यांची आणि घारोळी माणसे जरा ड्यांबिसच असतात. घरी भुऱ्य़ा डोळ्यांचा सुकाळ असल्याने ही कल्पना मला अर्थातच पटली नाही. पुढे लिहले होते काळेभोर डोळ्यांचा धनी प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतो. आपली कामेही खुश्याल दुसऱ्य़ावर ढकलुन ऎन आणिबाणीच्या वेळी बॉसच्या तोंडी तिसऱ्य़ाच व्यक्तीला देणाऱ्य़ा काळ्या डोळ्याच्या (आणि रंगाच्या) सहकाऱ्य़ाने ही संकल्पना फ़ोल ठरवली. एकुणच काय, चकाकणारं सगळच सोनं नसत आणि ओबडधोबड खडकातही स्वच्छ झऱ्य़ाचं वास्तव्य असत म्हणतात ते खोटं नाही. कोणी कसं रहाव आणि कस असाव याला काही कोष्टक नाहीये. भल्या बुऱ्य़ाचा अनुभव प्रत्येकजण यथा शक्ती देतच असतो, त्यामुळे पूर्वग्रह न बाळगणेच चांगले.

ता.क. : १) एक गंमत म्हणून नमूद करावेसे वाटते की ’टेक्सास चिंगळी’ च्या उपशाखा टेक्सास बंटी, टेक्सास इंगळी सुध्दा बघायला मिळतात.
२) पोस्टचे शीर्षकच सुचत नव्ह्ते त्यामुळे ते आणि मूळ विषय भरकटला असल्यास चू.भु.द्या.घ्या.
 
 

Friday, July 31, 2009

सहवेदना

" तुमच्या घरी कोण कोण असत लीलाबाई? "
" म्यॅडम, मला येक ४० किलोची मुलगी आनि ७० किलोचा मुलगा हाये "
ऑफिसमधल्या मावशीबाईने अशी भाज्यांच्या घाऊक दरात आपल्या मुलांची ओळख करुन दिली, तेव्हा मला फार गंमत वाटली होती.
" माज्या मुलीच नाव गंगा. किती पवित्र नाव..हाय की नाय? पर पोरगी म्हनते, तुला दुसर मॉडर्न नाव मिळाल न्हाय का? हे काय बोलन झालं? " लीलाबाईची कौतुकमिश्रित तक्रार!
तसे तिचे तिखट कान आणि बारीक लक्ष ऑफिसमधल्या सगळ्या घडामोडी टिपकागदाप्रमाणे टिपतात. मागच्या सहाएक महिन्यात तिच्या रजा वाढल्या,चेहऱ्य़ावरच्या सुरकुत्याही वाढल्या. ऑफिसमधल्या राजकारणात स्वारस्य वाटेनासे झाले. तरी त्यातून मागच्याच आठवड्यात ’ तो अकाउंटंट का कोन आहे ना, रिघेबाई जायच्याच येळेला कसा भायेर पडतो ’ अशी टिप्पणी करायला ती विसरली नाही. तिच्या मुलीला बरं नसत अस म्हणत होती. सारखी चक्कर येते, निदान होत नाही, काय करायचे समजत नाही, नवरा असता तर आधार वाटला असता वगैरे..
या सोमवारी तिची ४० किलोची मुलगी तिच्याबरोबर आली. सोबत रिपोर्टस्, कुणी कुणी दिलेले पत्ते, फोन नंबरचे चिटोरे, डोक्यात घुमणारे सल्ले...घडिभर बसून मुलीची ओळख वगैरे झाली.
" आता अस बगा म्यॅडम, हात पाय मोडला असता म्हंजे नीट तर करुन घेतला असता. पर हिला येकटी सोडायची सोय नाय, फ़ीट असेल अस वाटतय. सिटी स्कॅन झाल, रक्त तपासल पन अजून निदान न्हाय! डोंगरायेवडा खर्च..."
तिची मुलगी खोलीच निरीक्षण करत बसलेली. आणि अगदी अनपेक्षितपणे लीलाबाई हसली.. मी आणि वर्षाने पट्कन एकमेकींकडे बघितलं." पर बाकी लोकांनी काय काय प्रकार सांगितलेत, त्यापरिस बरं! आमच्या शेजारच्या माणसाने सांगितल की त्याचा पाव्हणा आंघोळ झाली की, दर तासाला चक्कर येऊन पडतो. काय पन बाई..." आता तिच्याबरोबर तिची मुलगीही हसू लागली.
हसणे इतके भयाण असू शकते?
अडचणी, मनस्ताप यांनी वैतागणारी माणसे पाहीलीत. पण् अनिश्चिततेच्या टप्प्यावर शंकांनी भरुन गेलेल्या मनात काय काय विचार आले असतील आणि ती हसली असेल?
हे हिमनगाचे टोक तर नसेल? की ’मी सहवेदना अनुभवली’ अशी बढाई मारणाऱ्य़ा माझ्याच यःकिंचीत मनाला हसली?
चट्कन तिच्याकडे नजर गेली.
अंगभर दाटून राहीलेली काळजी आणि डोळ्यात नसलेली अदृश्य गंगा आता स्पष्ट दिसत होती..

Monday, July 20, 2009

मोअर दॅन वर्ड्‌स...!!

अभावितपणे मिळणारय़ा गोष्टींचा काही विशेष आनंद असावा. मागे एकदा कधीतरी असचं टाईमपास म्हणून चॅनेल फ़िरवत असताना 'More Than Words' हा नितांत सुंदर चित्रपट पहायला मिळाला. मूळ जर्मन भाषेतला इंग्लिश डबिंग केलेला हा पिक्चर साधेपणातल सौंदर्य पुन्हा एकदा सांगून गेला..
कॅथरीन ही मूळची शिल्पकार पण पेशाने दारं खिडक्या तयार करणारा छोटा कारखाना चालवणारी साधी स्त्री. तिच्या या कारखान्यात १४-१५ कारपेंटर आहेत. जे नेहमी टिंगल व टाईमपास करण्यात धन्यता मानतात आणि त्यांच्यावर खेकसणारा तिचा तिरसट पार्टनर! ह्या सगळ्यांबरोबर काम करायचे तर कोरडेपणाने वागाय़चे हिने पक्के केलेले. नेहमी पुरुषी कपड्यात वावरणारय़ा कॅथरीनकडे कुणाचे लक्षही जात नसे! पण आपल्या घरी आल्यानंतर तिचे विश्व जणू बदलून जाई. कॉफ़ीचे घुटके घेत तासन्‌तास पुस्तके वाचत असताना अर्धी रात्रही उलटून जात असे. स्वतः कलाकार असणाऱ्य़ा कॅथरीनला तरल भावनांची जाणीव असते, साहित्याचे वेड असते. तिच्या आयुष्यातली आणखी हळवी जागा म्हणजे तिची सुंदर मैत्रिण मेरी! ही फ़िजीओथेरपिस्ट म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करीत असते. ती कॅथरीनला भेटायला बरेचदा तिच्या कारखान्यात चक्कर टाकीत असे.

'जेकब स्टेनर’ हा सिव्हील इंजिनीयर एक भव्य किंमती कलाकृतीची दुरुस्ती आणि चौकटी करण्यासाठी कॅथरीनच्या कारखान्यात येतो. तेव्हा त्याच्या बुध्दीमत्तेची, इतरांहून वेगळ्या प्रगल्भ व्यक्तीमत्वाची जाणीव होवून कॅथरीन त्याच्यात गुंतत जाते पण कोरडेपणाचा बुरखा ती काढू शकत नाही. दरम्यान योगायोगाने जेकबची मेरीशीही भेट होते व ती कॅथरीनला तिच्यावतीने जेकबला पत्र लिहण्यासाठी गळ घालते. साहित्य, कविता, उत्कट लिखाण यांच्याशी काडीचाही संबंध नसलेल्या जिवलग मैत्रिणीच्या आग्रहास्तव तिच्या वतीने कॅथरीन जेकबला खूप सुंदर भावनेने ओथंबलेली पत्रे लिहते. नकळत स्वतःचे मनच उघडे करते. जेकबही त्या सुंदर अक्षरात लिहलेल्या भावस्पर्शी पत्रांमुळे मेरीला भेटतो पण नंतर अशा काही गोष्टी घडत जातात की खरी गोष्ट कॅथरीनला कबूल करावी लागते.

हाताबाहेर जाणारय़ा गोष्टी व मनस्ताप यांमुळे ती कारखान्याचे काम आपल्या पार्टनरच्या हाती सोपवते. जेकबलाही खरया गोष्टी कळतात. आपण सुंदर मेरीच्या नव्हे तर सुंदर पत्रांच्या, सुंदर विचारांच्या प्रेमात असल्याचे तो कॅथरीनपाशी कबूल करतो.
कॅथरीनने लिहलेली काव्यात्मक पत्रे, सुंदर आणि तरल संवाद चित्रपटाची प्रमुख वैशिष्टे म्हणता येतील. अभिनय आणि अनावश्यक गोष्टींना फ़ाटा या आणखी जमेच्या बाजू. अगदीच कुठेतरी उन्नीस बीस झालय, पण दुर्लक्ष करायला हरकत नाही.

’ मुझसे दोस्ती करोगी ’ या अतिशय टुकार हिंदी चित्रपटाची मुळ कल्पना याच संकल्पनेवरुन उचलल्यासारखी वाटते. दुर्दैवाने या चित्रपटाच्या कलाकारांची नावे कळू शकली नाहीत इंटरनेटवर खूप शोधले पण फ़िल्म साईट किंवा इतर काहीच माहिती मिळाली नाही. पण फ़िरंगी चॅनेल (?) वर हिंदी डबिंग उपलब्ध आहे. हे भाषांतर बरच चांगल वाटतयं. त्याचा प्रिव्हयू मात्र मिळाला. बघू डिव्हीडी मिळण्याचा योग कधी आहे ते..!


Tuesday, July 7, 2009

आमची (न घडलेली) संगीतसेवा..!

'' तुला माहित नाही पण क्लास मधे मी एकदा का मेंडोलीयन वाजवू लागलो ना, की सगळे नुसते ऎकत राहतात..!"

माझा मोठा भाऊ राहुल एखादे गुपित सांगावे तसे खाजगित सांगत असल्याचे मला आठवते . पुढे पुढे क्लास मधले ’ते सगळे’ नुसते हतबल होऊन ऎकत असतात हे माझ्या लक्षात आले. साधारण १९९५-९६ च्या सुमारास DDLJ रिलीज झाला तेव्हा माझ्या दादाने inspire होऊन मेंडोलीयन शिकण्याचा मनापासून प्रयत्न केला होता पण त्या शिकण्यात learning कमी आणि shining ज्यास्त असल्याने ते वाद्य त्याला फारसे प्रसन्न झाले नाही. पण कॉलेजमधल्या मैत्रिणींवर impression मारण्यासाठी मात्र मेंडोलीयनने त्याला बराच हात दिला असावा. ’ तुझे देखा तो ये जाना सनम ’ हे गाणे शिकण्यासाठीच त्याने क्लास लावला, नविन मेंडोलीयन खरेदी केले आणि प्रक्टिस करुन करुन घरच्यांचे डोके उठवले ! हे गाणे मात्र तो अगदी सुरात सलग आणि स्पीडीली वाजवत असे.

"एवढे सोपे नसते, स्पीडी वाजवणे.."

असे म्हणून त्याच्या बोटांना पडलेले घट्टे तो दाखवायचा.. मी त्याच्या ज्ञानाने आणि कष्टाळूपणाने दिपून जात असे! त्याने मेंडोलीयनवर 'R' अक्षर काढुन चमचमती स्टिकर्स लावून खूप छान सजवले होते. रोज मऊ कापडाने तो मेंडोलीयन पुसून ठेवायचा. पुढे ’ है अपना दिल ’ वर थोडी खटपट करुन त्याने त्या मेंडोलीयनला जी विश्रांती दिली, ती आजतागायत मोडलेली नाही. तसा तो अगदी लहान असताना तबलाही शिकायला जायचा पण त्याने तबला शिकणे हे त्याचे शिक्षक तो आणि तबला या तिघांनाही मंजूर नव्ह्ते.

माझ्या दादाला बऱ्याच गोष्टी करता येतात, तो ऒलराउंडर आहे अशी माझी पक्की समजूत होती. त्यामुळे त्याचे अनुकरण करणे आलेच! मीही नंतरची काही वर्षे मेंडोलीयनवर हात साफ़ करुन घेतला. त्याचे ते टिपीकल ’तुझे देखा तो’ आणि ’है अपना दिल’ त्याने उदारपणे मला शिकवले (त्यावेळी तो फ़र्स्ट इयरला होता आणि आपण खूप अभ्यास करतो हे दाखवण्यासाठी झिरो नंबरचा चष्मा घालायचा )
पुढे कॉलेजमधे गेल्यावर आपणही वेगळे वाद्य शिकावे असे वाटू लागल्याने मी व्हायोलीनचा क्लास लावला. (हो, त्यावेळी मोहब्बते नविन होता ) बेसिक नोटेशन्स आणि भूप राग या नंतर माझा पेशन्स संपला (आमचे सर गाणी शिकवत नाहीत हे मला नंतर कळाले) तोपर्यंत घाईगडबडीने नविन व्हायोलीन ख्ररेदी केले होते, म्हणून मग घरीच गाणी बसवण्याचा प्रयत्न केला(तो फ़सला हे सांगायला नकोच! ) व्हायोलीन हे असे वाद्य आहे, की जे सुरात वाजवले तरच मधूर वाटते.
आता खंत वाटते हे सुंदर वाद्य नेटाने आणि चिकाटीने शिकायला हवे होते ! माझी संगीतामधली जाण आणि घरच्यांचे मानसिक स्वास्थ यांचा विचार करुन मीही दादाचा मार्ग स्विकारला आणि व्हायोलीनला विश्रांती दिली... पण कॅसिओ, बासरी, माउथ ओर्गन या वाद्यांवर प्रयोग चालूच ठेवले. आजही माउथ ओर्गन वर हे गाणे ओळख अशी धमकी दिल्याने आई घाबरुन जात असल्याचे माझ्या लक्षात आले आहे असो..

दादाचं मेंडोलीयन ’ तुझे देखा तो ’ वाजवुन वाजवुन धन्य झालं आणि माझं व्हायोलीन काहीच न करता त्याच्या शेजारी जाउन बसलं. हे सगळं चर्‍हाट सांगायचा मुद्दा हा, की परवाच गुळवणी सरांचे फ़ार सुंदर लाइव्ह सतार वादन ऎकले. मला सतार शिकायची आहे.
कोणी ओळखीचे शिक्षक आहेत का ?

Monday, June 29, 2009

गीतांजली

खरं तर एवढं सुंदर नाव असणाऱ्या नोबेल मिळलेल्या या पुस्तकात आहे तरी काय, या उत्सुकतेपोटीच शाळेत असताना मी गीतांजली वाचुन काढलं. आणि पहिल्यांदा फ़ारस काही कळाल नाही. त्यातही इंग्लिश भाषांतरात thy, thou, thee अशी भाषा वापरलेली..

खर म्हंजे कविता हा माझा प्रांत नव्हे.. शाळेत ’खालील कवितेचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या’ य घोकुन पाठ केलेल्या उत्तराने मला बरेच तंगवले होते. त्यात माझी मैत्रिण अपर्णा हिने केलेल्या ’मुक्तछंद’ प्रकारात मोडणाऱ्य़ा कविता वाचुन माझा कवितेवरचा विश्वास उडाला होता. ’कवटी’ , ’ चिखल’ , ’किडे’ , ’प्राणाघात’, अशा शब्दांची खरचं भिती वाटत असे. तिला काही समजवण्याचा प्रयत्नही व्यर्थ गेला होता.

” अगं, पण तू चांगले आणि यमक शब्द का वापरत नाहीस? ”

” मुक्तछंदाची कविता अशीच असते ”

माझ्या अज्ञानाकडे तुच्छतेने पहात ती म्हणाली होती..असो..

गीतांजलीच्या कविता आधी मला स्वप्निल वाटायच्या. पण मुखवटे आणि चेहऱ्य़ांचा, खऱ्या आणि खोट्याचा थोडाफ़ार अनुभव घेतल्यावर या कवितांमधला प्रकाश दिसू लागला. नवे अर्थ कळु लागले, संदर्भ लागत गेले. या छोट्या छोट्य कविता खूप तरल आणि सुंदर आहेत, काही दुर्बोधही आहेत.
वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा प्रत्येक कवितेत दिसतात. जसा हा काळसर करडा रंग :-

'If thou showest me not thy face, if thou leavest me aside

I know not how I am to pass these long , rainy hours..

I keep gazing on the far away gloom of sky,

and my heart wonders wailing with the restless wind..'

किंवा हा आशेचा कोवळा केशरी रंग :-

'I surly know that hundread petals of the lotus will not remain closed

and the secreat of honey in it will be bared..'


रविन्द्रनाथांचे आयुष्यही असेच परस्पर विरोधाने भरलेले होते. ते स्वत: जरी बालविवाह विरोधी संस्थेत होते, तरी त्यांनी मुलीचा विवाह बाराव्या वर्षीच केला.
गीतांजलीतील कविता ठरवून वगैरे लिहल्या गेल्या नाहीत. तो उत्फ़ूर्त प्रतिभेचा आविष्कार होता. या काळात गुरुदेवांनी दिक्षा घेतली होती. त्यांचे मन शांती आणि परमेश्वर याच विचारांनी भारलेले होते. योगानंदांच्या विचारांचा बराच प्रभाव होता. आणि या सगळ्यांविषयी वाटणारी कृतज्ञता त्यांनी इतक्या सुंदररीतीने व्यक्त केली.
गीतांच्या मध्यमातून त्यांनी संपूर्ण भावाने अंतरीतून परमेश्वराला जी हाक मारली, ज्याचा मंजूळ नाद आजही किणकिणत आहे.

’I have spread my mat on the floor, & whenever thy pleasere my Lord,

come silently and take thy seat here..!'

Wednesday, June 24, 2009

सखी

” त्या मेंटलचे केस पाहिलेस पिंजारलेले?"
” ह्या प्रिन्टचा ड्रेस मला खूप आवडतो”
” आपण एवढे बारीक कधी होणार ?”

तृप्ती आणि मी रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या कोणावर्ही कॉमेंट केल्याशिवाय सोडल्याच मला आठवत नाही. तृप्ती, माझी बालमैत्रीण! अगदी पुर्वीची आमची भांडणे, मारामारी केलेलीसुध्हा मला आठवते. अगदी शेजारीच घर असल्यामुळे मिटवामिटवी करायलाही बरं पडाय़चं.


शाळेत पहील्या पाचात यायच्या वगैरे भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. (पाचात काय पहिल्या पंधरात सुध्हा नाव असण्याची शक्यता कमीच होती ) शाळेत एकत्र जाणाऱ्यांचा ग्रुप मोठा होता. सर्वात सिनियर मुलगी ’प्राचीताई’ आमची लीडर असे. तिच्या बरोबर चालण्याचा मान फ़क्त तिच्या मैत्रिणींना किंवा तिच्याहुन थोडी लहान असणाऱ्या ’मनवा’ ला होता. बाकी आमची वरात मागे निवांत गप्पागोष्टी करत चालत असे. बहुदा मी आणि तृप्ती एकत्र असू. काही समान गोष्टी असणाऱ्या आम्हा सहा मुलींचा छान ग्रुप जमला होता, अजुनही आहे! सिनीयर मुलींची मापे काढणे, नोटबुक अपुर्ण ठेवणे आणि दुसऱ्या ग्रुपच्या मुलींशी काही वैचारीक मतभेद व्यक्त करणे या गोष्टी सोडल्या तर तसा आमचा ग्रुप निरुपद्रवीच होता. आम्ही नेहमी एकत्र असायचो पण तृप्तीशी माझी विशेष मैत्री कधीच कुणाला बोचली नाही. ती सर्वमान्य बाब होती.

’अभ्यास डिस्कस केल्याने ज्यास्त लक्षात राहतो’ या तत्वावर सुरु झालेला ’सामुहिक अभ्यास’ ही एक हास्यास्पद गोष्ट होती. ’ फ़्रेंच राज्यक्रांतीची प्रमुख कारणे भारतीय समस्यांना वळसे घालून स्नेहा कुलकर्णीच्य नविन हेअरस्टाईलपर्यंत कशी पोहचत असत याचा पत्ता लागत नसे. मी आणि तृप्तीने असा अनेक दिवस एकत्र अभ्यास केलेला आहे. तृप्तीच्या घरी गच्चीवर जायचा जिना व अंगण यामध्ये एक छोटीशी खोली आहे जेमतेम तीन लोक बसू शकतील इतकी! बहुदा तिथे आमचा अभ्यास चालयचा. माधुरी दिक्षीतचा नवा पिक्चर, पूजाचा नवा बॉयफ़्रेंड, स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय इथपासून पु लंची पुस्तके, अर्थशास्त्र, अध्यात्म इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह होत असे. अधून मधून आमच्या अभ्यासात (?) व्यत्यय आणण्याचा प्रयत्न तृप्तीचा लहान भाऊ इमानऎतबारे करीत असे. मग ती त्याच्या अंगावर खेकसत असे. पण नंतर एकंदरीत आमच्या अभ्यासाचा अंदाज आणि संशय घरच्या लोकांना येवू लागला आणि त्याचे पुरावेही वर्षीक टक्केवारीत दिसू लागले त्यामुळे पुढे हे प्रकरण कमी झाले.

सकाळी लवकर उठून फ़िरायला जायचे आणि आमच्या आळशीपणाबद्दल उगाच वावड्या उठवणाऱ्य़ा मंडळींची तोंडं बंद करायची असा निर्धार आम्ही अनेक वर्षं केला होता.
तृप्ती- ”ए, उद्या नक्की उठ हं, ५.३० ला बाहेर पडू."


”५.३०??? (येवढ्या मध्यरात्री?) नको..”

” बरं, मग ६.००? "

" अं...."

" ठिक आहे. dot ६.३० ला हाक मारते. OK? "

" अगं, कुत्री मागे लागतात!"

" मग ती ६.३० लाच मागे लागतात का?"

" Ok. Ok.."

अशा संवादानंतर पावणेसात या आडमुठ्या वेळेवर मांडवली व्हायची. पहीले ६-७ दिवस खरच जायचोही! पण नंतर घोड कुठे अडायच देव जाणे..! पण घरच्यांच्या टिंगल टवाळीला अजिबात दाद न देता सलग चार पाच वर्षे असे कार्यक्रम आम्ही चालूच ठेवले.
कोल्हापूरमधे महलक्ष्मी मंदिरात बसण्याची आमची एक खास जागा आहे. जरा बाजूला असणाऱ्या मारुती मंदिरच्या पायऱ्यांवर आमची सल्लामसलत चालत असे. त्या मारुतीला आत्तापर्यन्त काय काय म्हणून ऎकावे लागले असेल, तोच जाणे..! छोटे कच्चे आवळे, चिंचांचा समाचार घेत गुप्त खलबतेही चालत असत. आजही मंदिरात त्याच पायऱ्यांवर दुसरे कोणीतरी गप्पा ठोकत बसलेले दिसले, की आपल्या मालकीची जागा त्याला दिल्यासरखे वाटते.
आज लग्न होउन ती छान गृहकृत्यदक्ष वगैरे गृहिणी बनली आहे. पण हस्ताचा पाऊस, शाळा सुटल्यावर गर्दीने भरलेला रस्ता हट्कून मन मागे नेतो. खरचं, शाळेतल्या वर्षांनी माझा मैत्रीचा कोपरा खऱ्या अर्थाने समृध्द केला.

Special Things


I am me,
there will not ever be anyone like me!
I am special because I am unique.
I am stardustand dreams.
I am light.
I am love and hope.I am hugs and sometimes tears!
I am the words, 'I love you'.
I am swirls of blue,green,red,yellow,purple,orange,and colors no one can name!
I am the sky, the sea, the earth.
I am trust, yet I fear.
I hide, yet I hold anything back.
I am free.
I am a child becoming an adult.
I am me, and me is just fine.....!
-by
Beth jones
ही कविता कुठे वाचली होती, आठवत नाही..
पण माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. :)