Friday, July 31, 2009

सहवेदना

" तुमच्या घरी कोण कोण असत लीलाबाई? "
" म्यॅडम, मला येक ४० किलोची मुलगी आनि ७० किलोचा मुलगा हाये "
ऑफिसमधल्या मावशीबाईने अशी भाज्यांच्या घाऊक दरात आपल्या मुलांची ओळख करुन दिली, तेव्हा मला फार गंमत वाटली होती.
" माज्या मुलीच नाव गंगा. किती पवित्र नाव..हाय की नाय? पर पोरगी म्हनते, तुला दुसर मॉडर्न नाव मिळाल न्हाय का? हे काय बोलन झालं? " लीलाबाईची कौतुकमिश्रित तक्रार!
तसे तिचे तिखट कान आणि बारीक लक्ष ऑफिसमधल्या सगळ्या घडामोडी टिपकागदाप्रमाणे टिपतात. मागच्या सहाएक महिन्यात तिच्या रजा वाढल्या,चेहऱ्य़ावरच्या सुरकुत्याही वाढल्या. ऑफिसमधल्या राजकारणात स्वारस्य वाटेनासे झाले. तरी त्यातून मागच्याच आठवड्यात ’ तो अकाउंटंट का कोन आहे ना, रिघेबाई जायच्याच येळेला कसा भायेर पडतो ’ अशी टिप्पणी करायला ती विसरली नाही. तिच्या मुलीला बरं नसत अस म्हणत होती. सारखी चक्कर येते, निदान होत नाही, काय करायचे समजत नाही, नवरा असता तर आधार वाटला असता वगैरे..
या सोमवारी तिची ४० किलोची मुलगी तिच्याबरोबर आली. सोबत रिपोर्टस्, कुणी कुणी दिलेले पत्ते, फोन नंबरचे चिटोरे, डोक्यात घुमणारे सल्ले...घडिभर बसून मुलीची ओळख वगैरे झाली.
" आता अस बगा म्यॅडम, हात पाय मोडला असता म्हंजे नीट तर करुन घेतला असता. पर हिला येकटी सोडायची सोय नाय, फ़ीट असेल अस वाटतय. सिटी स्कॅन झाल, रक्त तपासल पन अजून निदान न्हाय! डोंगरायेवडा खर्च..."
तिची मुलगी खोलीच निरीक्षण करत बसलेली. आणि अगदी अनपेक्षितपणे लीलाबाई हसली.. मी आणि वर्षाने पट्कन एकमेकींकडे बघितलं." पर बाकी लोकांनी काय काय प्रकार सांगितलेत, त्यापरिस बरं! आमच्या शेजारच्या माणसाने सांगितल की त्याचा पाव्हणा आंघोळ झाली की, दर तासाला चक्कर येऊन पडतो. काय पन बाई..." आता तिच्याबरोबर तिची मुलगीही हसू लागली.
हसणे इतके भयाण असू शकते?
अडचणी, मनस्ताप यांनी वैतागणारी माणसे पाहीलीत. पण् अनिश्चिततेच्या टप्प्यावर शंकांनी भरुन गेलेल्या मनात काय काय विचार आले असतील आणि ती हसली असेल?
हे हिमनगाचे टोक तर नसेल? की ’मी सहवेदना अनुभवली’ अशी बढाई मारणाऱ्य़ा माझ्याच यःकिंचीत मनाला हसली?
चट्कन तिच्याकडे नजर गेली.
अंगभर दाटून राहीलेली काळजी आणि डोळ्यात नसलेली अदृश्य गंगा आता स्पष्ट दिसत होती..

Monday, July 20, 2009

मोअर दॅन वर्ड्‌स...!!

अभावितपणे मिळणारय़ा गोष्टींचा काही विशेष आनंद असावा. मागे एकदा कधीतरी असचं टाईमपास म्हणून चॅनेल फ़िरवत असताना 'More Than Words' हा नितांत सुंदर चित्रपट पहायला मिळाला. मूळ जर्मन भाषेतला इंग्लिश डबिंग केलेला हा पिक्चर साधेपणातल सौंदर्य पुन्हा एकदा सांगून गेला..
कॅथरीन ही मूळची शिल्पकार पण पेशाने दारं खिडक्या तयार करणारा छोटा कारखाना चालवणारी साधी स्त्री. तिच्या या कारखान्यात १४-१५ कारपेंटर आहेत. जे नेहमी टिंगल व टाईमपास करण्यात धन्यता मानतात आणि त्यांच्यावर खेकसणारा तिचा तिरसट पार्टनर! ह्या सगळ्यांबरोबर काम करायचे तर कोरडेपणाने वागाय़चे हिने पक्के केलेले. नेहमी पुरुषी कपड्यात वावरणारय़ा कॅथरीनकडे कुणाचे लक्षही जात नसे! पण आपल्या घरी आल्यानंतर तिचे विश्व जणू बदलून जाई. कॉफ़ीचे घुटके घेत तासन्‌तास पुस्तके वाचत असताना अर्धी रात्रही उलटून जात असे. स्वतः कलाकार असणाऱ्य़ा कॅथरीनला तरल भावनांची जाणीव असते, साहित्याचे वेड असते. तिच्या आयुष्यातली आणखी हळवी जागा म्हणजे तिची सुंदर मैत्रिण मेरी! ही फ़िजीओथेरपिस्ट म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करीत असते. ती कॅथरीनला भेटायला बरेचदा तिच्या कारखान्यात चक्कर टाकीत असे.

'जेकब स्टेनर’ हा सिव्हील इंजिनीयर एक भव्य किंमती कलाकृतीची दुरुस्ती आणि चौकटी करण्यासाठी कॅथरीनच्या कारखान्यात येतो. तेव्हा त्याच्या बुध्दीमत्तेची, इतरांहून वेगळ्या प्रगल्भ व्यक्तीमत्वाची जाणीव होवून कॅथरीन त्याच्यात गुंतत जाते पण कोरडेपणाचा बुरखा ती काढू शकत नाही. दरम्यान योगायोगाने जेकबची मेरीशीही भेट होते व ती कॅथरीनला तिच्यावतीने जेकबला पत्र लिहण्यासाठी गळ घालते. साहित्य, कविता, उत्कट लिखाण यांच्याशी काडीचाही संबंध नसलेल्या जिवलग मैत्रिणीच्या आग्रहास्तव तिच्या वतीने कॅथरीन जेकबला खूप सुंदर भावनेने ओथंबलेली पत्रे लिहते. नकळत स्वतःचे मनच उघडे करते. जेकबही त्या सुंदर अक्षरात लिहलेल्या भावस्पर्शी पत्रांमुळे मेरीला भेटतो पण नंतर अशा काही गोष्टी घडत जातात की खरी गोष्ट कॅथरीनला कबूल करावी लागते.

हाताबाहेर जाणारय़ा गोष्टी व मनस्ताप यांमुळे ती कारखान्याचे काम आपल्या पार्टनरच्या हाती सोपवते. जेकबलाही खरया गोष्टी कळतात. आपण सुंदर मेरीच्या नव्हे तर सुंदर पत्रांच्या, सुंदर विचारांच्या प्रेमात असल्याचे तो कॅथरीनपाशी कबूल करतो.
कॅथरीनने लिहलेली काव्यात्मक पत्रे, सुंदर आणि तरल संवाद चित्रपटाची प्रमुख वैशिष्टे म्हणता येतील. अभिनय आणि अनावश्यक गोष्टींना फ़ाटा या आणखी जमेच्या बाजू. अगदीच कुठेतरी उन्नीस बीस झालय, पण दुर्लक्ष करायला हरकत नाही.

’ मुझसे दोस्ती करोगी ’ या अतिशय टुकार हिंदी चित्रपटाची मुळ कल्पना याच संकल्पनेवरुन उचलल्यासारखी वाटते. दुर्दैवाने या चित्रपटाच्या कलाकारांची नावे कळू शकली नाहीत इंटरनेटवर खूप शोधले पण फ़िल्म साईट किंवा इतर काहीच माहिती मिळाली नाही. पण फ़िरंगी चॅनेल (?) वर हिंदी डबिंग उपलब्ध आहे. हे भाषांतर बरच चांगल वाटतयं. त्याचा प्रिव्हयू मात्र मिळाला. बघू डिव्हीडी मिळण्याचा योग कधी आहे ते..!


Tuesday, July 7, 2009

आमची (न घडलेली) संगीतसेवा..!

'' तुला माहित नाही पण क्लास मधे मी एकदा का मेंडोलीयन वाजवू लागलो ना, की सगळे नुसते ऎकत राहतात..!"

माझा मोठा भाऊ राहुल एखादे गुपित सांगावे तसे खाजगित सांगत असल्याचे मला आठवते . पुढे पुढे क्लास मधले ’ते सगळे’ नुसते हतबल होऊन ऎकत असतात हे माझ्या लक्षात आले. साधारण १९९५-९६ च्या सुमारास DDLJ रिलीज झाला तेव्हा माझ्या दादाने inspire होऊन मेंडोलीयन शिकण्याचा मनापासून प्रयत्न केला होता पण त्या शिकण्यात learning कमी आणि shining ज्यास्त असल्याने ते वाद्य त्याला फारसे प्रसन्न झाले नाही. पण कॉलेजमधल्या मैत्रिणींवर impression मारण्यासाठी मात्र मेंडोलीयनने त्याला बराच हात दिला असावा. ’ तुझे देखा तो ये जाना सनम ’ हे गाणे शिकण्यासाठीच त्याने क्लास लावला, नविन मेंडोलीयन खरेदी केले आणि प्रक्टिस करुन करुन घरच्यांचे डोके उठवले ! हे गाणे मात्र तो अगदी सुरात सलग आणि स्पीडीली वाजवत असे.

"एवढे सोपे नसते, स्पीडी वाजवणे.."

असे म्हणून त्याच्या बोटांना पडलेले घट्टे तो दाखवायचा.. मी त्याच्या ज्ञानाने आणि कष्टाळूपणाने दिपून जात असे! त्याने मेंडोलीयनवर 'R' अक्षर काढुन चमचमती स्टिकर्स लावून खूप छान सजवले होते. रोज मऊ कापडाने तो मेंडोलीयन पुसून ठेवायचा. पुढे ’ है अपना दिल ’ वर थोडी खटपट करुन त्याने त्या मेंडोलीयनला जी विश्रांती दिली, ती आजतागायत मोडलेली नाही. तसा तो अगदी लहान असताना तबलाही शिकायला जायचा पण त्याने तबला शिकणे हे त्याचे शिक्षक तो आणि तबला या तिघांनाही मंजूर नव्ह्ते.

माझ्या दादाला बऱ्याच गोष्टी करता येतात, तो ऒलराउंडर आहे अशी माझी पक्की समजूत होती. त्यामुळे त्याचे अनुकरण करणे आलेच! मीही नंतरची काही वर्षे मेंडोलीयनवर हात साफ़ करुन घेतला. त्याचे ते टिपीकल ’तुझे देखा तो’ आणि ’है अपना दिल’ त्याने उदारपणे मला शिकवले (त्यावेळी तो फ़र्स्ट इयरला होता आणि आपण खूप अभ्यास करतो हे दाखवण्यासाठी झिरो नंबरचा चष्मा घालायचा )
पुढे कॉलेजमधे गेल्यावर आपणही वेगळे वाद्य शिकावे असे वाटू लागल्याने मी व्हायोलीनचा क्लास लावला. (हो, त्यावेळी मोहब्बते नविन होता ) बेसिक नोटेशन्स आणि भूप राग या नंतर माझा पेशन्स संपला (आमचे सर गाणी शिकवत नाहीत हे मला नंतर कळाले) तोपर्यंत घाईगडबडीने नविन व्हायोलीन ख्ररेदी केले होते, म्हणून मग घरीच गाणी बसवण्याचा प्रयत्न केला(तो फ़सला हे सांगायला नकोच! ) व्हायोलीन हे असे वाद्य आहे, की जे सुरात वाजवले तरच मधूर वाटते.
आता खंत वाटते हे सुंदर वाद्य नेटाने आणि चिकाटीने शिकायला हवे होते ! माझी संगीतामधली जाण आणि घरच्यांचे मानसिक स्वास्थ यांचा विचार करुन मीही दादाचा मार्ग स्विकारला आणि व्हायोलीनला विश्रांती दिली... पण कॅसिओ, बासरी, माउथ ओर्गन या वाद्यांवर प्रयोग चालूच ठेवले. आजही माउथ ओर्गन वर हे गाणे ओळख अशी धमकी दिल्याने आई घाबरुन जात असल्याचे माझ्या लक्षात आले आहे असो..

दादाचं मेंडोलीयन ’ तुझे देखा तो ’ वाजवुन वाजवुन धन्य झालं आणि माझं व्हायोलीन काहीच न करता त्याच्या शेजारी जाउन बसलं. हे सगळं चर्‍हाट सांगायचा मुद्दा हा, की परवाच गुळवणी सरांचे फ़ार सुंदर लाइव्ह सतार वादन ऎकले. मला सतार शिकायची आहे.
कोणी ओळखीचे शिक्षक आहेत का ?