Monday, July 20, 2009

मोअर दॅन वर्ड्‌स...!!

अभावितपणे मिळणारय़ा गोष्टींचा काही विशेष आनंद असावा. मागे एकदा कधीतरी असचं टाईमपास म्हणून चॅनेल फ़िरवत असताना 'More Than Words' हा नितांत सुंदर चित्रपट पहायला मिळाला. मूळ जर्मन भाषेतला इंग्लिश डबिंग केलेला हा पिक्चर साधेपणातल सौंदर्य पुन्हा एकदा सांगून गेला..
कॅथरीन ही मूळची शिल्पकार पण पेशाने दारं खिडक्या तयार करणारा छोटा कारखाना चालवणारी साधी स्त्री. तिच्या या कारखान्यात १४-१५ कारपेंटर आहेत. जे नेहमी टिंगल व टाईमपास करण्यात धन्यता मानतात आणि त्यांच्यावर खेकसणारा तिचा तिरसट पार्टनर! ह्या सगळ्यांबरोबर काम करायचे तर कोरडेपणाने वागाय़चे हिने पक्के केलेले. नेहमी पुरुषी कपड्यात वावरणारय़ा कॅथरीनकडे कुणाचे लक्षही जात नसे! पण आपल्या घरी आल्यानंतर तिचे विश्व जणू बदलून जाई. कॉफ़ीचे घुटके घेत तासन्‌तास पुस्तके वाचत असताना अर्धी रात्रही उलटून जात असे. स्वतः कलाकार असणाऱ्य़ा कॅथरीनला तरल भावनांची जाणीव असते, साहित्याचे वेड असते. तिच्या आयुष्यातली आणखी हळवी जागा म्हणजे तिची सुंदर मैत्रिण मेरी! ही फ़िजीओथेरपिस्ट म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करीत असते. ती कॅथरीनला भेटायला बरेचदा तिच्या कारखान्यात चक्कर टाकीत असे.

'जेकब स्टेनर’ हा सिव्हील इंजिनीयर एक भव्य किंमती कलाकृतीची दुरुस्ती आणि चौकटी करण्यासाठी कॅथरीनच्या कारखान्यात येतो. तेव्हा त्याच्या बुध्दीमत्तेची, इतरांहून वेगळ्या प्रगल्भ व्यक्तीमत्वाची जाणीव होवून कॅथरीन त्याच्यात गुंतत जाते पण कोरडेपणाचा बुरखा ती काढू शकत नाही. दरम्यान योगायोगाने जेकबची मेरीशीही भेट होते व ती कॅथरीनला तिच्यावतीने जेकबला पत्र लिहण्यासाठी गळ घालते. साहित्य, कविता, उत्कट लिखाण यांच्याशी काडीचाही संबंध नसलेल्या जिवलग मैत्रिणीच्या आग्रहास्तव तिच्या वतीने कॅथरीन जेकबला खूप सुंदर भावनेने ओथंबलेली पत्रे लिहते. नकळत स्वतःचे मनच उघडे करते. जेकबही त्या सुंदर अक्षरात लिहलेल्या भावस्पर्शी पत्रांमुळे मेरीला भेटतो पण नंतर अशा काही गोष्टी घडत जातात की खरी गोष्ट कॅथरीनला कबूल करावी लागते.

हाताबाहेर जाणारय़ा गोष्टी व मनस्ताप यांमुळे ती कारखान्याचे काम आपल्या पार्टनरच्या हाती सोपवते. जेकबलाही खरया गोष्टी कळतात. आपण सुंदर मेरीच्या नव्हे तर सुंदर पत्रांच्या, सुंदर विचारांच्या प्रेमात असल्याचे तो कॅथरीनपाशी कबूल करतो.
कॅथरीनने लिहलेली काव्यात्मक पत्रे, सुंदर आणि तरल संवाद चित्रपटाची प्रमुख वैशिष्टे म्हणता येतील. अभिनय आणि अनावश्यक गोष्टींना फ़ाटा या आणखी जमेच्या बाजू. अगदीच कुठेतरी उन्नीस बीस झालय, पण दुर्लक्ष करायला हरकत नाही.

’ मुझसे दोस्ती करोगी ’ या अतिशय टुकार हिंदी चित्रपटाची मुळ कल्पना याच संकल्पनेवरुन उचलल्यासारखी वाटते. दुर्दैवाने या चित्रपटाच्या कलाकारांची नावे कळू शकली नाहीत इंटरनेटवर खूप शोधले पण फ़िल्म साईट किंवा इतर काहीच माहिती मिळाली नाही. पण फ़िरंगी चॅनेल (?) वर हिंदी डबिंग उपलब्ध आहे. हे भाषांतर बरच चांगल वाटतयं. त्याचा प्रिव्हयू मात्र मिळाला. बघू डिव्हीडी मिळण्याचा योग कधी आहे ते..!


6 comments:

Sheetal said...

Malahi ha picture awadto.
pramukh bhumila bahutek Anna Khrischove ne keli aahe.

Manoj said...

याच धर्तीवरचा ’तीन फ़ुल्या आणि तीन बदाम’ हा मराठी चित्रपट प्रसिध्द आहे. याचा उल्लेख तू केला नाहीस.. :)

Meenal said...

शितल, मनोज प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
काही समान गोष्टी असूनही ’तीन फ़ुल्या आणि तीन बदाम’याचा मूळ गाभा वेगळा आहे असे मला वाटते. ’गध्देपंचविशी’आणि पत्रामुळे होणारे विनोदी गैरसमज यांवर बेतलेला हा हलका फ़ुलका चांगला चित्रपट आहे.विक्रम गोखलेंनी तर अगदी धमाल उडवली आहे.

Somesh Bartakke said...

शब्दांच्या पलिकडले !! मला इकडे हा चित्रपट मिळाला तर नक्की बघेन.

आनंद पत्रे said...

या सिनेमाबद्दल नेटवर काहीच माहिती मिळाली नाही, डिव्हीडी किंवा टोरेंट बद्दल माहिती असेल तर प्लीज कळव...

मीनल said...

नाही ना..
फक्त एवढा व्हिडीओ मिळाला. जर्मन भाषेतच असला तर टोरंट असेल. पण मूळ जर्मन नाव माहित नाहीये.