Friday, July 31, 2009

सहवेदना

" तुमच्या घरी कोण कोण असत लीलाबाई? "
" म्यॅडम, मला येक ४० किलोची मुलगी आनि ७० किलोचा मुलगा हाये "
ऑफिसमधल्या मावशीबाईने अशी भाज्यांच्या घाऊक दरात आपल्या मुलांची ओळख करुन दिली, तेव्हा मला फार गंमत वाटली होती.
" माज्या मुलीच नाव गंगा. किती पवित्र नाव..हाय की नाय? पर पोरगी म्हनते, तुला दुसर मॉडर्न नाव मिळाल न्हाय का? हे काय बोलन झालं? " लीलाबाईची कौतुकमिश्रित तक्रार!
तसे तिचे तिखट कान आणि बारीक लक्ष ऑफिसमधल्या सगळ्या घडामोडी टिपकागदाप्रमाणे टिपतात. मागच्या सहाएक महिन्यात तिच्या रजा वाढल्या,चेहऱ्य़ावरच्या सुरकुत्याही वाढल्या. ऑफिसमधल्या राजकारणात स्वारस्य वाटेनासे झाले. तरी त्यातून मागच्याच आठवड्यात ’ तो अकाउंटंट का कोन आहे ना, रिघेबाई जायच्याच येळेला कसा भायेर पडतो ’ अशी टिप्पणी करायला ती विसरली नाही. तिच्या मुलीला बरं नसत अस म्हणत होती. सारखी चक्कर येते, निदान होत नाही, काय करायचे समजत नाही, नवरा असता तर आधार वाटला असता वगैरे..
या सोमवारी तिची ४० किलोची मुलगी तिच्याबरोबर आली. सोबत रिपोर्टस्, कुणी कुणी दिलेले पत्ते, फोन नंबरचे चिटोरे, डोक्यात घुमणारे सल्ले...घडिभर बसून मुलीची ओळख वगैरे झाली.
" आता अस बगा म्यॅडम, हात पाय मोडला असता म्हंजे नीट तर करुन घेतला असता. पर हिला येकटी सोडायची सोय नाय, फ़ीट असेल अस वाटतय. सिटी स्कॅन झाल, रक्त तपासल पन अजून निदान न्हाय! डोंगरायेवडा खर्च..."
तिची मुलगी खोलीच निरीक्षण करत बसलेली. आणि अगदी अनपेक्षितपणे लीलाबाई हसली.. मी आणि वर्षाने पट्कन एकमेकींकडे बघितलं." पर बाकी लोकांनी काय काय प्रकार सांगितलेत, त्यापरिस बरं! आमच्या शेजारच्या माणसाने सांगितल की त्याचा पाव्हणा आंघोळ झाली की, दर तासाला चक्कर येऊन पडतो. काय पन बाई..." आता तिच्याबरोबर तिची मुलगीही हसू लागली.
हसणे इतके भयाण असू शकते?
अडचणी, मनस्ताप यांनी वैतागणारी माणसे पाहीलीत. पण् अनिश्चिततेच्या टप्प्यावर शंकांनी भरुन गेलेल्या मनात काय काय विचार आले असतील आणि ती हसली असेल?
हे हिमनगाचे टोक तर नसेल? की ’मी सहवेदना अनुभवली’ अशी बढाई मारणाऱ्य़ा माझ्याच यःकिंचीत मनाला हसली?
चट्कन तिच्याकडे नजर गेली.
अंगभर दाटून राहीलेली काळजी आणि डोळ्यात नसलेली अदृश्य गंगा आता स्पष्ट दिसत होती..

5 comments:

mugdha said...

diagnosis na hone ha atishay bhayankar prakar aahe aani mi he javalun baghitalay..
tyaa mulilaa patkan bara vatava hi sadichchaa

Meenal said...

ho..ti lakvar bari hovo.

Anonymous said...

वेदना .. किं संवेदना .. एक बाहेर असते .. दुसरी आत .. :)

- मी
http://TheLife.in

मी said...

वेदना ..किं संवेदना .. एक बाहेर असते .. दुसरी आत .. :)

Meenal said...

बरोबर आहे..पण ही तिसरी ’सह’वेदना आहे, जी दुसरय़ा व्यक्तीशी निगडीत आहे.जी तिच्या बरोबर आपल्यालाही जाणवते. हा शब्द मी जी.ए.कुलकर्णींच्या पुस्तकात वाचला होता. :)