Friday, August 28, 2009

राजे

शेजारची रिद्धी गणपतीसाठी म्हणून कोल्हापूरला आली आहे. ती कराडला राहते आणि के.जी मधे आहे. बोबडं बोलत, आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतल्यावर ती नेहमीच्या गप्पांकडे वळली.

" आमत्या शालेत शिवाजीराजे भोसलेंचा पिक्चर दाखवला " हातातल्या पेढ्याकडे निरखून पहात ती म्हणाली.

" म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तो पिक्चरं ? " मला खरचं आश्चर्य वाटले.

" हं..तोच..ते घोड्यावरुन येतात तोच्च..आनि एक पेढा दे.."

" मगं आवडला का? आणि शिवाजीराजे कोण होते गं ? "

" हिरो.. "

" मग, टिचरने या हिरो बद्दल आणखी काहीच सांगितले नाही?? "

" नाई.. पेढा संपला. चॉक्केट आहे? "

तिला आणखीही खोदून प्रश्न विचारले पण ते फ़िल्म हिरो आहेत या पलिकडे तिला काही माहीत नाहीतसे दिसले. बाहेरुन किंवा घरी तिला राजेंविषयी काही माहिती मिळाली नाही ही गोष्ट अलहिदा ! पण शाळेतही शिक्षकांनी या विषयी काहीच माहिती देऊ नये? मुळात चार पाच वर्षाच्या मुलांना मराठी भाषिकांची दुखरी नस वगैरेवर बेतलेला चित्रपट दाखवणेच मला पटत नाही. त्याविषयी अधिक माहिती देण्याचे कष्टही शाळेने घेतलेले दिसले नाहीत. याचा अर्थ मुलांना फक्त कार्टून फ़िल्म दाखवावी किंवा त्यांना यातले काही कळत नाही असे नव्हे.. पण या संवेदनशील मनांपुढे विषय मांडताना निदान त्याची पूर्वमाहिती मुलांना द्यायला हरकत नाही. याऎवजी शिवाजीराजेंची डॉक्युमेंटरी, त्यांचा लढा यांविषयी कितीतरी सोर्स उपलब्ध आहेत आणि यांविषयी मुलांना माहित व्हायला हवं..
आज्जीच्या मऊ गोष्टींमधून मला शिवबा प्रथम भेटले. नंतर दादाने केरसुणीची तलवार करुन तक्क्या गाद्यांना झोडपून, राजे शत्रूंना कसे मारत असत, याचे प्रात्यक्षिक दाखवले. पुरंदरेंनी तर पुस्तकरुपाने खजिनाच उघड केला.
मुलांनी राजेंना प्रथम गड जिंकताना, दर्‍याखोर्‍या तुडवताना, राज्याभिषेक करुन घेतानाच पहावे अशी आपली माझी उगीचच इच्छा आहे..!

Tuesday, August 18, 2009

शुगरकोटेड

वेळ सकाळची. दाभोळकर कॉर्नरचा सिग्नल. हिरव्या दिव्याची वाट पहात थांबलेले बरेच दुचाकीस्वार, धूर सोडणाऱ्य़ा रिक्षा आणि तुरळक फ़ोर व्हिलर यांनी रस्ता गच्च भरलेला. माझ्या पुढे एक रिक्षा जिच्या मागे 'टेक्सास चिंगळी ’ असे ठळक अक्षरात लिहले होते आणि शेजारी, मागे बाईक्स. त्यातल्याच एका बाईकवरुन आवाज आला.

" जाऊ दे रे रोहन्या, आत्ता काम नाय झालं तर लगेच परत काय जातोस? आयुष्यात अस लगेच हरायच नसतयं भावा. टॉलस्टॉय म्हनतो तस वेळ आनि पेशन्स यांच्याशिवाय काम पूर्न होनार नाय. माजं नाय तर त्याच तरी ऎक! "

मी मघाशी बघण्यात चूक केली की काय अशी शंका वाटून शेजारच्या बाईकवर बसलेल्या जोडगोळीकडे पुन्हा नजर टाकली. लाल भडक पट्यापट्याचा टी शर्ट, त्यावर पिवळ्या फ़ुलांची नक्षी, मागे चंदेरी रंगात मॅग्नस की असच काहीस लिहलेलं. विटलेली जिन्स, कंगव्याशी फ़ारसं सख्य नसल्याच दाखवणारे केस, चेहऱ्य़ावर बेफ़िकीरीचा भाव आणि या ड्रायव्हारला साजेसा त्याच्यामागे एवढस तोंड करुन बसलेला रोहन्या!
या छोटेखानी मुलाकडून टॉलस्टॉय वगैरे शब्दांची अपेक्षाच नव्हती. आयुष्यावर टिपणी तर नाहीच नाही. त्यांच्या पुढच्या संवादाची मला भयंकर उत्सुकता होती पण सिग्नल सुटला आणि उजवीकडे उभी असलेली तमाम वाहने इंडिकेटर न दाखवता डावीकडे वळाली. नंबरप्लेटवर भगव्या रंगात ’ सिंहगर्जना ’ असे लिहलेली ही बाईकही भरधाव वेगाने स्टॅंडच्या दिशेने गेली.
पुढे दिवसभर हाच प्रश्न घुमत राहिला की आपण किती वरवरचा विचार करतो. काहीच्या काही ठोकताळयावरुन अंदाज बांधतो. सुंदर दिसण्याचा वगैरे हा मुद्दा नाहीच आहे. पूर्वग्रह किंवा काही वेगळ्याच कल्पना म्हणजे खूप हुशार विद्यार्थ्याने चश्मिस असलेच पाहिजे वगैरे मनात पक्क्या बसलेल्या कल्पनांविषयी आहे. फ़र्स्ट इंप्रेशनसाठी नेटके रहाणे चांगलेच पण तेवढ्यावरुन दोन चार मिनटात कुणाबद्दल पक्के मत बनवणेही बरोबर नाही. तसेही काय आपण फ़क्त ब्रॅंडेड वस्तूच वापरतो हे वारंवार सांगणारे आणि आत्मस्तुतीत दंग असणारे नमुने आजुबाजुला असतातच की! मग माणसे ओळखयची कशी ? श्रीयुत गोडबोले आतून श्रीयुत कडू असतीलही. मग बाह्यदर्शन आणि स्वभाव यांच्यात कायम तफ़ावत असते का? नाही तसेही नाही. व्यवस्थित छान असणाऱ्य़ा आणि स्वभावानेही गोड असणाऱ्य़ा माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत. म्हणजे उंट झाडपाला खातो म्हणून भाज्या खाणारे सगळेच उंट नव्हेत.

एक कुतुहल म्हणून बॉडी लॅंग्वेज आणि ’चेहऱ्य़ाच्या ठेवणीवरुन स्वभाव ओळख’ असली काही पुस्तक वाचून काढली होती. त्यात लिहले होते, भुऱ्य़ा डोळ्यांची आणि घारोळी माणसे जरा ड्यांबिसच असतात. घरी भुऱ्य़ा डोळ्यांचा सुकाळ असल्याने ही कल्पना मला अर्थातच पटली नाही. पुढे लिहले होते काळेभोर डोळ्यांचा धनी प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतो. आपली कामेही खुश्याल दुसऱ्य़ावर ढकलुन ऎन आणिबाणीच्या वेळी बॉसच्या तोंडी तिसऱ्य़ाच व्यक्तीला देणाऱ्य़ा काळ्या डोळ्याच्या (आणि रंगाच्या) सहकाऱ्य़ाने ही संकल्पना फ़ोल ठरवली. एकुणच काय, चकाकणारं सगळच सोनं नसत आणि ओबडधोबड खडकातही स्वच्छ झऱ्य़ाचं वास्तव्य असत म्हणतात ते खोटं नाही. कोणी कसं रहाव आणि कस असाव याला काही कोष्टक नाहीये. भल्या बुऱ्य़ाचा अनुभव प्रत्येकजण यथा शक्ती देतच असतो, त्यामुळे पूर्वग्रह न बाळगणेच चांगले.

ता.क. : १) एक गंमत म्हणून नमूद करावेसे वाटते की ’टेक्सास चिंगळी’ च्या उपशाखा टेक्सास बंटी, टेक्सास इंगळी सुध्दा बघायला मिळतात.
२) पोस्टचे शीर्षकच सुचत नव्ह्ते त्यामुळे ते आणि मूळ विषय भरकटला असल्यास चू.भु.द्या.घ्या.