Tuesday, August 18, 2009

शुगरकोटेड

वेळ सकाळची. दाभोळकर कॉर्नरचा सिग्नल. हिरव्या दिव्याची वाट पहात थांबलेले बरेच दुचाकीस्वार, धूर सोडणाऱ्य़ा रिक्षा आणि तुरळक फ़ोर व्हिलर यांनी रस्ता गच्च भरलेला. माझ्या पुढे एक रिक्षा जिच्या मागे 'टेक्सास चिंगळी ’ असे ठळक अक्षरात लिहले होते आणि शेजारी, मागे बाईक्स. त्यातल्याच एका बाईकवरुन आवाज आला.

" जाऊ दे रे रोहन्या, आत्ता काम नाय झालं तर लगेच परत काय जातोस? आयुष्यात अस लगेच हरायच नसतयं भावा. टॉलस्टॉय म्हनतो तस वेळ आनि पेशन्स यांच्याशिवाय काम पूर्न होनार नाय. माजं नाय तर त्याच तरी ऎक! "

मी मघाशी बघण्यात चूक केली की काय अशी शंका वाटून शेजारच्या बाईकवर बसलेल्या जोडगोळीकडे पुन्हा नजर टाकली. लाल भडक पट्यापट्याचा टी शर्ट, त्यावर पिवळ्या फ़ुलांची नक्षी, मागे चंदेरी रंगात मॅग्नस की असच काहीस लिहलेलं. विटलेली जिन्स, कंगव्याशी फ़ारसं सख्य नसल्याच दाखवणारे केस, चेहऱ्य़ावर बेफ़िकीरीचा भाव आणि या ड्रायव्हारला साजेसा त्याच्यामागे एवढस तोंड करुन बसलेला रोहन्या!
या छोटेखानी मुलाकडून टॉलस्टॉय वगैरे शब्दांची अपेक्षाच नव्हती. आयुष्यावर टिपणी तर नाहीच नाही. त्यांच्या पुढच्या संवादाची मला भयंकर उत्सुकता होती पण सिग्नल सुटला आणि उजवीकडे उभी असलेली तमाम वाहने इंडिकेटर न दाखवता डावीकडे वळाली. नंबरप्लेटवर भगव्या रंगात ’ सिंहगर्जना ’ असे लिहलेली ही बाईकही भरधाव वेगाने स्टॅंडच्या दिशेने गेली.
पुढे दिवसभर हाच प्रश्न घुमत राहिला की आपण किती वरवरचा विचार करतो. काहीच्या काही ठोकताळयावरुन अंदाज बांधतो. सुंदर दिसण्याचा वगैरे हा मुद्दा नाहीच आहे. पूर्वग्रह किंवा काही वेगळ्याच कल्पना म्हणजे खूप हुशार विद्यार्थ्याने चश्मिस असलेच पाहिजे वगैरे मनात पक्क्या बसलेल्या कल्पनांविषयी आहे. फ़र्स्ट इंप्रेशनसाठी नेटके रहाणे चांगलेच पण तेवढ्यावरुन दोन चार मिनटात कुणाबद्दल पक्के मत बनवणेही बरोबर नाही. तसेही काय आपण फ़क्त ब्रॅंडेड वस्तूच वापरतो हे वारंवार सांगणारे आणि आत्मस्तुतीत दंग असणारे नमुने आजुबाजुला असतातच की! मग माणसे ओळखयची कशी ? श्रीयुत गोडबोले आतून श्रीयुत कडू असतीलही. मग बाह्यदर्शन आणि स्वभाव यांच्यात कायम तफ़ावत असते का? नाही तसेही नाही. व्यवस्थित छान असणाऱ्य़ा आणि स्वभावानेही गोड असणाऱ्य़ा माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत. म्हणजे उंट झाडपाला खातो म्हणून भाज्या खाणारे सगळेच उंट नव्हेत.

एक कुतुहल म्हणून बॉडी लॅंग्वेज आणि ’चेहऱ्य़ाच्या ठेवणीवरुन स्वभाव ओळख’ असली काही पुस्तक वाचून काढली होती. त्यात लिहले होते, भुऱ्य़ा डोळ्यांची आणि घारोळी माणसे जरा ड्यांबिसच असतात. घरी भुऱ्य़ा डोळ्यांचा सुकाळ असल्याने ही कल्पना मला अर्थातच पटली नाही. पुढे लिहले होते काळेभोर डोळ्यांचा धनी प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतो. आपली कामेही खुश्याल दुसऱ्य़ावर ढकलुन ऎन आणिबाणीच्या वेळी बॉसच्या तोंडी तिसऱ्य़ाच व्यक्तीला देणाऱ्य़ा काळ्या डोळ्याच्या (आणि रंगाच्या) सहकाऱ्य़ाने ही संकल्पना फ़ोल ठरवली. एकुणच काय, चकाकणारं सगळच सोनं नसत आणि ओबडधोबड खडकातही स्वच्छ झऱ्य़ाचं वास्तव्य असत म्हणतात ते खोटं नाही. कोणी कसं रहाव आणि कस असाव याला काही कोष्टक नाहीये. भल्या बुऱ्य़ाचा अनुभव प्रत्येकजण यथा शक्ती देतच असतो, त्यामुळे पूर्वग्रह न बाळगणेच चांगले.

ता.क. : १) एक गंमत म्हणून नमूद करावेसे वाटते की ’टेक्सास चिंगळी’ च्या उपशाखा टेक्सास बंटी, टेक्सास इंगळी सुध्दा बघायला मिळतात.
२) पोस्टचे शीर्षकच सुचत नव्ह्ते त्यामुळे ते आणि मूळ विषय भरकटला असल्यास चू.भु.द्या.घ्या.
 
 

13 comments:

sanika said...

nehmipramanech sunder.......saglyat tuzya pratyek goshtikad pahanyacya drushtikona baddal hats off.........keep it up!!!!!!!!!!

Anonymous said...

"There is no art to find the mind's construction in the face." - Duncan in Macbeth, Act 1 Scene 4.

Meenal said...

@ सानिका, धन्यवाद..
@ एनॉनिमस, अगदी खरं आहे. किंग डंकनशी सहमत.

bhaanasa said...

आपल्याला जे पाहायची इच्छा असते तेच अनेकदा दिसते, प्रत्यक्षात सत्य वेगळेच असते.
छान लिहीले आहेस, आवडले. किंग डंकनशी सहमत.

Anonymous said...

Shakespeare may not have known that art but Michel de Montaigne had said that he could make out a kindred spirit from the way a person smiled.

And most religious orders, perhaps because they are wary of 'लाल भडक पट्यापट्याचा टी शर्ट', impose sartorial discipline.

मीनल said...

भानस, एनॉनिमस
आपल्याला जे पाहायची इच्छा असते तेच अनेकदा दिसते - होय,मला अगदी असेच म्हणायचे होते.
आणि कपड्यांविषयीच्या संकेतांबद्दल बोलायचे तर, हो, ७०% लोकं बाह्य पोषाखाविषयी जागृक असतात असे मला वाटते.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :-)

Somesh said...

ऊस डोंगा परि रस नोव्हे डोंगा, का रे भुललासी वरिलिया रंगा ? या ओळी आठवल्या.वपु काळेंचं 'का रे भूललासी ..' नावाचा एक कथासंग्र्ह आहे .. मिळाला तर वाच !

- सोमेश
http://thelife.in

Ajay Sonawane said...

barech diwasanantar post nahi kaa? lokana varun olkhana khup avghad asta, varun chgnali disnari lok khup tarhevaik asu shaktat ani kahi veles ulta hi

Manoj said...

shekspear kaay ani chokhamela kay, antarang mhantat to 'Rang' baherun disat nahi.
Anonymous ni Mcbethchya nemakya oli lihalyat.tyanni 'prakat' vyayala harkat nahi. :=)

मीनल said...

@सोमेश,
का रे भूललासी कसा बरं वाचायचा राहिला, तू सांगितलेस ते बरं झाल.नक्की वाचेन.
@अजय, हो..बरेच दिवसानंतर पोस्ट टाकली.तू बाकी चांगला स्पीड ठेवला आहेस. :) keep it up!
@मनोज, प्रतिक्रीयेबद्द्ल धन्यवाद.

Anonymous said...

Anonymous does not believe that Shakespeare's is the only take. He quoted only him first to see how eagerly the quote was received. It has to be applied carefully; or balanced with Montaigne's astute observation, if you will. For instance, it would be wrong of our prime minister to deliver his speech on 15-AUG in a bermuda with his face painted garishly and claim that 'there is no art' & c.

आनंद पत्रे said...

सुरेख लेख मीनल.. याच धर्तीवरच्या एका चारचाकीच्या जाहीराती आठवतात..

मीनल said...

कोणती जाहीरात बरं?