Friday, August 28, 2009

राजे

शेजारची रिद्धी गणपतीसाठी म्हणून कोल्हापूरला आली आहे. ती कराडला राहते आणि के.जी मधे आहे. बोबडं बोलत, आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतल्यावर ती नेहमीच्या गप्पांकडे वळली.

" आमत्या शालेत शिवाजीराजे भोसलेंचा पिक्चर दाखवला " हातातल्या पेढ्याकडे निरखून पहात ती म्हणाली.

" म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तो पिक्चरं ? " मला खरचं आश्चर्य वाटले.

" हं..तोच..ते घोड्यावरुन येतात तोच्च..आनि एक पेढा दे.."

" मगं आवडला का? आणि शिवाजीराजे कोण होते गं ? "

" हिरो.. "

" मग, टिचरने या हिरो बद्दल आणखी काहीच सांगितले नाही?? "

" नाई.. पेढा संपला. चॉक्केट आहे? "

तिला आणखीही खोदून प्रश्न विचारले पण ते फ़िल्म हिरो आहेत या पलिकडे तिला काही माहीत नाहीतसे दिसले. बाहेरुन किंवा घरी तिला राजेंविषयी काही माहिती मिळाली नाही ही गोष्ट अलहिदा ! पण शाळेतही शिक्षकांनी या विषयी काहीच माहिती देऊ नये? मुळात चार पाच वर्षाच्या मुलांना मराठी भाषिकांची दुखरी नस वगैरेवर बेतलेला चित्रपट दाखवणेच मला पटत नाही. त्याविषयी अधिक माहिती देण्याचे कष्टही शाळेने घेतलेले दिसले नाहीत. याचा अर्थ मुलांना फक्त कार्टून फ़िल्म दाखवावी किंवा त्यांना यातले काही कळत नाही असे नव्हे.. पण या संवेदनशील मनांपुढे विषय मांडताना निदान त्याची पूर्वमाहिती मुलांना द्यायला हरकत नाही. याऎवजी शिवाजीराजेंची डॉक्युमेंटरी, त्यांचा लढा यांविषयी कितीतरी सोर्स उपलब्ध आहेत आणि यांविषयी मुलांना माहित व्हायला हवं..
आज्जीच्या मऊ गोष्टींमधून मला शिवबा प्रथम भेटले. नंतर दादाने केरसुणीची तलवार करुन तक्क्या गाद्यांना झोडपून, राजे शत्रूंना कसे मारत असत, याचे प्रात्यक्षिक दाखवले. पुरंदरेंनी तर पुस्तकरुपाने खजिनाच उघड केला.
मुलांनी राजेंना प्रथम गड जिंकताना, दर्‍याखोर्‍या तुडवताना, राज्याभिषेक करुन घेतानाच पहावे अशी आपली माझी उगीचच इच्छा आहे..!

8 comments:

Anonymous said...

मीनल बाई: तुम्ही छान लिहिता, चक्क भारदस्तपणाकडे झुकणारं; पण म्हणून लेखनाचा एकूण सूर 'गजाली' शीर्षकाशी विसंगत वाटतो. हे म्हणजे 'राजहंस माझा निजला' नावाचा गाण्यांचा कार्यक्रम करायचा आणि 'राया मला मॅक्सी शिवाल का', 'शुक शुक मन्या' सारखी गाणी त्यात सादर करायची, असा प्रकार वाटतो. काही 'गजाली' नावाला शोभेल, असं लिहा की! अर्थात हलकफुलकं लिहिता येत असल्यास; उगीच ओढूनताणून प्रयत्न नको. सध्या ब्लॉगलेखकांचा आवडता दृष्टीकोन म्हणजे: 'मी कसा बाहेर फिरायला गेलो होतो/होते. एक भिकारी किंवा कोट्याधीश रस्ता ओलांडताना पाहिला. मधे तो अचानकच थांबला. या वर्तनाची विश्वाच्या पसार्‍याशी अमुक-अमुक प्रकारे सांगड बसते. हे अचानक लक्षात आले. अ) डोळे भरून आले. आ) आईची आठवण आली. इ) ती सगळ्यांसाठी किती करते! ई) शब्द फुटेना तोंडातून. उ) नज़रतले धुके सरले, तेव्हा लक्षात आले की रस्ता ओलांडणारा नाहीसा झालेला. याचीही विश्वात्मक ऐक्याशी सांगड जुळते. गीतेत (किंवा अजून कुठेतरी) म्हटलंच आहे: यथा काष्ठं च काष्ठं च.

या अ-आ-इ-ई शिवाय काही वाचायलाच मिळत नाही. त्यापेक्षा तुम्ही छान बिनधास्त वाटता.

लिहित रहा, आम्हाला तुमचे लिखाण आवडते.

मीनल said...

ऍनॉनिमस,
प्रतिक्रिया आणि सूचना दिल्याबद्दल धन्यवाद! खरं सांगू का, शीर्षक आणि पोस्ट यांतील तफ़ावत मलाही जाणवते.त्याचा उल्लेखही ’शुगरकोटेड’ मध्ये केला आहे. गजाली बद्दल बोलायच तर विशिष्ट विषयांपुरत लिहायच अस काही ठरवल नव्हत.. संगितसेवाची पोस्ट हलकफ़ुलक या सदरात मोडावी अशी इच्छा होती, पण ती बाळबोधपणा कडे झुकते की काय अशी बरेचदा शंका आली. परंतु आमच्यासारख्या नवशिक्यांना एवढी मुभा वाचक देतात याचा मला आनंद आहे. सुधारीत पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करेन.

Anonymous said...

The post on 'Sangeet-sewa' is exellent; nicely falls under the title 'Gajaalee'. Please do not modify it. Let it stand as it is. As I have commented under it, I found it jarring that the word 'Bhoop' is written as 'Bhup'. But that is a minor blemish.

शिवाय 'तो स्पीडीली वाजवायचा' हे ही खटकलं. इतक्या सहज आपण इंग्रजी शब्दांच्या आहारी जातो म्हणून भाषेची पीछेहाट होते. 'मूळ लय सोयीसाठी कमी न करता' हे पसरट आहे, पण अर्थ तोच निघतो.

आणि तुम्ही कसल्या नवशिक्या? इतकं भाषेवर प्रभुत्व सहसा वाचायला मिळत नाही. लेखनाला आवश्यक असा वाचनीयतेचा गुण तुमच्यात भरपूर आहे.

- एनॉनिमस-ली आभारी

Pravin said...

Nice one.... Liked it..:)

Innocent Warrior said...

Thanks for visiting my blog.

मीनल said...

pravin, innocent warrior thank you.

Anonymous said...

Write something ... !!

रोहन चौधरी ... said...

मिनल .. आत्ताच तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती कळली आणि पोस्ट्स बघता बघता थेट ह्या पोस्टयेउन थांबलो... :) 'श्री शिवछत्रपती महाराज' म्हणजे माझ दैवत ... मराठा इतिहास हा माझा अभ्यासाचा विषय... राजांबद्दल अधिकाधिक माहिती लोकांना मिळावी म्हणून मी मराठा इतिहासावर 3 ब्लोग्स सुरू केले आहेत...