Tuesday, September 22, 2009

पुस्तकातल्या जागा

कुठल्याशा दिवाळी अंकात आजोळच्या कानडी वाड्याचे वर्णन आले होते. लेखक श्री. जोशी, प्रथम नाव जाम आठवत नाहिये पण तपशिल लख्ख आठवतोय. पाय धुवायच्या छोट्याशा चौकोनापासून आजोबांची बैठक तिथला लाकडी झोपाळा, कोठार, आज्जीची खोली, देवघर, स्वयंपाकघर, परसदारी फ़ुललेली शेवंती केळी, विहीर अगदी ऎसपैस चौसोपी वाडा होता तो!


खूप वाटलं तिथे एकदतरी जाऊन याव. बरेचदा असं होतं. पुस्तकात वाचलेल्या अशा अगणित जागा असतात जिथ आपल्याला उपस्थित रहावस वाटतं. हॅरी पॉटरला नाही का ’ चेंबर ऑफ़ सिक्रेट ’ मधे डायरीत जाऊन जुनं हॉगवर्ड पहायला मिळाल? तशी संधी आपल्यालाही मिळाली तर? प्रथम कुठे जायचय बरं मला? हो, ज्योच्या खोलीत! तीच ती माळावरची छोटीशी खोली. ज्योने आपली पहिली गोष्ट इथेच लिहली, तर्‍हेतर्‍हेची नाटके बसवली, पिकविक क्लबची सदस्यता लॉरीच्या गळ्यात मारली. बाकीच्या तिघी बहिणींना चकवून लॉरी जेव्हा कपाटात लपून बसला होता आणि धुळीने खोकत माकत बाहेर आला तेव्हा त्या दोघांना पोटभरुन हसताना पहायचय!२२१ बेकर स्ट्रीटला भेट देता आली तर होम्सचे घर बघेनच, पण त्याच्या खोलीतला तो खास ड्रॉवर पण उघडून बघेन. त्यात त्याच्या आवडत्या वस्तू ठेवल्या आहेत म्हणे! बदकाच्या पोटात मिळालेला निळा महागडा खडा, लहान मोठी भिंग, त्याच जुनं सोन्याच्या चेनचं घड्याळ, सिगार, पत्यांची डायरी आणि हो, आयरीन ऍडलरचा फोटोसुध्दा... फारयप्लेसजवळ उभं राहून विचार करण्याची त्याला भारी खोड. त्याशेजारी पुस्तकांनी भरलेल कपाट आणि थेट रस्त्यावर नजर ठेवणारी खिडकी. वस्तूंची थोडी भाऊगर्दी झाल्यासारख्या त्या खोलीत दोघा मित्रांनी बनवलेल्या गुप्त योजनेत मलाही सामिल होता आले तर काय मजा येईल!


कार्व्हरची डायमंड ग्रोव्हमधली बाग आणि अलाबामा मधली चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली छोटी प्रयोगशाळा लssयं भारी असेल नाई? ’लाईफ़ ऍन्ड डेथ इन शांघाय’ मधील निएन चेंगच शांघायमधल मोठ्ठ घर, माओवाद्यांनी नासधूस कारायच्या कितीतरी आगोदरचं! एकदातरी जाता यावं तिथे.


पुलंच्या चाळीत जायची तर कित्ती कित्ती इच्छा आहे म्हणून सांगू? तशी बेळगावातल्या रावसाहेबांच्या बंगलीत संध्याकाळी जो अड्डा जमायचा तिथे दोन घटका जरी जाता आले तर अजि म्या ब्रह्म पाहिले असे होऊन जाईल.. काय भन्नाट जागा असेल ती! ते पान आठवले तरी बेळगावातली गार झुळूक अंगावरुन जाते.


शांताबाईंनी वर्णन केलेली माजघरातली खोली.. भरदुपारी गच्च करडा अंधार असणारी, गौरीच्या सणात पुरुषांच्या पंगतीमागून आरामात पुरणपोळी जेवून उठलेली बायकांची पंगत. डोळ्यांवर झोपेची गुंगी असूनही ’त्या’ बाईबद्दल हलक्या आवाजात बोलत माजघर जाग ठेवणार्‍या बायका. धान्याच्या पोत्यांमधे झोप घेणार्‍या बायका आणि आईला खेटून बसलेली छोटी शांता किती मजेशीर दिसत असेल नाई? मीही तिथे एक डुलकी मारुन यावी म्हणते!


’साद देती’ मध्ये वर्णन केलेली ती अद्भुत गुहा, बर्फाळ डोंगरातली उबदार स्वच्छ जागा.. वाघार्जिन, गरम दूध, वृध्द योगी काय सुंदर लिहल आहे याबद्दल! आपली काय पात्रता नाहिये बॉ तिथे जायची पण दोन क्षण जरी त्या गुहेत डोकावायला मिळेल का? अरविंद, योगानंद यांच्या साध्या शांत घरांच्या वर्णनात खासचं साम्य आढळतय. त्यांच्या अस्तित्वाचा वास्तूवर नक्कीच परिणाम होत असणार..


काळ आणखी मागे नेता आला तर थेट चाणक्यांची खोली पहायची इच्छा आहे. जिथे राजकीय कामासाठी राजाच तेल समईत जळत आणि खाजगी कामासाठी स्वखर्चाच! सुटलेल्या शेंडीची गाठ नक्की कुठे बांधली गेली माहित नाही पण इथे कोण्या एका रात्री आपल्या मोकळ्या केसांवरुन त्यांचा खिन्न हात नक्कीच फ़िरला असेल. विषकन्येला पाठवण्याचे खलबत इथेच ठरले असेल, राजमुद्रेचे खोटे खलिते तयार केले गेले असतील. किती गुप्त आणि सुरक्षित असेल ते आर्य दालन.


आता तर खरच लोभ सुटला आहे. इथे तिथे म्हणता म्हणता प्राचिन काळात जाण्याचे धैर्य आले की! तसे झाले तर, द्वारकाधीश कृष्णाच्या राजदरबारात उपस्थित राहता येईल का? वैभवात न्हायलेली ती कृष्णविभोर वास्तू काय देखणी असेल! पांडवांच्या मयसभेचे इतके कौतुक नाही जितके द्वारकेच्या कृष्णदालनाचे आहे. तिथे दान धर्म, यज्ञ याग घडले असतील, कोण्या कौरवाला समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या गेल्या असतील, द्रौपदीला सबूरीचा सल्ला दिला गेला असेल, कुणी सांगाव, तिथे अष्टनायिकांचा दुस्वासही झिरपला असेल!


गंमत म्हणजे व्यासांचे मूळ महाभारत अजून मी वाचलेलेच नाही पण महाभारतावरील टिका, त्याचा उत्तरार्ध, आणि त्यासंबंधीत बरीच काल्पनिक, वास्तव पुस्तके वाचली गेली. देसाई, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, वैद्य, पानसे यांनी महाभारतातील व्यक्तीच नव्हे तर शहरं वास्तूही बारीकसारीक तपशिलांसकट जिवंत केल्या आहेत.


काही वास्तव काही काल्पनिक अशा ह्या सगळ्या जागा आपण मनाने फ़िरुन आलो आहोत. खरचं काय भन्नाट आहेत हे लेखक! जादूने वा तत्सम प्रकाराने या ठिकाणी जायला मिळो न मिळो पण या लोकांच्या लेखणीच्या जादूने या जागा आणि जगाची सफ़र झाली आहे हे नक्की..!


काही वर्णनात्मक भाग व संदर्भासाठी साभार :-
चौघीजणी- शांता शेळके (Little Women- Louica Alcott), The Adventures of Sherlock Homes - Arthur Canon Dyan, एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर, पु.ल. देशपांडे- (सांगणे न लागे तरी पण) बटाट्याची चाळ व व्यक्ती आणि वल्ली, साद देती हिमशिखरे- श्री प्रधान, योगी कथामृत- परमहंस योगानंद, महाभारतातील व्यक्तीरेखा- श्री पानसे.