Wednesday, October 21, 2009

किर्लोस्करवाडी

UAE मध्ये अल्‌ एन अमिरात पाहताना हटकून कशाची आठवण झाली असेल तर किर्लोस्करवाडीची! ’मेलेमे बिछडी हुई जुडवा बहने’, एक मॉडर्न ज्यास्त श्रीमंत, तर दुसरी साधी पण सारख्याच चेहर्‍यामोहर्‍याची अगदी तस्सच.
महाराष्ट्रातील सगळ्यात आखीव रेखीव गावांमध्ये किर्लोस्करवाडीचा पहिला नंबर येण्यास काहीच हरकत नाही. हे गावच मुळी कारखान्याभोवती नियोजित पध्दतीने वसवले गेले आहे. हडप्पा संस्कृतीत सर्व रस्ते काटकोनात छेदत होते म्हणजे नक्की काय प्रकरण होते हे प्रत्यक्ष या गावातील रस्ते बघून समजले. वर्षातून एकदा तरी किर्लोस्करवाडीला जायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. द्राक्षांचे मळे एकापाठोपाठ दर्शन देवू लागले की समजायचे वाडी जवळ आले. स्थानकावर रिक्षा, टांगे तयार असायचे. रिक्षेची शिफारस आम्ही कधीच करणार नाही हे माहित असूनही बाबा विचारायचे " कस जायचं? रिक्षा की टांगा? "
" टांगाsss टांगाss"
मग हातातला रंगित चाबूक उडवत टांगेवाला म्हणायचा, " ४२६ टोपकर नां? चला सोडतो "
त्याच्याशेजारी कोण बसणार यासाठी स्पर्धा व्हायची. अंगभूत चापल्याच्या अभावामुळे मला बरेचदा मागे बसावे लागे. दादा ती ’पेशल’ जागा पटकवायचा. हे पुढे बसणे खरचं मजेदार असे. तो टांगेवाला रंगित चाबूक फ़िल्मी पध्दतीने हवेत फ़िरवायचा. टांग्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजात घोड्यांच्या टापांचा आवाज मिसळून जाई. खूप छान वाटायचे ते ऎकताना!
टांगेवाले काकांच्या "हुर्याss च्याक च्याक " केल्याने आणि जोराने लगाम उडवल्यानेही घोडा आपली गती अजिबात वाढवत नाही हा माझा वैयक्तीक शोध होता. रस्त्यावर फारशी गर्दी नसायचीच, त्यामुळे टांग्याच्या रबरी भोंग्याचा तसा उपयोग व्हायचा नाही. मग घर आल्यावर तो जोरजोराने वाजवून टांगेवाले काका पाहुणे आल्याची वर्दी देत.
एका कॉलनीतील घरे एकसारखी असत. गावातल्या गावातही आत्याला काहीवेळा कॉलनी, पर्यायाने घर बदलावे लागे. तिच्या प्रत्येक घराभोवती फुलवलेली सुंदर बाग सोडताना तिला परम दुःख व्हायचे. अगदी चित्रातल्यासारखी दिसणारी ती घरे फार सुरेख असायची. बहुतांशी घराबाहेर आंबा, नारळाची, शेंगांची झाडे सावली धरायची. घ.नं. ४२६ हे विशेष लक्षात राहीलेले. त्याच टॉयलेट मात्र घराबाहेर, मागच्या बाजूला होत. या वाटेवर नागमोडी रांगोळी काढल्यासारखे फरश्यांचे तुकडे टाकलेले होते. या निळ्या घराच्या मागे जंगलाची सुरवात होत होती. त्यामुळे मोरांचा केकारव तर अखंड कानी पडायचा. बरेचदा मोर परसदारी भटकायलाही यायचे.
भरपूर पदार्थ आणि गप्पा यातून वेळ मिळाला की खेळायला पळायचे. वरणभातातल्या मुलांबरोबर खेळताना खूप मजा यायची. ’ए चकली’ ’ए टकलू’ ही तिथली परमोच्च शिवी. कोल्हापूरी शिव्यांपुढे हे म्हणजे टिपू सुलतानने लिलिपुटच्या राजाबरोबर केलेली लुटूपुटूची लढाईच!
शेजारच्या दयानंदच्या आईला, ’दयानंदची आई’ म्हणूनच ओळखले जायचे. दयानंद हा खूप व्रात्य मुलगा होता. खाली पडलेल्या किंवा दगड मारुन मुद्दाम पाडलेल्या शेंगा चेचून त्याचा चेंडू बनविण्याचा कार्यक्रम असायचा. मग क्रिकेट! त्याचा तो चेंडू वाळेपर्यंत आमची परत निघायची वेळ यायची.
वाडीतल्या हवामानाने कधी आम्हाला आजारी वगैरे पाडले नाही तरी, तिथल्या एकमेव डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली ती ’फिटनेस सर्टिफीकेट’ आणण्यासाठी. तिथल्या पोहण्याच्या तलावाचा पास मिळवण्यासाठी, हे आवश्यक होते. गोळे डॉक्टर अगदी परदेशी माणसासारखे दिसायचे. उंच, गोरेपान.
" आता तुझा रक्तगट कळण्यासाठी तुझे रक्त घेतले पाहिजे "
" मला महिती आहे, ऒ " घाबरुन त्यांच्या हातातील सुई कडे पहात मी ठोकून दिले होते.
" अगं, पण ऒ पॉझिटीव्ह का निगेटिव्ह? "
उत्तरादाखल ’तडजोड करा ना आता काहीतरी’ या नजरेने मी त्यांच्याकडे पाहिले.
" ठिक आहे. ऒ पॉझिटिव्ह लिहतो "
त्यांना आवश्यक ती कृत‍‌‌ज्ञता दर्शवून सर्टिफीकेट हातात घेतले आणि मग कुठे तो पास मिळाला.
वाडीतल महिला मंडळ भलतच सक्रिय होतं. सणावाराला कार्यक्रम, स्पर्धा असायच्याच पण त्याव्यतिरिक्तही अनेक उपक्रम व्हायचे. काचेच्या नोटीसबोर्डवर नवनविन घोषणा जाहीर व्हायच्या. माझी आत्या बहुतेकदा पहिल्या तीन क्रमांकात असायची. शाळेत न मिळालेल्या बक्षिसांचा तिने इथे पुरेपुर वचपा काढला.
गावाच्या मध्यभागी मारुतीच देऊळ आहे. संगमरवरी गोंडस मारुती मी प्रथमच पाहिला. आत्याची अक्करकी असायची तेव्हा १२१ दिवे एकदम उजळून गेलेले फार सुंदर दिसायचे. त्यातल्या काही वेड्यावाकड्या दिव्यांना माझाही हातभार लागलेला असायचा. ती दुखर्‍या पायांनी प्रदक्षिणा घालायची तेव्हा, तिच्याऎवजी मी घातलेल्या प्रदक्षिणा मारुतीला नक्कीच चालतील हा मुद्दा तिला पटायचाच नाही.
आत्या, काकांनी किर्लोस्करवाडी सोडून आता बरीच वर्षे झाली. वाडीचा विषय निघाला तरी ती हळवी होते. आता म्हणे तिथे टांगे वगैरे नसतात. जुळुन आलेले मैत्र, जुन्या ओळखी कुठे कुठे बदली होऊन गेल्या. अतिशय शांत, सुसंस्कृत, रेखिव गावातली काही वर्षे तिच्या मनात गुंतून बसली आहेत. उगाच का माहेरच्या गावापेक्षा हे गाव प्रिय वाटते..?

Wednesday, October 14, 2009

आणखी एक मत

काल मतदान केंद्रात दुपारी दीडच्या सुमारास थोडाफार आळसावलेलाच माहौल होता. थोड्या कंटाळलेल्या मतदारांच्या रांगेत एक मध्यमवयीन माणूस आणि मिश्कील पोलीस यांनी हास्याची कारंजी उडवून दिली. झाले होते काय, की या माणसाने प्रवेशद्वारी मतदार क्रमांक तपासायला टेबल टाकलेले असते, तिथून हलायलाच वीस पंचवीस मिनिटे घेतली. प्रत्येकाला तुम्ही कुठे राहता? त्या देवळाच्या मागे होय? आपली खास ओळख आहे, आठवतय का? अस विचारुन भंडावून टाकत होता. आता या दारु पिऊन आलेल्या पात्राला ओळख द्यायला लोकं बिचकणारच! काही माणसांनी तिथून त्याला घालवले. थोडा नॉर्मल झाल्यावर तो आत आला आणि मोठ्या आवाजात पाण्याच्या, रस्त्याच्या तक्रारी सांगू लागला. त्याच्याकडे नजर टाकून दोन पोलीसांची नेत्रपल्लवी झाली आणि त्यातील एक याच्या मागोमाग आला. आता या दोघांचा संवाद फार मजेशीर होता. प्रथम पोलीसांनी विचारले,

" काय मतदानाला आला वाटतं? "

" मग्गं, इत काय भाजी इकाया बसलेत? "

" तस नव्हे साहेब, आपल्यासारखे व्यस्त लोकं, विसरतात कधीकधी "

" *** आपला खास मानूस आहे, आपन खार्‍याची जेवनं उडवनार, स्वत्ता भाषणं देनार, त्यांच मत्व पटवनार आनी जित्तून आननार "

" मग तर निवडून आलेच ते! "

" मला रांगेतन फुड जाऊ द्या "

" अहो थांबा, तुम्ही रांगेतून जायच शोभत काय? थांबा जरा "

" थांबतो, थांबतो चांगला संध्याकाळपर्यंत थांबतो. xxx,  इतकी वर्षे मद्दान केलं, पन कोनी अस आडावल नाय "

" अहो साहेब, रागावू नका तुमच्यासाठी काही थंड आणू का? आज येताना घेउन आलात ते आणण्याची व्यवस्था करु का? "

" नगं, तुमी विचारलात हेच खूप आहे "

" आपल्याला इथ बाकड्यावर बसल तर चालेल ना? की माझ्या ऑफिसमध्ये नेऊ? "

" म्हंजे काय तुरुंगात घालता का काय मला?

" काय साहेब, *** चे पाव्हणे तुम्ही, तुमाला कस तुरुंगात घालणार? पण माझा हिसकाच असा आहे ना, की तुरुंगाच्या आधी हॉस्पिटलातच जावं लागत बगा! त्यामुळ दंगा करु नका. गुमान मतदान करा आणि लवकर चालते व्हा. "

लोकांनी पटकन त्याला पुढे जाऊ दिले. नशेत कोणतेतरी बटन दाबले गेले,  आणि आणखी एक मतदान झाले..!

Monday, October 12, 2009

शिल्पा

कॉलेजच्या पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन ऑफीस बाहेर हिss गर्दी.. बावरलेलं फ़र्स्ट इयर, जरा आत्मविश्वासी सेकंड इयर, निर्ढावलेलं थर्ड इयर आणि बेफ़िकीर फ़ायनल इयर.. सगळी मंडळी उपस्थित होती. एक उंच मुलगी रंग गेलेल्या खांबाला रेलून उभी होती. एवढ्या गर्दीत तिच्याकडेच का चौकशी करायला गेले सांगता नाही येणार, पण मी काही विचारायच्या आधीच तिने सांगितले, की फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना उद्या रजिस्ट्रेशन करायला सांगितले आहे. मला वाटतं आमच्या समविचारांची सुरवात तिथेच झाली असावी.

काही दिवसांनी ती वर्गात दिसली. हो म्हणजे दिसलीच! जुजबी बोलण्यापलीकडे ओळख गेली नाही. तशी ती एकटीच असायची. काहींनी ती मिसळत का नाही पासून विचित्रच आहे पर्यंत कारण नसताना शेरे मारले पण तास संपल्यावर चालणार्‍या फ़ुटकळ गप्पांमधे तिला खरचं रस नव्हता. माझ्या एका इंग्रजाळलेल्या मैत्रिणीपुढे मी ’मराठीतील सौंदर्यस्थळे’ या विषयावर घसाफोड करत असताना तिने प्रथमच संभाषणात भाग घेतला. आवडत्या विषयावर शिल्पा भरभरुन बोलते, नव्हे माहितीपूर्ण आणि विनोदीही बोलते हा शोध नविन होता. सोबत मिळाल्यावर मीही मराठीला माफक विरोध करणारीला हाणून घेतले.

" आय डोन्नो तुमी लोकानी आज मलाच काय पकडलयं " म्हणून तिने माघार घेतली आणि शिल्पा बरोबर दुसर्‍या गप्पा सुरु झाल्या. विषयांतर होत होत राधाचा विषय निघाला.

" अगं शिल्पा, तुला याबद्दल काही माहिती आहे का, राधाकृष्ण जोडून नाव येते पण राधेच्या अस्तित्वाचा महाभारतानंतरच्या अनेक वर्षांनंतरच्या ग्रंथांमध्ये उल्लेख नाहिये. काही ठिकाणी असे काही ऎकले तरी लोक मारतील.. पण राधा इतकी जिवंत आहे की तिचे अस्तित्व नाकारणे धाडसाचे होईल. "

" खरं आहे. मी पण वाचलय की ही काल्पनिक व्यक्ती असावी पण लोकांवर या गोष्टीचा पगडाच इतका आहे की, ती नव्हतीच हे जरी सिध्द झाले तरी पचनी बाकी पडणार नाही. "

" खरी असो नसो, पण ही व्यक्तीरेखा किती गोड आहे नं.."

कँटीनमधे इंग्लिश चिमणी कडून 'हाउ कुड यू' ने सुरु होणारं कोणत तरी वाक्य येणार याची खात्री होतीच !

" तूमी पयल्यांदाच राधाच्या एग्झिस्टंट बद्दल कसे बोलू शकता? "

" अगं, जाउदेत तिला बरीच महिती आहे म्हणून विचारल "

" पण इतका वेळ मी काय करायचं? वर आणि मलाच बंबार्डींग केलंत "

" मग, मराठीत इतक काय आहे? असं का म्हणालीस? "

यानंतरही काही वादग्रस्त काही हलक्या विषयांवर गजाली होत राहिली. वाचनाव्यतिरीक्तचे तिचे व्यसन म्हणजे परिक्षा! उद्या माझा अमुकतमुक पेपर आहे हे वाक्य ऑडिओ सिग्नल्सनी बरेचदा माझ्यापर्यंत पोहोचवले आहे. ती अभियांत्रिकी शिकत आहे, बी. ए. पूर्ण केले आहे, बहिस्थ एम. बी. ए. करीत आहे. परवा एल.एल.बी.च्या प्रवेशासाठी खटपट करीत असल्याचे सांगत होती. त्यामुळे दर महिन्याला यांपैकी एका तरी विषयाचा पेपर असतोच. भरतनाट्यमची प्रथम परिक्षा आपल्यापेक्षा खूप लहान मुलींबरोबर देणे सोपी गोष्ट नाही. खेरीच प्रचंड वाचन, प्रवास, बागकाम, इतर उचापती चालूच असतात. जरबेरा घरच्या बागेतसुध्दा लावता येतो हे मला तिच्या बागेतली रंगिबेरंगी फुले बघेपर्यंत माहित नव्हते.

चंद्रपूरच्या आनंदवन आश्रमात राहण्याची तिला खूप इच्छा होती. मला तिच्याबरोबर जाणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर ती थोडी नाराज झाली. उत्तमोत्तम गोष्टी शेअर करण्याच्या भावनेने आमची मैत्री अधिक घट्ट केली. तिने हट्टाने मला वेगवेगळी पुस्तके वाचायला लावली. सुंदर चित्रपट दाखवले. Come September मी आपणहून कधी पाहिला नसता, तिने अगदी बघच म्हणून डिव्हीडी आणून दिली. शिल्पाने दिलेल्या पुस्तकांपैकी लक्षात राहिलेले एक म्हणजे ’चौघीजणी’. त्यावेळी परिक्षा अगदी तॊडावर होती. संध्याकाळी घाईघाईने घरी येवून तिने माझ्या हातात हे पुस्तक कॊंबले.

" आईने यावेळी मला अभ्यासाव्यतीरिक्तची पुस्तके वाचताना बघितले तर, परत कधीच ती पेपर पण वाचू देणार नाही, आणि पूर्ण वाचल्याशिवाय मला रहावणार नाही "

असे म्हणून हे कोलीत माझ्या हातात दिले आणि माझ्या परिक्षेचे तीन तेरा वाजले.

समान आवड हा प्रमुख धागा असला तरी मतभेद होतच नाहीत म्हणता येणार नाही. तिला कार्टून्स आवडत नाहीत, शाहरुख खान (अजूनही) बरा वाटतो, कधीतरी खूप आवडलेले चौघीजणी आता बाळबोध वाटते. ’कियानू रिव्ह्ज’ सर्वात देखणा अभिनेता (?) आहे ’ हे म्हणणे ती अजून माझ्या गळी उतरवू शकली नाही हे माझे यश मानते. कधीकधी तिच्या वागण्यात बेफ़िकीरीची झाक येते. अगदी काळजी वाटण्याइतपत! इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरला मॅथ्सचा अभ्यास करुन जाणारी, आणि त्याबद्दल विनोद करणारी माझ्या बघण्यातली ही पहिलीच. तिला रागावले तर निमूटपणे ऎकून घेते पण तशी पुन्हा वागणार नाही याची खात्री देता येत नाही.

शिल्पाला विचित्र म्हणणार्‍यांना ती नक्की कशी आहे हे समजावण्याच्या भानगडीत कधी मी पडले नाही, किंवा तिलाही याची फारशी पर्वा नव्हती. ज्या मैत्रीत आपण कसे आहोत, कोण आहोत ते दुसर्‍याला समजावून सांगावे लागते, ती खरी मैत्रीच नव्हे.
आधीच्या एका पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अभावितपणे मिळणार्‍या गोष्टींचा विशेष आनंद असतो. त्याला आणखी जोडून सांगायचे तर, अनपेक्षित, वेगळ्या आणि सुंदर गोष्टींमध्ये शिल्पाच्या मैत्रीचा नंबर खूप वरचा आहे.