Monday, October 12, 2009

शिल्पा

कॉलेजच्या पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन ऑफीस बाहेर हिss गर्दी.. बावरलेलं फ़र्स्ट इयर, जरा आत्मविश्वासी सेकंड इयर, निर्ढावलेलं थर्ड इयर आणि बेफ़िकीर फ़ायनल इयर.. सगळी मंडळी उपस्थित होती. एक उंच मुलगी रंग गेलेल्या खांबाला रेलून उभी होती. एवढ्या गर्दीत तिच्याकडेच का चौकशी करायला गेले सांगता नाही येणार, पण मी काही विचारायच्या आधीच तिने सांगितले, की फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना उद्या रजिस्ट्रेशन करायला सांगितले आहे. मला वाटतं आमच्या समविचारांची सुरवात तिथेच झाली असावी.

काही दिवसांनी ती वर्गात दिसली. हो म्हणजे दिसलीच! जुजबी बोलण्यापलीकडे ओळख गेली नाही. तशी ती एकटीच असायची. काहींनी ती मिसळत का नाही पासून विचित्रच आहे पर्यंत कारण नसताना शेरे मारले पण तास संपल्यावर चालणार्‍या फ़ुटकळ गप्पांमधे तिला खरचं रस नव्हता. माझ्या एका इंग्रजाळलेल्या मैत्रिणीपुढे मी ’मराठीतील सौंदर्यस्थळे’ या विषयावर घसाफोड करत असताना तिने प्रथमच संभाषणात भाग घेतला. आवडत्या विषयावर शिल्पा भरभरुन बोलते, नव्हे माहितीपूर्ण आणि विनोदीही बोलते हा शोध नविन होता. सोबत मिळाल्यावर मीही मराठीला माफक विरोध करणारीला हाणून घेतले.

" आय डोन्नो तुमी लोकानी आज मलाच काय पकडलयं " म्हणून तिने माघार घेतली आणि शिल्पा बरोबर दुसर्‍या गप्पा सुरु झाल्या. विषयांतर होत होत राधाचा विषय निघाला.

" अगं शिल्पा, तुला याबद्दल काही माहिती आहे का, राधाकृष्ण जोडून नाव येते पण राधेच्या अस्तित्वाचा महाभारतानंतरच्या अनेक वर्षांनंतरच्या ग्रंथांमध्ये उल्लेख नाहिये. काही ठिकाणी असे काही ऎकले तरी लोक मारतील.. पण राधा इतकी जिवंत आहे की तिचे अस्तित्व नाकारणे धाडसाचे होईल. "

" खरं आहे. मी पण वाचलय की ही काल्पनिक व्यक्ती असावी पण लोकांवर या गोष्टीचा पगडाच इतका आहे की, ती नव्हतीच हे जरी सिध्द झाले तरी पचनी बाकी पडणार नाही. "

" खरी असो नसो, पण ही व्यक्तीरेखा किती गोड आहे नं.."

कँटीनमधे इंग्लिश चिमणी कडून 'हाउ कुड यू' ने सुरु होणारं कोणत तरी वाक्य येणार याची खात्री होतीच !

" तूमी पयल्यांदाच राधाच्या एग्झिस्टंट बद्दल कसे बोलू शकता? "

" अगं, जाउदेत तिला बरीच महिती आहे म्हणून विचारल "

" पण इतका वेळ मी काय करायचं? वर आणि मलाच बंबार्डींग केलंत "

" मग, मराठीत इतक काय आहे? असं का म्हणालीस? "

यानंतरही काही वादग्रस्त काही हलक्या विषयांवर गजाली होत राहिली. वाचनाव्यतिरीक्तचे तिचे व्यसन म्हणजे परिक्षा! उद्या माझा अमुकतमुक पेपर आहे हे वाक्य ऑडिओ सिग्नल्सनी बरेचदा माझ्यापर्यंत पोहोचवले आहे. ती अभियांत्रिकी शिकत आहे, बी. ए. पूर्ण केले आहे, बहिस्थ एम. बी. ए. करीत आहे. परवा एल.एल.बी.च्या प्रवेशासाठी खटपट करीत असल्याचे सांगत होती. त्यामुळे दर महिन्याला यांपैकी एका तरी विषयाचा पेपर असतोच. भरतनाट्यमची प्रथम परिक्षा आपल्यापेक्षा खूप लहान मुलींबरोबर देणे सोपी गोष्ट नाही. खेरीच प्रचंड वाचन, प्रवास, बागकाम, इतर उचापती चालूच असतात. जरबेरा घरच्या बागेतसुध्दा लावता येतो हे मला तिच्या बागेतली रंगिबेरंगी फुले बघेपर्यंत माहित नव्हते.

चंद्रपूरच्या आनंदवन आश्रमात राहण्याची तिला खूप इच्छा होती. मला तिच्याबरोबर जाणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर ती थोडी नाराज झाली. उत्तमोत्तम गोष्टी शेअर करण्याच्या भावनेने आमची मैत्री अधिक घट्ट केली. तिने हट्टाने मला वेगवेगळी पुस्तके वाचायला लावली. सुंदर चित्रपट दाखवले. Come September मी आपणहून कधी पाहिला नसता, तिने अगदी बघच म्हणून डिव्हीडी आणून दिली. शिल्पाने दिलेल्या पुस्तकांपैकी लक्षात राहिलेले एक म्हणजे ’चौघीजणी’. त्यावेळी परिक्षा अगदी तॊडावर होती. संध्याकाळी घाईघाईने घरी येवून तिने माझ्या हातात हे पुस्तक कॊंबले.

" आईने यावेळी मला अभ्यासाव्यतीरिक्तची पुस्तके वाचताना बघितले तर, परत कधीच ती पेपर पण वाचू देणार नाही, आणि पूर्ण वाचल्याशिवाय मला रहावणार नाही "

असे म्हणून हे कोलीत माझ्या हातात दिले आणि माझ्या परिक्षेचे तीन तेरा वाजले.

समान आवड हा प्रमुख धागा असला तरी मतभेद होतच नाहीत म्हणता येणार नाही. तिला कार्टून्स आवडत नाहीत, शाहरुख खान (अजूनही) बरा वाटतो, कधीतरी खूप आवडलेले चौघीजणी आता बाळबोध वाटते. ’कियानू रिव्ह्ज’ सर्वात देखणा अभिनेता (?) आहे ’ हे म्हणणे ती अजून माझ्या गळी उतरवू शकली नाही हे माझे यश मानते. कधीकधी तिच्या वागण्यात बेफ़िकीरीची झाक येते. अगदी काळजी वाटण्याइतपत! इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरला मॅथ्सचा अभ्यास करुन जाणारी, आणि त्याबद्दल विनोद करणारी माझ्या बघण्यातली ही पहिलीच. तिला रागावले तर निमूटपणे ऎकून घेते पण तशी पुन्हा वागणार नाही याची खात्री देता येत नाही.

शिल्पाला विचित्र म्हणणार्‍यांना ती नक्की कशी आहे हे समजावण्याच्या भानगडीत कधी मी पडले नाही, किंवा तिलाही याची फारशी पर्वा नव्हती. ज्या मैत्रीत आपण कसे आहोत, कोण आहोत ते दुसर्‍याला समजावून सांगावे लागते, ती खरी मैत्रीच नव्हे.
आधीच्या एका पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अभावितपणे मिळणार्‍या गोष्टींचा विशेष आनंद असतो. त्याला आणखी जोडून सांगायचे तर, अनपेक्षित, वेगळ्या आणि सुंदर गोष्टींमध्ये शिल्पाच्या मैत्रीचा नंबर खूप वरचा आहे.

10 comments:

Ajay Sonawane said...

आयुष्यात असे कितीतरी लोक भेटत असतात त्यातलीच काही लोक मनात घर करुन बसतात. पण हा लेख अपुर्ण राहिल्यासारख वाटलं.

-अजय

HAREKRISHNAJI said...

surekh

मीनल said...

अजय,
लेख अपूर्ण वाटतो का? पण लोकांच्या सहनशक्तीचा किती अंत बघायचा, म्हणून लवकर आवरते घेतले. त्या नादात अपूर्णता आली असेल. :)

हरेकृष्णजी,
खूप खूप धन्यवाद.

Sheetal said...

Kaay sangtes?
Radha hi kalpanik vyaktirekha ahe?

मीनल said...

हो ग, असं वाचलय खरं..
पक्क ठाऊक नाहिये.

Innocent Warrior said...

sahi...

मीनल said...

Thanks abhi,
Keep visiting!

Anonymous said...

मूर्तिमंत समर्पणवृत्ती हे राधेचे स्वरूप असून ते काल्पनिक तसेच वास्तव या दोन्ही आकलनक्षेत्रांबाहेरही अस्तित्वात असल्याने त्या त्या नजरेने पाहणाय्राला त्या त्या स्वरूपात जाणवू शकते.

मीनल said...

so true..
राधा ही वृत्ती आहे. आणि कोणत्याही वृत्तीला वास्तव- अवास्तवतेच्या कक्षेत बांधता येत नाही.
जाणिवेच्या स्वरुपात ती असतेच!
नविन विचार दिल्याबद्दल धन्यवाद.

Rahul........ said...

Baap re tula eavadhi mahiti aahe aani eavadhya changalya prakare present karu shaktes he mala aata samajal. Hats off. :)