Wednesday, October 14, 2009

आणखी एक मत

काल मतदान केंद्रात दुपारी दीडच्या सुमारास थोडाफार आळसावलेलाच माहौल होता. थोड्या कंटाळलेल्या मतदारांच्या रांगेत एक मध्यमवयीन माणूस आणि मिश्कील पोलीस यांनी हास्याची कारंजी उडवून दिली. झाले होते काय, की या माणसाने प्रवेशद्वारी मतदार क्रमांक तपासायला टेबल टाकलेले असते, तिथून हलायलाच वीस पंचवीस मिनिटे घेतली. प्रत्येकाला तुम्ही कुठे राहता? त्या देवळाच्या मागे होय? आपली खास ओळख आहे, आठवतय का? अस विचारुन भंडावून टाकत होता. आता या दारु पिऊन आलेल्या पात्राला ओळख द्यायला लोकं बिचकणारच! काही माणसांनी तिथून त्याला घालवले. थोडा नॉर्मल झाल्यावर तो आत आला आणि मोठ्या आवाजात पाण्याच्या, रस्त्याच्या तक्रारी सांगू लागला. त्याच्याकडे नजर टाकून दोन पोलीसांची नेत्रपल्लवी झाली आणि त्यातील एक याच्या मागोमाग आला. आता या दोघांचा संवाद फार मजेशीर होता. प्रथम पोलीसांनी विचारले,

" काय मतदानाला आला वाटतं? "

" मग्गं, इत काय भाजी इकाया बसलेत? "

" तस नव्हे साहेब, आपल्यासारखे व्यस्त लोकं, विसरतात कधीकधी "

" *** आपला खास मानूस आहे, आपन खार्‍याची जेवनं उडवनार, स्वत्ता भाषणं देनार, त्यांच मत्व पटवनार आनी जित्तून आननार "

" मग तर निवडून आलेच ते! "

" मला रांगेतन फुड जाऊ द्या "

" अहो थांबा, तुम्ही रांगेतून जायच शोभत काय? थांबा जरा "

" थांबतो, थांबतो चांगला संध्याकाळपर्यंत थांबतो. xxx,  इतकी वर्षे मद्दान केलं, पन कोनी अस आडावल नाय "

" अहो साहेब, रागावू नका तुमच्यासाठी काही थंड आणू का? आज येताना घेउन आलात ते आणण्याची व्यवस्था करु का? "

" नगं, तुमी विचारलात हेच खूप आहे "

" आपल्याला इथ बाकड्यावर बसल तर चालेल ना? की माझ्या ऑफिसमध्ये नेऊ? "

" म्हंजे काय तुरुंगात घालता का काय मला?

" काय साहेब, *** चे पाव्हणे तुम्ही, तुमाला कस तुरुंगात घालणार? पण माझा हिसकाच असा आहे ना, की तुरुंगाच्या आधी हॉस्पिटलातच जावं लागत बगा! त्यामुळ दंगा करु नका. गुमान मतदान करा आणि लवकर चालते व्हा. "

लोकांनी पटकन त्याला पुढे जाऊ दिले. नशेत कोणतेतरी बटन दाबले गेले,  आणि आणखी एक मतदान झाले..!

4 comments:

Sachin_Gandhul said...

मस्तच.. आवडले आपल्याला .. अश्या शाब्दिक कुरघोड्या बर्याच वेला हसायला लावतात

मीनल said...

सचिन,
उपरोधातून बरेच काही सांगता येते. इथे काही महिन्यांपूर्वी खड्डेनवमी साजरी केली होती. नागरीकांनी प्रत्येक खड्ड्याभोवती रांगोळी काढून पूजा केली होती.

Mahendra said...

विनोदातुन पण जे सत्य मांड्लंय ते मनाला भिडलं.. :(

मीनल said...

महेंद्रजी,
धन्यवाद. ग्रे ह्यूमर प्रकार विनोद, सत्य दोन्ही सांगून जातो.
म्हणूनच कदाचित पु.लं.चा ’अंतू बर्वा ’ एवढा लोकप्रिय आहे.