Wednesday, October 21, 2009

किर्लोस्करवाडी

UAE मध्ये अल्‌ एन अमिरात पाहताना हटकून कशाची आठवण झाली असेल तर किर्लोस्करवाडीची! ’मेलेमे बिछडी हुई जुडवा बहने’, एक मॉडर्न ज्यास्त श्रीमंत, तर दुसरी साधी पण सारख्याच चेहर्‍यामोहर्‍याची अगदी तस्सच.
महाराष्ट्रातील सगळ्यात आखीव रेखीव गावांमध्ये किर्लोस्करवाडीचा पहिला नंबर येण्यास काहीच हरकत नाही. हे गावच मुळी कारखान्याभोवती नियोजित पध्दतीने वसवले गेले आहे. हडप्पा संस्कृतीत सर्व रस्ते काटकोनात छेदत होते म्हणजे नक्की काय प्रकरण होते हे प्रत्यक्ष या गावातील रस्ते बघून समजले. वर्षातून एकदा तरी किर्लोस्करवाडीला जायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. द्राक्षांचे मळे एकापाठोपाठ दर्शन देवू लागले की समजायचे वाडी जवळ आले. स्थानकावर रिक्षा, टांगे तयार असायचे. रिक्षेची शिफारस आम्ही कधीच करणार नाही हे माहित असूनही बाबा विचारायचे " कस जायचं? रिक्षा की टांगा? "
" टांगाsss टांगाss"
मग हातातला रंगित चाबूक उडवत टांगेवाला म्हणायचा, " ४२६ टोपकर नां? चला सोडतो "
त्याच्याशेजारी कोण बसणार यासाठी स्पर्धा व्हायची. अंगभूत चापल्याच्या अभावामुळे मला बरेचदा मागे बसावे लागे. दादा ती ’पेशल’ जागा पटकवायचा. हे पुढे बसणे खरचं मजेदार असे. तो टांगेवाला रंगित चाबूक फ़िल्मी पध्दतीने हवेत फ़िरवायचा. टांग्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजात घोड्यांच्या टापांचा आवाज मिसळून जाई. खूप छान वाटायचे ते ऎकताना!
टांगेवाले काकांच्या "हुर्याss च्याक च्याक " केल्याने आणि जोराने लगाम उडवल्यानेही घोडा आपली गती अजिबात वाढवत नाही हा माझा वैयक्तीक शोध होता. रस्त्यावर फारशी गर्दी नसायचीच, त्यामुळे टांग्याच्या रबरी भोंग्याचा तसा उपयोग व्हायचा नाही. मग घर आल्यावर तो जोरजोराने वाजवून टांगेवाले काका पाहुणे आल्याची वर्दी देत.
एका कॉलनीतील घरे एकसारखी असत. गावातल्या गावातही आत्याला काहीवेळा कॉलनी, पर्यायाने घर बदलावे लागे. तिच्या प्रत्येक घराभोवती फुलवलेली सुंदर बाग सोडताना तिला परम दुःख व्हायचे. अगदी चित्रातल्यासारखी दिसणारी ती घरे फार सुरेख असायची. बहुतांशी घराबाहेर आंबा, नारळाची, शेंगांची झाडे सावली धरायची. घ.नं. ४२६ हे विशेष लक्षात राहीलेले. त्याच टॉयलेट मात्र घराबाहेर, मागच्या बाजूला होत. या वाटेवर नागमोडी रांगोळी काढल्यासारखे फरश्यांचे तुकडे टाकलेले होते. या निळ्या घराच्या मागे जंगलाची सुरवात होत होती. त्यामुळे मोरांचा केकारव तर अखंड कानी पडायचा. बरेचदा मोर परसदारी भटकायलाही यायचे.
भरपूर पदार्थ आणि गप्पा यातून वेळ मिळाला की खेळायला पळायचे. वरणभातातल्या मुलांबरोबर खेळताना खूप मजा यायची. ’ए चकली’ ’ए टकलू’ ही तिथली परमोच्च शिवी. कोल्हापूरी शिव्यांपुढे हे म्हणजे टिपू सुलतानने लिलिपुटच्या राजाबरोबर केलेली लुटूपुटूची लढाईच!
शेजारच्या दयानंदच्या आईला, ’दयानंदची आई’ म्हणूनच ओळखले जायचे. दयानंद हा खूप व्रात्य मुलगा होता. खाली पडलेल्या किंवा दगड मारुन मुद्दाम पाडलेल्या शेंगा चेचून त्याचा चेंडू बनविण्याचा कार्यक्रम असायचा. मग क्रिकेट! त्याचा तो चेंडू वाळेपर्यंत आमची परत निघायची वेळ यायची.
वाडीतल्या हवामानाने कधी आम्हाला आजारी वगैरे पाडले नाही तरी, तिथल्या एकमेव डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली ती ’फिटनेस सर्टिफीकेट’ आणण्यासाठी. तिथल्या पोहण्याच्या तलावाचा पास मिळवण्यासाठी, हे आवश्यक होते. गोळे डॉक्टर अगदी परदेशी माणसासारखे दिसायचे. उंच, गोरेपान.
" आता तुझा रक्तगट कळण्यासाठी तुझे रक्त घेतले पाहिजे "
" मला महिती आहे, ऒ " घाबरुन त्यांच्या हातातील सुई कडे पहात मी ठोकून दिले होते.
" अगं, पण ऒ पॉझिटीव्ह का निगेटिव्ह? "
उत्तरादाखल ’तडजोड करा ना आता काहीतरी’ या नजरेने मी त्यांच्याकडे पाहिले.
" ठिक आहे. ऒ पॉझिटिव्ह लिहतो "
त्यांना आवश्यक ती कृत‍‌‌ज्ञता दर्शवून सर्टिफीकेट हातात घेतले आणि मग कुठे तो पास मिळाला.
वाडीतल महिला मंडळ भलतच सक्रिय होतं. सणावाराला कार्यक्रम, स्पर्धा असायच्याच पण त्याव्यतिरिक्तही अनेक उपक्रम व्हायचे. काचेच्या नोटीसबोर्डवर नवनविन घोषणा जाहीर व्हायच्या. माझी आत्या बहुतेकदा पहिल्या तीन क्रमांकात असायची. शाळेत न मिळालेल्या बक्षिसांचा तिने इथे पुरेपुर वचपा काढला.
गावाच्या मध्यभागी मारुतीच देऊळ आहे. संगमरवरी गोंडस मारुती मी प्रथमच पाहिला. आत्याची अक्करकी असायची तेव्हा १२१ दिवे एकदम उजळून गेलेले फार सुंदर दिसायचे. त्यातल्या काही वेड्यावाकड्या दिव्यांना माझाही हातभार लागलेला असायचा. ती दुखर्‍या पायांनी प्रदक्षिणा घालायची तेव्हा, तिच्याऎवजी मी घातलेल्या प्रदक्षिणा मारुतीला नक्कीच चालतील हा मुद्दा तिला पटायचाच नाही.
आत्या, काकांनी किर्लोस्करवाडी सोडून आता बरीच वर्षे झाली. वाडीचा विषय निघाला तरी ती हळवी होते. आता म्हणे तिथे टांगे वगैरे नसतात. जुळुन आलेले मैत्र, जुन्या ओळखी कुठे कुठे बदली होऊन गेल्या. अतिशय शांत, सुसंस्कृत, रेखिव गावातली काही वर्षे तिच्या मनात गुंतून बसली आहेत. उगाच का माहेरच्या गावापेक्षा हे गाव प्रिय वाटते..?

20 comments:

yog said...

so Nice...

मीनल said...

Thanks Yog,
कालच ती इकडे आली आहे आणि निदान दोन तीन वेळा तरी ’वाडीत असताना..’ च्या गप्पा झाल्या. :)

Rahul........ said...

Wow, mast lihil aahes. Agadi wadit jaunaalyasarakh vatal. Aata mi suddha thoda halava zaloy. June divas aathavale. Golden Days. :)

Mahendra said...

किर्लोस्कर वाडीला थांबणं झालं नाही कधिच. पण एकदा जावंस वाटतंय तुमचं पोस्ट वाचुन.. :D

मीनल said...

Thanks Rahul dada

मीनल said...

महेंद्रजी नक्की जाऊन या.
आता, मुंबईच्या माणसांना थोडा कंटाळा येईल कदाचित, पण तरीही Relaxation साठी जाउन या.

Anonymous said...

गाव आणि वाडी हा श्री. मोघे यांचा मार्चच्या ईपेपर मध्ये लेख आहे.
हापण लेख छानच.

- सदानंद

मीनल said...

धन्यवाद सदानंद, कोणता पेपर ?
लिंक पाठवाल का?

Ajay Sonawane said...

मीनलः लेख आवडला. बारामतीच्या जवळ वालचंदनगर हे असंच किर्लोस्करवाडीसारखं वसवलं गेल आहे. तुझी पोस्ट वाचुन वालचंदनगरमध्ये मित्राबरोबर व्यतीत केलेले दिवस आठवले. एकदा किर्लोस्करवाडीला भेट द्यावं अस वाटु लागलं आहे. कोल्हापुरपासुन जास्त लांब आहे का ग हे ? म्हणजे एका दिवसात फिरुन होईन का? तिथे घरगुती राहण्याची सोय असते का कोकणासारखी?

- अजय

मीनल said...

कोल्हापूरहून साधारण २.३० तास लागतात. वाडीच गेस्टहाउस आहे, पण घरगुती राहण्याविषयी नक्की माहिती नाही. बरीच वर्षे झाली तिथे जाउन.

Anonymous said...

मी किर्लोस्करवाडीला १९८५ साली काही आठवडे होतो, पण एकही टांगा पाहिल्याचं आठवत नाही. तुम्ही तिथे टांग्यातून प्रवास १९८५ च्या आधी केलात की नंतर?

मीनल said...

अनामिक,
तुम्ही काही आठवडे वास्तव्य केले असूनही टांगा पाहिला नसल्याचे आश्चर्य वाटते.
मी साधारण १९९४-९७ च्या दरम्यान तिथे जात होते. ’प्रवास’ म्हणता येणार नाही, पण मुख्य दारापासून घरापर्यंत पोहोचवण्यासाठी तीन टांगे होते. शामू, किसन आणि भीमा यांचे! त्यापैकी आमचा आवडता टांगा शामूकाकांचा असे. कंपनीने नंतर गाड्यांची सोय केल्यावरही काही वर्षे टांगे होतेच. शामूने शंतनू किर्लोस्करांना प्रथम टांग्यातून नेल्याच्या आठवणी सांगून बरेच पकवले होते, तसा फ़ोटोही दाखवला होता. त्यामुळे १९८५ साली ते असावेतच. नजरचुकीने राहून गेले असावे.
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

Anonymous said...

रेल्वे स्थानकावरून अतिथी-घरात मी पहिल्या दिवशी कसा गेलो होतो हे मी आठवून पाहतोय, पण काहीच आठवत नाही. आम्ही ज़वळज़वळ दोन महिने रोज़ रेल्वे स्थानकासमोरून ज़ायचो, पण टांगा पाहिल्याचं काही केल्या आठवत नाही. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे टांगा असणारच. ज़र १९८५ मधे नसता तर त्यानंतरच्या ५-१० वर्षांच्या काळात तो तिथे नव्याने वापरात येण्याची शक्यता नाहीच.

किर्लोस्करवाडी हे बर्‍याच आधीपासून प्रगत गाव होतं. आनंदीबाई विज़ापुरे तिथे राहत, म्हणजे १९४५ चा काळ असणार. त्या काळी मला वाटतं तिथे बायकांना पोहण्याची सोय आणि तसा राखीव तास तलावावर होता. मला वाडीत तलाव (Tank) असलेलाही आठवत नाही. १९४५ कडे तिथे बहुतेक ब्रिज खेळणारे लोक होते. १९८५ मधे तर नक्कीच होते. पण त्यातले सगळे हौशी होते. आम्ही पाहुणे म्हणून स्पर्धेत भाग घेतला नाही; पण डावांवर चर्चा केली. आम्ही स्वतः नवशिके असूनही तिथल्या अनेक वर्षं खेळणार्‍यांपेक्षा आमचा दर्जा वर होता. आमच्याशी गाठ पडली नाही याचा त्यांना आनंद होत होता.

आखातात अबू धाबीकडे ज़सा रस्त्याच्या कडेला १०-१५ पैशात हवं तितकं खनिज तेल पिण्याचा आनंद लुटता येतो तसा वाडीला २०-२५ पैशात उसाच्या रसाचा मोठा पेला मिळेल अशी आशा मला होती. पण ती कल्पनेच्या पातळीवरच राहिली. भारतात इतरत्र तेव्हा रसासाठी एक रुपया पडत असे, आणि तोच भाव वाडीला होता.

अज़ून काही आठवणी मी तुम्हाला मेल-द्वारा कळवल्या आहेत.

मीनल said...

१९८५ साली टांग्यांच्या उपलब्धतेविषयी मला खात्रीने सांगता येणार नाही,पण नंतरच्या १० वर्षात त्याचा वापर नक्कीच होता. जलतरण तलावही खूप नंतर सुरु झाला.
आपला ई मेल मिळाला. धन्यवाद.

Somesh Bartakke said...

Do you forget passoword of your blog-a/c ? Didn't see any post since long time .. :)

मीनल said...

Actually,I wrote couple of posts, but didnt find worth posting.. :)
Thanks for ur encouraging comment.

अपर्णा said...

लहानपणी वसईत टांगेच होते अगदी मी शाळेत असेपर्यंत....गेले आता...तू मला एकदम टांग्यात बसवुन आणलंस....खरंच पुढे बसायला मजा येते...तबडीक तबडीक करत जायला....
एकदा किर्लोस्करवाडीला भेट द्यावं अस वाटायला लागलं आहे.

मीनल said...

अपर्णा, नक्की जाऊन ये.
Thanks for reply.

Varada said...

मीनल, खूप छान वाटलं वाचून. मी तर वाडिचीच आहे. पुन्हा एकदा तिथे गेल्यासारखं वाटलं. खरच पूर्वीची वाडी आता नाही राहिली. आम्ही खूप धमाल करायचो. अनिता मावशीचे घर मलाही आठवते आहे. माझी आई मला तिच्याकडे घेउन जायची. मावशी सांगते की " वरदु तुला लहानपणी डायनिंग टेबल वर ठेवून मी स्वयंपाक करायचे. मग तू खिडकीतून मोर बघत बसायचीस ! "
आजही वाटते की पुन्हा ते दिवस यावेत.....पुन्हा ती माणसे भेटावीत.... पुन्हा ते मैत्र जुळावे.
गेले ते दिन गेले !!!

मीनल said...

वरदू,
हो गं, खूप धमाल यायची.. मोरांच येणं सुध्दा छान असायच! तिच्या त्या खिडकीतून संध्याकाळी हमखास दिसायचे!
आपण एकदाच तिथेच भेटलो आहोत. तुला पाहून छान वाटलं. :)