Thursday, December 24, 2009

पुढचा टॅग..

ही योगायोगाची साखळी खरचं मजेशीर आहे. तीन दिवसांपूर्वी कपाट आवरताना स्लॅमबुक मिळाली. परत वाचून काढली. विशेषत: 'opinion about me' ची वाक्ये. खाल्ल्या वडापावला जागून झाडून सगळ्यांनी चांगल्याच ओळी खरडल्या आहेत, पण बरं वाटत परत वाचताना.

श्रेयसीने लिहलेली सुंदर अक्षरातली पाने मात्र मनापासून लिहलेली आणि कवितेत भिजलेली! इतकी हळवी मुलगी मी कधीच पाहिली नाही. दुसर्‍या दिवशी ’काय गं, कशी आहेस’ असा फ़ोन आणि कधी भेटायच हा प्रश्न! मग त्यावरं आपण टेलीपथी असण्याबद्द्ल शेरा वगैरे.. आणि आज अजय चा टॅग केले असल्याचा ’बेधुंद’ मार्फ़त निरोप. मजाच आहे.

1.Where is your cell phone?

त्याच्या नविन पाऊचमधे

2.Your hair?

वाढायच्या विचारात दिसतात

3.Your mother?

सर्वात जवळची

4.Your father?

Brillient & Balanced

5.Your favorite food?

शाका.चमचमीत काहीही

6.Your dream last night?

रुट्स पुस्तकातला कुंटा आला होता स्वप्नात

7.Your favorite drink?

चहा

8.Your dream/goal?

World Tour yuppi..!

9.What room are you in?

स्टडी रूम
(एक मुलगी, बायको, आई, आजी वगैरे होत जाते तशी ही खोली renovation नंतर हॉल, गेस्टरुम, भावाची खोली, स्टडी रूम इ.स्थितंतरातून गेलेली आहे.तिसरा बदल तिच्यासाठी ज्यास्त कष्टप्रद असावा.)

10.Your hobby?

वाचन

11.Your fear?

पाल

12.Where do you want to be in 6 years?

ते... २०१२ चं काय झालं?

13.Where were you last night?

घरी

14.Something that you aren’t diplomatic?

नात्यातल्या, मैत्रीतल्या बर्‍याच काळजीवाहू व्यक्ती

15.Muffins?

चॉकलेट फ़्लेवरच अस्तित्व असलं म्हणजे झालं!

(इथे चॉकलेट्वाल्या व्यक्ती बर्‍याच दिसल्या)

16.Wish list item?

ते कधी संपतात का?

17.Where did you grow up?

कोल्हापूर

18.Last thing you did?

जी च्या ब्लॉग पर्यंत वाट काढली.

19.What are you wearing?

(ढगळ)कुर्ता व जीन्स

20.Your TV?

चॅनलप्रमाणे फ़िरत असतो सारखा, डिस्नेवर बरेचदा स्थिरावतो.

21.Your pets?

नाही

22.Friends

चांगले आहेत सगळे!

23.Your life?

मस्त चाललय.(लाकडाला स्पर्श)

24.Your mood?

झकास!

25.Missing someone?

हो ( विचारलं नाही म्हणून नाव सांगत नाही :-) )

अजयच वाक्य कॉपी केलयं फ़क्त ’णू’ दुसरा काढलाय.

26.Vehicle?

चित्रातली की चालवता ती?

27.Something you’re not wearing?

Tension

28.Your favorite store?

Ikea

Your favorite color?

खाकी सोडून सगळे

29.When was the last time you laughed?

काल

30.Last time you cried?

आठवत नाही

31.Your best friend?

http://gazali.blogspot.com/2009/06/blog-post.html

32.One place that you go to over and over?

नाईलाजाने- शिंपी (चारातले तीन ड्रेस बिघडवायचेचं असा अलिखित नियम असावा)
आनंदाने- लायब्ररी

33.One person who emails me regularly?

मॉन्स्टर जॉबवाले

34.Favorite place to eat?

प्रत्येक पदार्थासाठी वेगवेगळी आहेत.

मी सोमेश, मुग्धा, बहिर्जी नाईक, हरेकृष्णजी, योग, प्रविण  यांना टॅग करते आहे.

Monday, December 7, 2009

वर्तुळ

सरत्या मे महिन्यातील कोमट रात्र. चंद्राच्या दुधी प्रकाशात बाजूची शेवाळलेली पायरीसुध्दा उजळून गेलेली. उघड्या अंगणात सोलापुरी जमखान्यावर घरातल्या सगळ्या सुट्टीवाल्या चिल्ल्यापिल्यांना जमवून ताई गोष्ट सांगत होती.

" योशिहारा नावाचा व्यापारी होता. मुलगा काझुओ त्याचा जरा ज्यास्तच लाडका.. त्यावर्षी तो काझुओला घेऊन प्रथमच गावाबाहेर व्यापारासाठी घेऊन जात होता. चालत जाता जाता रात्र झाली आणि गच्च ढग दाटून आले. मुसळ्धार पाऊस सुरु झाला. अशा अवेळी थांबायचे कुठे? दूरपर्यंत फ़क्त एकच घर होते पण तिथे तर कोणी रहात नसते. आता काय करावे बरे? योशिहारा विचार करु लागतो. इकडे थंडी वाढत असते त्यामुळे काझुओला सर्दी होते..

" बाबा आपण तिथे का जात नाही? "

" अरे, तिथे एक राक्षस राहतो. तसा तो कुणाला त्रास देत नाही, पण त्याच्या घरापाशी येऊन कुणी शिंकले, तर तो त्या माणसाला खाऊन टाकतो आणि आता तुला तर सर्दी झाली आहे.  पण माझ्याजवळ एक युक्ती आहे. चल जाऊयात "

असे म्हणून जरा घाबरतच दोघे त्या घराच्या छपराखाली उभे राहतात.

"मगं, तो लाक्शस त्यांना खाउन टाकतो?"

"थांब रे निख्या, मधे मधे काही विचारु नकोस.."

हां, मग थोड्या वेळाने काझुओ शिंकतो. त्या घरातला राक्षस त्याला खायला येणार, एवढ्यात योशिहारा त्याच्या पाठीवर थाप मारुन म्हणतो,

" गॉड ब्लेस यू "

ते ऎकल्यावर मात्र राक्षस म्हणतो, " याने तर देवाचे नाव घेउन पाठीवर थाप मारली. आता याला कसे खाणार? हरकत नाही, या मुलाला सर्दी झाली आहे. कघी ना कधी तरी त्याचे वडील कंटाळतील किंवा झोपून जातील, तेव्हा मी याला खाईन."

" मग, आता लाक्शस त्याला खातो? "

" अरे निख्या, प्रश्नकुमारा ऎक तरी.!"

मग काझुओ रात्रभर शिंकत राहतो, जवळजवळ शंभर वेळा. पण प्रत्येकवेळी राक्षस येण्याआधीच योशिहारा न कंटाळता त्याला थाप मारुन आशिर्वाद देत राहतो आणि काय म्हणतो?

" गॉड ब्लेssस यूss "

बरोब्बर! शेवटपर्यंत राक्षस काही त्याला हात लावू शकत नाही. शेवटी रात्र संपते, पाऊसही संपतो. मग दोघेही सुखरुप दुसर्‍या गावात पोचतात.

मग कुणी शिंकले की काय म्हणायचे?

" गॉड ब्लेssस यूss "

गोष्ट ऎकल्यापासून आम्ही उगाचच शिंकू लागलो आणि ताई कडून प्रत्येकवेळी ’ब्लेस यू’ ची थाप घेऊ लागलो.

काही महिन्यांपूर्वीची ती रात्र मात्र सरत्या पावसाळ्यातली होती. भरनियमनाला समर्थन दिल्याप्रमाणे चंद्रानेही आपला हात (चेहरा) आखडता घेतलेला. कुठल्याश्या कार्यक्रमानिमित्य जमलेल्या नातेवाईकांच्या गप्पांत घर बुडून गेलेलं! रात्रीचे जेवण झाल्यानेंतर परत गोल करुन सुरु झालेल्या सुस्त गप्पा! तिथल्याच एका कोपर्‍यात एक चिमणा गोल, स्वतंत्र चिवचिवाट करत बसलेला! त्यातून एक नाजुक ’ऑssक्क्षी’ मला ऎकू आले.

" ब्लेस यू "

" ए मावछी, किती जोरात धपाटा मारलाश? "

" असच करायच असतं, तुला ती गोष्ट माहिती नाही? "

" कुठली गं? "

" अगं, तुझ्या आईनेच सांगितली होती.. एक किनई योशिहारा नावाचा व्यापारी होता. मुलगा काझुओ त्याचा जरा ज्यास्तच लाडका....