Monday, December 7, 2009

वर्तुळ

सरत्या मे महिन्यातील कोमट रात्र. चंद्राच्या दुधी प्रकाशात बाजूची शेवाळलेली पायरीसुध्दा उजळून गेलेली. उघड्या अंगणात सोलापुरी जमखान्यावर घरातल्या सगळ्या सुट्टीवाल्या चिल्ल्यापिल्यांना जमवून ताई गोष्ट सांगत होती.

" योशिहारा नावाचा व्यापारी होता. मुलगा काझुओ त्याचा जरा ज्यास्तच लाडका.. त्यावर्षी तो काझुओला घेऊन प्रथमच गावाबाहेर व्यापारासाठी घेऊन जात होता. चालत जाता जाता रात्र झाली आणि गच्च ढग दाटून आले. मुसळ्धार पाऊस सुरु झाला. अशा अवेळी थांबायचे कुठे? दूरपर्यंत फ़क्त एकच घर होते पण तिथे तर कोणी रहात नसते. आता काय करावे बरे? योशिहारा विचार करु लागतो. इकडे थंडी वाढत असते त्यामुळे काझुओला सर्दी होते..

" बाबा आपण तिथे का जात नाही? "

" अरे, तिथे एक राक्षस राहतो. तसा तो कुणाला त्रास देत नाही, पण त्याच्या घरापाशी येऊन कुणी शिंकले, तर तो त्या माणसाला खाऊन टाकतो आणि आता तुला तर सर्दी झाली आहे.  पण माझ्याजवळ एक युक्ती आहे. चल जाऊयात "

असे म्हणून जरा घाबरतच दोघे त्या घराच्या छपराखाली उभे राहतात.

"मगं, तो लाक्शस त्यांना खाउन टाकतो?"

"थांब रे निख्या, मधे मधे काही विचारु नकोस.."

हां, मग थोड्या वेळाने काझुओ शिंकतो. त्या घरातला राक्षस त्याला खायला येणार, एवढ्यात योशिहारा त्याच्या पाठीवर थाप मारुन म्हणतो,

" गॉड ब्लेस यू "

ते ऎकल्यावर मात्र राक्षस म्हणतो, " याने तर देवाचे नाव घेउन पाठीवर थाप मारली. आता याला कसे खाणार? हरकत नाही, या मुलाला सर्दी झाली आहे. कघी ना कधी तरी त्याचे वडील कंटाळतील किंवा झोपून जातील, तेव्हा मी याला खाईन."

" मग, आता लाक्शस त्याला खातो? "

" अरे निख्या, प्रश्नकुमारा ऎक तरी.!"

मग काझुओ रात्रभर शिंकत राहतो, जवळजवळ शंभर वेळा. पण प्रत्येकवेळी राक्षस येण्याआधीच योशिहारा न कंटाळता त्याला थाप मारुन आशिर्वाद देत राहतो आणि काय म्हणतो?

" गॉड ब्लेssस यूss "

बरोब्बर! शेवटपर्यंत राक्षस काही त्याला हात लावू शकत नाही. शेवटी रात्र संपते, पाऊसही संपतो. मग दोघेही सुखरुप दुसर्‍या गावात पोचतात.

मग कुणी शिंकले की काय म्हणायचे?

" गॉड ब्लेssस यूss "

गोष्ट ऎकल्यापासून आम्ही उगाचच शिंकू लागलो आणि ताई कडून प्रत्येकवेळी ’ब्लेस यू’ ची थाप घेऊ लागलो.

काही महिन्यांपूर्वीची ती रात्र मात्र सरत्या पावसाळ्यातली होती. भरनियमनाला समर्थन दिल्याप्रमाणे चंद्रानेही आपला हात (चेहरा) आखडता घेतलेला. कुठल्याश्या कार्यक्रमानिमित्य जमलेल्या नातेवाईकांच्या गप्पांत घर बुडून गेलेलं! रात्रीचे जेवण झाल्यानेंतर परत गोल करुन सुरु झालेल्या सुस्त गप्पा! तिथल्याच एका कोपर्‍यात एक चिमणा गोल, स्वतंत्र चिवचिवाट करत बसलेला! त्यातून एक नाजुक ’ऑssक्क्षी’ मला ऎकू आले.

" ब्लेस यू "

" ए मावछी, किती जोरात धपाटा मारलाश? "

" असच करायच असतं, तुला ती गोष्ट माहिती नाही? "

" कुठली गं? "

" अगं, तुझ्या आईनेच सांगितली होती.. एक किनई योशिहारा नावाचा व्यापारी होता. मुलगा काझुओ त्याचा जरा ज्यास्तच लाडका....

16 comments:

yog said...

very nice circle!

मीनल said...

Thanks Yog, keep visiting..!

Gouri said...

chhaanach aahe vartul!

मीनल said...

thanks Gauri, tuza email ID milalach nahi mala tuzya blog war.
I like ur blog.

me said...

Good post after a long time ...
Nice story and the way it casted.

मीनल said...

its because of ur previous encouraging comment, i desided to get out of this inertial state.
Thanks. :)

Ajay Sonawane said...

वाचताना खुप विचार करावा लागतो असे तुझे पोस्ट असतात, हा ही असाच ! कदाचीत म्हणुनच तुझ्या ब्लॉग चा मी फॅन आहे :-)

-अजय

मीनल said...

अरे बापरे! कुणीतरी ’जरा हलकफ़ुलकं लिहा’ असं दामटवल्यावर काही महिने केलेला प्रयोग जमलेला दिसत नाहीये. :)
पण तुला हा प्रकार आवडतो हे वाचून आनंद झाला.

अपर्णा said...

अगं कसलं गोड लिहिलंस यार...आजपासुन मी पण तुझी फ़ॅन....जा....आता इथे ये गोष्टी सांगायला....मी शोधतेच आहे...ब्लेस यु....:)

मीनल said...

नक्की अपर्णा, मी पक्की गोष्टीवेल्हाळ आहे.
चाणक्य चंद्रगुप्ताची कॅसेट तर मी अजूनही ऎकते. :)

Anand said...

लेख आवडला! वर्तुळ मस्तच!

मीनल said...

Thanks anand, keep visitig..

tanvi said...

मस्तच आहे गं हे वर्तूळ.....आज आता लेकाला सांगते ही गोष्ट............

मीनल said...

तन्वी,
म्हणजे आजच्या गोष्टीचा प्रश्न सुटला ना? :)
ही पहिल्यांदा ऎकली तेव्हा जपानी नावांमुळे लक्षात राहिली!

आर्यन केळकर said...

मस्त गोष्ट आहे. कपुसकोंड्याच्या गोष्टीसारखी.
सोनाली केळकर

मीनल said...

हो.. म्हणूनच वर्तुळ.. :)