Wednesday, December 15, 2010

पोंगल

गोड पोंगल


साहित्य:-

 तांदूळ- १ वाटी,

 मूगडाळ- १/२ वाटी,

 गूळ- १ वाटी,

 दूध- ३ वाट्या,

 लवंग- ३,

 वेलदोडे- ४,

 काजू- १०-१२,

 बेदाणे- १०-१२

 तूप- ३ चमचे,

 ताजं खोबरं- भरपूर

कॄती-

  • प्रथम एक वाटी तांदूळ धुवून पूर्ण न निथळता किंचित पाण्यात एक तास पाण्यात भिजवावे. मूगडाळ एक चमचा तुपात लालसर भाजून घ्यावी. भाजतानाच त्यात लवंगा टाकाव्यात. नंतर डाळही धुवून पूर्ण निथळून एक तास भिजत ठेवावी. गूळ बारीक चिरुन ठेवावा. 
  • जाड पातेल्यात ३ वाट्या दूध, एक वाटी पाण्याबरोबर गरम करावे. उकळी आल्यावर त्यात तांदूळ व डाळ घालावी.
  • कमी आचेवर दूध पातेल्याला लागू न देता अधूनमधून ढवळत रहावे. (१० मि.)
  • आता एक वाटी गूळ घालावा.(जास्त गोडीसाठी दिड वाटी) गूळ विरघळून डाळ तांदूळ एकत्र झाल्यावर दोन चमचे तूप घालावे. नंतर काजू, बेदाणे, वेलदोडे, आणि दोन वाट्या खोबरं घालून मिसळावे.
  • एक वाफ आल्यावर परत थोडे खोबरे आणि १ चमचा तूप शिजलेल्या पोंगलमधे घालावे.
  • खोबरे जास्त घातले तरी छान लागते. अधिक नारळाचे दूधही वापरतात.


Friday, December 3, 2010

क्षणमात्र

वेळ तशी रहदारीची होती पण तो रोड फारसा गजबजलेला नव्हता. नसतोस बरेचदा! घरी जाताना नकळत वेग वाढलेला..मुख्य रस्त्याला थोड्या अंतराने दोन फाटे फुटतात त्यातल्या पहिल्या फाटयातून रहदारीच्या सर्व नियमांना फाटा देवून एक गाडी, बहुदा बोलेरो, जोरात वळण देऊन पुढे गेली. गाडीतल्या डॅशबोर्डवरचा छोटा टेडी आणि अंगावर येणारा करडा रंग मला स्मरतो. क्षणाचा अर्धा, पाव जो काही भाग असेल त्यात एक विचित्र जाणीव इतकी तिव्रतेने झाली, की तो लहानसा काळही तासभर घडत असल्यासारखा वाटला. मृत्यूची भिती असेल, अनपेक्षित गोष्टीचा धक्का असेल, इतक्या वेळेत नक्की काय करायचे न सुचून आलेली हतबलता असेल.. मी पडले नव्हते, पण काहीतरी मोठे घडल्यासारखे वाटत होते. थोडी थरथर थांबली, तेव्हा समोर पाहिले तो, पुढे जाऊन काही अंतरावर ती गाडी थांबली होती. मी जिवंत आहे व हालचाल करीत आहेसे पाहून पुढे निघून गेली. मला त्याला गाठून भांडायची ताकतच नव्हती. जाऊ दे, म्हणून तशीच घरी आले.

काल, दिवसभराच्या शेवटच्या उजळणीत तो प्रसंग आला आणि मनातल्या मनात काही अ‍ॅनालिसिस सुरु झाले. एखाद्या क्षणार्धात एवढा वेळ असेल असे कधी वाटले नव्हते. ’तो क्षण युगासारखा भासला ’, ’रात्र सरता सरत नव्हती ’, ’काळ थांबून राहिला होता ’ वगैरे वाक्ये पुस्तकात लय भारी वाटतात. तसे होते म्हणजे नक्की काय कधी समजले नव्ह्ते. हाही क्षण म्हणजे हीच वाक्ये असेही नाही पण बरिचशी जवळपास.. होय असंच काहीसं..

त्या अर्ध्या क्षणाचे आणखी तुकडे केले तर प्रत्येक तुकडा काही आठवणींचा होता. मला घर आठवले, काही काळज्या आणि एक मैत्रिण! स्पष्ट, लख्ख आठवण नाहीच म्हणता येणार, पण एखाद्या कडक शिस्तिच्या शाळेत मुलांची रांग लावताना पहिल्या मुलाला उभं केल्यावर मागच्यांनी आपोआपच पटापट मागे उभं रहावं, तशीच काहीशी , आठवणींची रांग! नुसते संदर्भ होते. स्प्ष्टीकरण मी मागाहून घुसडलं :)

परतीच्या वेळेत मला आठवला तृप्तीचा अपघात! तो खूपच वेदनादायी होता. नंतर महिनाभराच्या विश्रांतीसाठी ती इकडेच आली होती. तिचा हात प्लॅस्टरमधे होता, व्यवस्थित उपचार झाले होते. आठवड्याभरापूर्वीच्या अपघाताचे वर्णन सांगताना तेच ते प्रश्न उत्तर चालू होतं.. कधी, कुठे, कसं?? ट्रॅफिकचा काय भरवसा नाही वगैरे.. सगळी प्रश्नोत्तरे झाल्यावर ती माझ्याकडे आली. "काय म्हणतीस?" नेहमीचा सूचक प्रश्न टाकून झाल्यावर सूचक हसली. (या प्रश्नात आणखीही बरेच प्रश्न दडलेले असतात)
"खूप दुखतं आहे का गं?"

"आत्ता नाही, पण तेव्हा.. मला जाणवत होतं, आपलं हाड फ्रॅक्चर झालयं.. आणि हॉस्पिटलमधे ऑपरेशनपूर्वी तात्पुरतं प्लॅस्टर घालताना तर.. प्रचंड.. ब्रह्म आठवलं गं मीनू "
तिच्या काळ्या काळ्या डोळ्यात त्यावेळेच्या वेदनेचं पाणी आलं. तिला तो क्षण परत जागवून दिल्याबद्दल मला खूप अपराधी वाटलं. मग मात्र एकही प्रश्न न विचारता टिपी करत तिच्या हातावर झोकदार सही करुन शल्य कमी करण्याचा मी प्रयत्न केला.

तिला एका क्षणाचं जे ब्रह्म आठवलं, ते वेदनेच होत. माझ्या एका क्षणात आठवलेल्या ब्रह्माचा संदर्भ केवळ भितीशी होता का? माहित नाही...

विकल्या न गेलेल्या फुग्यांच्या एकत्र गाठी बांधून संध्याकाळी कुणी फुगेवाला सायकलवरुन परत जावा, आणि त्याच्यामागे हाss मुलांचा घोळका गलबल करत जाव तसं काहीसं झालं.. संध्याकाळच्या उजळणीत अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या गोष्टीही घोळका करुन कलकलाट करत आल्या. हेही आठवलं की प्लॅस्टर उतरवून आता तिला एक महिना होईल. आपण साधा फोनही केलेला नाही..

" मग, आणि काय म्हणतीस?"

तिचा फोनवरचा निरोप, सुरवातीच्या प्रश्नासारखाच असतो. तिला खूप आनंद झालेला दिसला.

"सांगते ना, येशिल तर खरं! जपून रहा गं.."

त्या एका क्षणाच्या नंतर शेपट्या फारच वाढल्या पण त्यामुळे जे मंथन झालं, ते नक्की लिहिता येणार नाही. आपल्या बाबतीत घडणार्‍या अघटिताचा आपण असा कितीसा विचार करतो? आणि का करावा? माहिती नसतं काय होणार आहे म्हणूनच ’अनपेक्षित’ शब्द वापरतात ना! पण असे काही प्रसंग दैनंदिन कामाच्या घोळात कुठेतरी लपून बसलेल्या महत्वाच्या गोष्टींना बाहेर ओढून काढतात. किंबहुना त्यासाठीच ते अनपेक्षितरित्या घडत असावेत का?  
हे फारसं लॉजिकल नाहीये, पण असंच होत असावं..

Saturday, November 20, 2010

अंजिर फिरनी

अंजिर फिरनी

साहित्य:-

दूध-१ लिटर,
बासमती तांदूळ- ४ चमचे,
साखर- ५ चमचे,
अंजिर- १
काजू- १०,१२
पिस्ता, बदाम- ८,१०
वेलदोडे- ३

(चमचा-मोठा टे.स्पून)


कॄती-

प्रथम तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. नंतर खरबरीत वाटून घेऊन अर्धा वाटी पाणी घालून ठेवावे.
अंजिर बारीक तुकडे करुन अर्धा वाटी दूधाबरोबर मिक्सर मधून काढावे. त्याची थोडी पेस्ट होईल, थोडे तुकडे तसेच राहतील. हे वाटीभर मिश्रण तसेच बाजूला ठेवावे.
काजू, पिस्ता, बदाम चिरुन ठेवावे. साधारण अर्धा चमचा पूड होईल इतके वेलदोडे कुटून ठेवावे.
शक्यतो नॉनस्टीक भांड्यात दुध तापत ठेवावे. त्याला उकळी आल्यानंतर तांदूळ दूधात घालावेत. नंतर साखर, वेलची पावडर घालावी. ती विरघळल्यावर काजू, बदाम, पिस्ते घालावेत. मंद आचेवर मिश्रण सतत ढवळावे. सर्वात शेवटी अंजिर पेस्ट घालावी. ५ मिनिटे किंवा साधारण दाट होत आले की गॅस बंद करावा. फिरनी थंड होत आली की आणखी थोडी आळते. अशी दाट खीर वरुन थोडे काजू घालून वाढावी.टीप-
अंजिर ऎवजी स्ट्रॉबेरी किंवा दूधाबरोबर सूट होणारी इतर फळे घालूनही छान लागते. स्ट्रॉबेरी वापरताना बारीक तुकडेच करावेत. मिक्सरमधून काढू नये.
साखरेचे प्रमाण इथे कमी घेतले आहे कारण अंजिराचाही गोडवा त्यात अधिक होतो. फळानुसार साखर कमी जास्त करावी.

Tuesday, November 2, 2010

अशांतीच कार्टं

भारतने ओरिगामी हंसाची लिंक दिली आणि नव्या छंदाला सुरवात झाली. यासाठी ४८४ लहान त्रिकोण दुमडावे लागत होते. दोन दिवसातच घरभर कागदाचे कपटे पसरले. घरच्या मंडळींच्या कोणतेही टेबल रिकामे न ठेवल्याच्या कुरकुरीकडे साफ दुर्लक्ष करुन हे काम पूर्ण करणे थोडे ट्रिकी आहे. मग जसे त्रिकोण पुर्ण होतील, तसे जोडायला सुरवात केली. पाच-सहा दिवसांत झाला एकदाचा पूर्ण तो हंस! मग ’इथे नको तिथे ठेव, त्याच्या मानेला हात लावू नकोस, उंच जागी ठेव’ असली इतरांवर माझी दमदाटी सुरु झाली. दमदाटी संपायला एक कारण घडले आणि काही दृष्टीकोनही बदलले.

पूर्वकल्पना न देता गडबडीच्या वेळी, किंवा वेळ काढायला, अचानक चाल करुन येणारी बरीच मंडळी आहेत. अशाच एका आख्ख्या कुटुंबाला आम्ही भितो.. वाट फुटेल तिथे (दोनच वाटा आहेत) पळून गेलेल्या मंडळींपैकी जो बाहेरच्या खोलीत उरेल, त्याने त्यांना तोंड द्यायचे असा अलिखित नियम आहे. (मी ९०% वेळा माडीवर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे) तर, त्या दिवशी आम्ही संध्याकाळी बाहेर पडणारच होतो तोपर्यंत ती मंडळी घरी आली. पैकी दोन लहान मुलांनी काही मिनिटांतच मोठ्या आवाजात भांडणं करण्यास सुरवात केली. त्यांच्या आरडाओरडीकडे यत्किंचित लक्ष न देता, बाईंनी त्याहून मोठ्या आवाजात गप्पा मारण्यास सुरवात केली. नुकतीच व्यवस्थित लावलेली, साडीतल्या हेमामालिनी सारखी दिसणारी खोली नजरेसमोर आली, आणि आता बाहेर गेल्यावर तिची अवस्था शमिता शेट्टी पेक्षाही (हो, ही नटी आहे) गईगुजरी झाली असणार याची खात्रीच पटली.

" अरे, अशा उश्या फेकू नकोस, कोचवर नाचू नकोस. " आमच्याच घरातल्या व्यक्तीचा केविलवाणा आवाज ऎकू आला.
" आणि तो हत्तीचा शो पीस ओढू नकोस तुटेल, नाजूक आहे, दिल्लीहून..." तो शो पिस आणणार्‍या व्यक्तीचे पुढचे शब्द हवेतच विरुन गेले. मुलांबरोबर आलेल्या बाई नक्की तिथेच आहेत ना, याची खात्री करुन घ्यावी आणि जमलं तर एखाद्याच्या पाठीत धपाटा मारता आला तर पहावा म्हणून मी जाणार एवढ्यात बाईंचा आवाज आलाच,
" ए, ऎकले ना त्यांनी काय सांगितले ते? पिल्लू गं माझं.. जा खेळ जा! तर, मी काय म्हणत होते...."
मुलांनी नव्या उत्साहाने मोडतोडीस आपलं, खेळण्यास प्रारंभ केला. दृष्टीआड सृष्टी नात्याने, मी लपून असले तरी, येणार्‍या आवाजाला कोणतीच भिंत रोखू शकत नव्हती.

" माला हे पायजे, माला ते पन पायजे "

" मी राक्षस आहे, मी तुला खानार "

लहान मुलाला स्वतःची ओळख एवढ्या लवकर कशी पटली याचे नवल करेपर्यंत एक वाक्य कानावर आले आणि एकदम काहीतरी लक्षात आले.

" हे काय कागदाचं आहे ? "

दोन दिवसांपूर्वी ओरिगामी हंस किरकोळ दुरुस्तीसाठी टेबलावर ठेवला होता. त्या मुलाने त्यावर झडप घातलेला, हंस खाली पडलेला आणि मुलाच्या खिदळण्याचा आवाज तेवढा ऎकू आला. माझ्या आईचे संतापाने त्याला काही बोललेलेही ऎकू आले. एक आठवडा खपून तयार केलेले सगळे विस्कटून गेले. अगदीच रहावले नाही म्हणून मीही बाहेर गेले. आणि पसरलेले तुकडे गोळा करु लागले.

"तू आहेस होय घरी? मला वाटलं, बाहेर गेलीस की काय? अगं, ते त्याला सांगेपर्यंत तुटलंच! "- बाई.

बाईंचा मुलांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न मला मुळीच आवडला नाही. कुणाला काही वाटण्याची पर्वा न करता त्या मुलाला समोर बोलवून मी ५ मिनिटे रागावून बोलले. त्या बाईंना ते आवडले नसावे, त्यांनी काढता पाय घेतला.. पण लपून बसण्यापेक्षा हे पुष्कळ बरे होते. प्रश्न फक्त ती वस्तू तुटण्याचा नव्ह्ता. मुले दंगा करणारच, काही मोडतोड करणारच! आपल्या सर्वांच्याच घरी लहान मुले असतात. पण इतकी विध्वंसक मुले आणि त्याहूनही त्यांना काहीही न बोलता, सांगता त्याकडे कौतुकाने बघत बसणारी वडील माणसे आश्चर्यचकित करतात. बरे, मुलांना आपण काही सांगावे तर त्यांना आवडत नाही.
असो, यातूनही चांगल्या गोष्टी घडल्या म्हणजे, मला परत नविन हंस बनवता येईल आणि तो मुलगाही मला टरकून असेल. :)

त्याच्यानिमित्याने तरी, बोळा निघाला आणि अक्षरे वाहती झाली.

********************************************************************

आपल्या सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

Friday, August 6, 2010

मावशीबोलीतल्या कविता

दोन दुचाकी कशाबशा जाऊ शकणारा एक बोळ आहे. जरा आडवाटेला, पण तरी गावातच! टिपीकल वाडा.. लाकडी अरूंद जिना दोन खोल्या एक करुन मोठा केलेला हॉल. तिथे संध्याकाळची शिकवणी असायची.. नावाजलेले कडक सर होते. (जाम भिती वाटायची त्यांची!) शिकवणीला सुध्दा प्रवेश परीक्षा वगैरे घेऊन मग प्रवेश दिलेला. शिकवणी चालू असतानाच मधे एखाद्याला उभे करुन अवघड प्रश्न विचारण्याची कधी फिरवून क्लिष्ट सूत्रे विचारण्याची त्यांची सवय होती. तशी शिकवण्याची ही पध्दत नविन नाही. तरीही, विद्याधरने खो दिल्यावर या ठिकाणी उगिचच त्यांची आठवण झाली. :)

अमृता प्रीतमची एक आवडलेली, वेगळी वाटलेली कविता. फाळणीच्या जखमा इथे तिथे लख्ख दिसतात. दुभंगत्या काळात भारतच नव्हे तर कोणत्याही देशाच्या शहराचा चेहरामोहरा असाच असावा.

शहर

मिरा शहर इक लम्बी बहिस वरगा है
सड़कां-बेतुकीआं दलीलां दी तरह
ते गलीआं इस तरह-
जिउं इको गल्ल नूं कोई इधर घसीटदा कोई उधर

हर मकान इक मुठ वांगु वटीआ होईआ
कंधा कची चीआं वांगु
ते नालीआं, जिउं मूहां ’चो झग वगदी है

एह बहिस खौरे सूरज तों शुरु होई सी
जु उस नूं वेख के हो़र गरम हुंदी
ते हर बूहे दे मुंह ’चों-
फ़िर साइकलां ’ते सकूटरां दे पहिए
गाहलां दी तरह निकलदे
ते घंटीआं ते हार्न इक दूजे ’ते झपटदे

जिह़डा़ वी बाल इस शहर विच जमदा
पुछदा कि किहडी़ गल्ल तों एह बहिस हो रही?
फ़िर उसदा सवाल ही इक बहिस बणदा
बहिस विचों निकलदा बहिस विच रलदा

संखा घड़िआलां दे साह सुक्के
रात अउंदी, सिर खपांदी ते चली जांदी
पर नींदर दे विचवी इह बहिस न मुक्के
मिरा शहर इक लम्बी बहिस वरगा है...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझं शहर एका लांबलचक भांडणासारखं
रस्ते-निरर्थक म्हणणं मांडल्यासारखे
आणि गल्ल्या तर अशा की,
जसं एकाच गोष्टीला कुणी इकडे खेचतयं, कुणी तिकडे

प्रत्येक घर एका मुठीप्रमाणे आकसलेलं
भिंती- किंचाळणार्‍या, कचकचणार्‍या
आणि नाले, जे तोंडातून फेस वाहून आणतात..

हे भांडण जणू सूर्यापासून सुरु झालं होतं
जे त्याला बघून आणखीच दाहक होत गेलं
आणि प्रत्येक दाराच्या मुखातून
मग सायकल आणि स्कूटरची चाकं
गल्लीच्या दिशेन बाहेर पडतात
आणि घंटा-हॉर्न एक दुसर्‍यावर कुरघोडी करु पाहतात

जे कुणी मूल या शहरी जन्म घेई
विचारत असे की कोणत्या गोष्टीवर हे भांडण होत आहे?
मग त्याचा प्रश्न सुध्दा एक भांडण होऊन जाई
भांडणातून येणारा भांडणातच विसर्जित होणारा

शंख घंटांचे श्वास कोरडे होतात
रात्र येते माथा आपटून निघून जाते
पण झोपेतसुध्दा भांडण संपत नाही
असंच माझं शहर एका लांबलचक भांडणासारखं..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एकाच अनुवादावर खरं म्हणजे थांबायला हवं, पण गुलजारची ’नज़्म’ मराठीत बसवायचा मोह आवरत नाही म्हणून.. कुछ और नज़्मे वाचायच राहिल होतं. वाचनालयात हे पुस्तक का कुणास ठाऊक बाल विभागात आढळलं. कोरं करकरीत पुस्तक.. हाताळलेलं जाऊन त्यान थोडं तरी जुनं-वृध्द व्हायला हरकत नव्हती. पुस्तक परत करण्याच्या शेवटच्या पानावर माझा एकच शिक्का आहे.

शेर लिहताना ’ उला’ आणि ’सानी’ असे दोन भाग पडतात. पहिल्या उलाच्या ओळी काहीतरी अर्थ सांगतात पण तो पूर्ण असत नाही. व्यक्ती किंवा भावसापेक्ष अर्थ बदलतो. पूर्णार्थासाठी सानीची गरज असते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ज्याला जसा भावेल तसा अर्थ घ्यावा. फक्त उला प्रकारातच ऎंशीच्या वर कविता आहेत. त्यातलीच एक-

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बन्द शीशों के परे देख दरीचों के उधर

सब्ज पेड़ों पे घनी शाख़ों पे फूलों पे वहाँ

कैसे चुपचाप बरसता है मुसलसल पानी


कितनी आवाज़ें हैं, यह लोग हैं, बातें हैं मगर

ज़हन के पीछे किसी और ही सतह पे कहीं

जैसे चुपचाप बरसता है तसव्वुर तेरा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बंद काचेच्या पलीकडे पहा, खिडकीच्या त्या तिकडे

हिरव्या झाडांवर घनदाट फांद्यांवर फुलांवर तिथे

कसा गुपचुप संततधार पाऊस बरसत असतो


किती आवाज आहेत, हे लोक आहेत, गप्पागोष्टी आहेत पण

खोल मनात वेगळ्याच कुठल्यातरी पटलावर कुठेतरी

जसा गुपचुप तुझा आठव बरसत असतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शब्दशः अनुवाद कवितेच्या बाबतीत तरी अवघड प्रकार आहे. त्यामुळे अनुवादित शब्दांचे बरेच स्वातंत्र्य घेतले आहे. दोन्ही कवी आणि वाचणार्‍यांची जाहीर माफी मागून हा स्वैर प्रयत्न संपवत आहे

माझा खो अपर्णातन्वीताई यांना ....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(टिप: डोळ्यांवर गार पाण्याच्या किंवा ताकाच्या पट्ट्या ठेवल्याने दाह कमी होतो असे म्हणतात. तरी, मानसिक क्लेशासाठी या पोस्टला खो देणार्‍यालाच जबाबदार धरावे.)

Tuesday, July 27, 2010

मौनाची भली अक्षरे

सुंदर हस्ताक्षराचा हेवा हा प्रकार हेवा-असूया या गटात मोडत असेल असे वाटतच नाही. यात कौतुकच जास्त डोकावते. प्रत्येक हस्ताक्षराला स्वतःचा पोत, लकब असते. कुणाचे गोल आणि गोड दोन्ही, बंगाली रोशोगुल्ल्यासारखे, कुणाचे काटेरी तिळगुळाच्या काट्याची आठवण करुन देणारे, कुणाचे नुसतेच फर्राटे (फराटे शब्दामधेच फराटा नाही म्हणून फर्राटे!), कुणाचे तक्क्याला टेकून बसणार्‍या शेठासारखे वरच्या रेषेला टेकून ऎसपैस पसरणारे, कुणाचे गिचमिड शब्दालाही मागे टाकेल असे गिच्चमिडं.. ब्लॉगविश्वात सुंदर अक्षर कुठे आहे? विचारले असता, सोमेशच्या ब्लॉगकडे बोट आपलं, कर्सर दाखवले जाईल यात शंका नाही. बर्‍याच वर्षांपूर्वी अतिशय सुंदर अक्षर असणार्‍या माझ्या मामाने एक पिवळे पोस्टकार्ड पाठवले होते. पत्र छापिल असेल तर जादा किंमत आकारली जाते. त्याप्रमाणे पोस्टमनने ’येक्श्ट्रा’ बिल मागितले. त्याला कितीही समजावले की, हे हातानेच लिहिलेले आहे तरी त्याला पटेचना! शेवटी येक्श्ट्रा देऊनच त्याची बोळवण करावी लागली. कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यात कावणेकर नावाचे अक्षरयात्री आहेत. त्यांचे दरवर्षी अक्षरांचे प्रदर्शन भरते. त्यांनी सुंदर अक्षरात ओव्या, ज्ञानेश्वरी, दोहे लिहून काढले आहेत. छंद म्हणून बर्‍याच जणांना पत्र देखिल पाठवत असतात. हा त्यांच्या अक्षरांचा नमुना.

पत्र हे इमेलपेक्षा जवळचे वाटावे यात नवल नाही. निळ्या, काळ्या अक्षरात त्या त्या व्यक्तीला पाहिले जाते. अक्षरातून माणसे भेटतात हे खोटे नाही. कधी खोडलेला शब्द तर कधी खोडलेली आख्खी ओळच मनाला चाळा लावून जाते. लिहण्याच्या सुध्दा व्यक्ती तितक्या पध्दती! कुणाचे मन हे बोटांपेक्षा जास्त धावत असल्याने एका वाक्याला पुढच्या वाक्याची शेपूट, तर कुठे काय लिहावे न कळल्यामुळे रेंगाळलेली बोटे आणि वाढत जाणारे शाईचे डाग! कुणाला प्रत्येक दोन ओळींनंतर काहीतरी बहुमोल आठवल्याने दोन शब्दांच्या मधे /\ बाण करुन टोप्या चढवायची सवय, तर कुणाला एकाच शब्दाच्या अक्षरांची - ने ताटातूट करण्याची खोडी! (अशा वेळी चितळे मास्तरांचे एका ओळीत सात शब्द आठवतात)

तर सांगायचा मुद्दा होता की, सर्वसाधारण अक्षरासंबंधी येणारी विशेषणे वळणदार, टपोरे, रेखिव, सुंदर, मोती ही आहेत पण ’मौनाचे अक्षर’ हे विशेषण पुढील प्रसंगावरुन समजले.
तापी नदीकाठी मठात एक महान योगी रहात होते. त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी पुष्कळ काही ऎकले व त्यांना एकदातरी भेटावेसे वाटू लागले. त्याविषयी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवण्याची इच्छा तर होती, परंतु एक अडचण आली. मायना लिहिताना, ज्ञानेश्वर वयाने लहान म्हणून त्यांना ’आशिर्वाद’ लिहावा की अनुभवाने थोर म्हणून ’तीर्थरुप’ लिहावे असा त्यांना प्रश्न पडला. शेवटी काहीच न लिहिता एक कोरे पत्र त्यांनी ज्ञानेश्वरांना पाठविले. यावर उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी ६५ ओव्या रचून त्यांना पाठवल्या. हिच ’चांगदेव पासष्टी’! चांगदेवांचा व ज्ञानेश्वरांचा हा पत्रसंवाद म्हणजे ’मौनाची भली अक्षरे’ आहेत. तळहाताने तळहातास मिठी द्यावी, किंवा गोडीने गोडी चाखावी त्याप्रमाणे तुझा-माझा संवाद आहे, तेव्हा आपण परस्परांना मुकेपणानेच भेटणार असे ज्ञानेश्वर चांगदेवांना म्हणतात. एवढ्या सुंदर पत्रव्यवहाराची गोडी वर्षानुवर्षे मराठी भाषा चाखत आहे. या ह्रदयीचे त्या ह्र्दयी कळविणारी चांगदेवांच्या पत्रातली अदृश्य अक्षरे ज्ञानेश्वरांनी नक्कीच वाचली असतील. काय लिहले असेल बरं त्या पत्रात?

Thursday, July 22, 2010

परिक्षा परिक्षा..

शाळा असो कॉलेज असो थोड्याफार फरकाने परिक्षेच्या काही मिनिटे आधी एक ठराविक प्रकारचा माहौल आवारात पहायला मिळतोच! बंद दाराच्या समोर खाकी कपड्यातले शिपाई मामा उभे आहेत. जवळच्या बोर्डवर नंबर व वर्ग लिहलेले आहेत. २०० ते २३०-Class B असे वाचून लाल शर्ट घातलेला रोल नं २३० आपला नंबर शेवटच्या बाकावर आल्याबद्दल आनंद लपवू शकत नाहीये. समोरच्या कट्ट्यावर थोडी, पायर्‍यांवर थोडी, पुस्तकात खुपसलेली डोकी दिसत आहेत. Imp, V.Imp आणि पुढे एक दोन चांदण्या गिरगटलेल्या नोट्स, झेरॉक्स इथून तिथून सांडत आहेत. पानं भराभर उलटली जात आहेत. पाच जणांच्या घोळक्यात तिघांचे चेहरे ऑप्शनला टाकलेल्या काही मुद्यांबाबत काळजीने काळवंडलेले आहेत. समोरुन एखादा आग्रही चेहरा जात असला तरी कटाक्ष टाकण्याचीही बुध्दी होत नाहीये. नाकावर चष्म्याच्या रेषेत दिसेल न दिसेल असा अंगारा लावलेला आहे. एरवी हिरो माफिक वावरणार्‍या पण परिक्षेच्या ऎन वेळी हातपाय गाळणार्‍या कुणा जिवलग मित्राला " हे बघ, शक्य तितक्या डायग्रॅम काढ.. काय? आणि तेच मुद्दे परत परत लिही. पानं भरवं. " असा त्यावेळी देता येणारा बहुमोल सल्ला दिला जातोय. क्वचित कुणीतरी बेफिकीरीने इकडे तिकडे पहात फिरतोय. ’अ’चा आज तिसर्‍या पेपरला सुध्दा तोच ड्रेस? असे मनात म्हणणार्‍या चाणाक्ष ’ब’चा पेपर सुटल्यावर ही गोष्ट ’क’ आणि ’ड’च्या निदर्शनास आणून देण्याचा बेत चालू आहे. (या मुलीच असणार हे सांगायला नको)

आणि तेवढ्यात घंटा होते. हातातली पुस्तके सांभाळत आपापल्या वर्गांकडे धाव घेतली जाते. क्रमांक निट तपासून स्थिरस्थावर होताच लकी पेन बरोबर असल्याची नकळत चाचपणी होते. कुणाची डोळे मिटून काही प्रार्थना चालू असते कुणी हाती पडणार्‍या प्रश्नपत्रिकेबाबत उत्सुक झालेला असतो. कुठे "जरा अक्षर मोठं काढ रे, मला निटं दिसत नाही" अशी रोल नं १०६ ची १०५ ला धमकावणी पोहोचते. तर कुठे "आज सेकंड सेक्शन थोडा सांग उद्या माझा विषय आहे मी सगळं सांगतो " अशी मांडवली चालू असते. कुणी आत्मविश्वासाने उत्तरपत्रिका लिहायला घेतो, कुणी तीन तासांचे वेळापत्रक बसवू लागतो. पहिला तास निर्विवादपणे सगळेच विद्यार्थी भराभर लिहीत असतात.(जे येते ते आधि लिहणे तत्वानुसार) नंतर काही अवघड प्रश्नांपाशी पेनाचा वेग मंदावतो. कॅल्युलेटरवरची बोटे अडखळतात. मान वर करुन बाकीच्या प्रजेचा अंदाज घेतला जातो. स्मरणशक्तीवर ताण देवून पुढची मजल मारायला सुरवात होते. शेवटची दहा मिनिटे उरल्याची घंटा झाल्यावर उडालेल्या धांदलीची तुलना अक्षतेच्या वेळी ’नवरीला बोलवा’ असे तिसर्‍यादा सांगून झाल्यावर वधूपक्षात उडालेल्या धांदलीशीच होवू शकते. इथेही संमिश्र भाव पहायला मिळतात. कुणाचा पेपर पूर्ण झालेला असतो, कुणाची फेरतपासणी चालू असते, कुणी अजून १० मार्कांचे राहिले आहे म्हणून भराभर खरडत असतो तर कुणी ’ए, पेपर झाल्यावर सांगतो म्हणाला होतास की, सांग ना उत्तर पट्कन" म्हणून एखाद्याची विनवणी करत असतो.

पर्यवेक्षकांचेही अनेक प्रकार पहायला मिळतात. जो चोख, सतर्क असतो तो ’खडूस’. जो आळशी, सैल असतो तो ’चांगला’ अशी विद्यार्थ्यांच्या मतांनुसार ढोबळ विभागणी करायला हरकत नाही. खडूस माणूस प्रश्नपत्रिकंचे सील आधी मुलांना दाखवतो व नंतर काळजीपूर्वक फोडतो. ओळखपत्रावरचा फोटॊ विद्यार्थ्यांच्या चेहर्‍याशी ताडून पाहतो. कुठेही खुस्स झाले तर करडी नजर रोखून एकही शब्द न बोलता गोठवून ठेवतो. तर चांगला माणूस पहिली काही मिनिटे कडक असल्याचे भासवून नंतर दारात जाऊन उभारतो. शेजारच्या वर्गांतल्या मानेबाईंची एखादा मिनिट विचारपूस करतो. टेबलावर ठेवलेल्या काही वस्तूशी चाळा सुरु करतो. शेवटच्या दहा मिनिटात तर त्याच्या औदार्याचा कळस होतो. पेपर संपल्यावर कृतज्ञतेचे कटाक्ष झेलत तो पेपरची चळत सांभाळत स्टाफ रुमच्या दिशेने चालता होतो.

प्रत्यक्ष पेपर संपवून वर्गाबाहेर आल्यावर तर गोंगाटाने सगळी जागा व्यापून गेलेली असते.

~तू याचे उत्तर काय लिहलेस?

~कोणतेही तीन प्रश्न सोडवा मधे हा प्रश्न तिथे हवा होता आणि तो कंपल्सरी प्रश्न ऎच्छिकमधे हवा होता. काय पण पेपर सेट केलाय, छ्या..!

~पेपर बाकी मस्त, नव्वदच्या पुढे स्कोअरिंग होणार, मन्या तुला कटिंग देतो चल..

~कसंही करुन पेपर सुटायला हवा. ग्रेस मार्क्स मिळू देत. पेपर तपासताना मास्तराच डोकं शांत असू दे

~आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न टाकतातच कसे?

अरे हा सिलॅबस मधलाच प्रश्न आहे. तू सिलॅबसच्या पुस्तकालाच आऊट केलास त्याला ते तरी काय करणार?

~काय मंजू यंदा पण टॉपर ना?

~मी तर एसी (All Clear) होऊन राहिलो ना भावा..!

~ते पश्या तर्कट, दोन दोन सप्लीमेंटा घेऊन टराटर लिहित होतं, पास होतय वाटतं यंदा..

~सोप्पा!

यापैकी कोणताही संवाद परिक्षेनंतरच्या काही मिनिटातच ऎकायला मिळतो. अर्थात कुणी पेपर मनासारखा सोडवल्याच्या आनंदात, कुणी ऑप्शनला टाकलेले प्रश्न न आल्यामुळे दैवावर खूष, कुणी नाराज.. जसा अभ्यास केला आहे तसेच रंग परिक्षा दाखवत असते. लकी पेनाचा आणि चार चार दिवस न बदललेल्या लकी कपड्यांचा यात काही सहभाग असो, नसो, पण असल्या वेगवेगळ्या गोष्टी परिक्षा हंगामात पहायला मिळतातच! एक विषय पार पडलेला असला तरी अजून पुढची लढाई बाकी असते. दुसर्‍या विषयाची तजवीज करण्यासाठी जास्त न रेंगाळता समस्त परिक्षार्थींची गर्दी विरळ होवू लागते. तासाभरातच शिपाईमामा इथे तिथे पडलेले कपटे साफ करु लागतात. काहीवेळाने लोखंडी दार कुलुपबंद होते आणि दुसर्‍या दिवशी याच आवृत्तीची वाट पहात पेंगू लागते.

Thursday, June 24, 2010

१ नोंद मिळाली

पहिली पोस्ट प्रकाशित करुन आज २४ तारखेला एक वर्ष होईल. पहिल्या दिवशी मब्लॉविने ’१ नोंद मिळाली ’ असे सांगितले आणि गजालीला सुरवात झाली. आता, एका वर्षात २५ पोस्ट म्हणजे फार अभिमानाने सांगण्यासारखा आकडा नाही, पण संपूर्ण महिना रिकामा जाऊ न देण्याचा प्रयत्न बाकी केला. सुरवातीला मित्रमैत्रिणींना लिंक पाठवली तेव्हा चतुर लोकांनी तेवढीच पोस्ट वाचून नंतर परत ब्लॉगवर न येण्याचा सूज्ञपणा दाखवला. पण गीतांजलीच्या पोस्टला जेव्हा प्रथम अनोळखी आणि मोठी प्रतिक्रिया अंजली कडून मिळाली.(तीही परत आली नाही ब्लॉगवर :() त्यावेळी मी ती दहा वेळा तरी परत परत वाचली असेल. काय छान वाटलं होतं तेव्हा! म्हणूनच नविन ब्लॉग सदराखाली आवडलेल्या प्रकाशित न झालेल्या पोस्टलाही आवर्जून प्रतिक्रिया द्याविशी वाटते.(कदाचित ती पण माझं नाव पुढच्या वर्षी नमूद करेल!) आजही कुणाच्या ब्लॉगवर जुने बेसिक टेंप्लेट पाहिले की, माझ्याच जुन्या पोस्टची आठवण होते. पहिल्या दुसर्‍या पोस्टमध्ये तर मी वेलांटी, ऊकार, शब्द इतके तपासून घेतले होते आणि इतका बदल केला होता, की आख्खी पोस्ट तोंडपाठ झाली होती. मग पहिला फॉलोअर दिसू लागला. काही दिवसांनी पहिल्यांदा टेंप्लेट बदलले तेव्हा फॉलोअर्सचा पर्यायच गायब झाला त्यावेळी घाबरुन एकुलता एक फॉलोअरही गेला म्हणून जरा टेंशनच आले होते.:) पुढे जशा भेटी गाठी वाढत गेल्या तसा हुरुपही वाढत गेला. आज वर्षभराच्या जुन्या नोंदी पाहताना एक मजेदार प्रवास घडत गेल्याचं जाणवतं. पहिल्यांदा जुनी पाटी या एकाच विषयाभोवती फिरत असताना पुढे (चांगल्या अर्थाने) विषयाला फाटे फुटत गेले.


मब्लॉवि इथे नविन मित्र मैत्रिणी मिळाले. कौतुकाच्या चार शब्दांनी उत्साह दहा पटींनी वाढला. (जो महिन्याला तीन पोस्टच्या वर कधी गेला नाही) त्यांनी कुठल्याच पोस्टला एकटे टाकले नाही. एखाद-दुसरी का होईना, पण प्रतिक्रियेची सोबत खूप सुखावून गेली. अपर्णा म्हणते त्याप्रमाणे काही धूमकेतूंनी अनपेक्षितरित्या एकदम भरपूर कमेंट देवून सुखद धक्का दिला. कधी कानपिचक्या मिळाल्या, सूचना मिळाल्या. त्यातूनच खर्‍या अर्थाने नोंद घेतली गेल्याचे जाणवले. मध्यंतरीच्या टॅगिंग प्रकारामुळे बरेच नविन ब्लॉग कळाले, गजाली वरही नविन लोकं हजेरी लावून गेले.
ब्लॉग हा माणसाचा छापिल चेहराच म्हणायला हवा. तो कधी हसतो, रागावतो, मधेच सुस्त होतो, बरेचदा नॉस्टॅलजिक होतो. ’कं’च्या काळात दोघा तिघांनी ’उठा, छापा काहीतरी’ म्हणून पाठवलेले इमेल मैत्रिणीच्या कोपरखळीसारखे हसू उमटवून गेले. प्रोत्साहनासाठी सर्वांचे खूप आभार.

अलिशान सप्ततारांकित रेस्टॉरेंट असो वा कोपर्‍यापरची छोटी टपरी! सुरु करणार्‍याच्या मनात थोडी धाकधूक असतेच. हिच गोष्ट छेडताना गुलजारने ’रात पश्मीने की’ या पुस्तकाच्या सुरवातीला म्हटले आहे,

’ उम्मीद भी है घबराहट भी कि अब लोग क्या कहेंगे, और इससे बड़ा डर यह है कि कहीं ऐसा न हो कि लोग कुछ भी न कहें ’

नेमके हेच या ब्लॉग बद्दलही वाटत होते. तसेही ब्लॉगस्पॉटवरचा एक दुवा अडवून मी फार काय कामगिरी करणार हा प्रश्नही होताच. तरी, या छॊट्याश्या टपरीवर काहीबाही खरडलेले तुम्ही गोड मानून घेतलेत. टपरीच्या कटींग चहाला काही जणांनी त्यांच्या ब्लॉगवर जागा दिली.(विजेटबद्दल भुंगादादाचे आभार) गजालीच्या पहिल्या वाढदिवसाचा केक शोधताना मलाही मजा आली. असेच भेटत राहू. लोभ असावा.

Thursday, June 10, 2010

चाँद छूता दोस्त - पुखराज़

त्याच्या शब्दात जादू आहे, वेगळेपण आहे. पण वेगळेपण कसले? शब्द तर तेच! तरी, त्यांचा मेकओव्हर होवून पुढे येवून बसल्यासारखे वाटतात. डोळ्यात डोळे घालून काही समजतय का? असा सवाल टाकल्यासारखे वाटतात. अशावेळी अर्थ आपल्याला समजून जातोही...कदाचित!

वेगळेपणाबद्दल गुलजारनेच म्हटले आहे की, लोकं म्हणतात तुम्ही नविन शब्द कुठून शोधून काढता हो? ’नीट पहा, शब्द नविन नाहीत तेच आहेत, फक्त जागा बदलल्यात! आँखे, खुशबू हे शब्द नविन नाहीत. पण आँखोंसे महकती खुशबू म्हटले की लोकांना वाटते, हे काय नविन आणि?’


कविता ही आवडण्याच बंधन असलेली गोष्टच नाही. एक तर ती आवडते किंवा नाही आवडत! पुढे त्याचे ’कळली नाही म्हणून आवडली नाही, छंदबध्द नाही म्हणून आवडली नाही ’ असे पोटभाग पडत जातात, पण ती पुढची गोष्ट आहे. पुखराज़ मधे काही नविन आढळेल, कुणाला तसं आढळणारही नाही कदाचित! पण काही रचना दृष्ट लागण्याइतक्या सुंदर आहेत हे नक्की! पुखराजची सुरवात अमृता प्रितमच्या प्रस्तावनेने होते. या संग्रहाबद्दल गुलजार म्हणतो,


इक सबब मरने का, इक तलब जीने की
चाँद पुखराज का, रात पशमीने की

एकटेपणा वागवणार्‍या कविता चंद्रावर केलेल्या कवितांइतक्याच भरपूर आहेत..जसे की दोस्त, खामोशी़, पतझड.. फाळणीच्या जखमाही दिसतात कुठे कुठे, अतिरंजित वाटणारं सत्यही सापडत कुठे!
दिवसभर बाहेरच असतो मी, कामासाठी किंवा दिवस घालवण्यासाठी केलेल्या कामासाठी. तसही घरी कुणी असणासच नाही पण सवयीने रिकाम्या घरी येतो तर, हे काय आश्चर्य, इथे माझ्याही स्वागतासाठी कुणीतरी आहे!

दोस्त

बे यारो मददगार ही काटा था सारा दिन
कुछ खुद से अजनबी सा, कुछ तन्हा उदास सा
साहिल पे दिन बुझा के मैं लौट आया फ़िर वही
सुनसान सी सड़क के इस खा़ली मकान में
दरवाजा खोलते ही मेज पर किताब ने

हल्के से फड़फडा़ के कहा-
"देर कर दी दोस्त ।"

-----------------------------

’नसतेस घरीची’ किंचीतशी आठवण होते.

खा़मोशी

खिडकियाँ बंद है दिवारों के सीने ठंडे
पीठ फेरे हुए दरवाजों के चेहरे चुप है
मेज-कुर्सी है कि खा़मोशी के धब्बे जैसे
फ़र्श में दफ़न है सब आहटे सारे दिन की
सारे महौल पे ताले-से पडे़ हैं चुप के

तेरी आवाज की इक बूँद जो मिल जाये कही
आख़री साँसों पे है रात ते बच जायेगी
-------------------------------

पुरणाशिवाय पुरणाच्या पोळ्या, चंद्राशिवाय गुलजारचे पुस्तक कसे शक्य आहे?

पतझड़

जब जब पतझड़ में पेडों से पीले पीले पत्ते
मेरे लॉन में आकर गिरते है
रात को छत पर जाके मैं आकाश को तकता रहता हूँ
लगता है कमज़ोर सा पीला चाँद भी शायद
पीपल के सूखे पत्ते सा

लहराता-लहराता मेरे लॉन में आकर उतरेगा

--------------------------------

गुलजारबद्दल तो कमी, बाकीचेच लोक जास्त बोलतात ही फॅक्ट आहे. त्याला ते आवडत असेल, नसेल.. पण सेल्फ पोर्टरेट मधे त्याने आपल्या नावाच्या प्रवासाबद्दल लिहले आहे. हे त्याचे स्वगत आहे.(असावे) ’तुमने इक मोड़ पर अचानक जब मुझको ’गुलज़ार’ कहके आवाज़ दी’ मधला ’तुम’ कोण आहे नक्की? जर तो स्वतःशीच बोलतोय तर ’मेरे दिलने कहा’ टाइपचे वाक्य का नाही?
गुलजारच्या चार चार कविता असताना आपण जास्त न लिहलेलेच बरे!

सेल्फ पोर्टरेट

नाम सोचा ही ना था, है कि नहीं
’अमाँ’ कहके बुला लिया इक ने
’ए जी’ कहके बुलाया दुजे ने
’अबे ओ’ यार कोग कहते है
जो भी वूँ जिस किसी के जी आया
उसने वैसे ही बस पुकार लिया

तुमने इक मोड़ पर अचानक जब
मुझको ’गुलज़ार’ कहके दी आवाज़
एक सीपी से खुल गया मोती
मुझको इक मानी मिल गये जैसे

आह, यह नाम खूबसूरत है
फिर मुझे नाम से बुलाओ तो !

---------------------------------

Thursday, May 20, 2010

मराठीचा शिवाजी

इ.स.१८१८ ते १८७४ या अर्ध्या शतकाहूनही अधिक काळ अभ्यासकांनी मराठीचा कठीण काळ म्हटले आहे. अ.ना. देशपांडे यांच्या संदर्भग्रंथात याबद्दल म्हटले आहे, "पेशवाईच्या अखेरच्या दिवसात सुदृढ आणि आरोग्यसंपन्न असलेली मराठी पेशवाई अस्तानंतर एकाएकी अनेक वर्षांच्या आजारातून उठलेल्या रुग्ण स्त्री सारखी दिसू लागली." सद्यस्थिती पाहता, परकीय आक्रमण (मग ते सत्तेचे असो किंवा भाषेचे असो) मूळ संस्कृतीला महागात पडू शकते. तसे ते तेव्हाही पडले असावे. इंग्रजी राजवटीत परकीय अंमलाखाली स्वतःच स्वतःला अनोळखी झालेली मराठी आपल्या लेकरांची घुसमटही पहात असावी.

१८७४ मध्ये ’विष्णुशास्त्री चिपळूणकर’ यांनी निबंधमाला सुरु केली.तेव्हा जणू तिला जहाल पण परिणामकारक औषधच मिळाले. स्वभाषेचा अभ्यास, अभिमान, पारतंत्र्याबद्दल चीड यांनी भरलेले एक एक निबंध लोकांसमोर येवू लागले. सात वर्षात तिचे ८१ अंक निघाले. या अंकात वेगवेगळे विषय हाताळले गेले. भाषाविषयक, वाङ्‌मयविषयक, सामाजिक, राजकीय इ. याबद्दल त्यांनी कुणाच्या लेखाची उसनवारी केली नाही, आर्थिक मदत मागितली नाही किंवा सरकारी गैरमर्जीची पर्वा केली नाही. निबंधमालेचा पहिला लेख ’ मराठी भाषेची स्थिती’ हा होता. मालेचे प्रमुख कार्य जागृती हे असले तरी ते हळूहळू करणे भाग होते. एकदम पारतंत्र्यावर (भाषिक आणि राजकीय दोन्ही) जहाल टिका करणे योग्य नव्हते. म्हणून कदाचित प्रथम त्यांनी लेखनशुध्दी, वक्तृत्व, संस्कृत कवी, मोरोपंतांची कविता, इ. विषय हाताळले. मराठीचा व्यापक परिचय करुन दिला व नंतर तीव्र शब्दांत द्वेष्ट्यांवर टिकेची झोड उठवली. नंतर अर्थातच या मंडळींनी रागाने आगपाखड केली. परंतु, तोपर्यंत निबंधमालेची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा अंक बंद करणे किंवा चिपळूणकरांच्या लिखाणावरच बंदी घालणे यापैकी काहीच सुधारकांना शक्य झाले नाही. मराठी भाषेपासून सुरु झालेला प्रवास ’आमच्या देशाची स्थिती’ पर्यंत आला आणि मालेचे कार्य सफल झाल्याचे जाणवून त्यांनी निबंधमाला बंद केली. महाराष्ट्रात रुजू पाहणारी न्यूनगंडाची भावना तिथेच उपटून काढण्याचे महत्वाचे काम निबंधमालेने केले.

भांडारकर(दक्षिणपथाचा इतिहास), कुंटे(आर्यसंस्कृतीची स्थित्यंतरे), रानडे(मरठ्यांच्या सत्तेचा अभ्युदय), तेलंग(शंकराचार्य) यांनी त्यांची पुस्तके मराठीत न लिहता फक्त इंग्लिशमध्ये लिहली. त्यांना चिपळूणकरांनी फटकारले. दोन्ही भाषेत ग्रंथनिर्मिती झाली असती तर मराठी वाङमयात केवढी मोलाची भर पडली असती! याचा अर्थ चिपळूणकर इंग्लिश भाषेचे द्वेष्टॆ होते असा मुळीच नसावा.
" इंग्रजीचा आम्ही द्वेश करीत नाही हे तर काय, पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. एकीकडून संस्कृत व एकीकडून इंग्रेजी अशा दोहोंचा आधार तीस बळकट सापडला पाहिजे विशेषतः या भाषेत जे अगाध ज्ञान भरले आहे त्याचा पाट फोडून जर आपल्या भाषेकडे वळविता येईल तर केवढी मजा होईल!" (सं-निबंधमाला)

तसेच, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी काही सामाजिक सुधारणा केल्या असल्या तरी, सांस्कृतिक बाबतीत खोडसाळ ख्रिस्ती प्रचारकांनी ढवळाढवळ करण्याचे काहीच कारण नाही हे त्यांनी ठासून सांगितले.
" आमच्या देशास काही एक झाले नाही. त्याची नाडी अद्याप साफ चालत असून शरीरप्रकृतीस म्हणण्यासारखा काही एक विकार नाही. "

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी वाङमयाचे जनक संबोधले जातात. १८७४ हा स्थित्यंतराचा काळ आहे. म्हणजे मालापूर्व काळात (१८१८ ते १८७४) ग्रंथनिर्मिती झालीच नाही असे मुळीच नाही. १९६४ पर्यंत ६६१ च्या आसपास मराठी पुस्तके प्रसिध्द झाली. यात इंग्रजी साहित्यातले काही विचार मराठीत आले. लघुकथेसारखे काही नविन प्रकारही भाषेला समृध्द करुन गेले. पण हे करताना आपण हीन आहोत, इंग्रजीमधले साहित्य भाषांतरीत करुन आपण मराठीला वर काढत आहोत हा सूरच चुकीचा होता. जांभेकर, परमहंस मंडळी, प्रार्थनासमाज, ज्योतीराव फुले, विष्णुवुवा ब्रह्मचारी (गोखले), लोकहितवादी ही मालापूर्व काळातली काही आदराची नावे! ही नावे टाळून पुढे जाताच येणार नाही. पण चिपळूणकरांच्या निबंधमालेच्या रुपाने परखड स्वत्वांचे तेज उमटले आणी नविन स्वाभिमानी युगाचा प्रारंभ झाला.

२० मे १८५० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला. त्यांना लिखाणाचे बाळकडूच मिळाले होते. ’शालापत्रक’ नावाचे मासिक त्यंचे वडील चालवत असत. त्यातील रासेलसच्या अठरा, वीस भागांनंतरचे भाषांतर करण्याचे काम चिपळूणकरांनी कॉलेजमध्ये असताना पूर्ण केले. निबंधमाला १८७४ मधे सुरु झाली आणि १८७५ मध्ये हे मासिक (सरकारतर्फे) बंद करण्यात आले! निबंधमालेच्या जन्माच्या वेळी चिपळूणकरांचे वय २४ वर्षे होते. ते पूना सरकारी हायस्कूलमधे शिक्षकाची नोकरी करीत होते. निबंधांच्या परखड आणि विरोधी मतांचे प्रतिबिंब नोकरीवर पडणे सहाजिक होते. वर्षाच्या आतच त्यांची बदली रत्नागिरीस झाली. नियमाप्रमाणे ते पुण्याहून रत्नागिरीस गेले पण, एक वर्षांनंतर त्यांच्या वडीलांच्या मृत्यूनंतर ते पुण्यास आले ते परत गेलेच नाहीत.सरकारी नोकरीचा राजिनामा देवून त्यांनी पुण्याला ’किताबखाना’ नावाचे पुस्तकाचे दुकान सुरु केले. १८८० मध्ये टिळक, चिपळूणकर, नामजोशी, आगरकर, आपटे यांनी ’न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. त्याच्याच पुढच्या वर्षी टिळक, आगरकर यांच्या सहाय्याने चिपळूणकरांनी ’केसरी’, ’मराठा’ ही वर्तमानपत्रेही सुरु केली. त्याशिवाय काव्येतिहास, चित्रशाळा हे अंकही सुरु केले. केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी लेखणीद्वारे सरकारी अधिकारी व मिशनरी यांना न जुमानता अखंड मराठी भाषेची सेवा केली. केवळ मराठीचीच म्हणणे चुकीचे ठरेल. संपूर्ण भारत स्वतंत्रपणे, स्वाभिमानाने झळकत रहावा हिच त्यांची इच्छा होती. त्याची सुरवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली इतकेच!

आज २० मे, चिपळूणकरांची जयंती! यानिमित्य मराठीचे शिवाजी ’विष्णुशास्त्री चिपळूणकर’ यांना मानाचा मुजरा..!

------------------------------------------------------------------------------
संदर्भ- आधुनिक मराठी वाङ्‌मयाचा इतिहास- अ.ना. देशपांडे

Tuesday, May 4, 2010

गारपीट

परवा झालेली गारपीट पाहिल्यामुळे गारा लागून माणसे जबर जखमी होवू शकतात हे पटले. ’आमच्या घराजवळ लिंबाएवढी गार पडली’ पासून ’चांगल्या पेरुएवढ्या गारा ह्या अश्श्या समोर पडल्या होss’ हे बिनधास्त सांगण्यापर्यंत कोल्हापूरकरांनी धाडस केले आहे.पावसाळा आता महिन्यावर आला! पाऊस आणि कविता हे कधी वेगळे न होणारे, कधी न बिघडणारे समीकरण आहे. ही अशाच काही आठवणीतल्या कवितांची उजळणी !

शांताबाई आणि पावसाची कविता काय ग्रेट कॉम्बिनेशन आहे नां? ही त्यांची बरीच जुनी कविता आहे.

पावसाच्या धारा, येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ, जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये, तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली, गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया, बसली पाखरें

हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे, डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे, शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे, जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें, रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे, भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें, पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने, मनी संतोषली..!

- शांता शेळके

*******************************
गुलजार पावसाबद्दल काय म्हणतात याची उत्सुकता होतीच, पण त्यांना पावसापेक्षा चंद्र जास्त प्रिय आहे. तरी, या पावसाच्या त्यांच्या काही ओळी.

बारिश आती है तो पानी को भी लग जाते हैं पांव ,
दरो दीवार से टकरा कर गुजरता है गली से,
और उछलता है छपाकों में ,
किसी मॅच में जीते हुए लड़को की तरह...

जीत कर आते हैं जब मॅच गली के लड़के
जुते पहने हुए कॅनवस के ,
उछलते हुए गेंदों की तरह ,
दरो दीवार से टकरा के गुजरते हैं,
वो पानी के छपाकों की तरह...|

-गुलजार
**********************************

Thursday, April 22, 2010

जंगलातली गोष्ट

एका मराठीब्लॉगविश्व नावाच्या जंगलात सगळे प्राणी सुखासमाधानाने रहात होते. आपापल्या पोस्ट पब्लिश करत होते, हिट काउंटर वाढवत होते. काही बरे वाचायला मिळाल्यास वाचक प्राणी लेखक प्राण्यांना प्रतिक्रियाही देत. काही आळशी प्राणी पोस्ट लिहण्यास टाळाटाळ करीत. तेव्हा त्यांचे इतर मित्र त्यांना प्रेमाने दमदाटीही करीत. सारे आनंदाने चालले होते. हे जंगल थोडे वेगळे होते. इथे सिंह हा राजा मानला जात नव्हता, उंदीर दुबळा मानला जात नव्हता. एक सत्ता नसून सारे जंगलराज्य लेखन गुणवत्तेवर चाले. एके दिवशी एका वाघाला दुसर्‍या वाघाची पोस्ट तिसर्‍याच्या पिशवित दिसली. त्याला नवल वाटले. दुसर्‍या वेळेला तर त्याला स्वतःचीच पोस्ट त्याच्या पिशवित दिसली. त्याबद्द्ल त्या प्राण्याला हटकले असता त्याने सरळ कानावर हात ठेवले. मग मात्र पहिल्या वाघाने ठरवले की याची शहानिशा करायची आणि त्याने स्वतंत्र ब्लॉग सुरु केला. बर्‍याच प्राण्यानी त्याला चांगला प्रतिसाद दिला. ’पोलिस वाघ’ म्हटले पण दुसर्‍या बाजूचे प्राणीही होते, त्यांचही काही म्हणण होत. आता काय करायचे? दुसर्‍या कमजोर गटात एक ’ जातीय फूट पाडा आणि हरवा ’ संकल्पनेवर विश्वास असणारा प्राणी होता. त्याने सरळ त्या ब्लॉगच्या प्रतिक्रियेमध्ये तू वाघ आहेस, तुझेच राज्य का असावे? तू स्वतःला कोण समजतोस? असली काही वाक्ये लिहली. खरं म्हणजे त्या जंगलाची एकच जात होती ती म्हणजे ’मराठी’. त्या एकात्मतेचा भंग केल्यामुळे वाघाला आणि इतर प्राण्यांना काही काळ वाईट वाटले. पण अशा फुसक्या वल्गनेला अजिबात दाद न देता, त्याने आपले काम सुरु ठेवले. सर्व प्राण्यांनी Kill by ignarance हा पर्याय अवलंबला आणि पुन्हा एकदा सर्वजण आपल्या पोस्ट सुखाने (स्वतःच्या नावाने) खरडू लागले.

तात्पर्य :-  बुध्दीमत्ता आणि प्रतिभा ही जात पाहून येत किंवा जात नाही. एक तर ती असते, किंवा नसते. म्हणून अशा गोष्टी उकरुन कोणी जंगलातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे.


संदर्भ-  http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_18.html

Saturday, April 3, 2010

आठवण घटिका

पाच मिनीटे पाच मिनीटे करत चांगली वीस पंचवीस मिनीटांपर्यंत लांबवलेली आणखी थोडी झोप, कामाची, पुढच्या दिवसाची तयारी यात बरेचदा सकाळ कधी वाहून जाते कळतच नाही. माझ्या लक्षात राहीलेली ती सकाळ म्हणजे घरच्याच एका लग्नसराईतली आहे. गच्च थंडीतले दिवस.. चार दिवसांवर आलेल्या लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांनी घर भरुन गेलेले. सहा वाजता स्वयंपाकघरातून पहिल्यांदा दबक्या आणि नंतर खळखळून हसण्याच्या आवाजाने जाग आली. घरच्या स्त्रियांचा चहाचा पहीला राऊंड चालला होता. मस्त धुके पडले होते. अंगणातल्या सडा रांगोळीने मांडव खुलला होता पण असल्या थंडीत बाहेर उभी रहायची सोय नव्हती. तशीच गार पावलांनी मागे फ़िरले. मांजरीसारखं उबेसाठी आईला खेटून परत झोपण्याच्या प्रयत्नात केला पण ’अग उठ उठ.. आंघोळ आटप. नंतर बाथरुम रिकाम्या रहायच्या नाहीत’ म्हणत ती कामाच्या रगाड्यात परत फिरलीसुध्दा!

" अक्का, निपाणीकरचा चिवडा बघ, फार तेलकट झालाय काय? " (तो नेहमी तेलकटच चिवडा करतो हे माहीत असूनही त्याच्याकडेच कंत्राट द्यायचा अट्टाहास का हे कळाले नाहीये अजून.)

" नाही गं, चांगला आहे की, दही घालून बघं..जाणवत पण नाही! "
(सकाळी सहा वाजता तेलकट चिवडा आणि दही वगैरे घालून त्याचे केलेले अद्भुत रुपांतर खाणारी मंडळी आहेत तर!)

" हे हे, म्हणजे सगळ्या वर्‍हाडाला चिवड्याबरोबर दह्याचे कुंडे पण द्यायला हवेत.. " (पण सगळीच लोकं असलं, रुपांतर पचवतात हे यांनी गृहीत धरलं कसं?)

थंडीत वेढलेल्या अश्या फुटकळ गप्पांतून दोन तास भुरुभुरु उडाले. मस्त वाटतं ना, आजूबाजूला अशा उगाचच गप्पा, उकळत्या चहाचा वास, धुरकटलेली थंडी, दुलईत गुरफटलेले, परत झोपायच्या प्रयत्नात आपण!

मग दुसर्‍या फेजमध्ये उठणारी माणसे हळूहळू जमू लागली. पूजेच्या फुलांचा वास घमघमला. फोडणीच्या पोह्यांचा आणि उकळत्या चहाचा मिश्र वास अंगणापर्यंत पोहोचला असावा कारण बाहेर पहुडलेल्या रामाने आत डोकावून अंदाज घ्यायला सुरवात केली होती. " त्याचा आत्मा आधी शांत कर बाई!" म्हणून कुणीतरी पोह्याची डिश आणि चहा त्याला देण्यासाठी हातात ठेवली.
नऊ वाजले तरी धुक्याचा विरळ पदर दिसतच होता. चेहरा सोडून संपूर्ण पांढर्‍या रंगाचं साम्राज्य वागवणारा रामा पुढे झाला. "वाईच झाडून घेतु आगोदर मंग च्या घेतो. ठेवा! "
तो असं काहीएक करणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे. " ए चल ना, गंमत चालली आहे वर " असं म्हणत, ड्रेसचे टोक ओढत एका चिमण्या हाताने वरच्या माडीवर नेले. तीन गट पाडून मला सर्वात कमजोर गटात घालून खेळ सुरु झालासुध्दा! मस्त फ्रेश होती ती सकाळ!

आठवणीतल्या दुपार (अनेकवचन काय?) बर्‍याच आहेत आणि बहुदा मे महिन्यातल्याच आहेत. वार्षिक परीक्षा संपलेली दुपार, पत्त्याचा डाव उधळलेली दुपार, उन्हात नारळीच्या झावळ्यांनी छोटे घर बांधलेली आणि त्याला ’मीनिगौ’ असे विचित्र नाव (स्थापत्यकारांचे आद्याक्षर) देवून कॄतकृत्य झालेली दुपार! मोठ्या पातेल्यात रसना ढवळत बसलेली आमची चौकडी, तयार केलेलं रसायन चवीपुरतं म्हणून घेत असता निम्म्या झालेल्या पातेल्यात डोकावून बघणारी दुपार.

’अरे ए, भरं उन्हाचं बाहेर खेळू नका’ म्हणून ओरडून घेतल्यावर मागच्या खोलीत जमवलेली एक बैठक!

" एका भविष्यकाराने सांगितलयं, भारतातला ’क’ अक्षराने नाव सुरु होणारा माणूस जगावर राज्य करणार! "

" कुणाला सांगितलयं? "

" म्हंजे लिहून ठेवलयं! तो माणूस कोणीही असू शकतो, किरण काका सुध्दा असू शकतो.. कारण त्या माणसाचा जन्म झालाय! "

" कॄष्णा मामा? (वय ७१) "

" अम्मं..काही सांगता येत नाही. ते नसतील बहुतेक, त्यांना निट लढता यायच नाही. "

" क म्हणजे कोल्हापूरातला असेल का? "

" ए, नाव ’क’ ने सुरु होणारं, गाव नाही काई.. "

" हो? मग असं झाल तर आपण राज्य करणार? "

असल्या कितीतरी तत्सम चर्चा आ वासून ऎकणारी दुपार! आंब्याच्या अढीमध्ये बसून कुचके आंबे वेचणारी, हापूस पेक्षा गोटी आंब्याला प्राधान्य देणारी गोड दुपार! चांदोबात मिळतो तसा आपल्या घराच्या मागच्या अंगणातही खजिना मिळेल म्हणून बाग खणून काढणारी दमवणारी दुपार! ’त्यावेळी खोदकाम करताना गाडून टाकलेली फुटलेली महादेवाची पिंड सोमवारीच मिळाली यांमागे नक्कीच काहीतरी अर्थ असावा’ या गंभिर चर्चेत सहभागी झालेली दुपार! आजीच्या आंबटगोड पन्ह्याने थंडावलेली सुस्त दुपार! अनेक मे महिन्यातल्या या दुपारी का कुणास ठाऊक एकसंध अशा एकच वाटतात.

आठवणीतल्या रात्रीवर आजोळचा शिक्कामोर्तब आहे. घरापेक्षाही मोठ्ठ्या असलेल्या अंगणात नक्की कधी झोप यायची कळायचंच नाही. उन्हाळा असला तरी, सारवलेल्या अंगणात आजूबाजूच्या पपई, चिकू, पेरू मधून फ़िरणारा गारवा शोषला गेलेला असायचा. त्यावर टाकलेल्या पिवळ्या जोड चटयांवर वर एकेक एकेक मातुलाप्तेष्ट खडीसाखर, बडिशेप चघळत यायचे. आम्ही आधिच जागा पटकावलेल्या असायच्या. एक पंजाबी ढाब्यावर दिसते तशी अक्षरशः खाट्खाट् करणारी खाटही होती. गुढगेदुखीवाले मेंबर उच्चस्थानावर बसायचे. चंद्राच्या दुधी प्रकाशात आजोबांचे केस ज्यास्तच पांढरे होवून चमकायचे. गडद काळ्या आभाळात चांदण्यांच्या खैरातीवर नजर ठरत नसे. उंच इमारतींचा कुठेच अडसर नसल्याने दूरपर्यंत ती चांदणखडी चमचमताना दिसायची. यात एकच डोकेदुखी होती. ’हे जाणून घ्या’ या सदराखाली पेपर मधे काहीतरी चंद्र तार्‍यांविषयी येते ना, तसले स्तंभ वाचून खगोलशास्त्रात रुची निर्माण झालेल्या मामाची प्रश्नावली.

" काल तुला दाखवलेली व्याधाची चांदणी शोधून दाखव.. "

" ती? "

" छ्या, ती तर.. अं.. माहित नाही नाव त्याचे, पण ती नव्हे. सप्तर्षी तरी दाखव.. "

" हा चार तार्‍यांचा चौकोन, आणि ती तिन तार्‍यांची शेपटी. "

" तिकडे कुठे शेपटी? इकडे, विरुध्द बाजूला. काय तू पण! त्यातला दोन नंबरचा तारा आहे ना, त्याच्या बरोब्बर खाली अगदी छॊटी चांदणी आहे दिसली? "

" कुठे? "

" ती दिसली तर तुमचे डोळे चांगले आहेत. "

" दिसली. दिसली! "

आजतागायत मला सप्तर्षींची शेपटी अचूक ओळखता येत नाही. त्या दोन नंबर तार्‍याच्या आश्रयाला राहणार्‍या चांदणीच्या अस्तित्वाची पण शंकाच आहे. पण उगाच तुझे डोळे खराब आहेत असे कशाला ऎकून घ्या? मंगळ ओळखणे मात्र काहीच अवघड नाही. लालसर तेजोहीन तारा! (ग्रह म्हणायला बोजड वाटतं, अज्ञानाविषयी ग्रह करुन घेऊ नये.) चांदण्यांनी कसं, अस्ताव्यस्त पसरलेलंच असावं, या पंथातले आम्ही! तीन दिवसांनी हा तारा इथे येतो, तो तिकडे जातो. कशाला लक्षात ठेवा?

खाटेवर बौध्द तत्वाच्या, चाणक्यनितीच्या, साहित्यसंमेलनाच्या वेगवेगळ्या गप्पा व्हायच्या. आम्हाला सगळेच कळायचे असे नाही, पण ते अवघड शब्द ऎकत तारांकीत घुमट बघता बघता छान झोप चढायची.

आजही रात्रीचे बर्‍यापैकी मोकळे आकाश दृष्टीस पडले की, नजर भिरभिरत सप्तर्षींची दिशा शोधते. दुसर्‍या तार्‍याचा आश्रित अजूनही गायबच आहे.

Wednesday, March 17, 2010

प्रगती

"हॅलो, कोण मंगळाचार्य आहेत का? हो, मी अर्थ सेक्टर मधूनच बोलतोय. आम्ही दिड वर्षांपूर्वी आपली अपॉईंमेंट घेतली होती. नाही कसे म्हणता? आपल्याला पाठवलेल्या सॅटेलाईट संदेशाचा बॅकअप आहे आमच्याकडे! सरकारी कामाचा अनुभव आपल्या पूर्वजांनी सुध्दा पुराणात लिहून ठेवला आहे. त्यावरुन सगळे संदेश ई फाईल्स मध्ये आहेत आमच्याकडे. ठीक आहे. उद्या परत बॅकअप सिग्नल्ससकट संपर्क साधतो. हॅलो, हॅलो.. काय कटकट आहे, जवळच सिग्नल पॉईंट असूनही संपर्क होत नाही. अहो उंगिरे, जरा ती फाईल डिस्प्ले करा.. "

" साहेब, ती फाईल गेली कधीच! "

" काय? कशी? "

" अहो आपल्या अँटी लायरसलाच लायरस लागला. त्याची वाजली घंटी! "

" बट व्हाय? "

" अँटी करप्शनला बॅकअप डाटा सिस्टिममधे ’रस’ निर्माण झाला. ट्रबलशूटच्या वेळी तुम्हाला विचारल होतं, ती फाईल पण क्लीन करायची आहे का म्हणून तेव्हा तुम्हीच सांगितलेत की बिनसोईच्या फाईल्स उडवा. "

" उंगिरे, मातृभाषेत बोला.. काय त्या दहा तोंडी बोलणार्‍या देशाचे शब्द घुसडताय? आणि उडवा काय? ’गहाळ’ शब्दाचा अर्थ कळतो की नाही? नविन लायरस तयार करा. त्याचे डिटेल्स घंटी लायरस कंपनीला पाठवा आणि त्यामुळे फाईल करप्ट झाल्याचे दाखवा. उद्या बघतो, मंगळ्वाल्यांना काय उत्तर द्यायचे ते.. काही झालं तरी इथल्याच मातीचे आहेत ते. "

" नविन लायरसचा खर्च दाखवायचा कुठे? "

" उंगिरे, प्रत्येक गोष्ट मीच सांगायला हवी का? जाता जाता ऑक्सिजन सिस्टीममधली ट्यूब फोडा आणि मेंटेनन्स खर्चामध्ये ’तो’ खर्च घुसडा. काय? "

" पण साहेब, ऑक्सिजन सिस्टिम बंद पडली तर आपण बाहेर कसे पडणार? "

" तुमची सेवासमाप्ती कधी आहे? "

" नाही, कळलं, मि फक्त कॅंटिनमधली ट्यूब निकामी करतो "

" हं, ठीक आहे. यावरुन आठवलं, माझ्या मुलांना शाळेचा ’हिस्ट्री प्रोजेक्ट’ पूर्ण करायचा आहे. पूर्वी झाडांमधून वगैरे ऑक्सिजन मिळण्याची सोय होती, तर ही दाट म्हणतात तशी झाडी मिळवा. ब्लॅक मनी द्यावा लागला तरी चालेल पण माझ्या मुलांचा सर्वात चांगला प्रोजेक्ट झाला पाहिजे. ते चित्रातून जंगल दाखवण बास झालं! "

ठीक आहे. आपल्या सरकारवेदांत सुध्दा पाचव्या खंडात वनखात्याचा उल्लेख आहे. ति माहितीही फर्नांडीसला तयार ठेवायला सांगतो. "

" ठीक. त्या चिमण्यांसारखे नामशेष पक्षी झाडावर बसायचे म्हणजे काय ते मुलांना समजवा. नाहीतर आयत्या वेळी गडबडायचे ते! सिग्नल ट्रॅफिक समस्येचं उत्तर तयार केलंत का तुम्ही? "

" तसं वरवरं केलय पण, बिम फोनचे सिग्नल्स, रिसिव्हींग, ट्रांस्मिटींग पॉईंट्स खरचं इतके वाढलेत की, त्याने मशिनिय प्रकृतीवर वाईट परिणाम होतो आहे. परवा तर मोनिया मॅडमच्या रोबोटने चक्क मिटींगला बसायचे सोडून गुरुद्वाराची वाट धरली. ’ प्रत्येक कंपनीला रोटेशनने दिवसाचा ठराविक काळ देण्यात येईल ’ हा मार्ग कुणाला पटेल असे वाटत नाही. बड्या बड्या कंपनीने भांडवल गुंतवले आहे त्यामुळे स्काय मिटींगमध्ये दंगा होण्याची शक्याता आहे. कायामती तर मिटींगत्याग करतील "

" उंगिरे, भारतात ९५% जागा आरक्षणासाठी आणि ५% खुल्या, निव्वळ गुणवत्तेसाठी आहेत. तुम्ही ५% मधून आलात हे खरचं वाटत नाही. तुम्ही माझे पी.ए., पण कित्येक गोष्टी बोट वाकडं करुनच कराव्या लागतात हे तुम्हाला कधी कळणारं ? मीही एका मंत्र्याचा पी.ए.च आहे. पण त्यांना मला काही सांगावेसुध्दा लागत नाही. असं बघा, सभेत दंगा होईल, वातावरण नियंत्रित करणारे मशिन चालू होईल, मनःशांतीचे संगित लावले जाईल आणि सगळे रिलॅक्स होईपर्यंत सभा पुढे ढकलल्याची घोषणा होईल. आणि काय हवे आहे? मधे कुठेतरी आपण किती क्षेत्रात प्रगती केली आहे हे नमूद करायला विसरु नका.."

" बरं, दुसरा महत्वाचा मुद्दा पाजीस्तान बाबतचा आहे. परराष्ट्र खात्याने सलोख्याचे संबंध निर्माण होण्यास वाव असल्याचा अहवाल दिला आहे. संपूर्ण देशात २ ठिकाणी आतंक, ५ ठिकाणी फोझन फूड मधून घातक द्रव्ये, प्रक्षोभक प्रचाराने जातिय फूट या सगळ्यांचे धागेदोरे पाजीस्तानापर्यंत पोहोचतात. जागतिक शांततेसाठी ही अतिगुप्त (?) माहिती सादर करायची की सलोख्याचा रिपोर्ट पुढे ढकलायचा? "

" हं.. तूर्तास तो विषय प्रलंबित ठेवू. तसाही त्या देशात दम उरला नाहीये. च्यामारीका त्यांच्यावर दबाव आणेल असा अंदाज आहे. गुप्त मदत पोचवून त्यांच तरी काय भलं झालं? चला, लवकर कँटीनच्या ऑक्सिजन ट्यूबची (अ)व्यवस्था करा. चला, कामाला लागा.."

शेकडो वर्षांपासून प्रलंबित विषय आणखी किती लांबवायचा याचा विचार करत उंगिरेंनी वातावरण नियंत्रित करणारे मशिन चालू केले. मनःशांतीचे संगित लावले आणि मेंटल रिलॅक्सेशनच्या खास सोफ्यामध्ये शांतीची आराधना करत बसून राहिले..

Sunday, March 7, 2010

त्या..

त्या दोघी बाहिणीत काय बिनसलं होत कोण जाणे! बोलणं अजिबात बंद नसलं तरी तुरळक शब्दांपलीकडे संवाद असा व्हायचाच नाही. अगदी परवापर्यंत दोघींच्या दबक्या कधी तार स्वरातल्या हसण्याला त्यांची आई वैतागून गेली होती. निवांत वेळेत काय काय करायचे याची भली मोठी यादी तयार होती तिच्याकडे. पण मुलींचा दंगा नसल्यामुळे आपल्याला इतके चुकचुकल्यासारखे वाटेल याचे तिला आश्चर्य वाटले. तीन जणांच्या कुटुंबात दोघांचे बोलणे बंद म्हणजे घर सामसूमच! पण यावेळी तिने दोघींच्या मधे न पडण्याचे ठरवले.

दुपारी शाळेत जाण्यासाठी मैत्रिणीने हाक मारली तसा मोठ्या मुलीच्या मनात विचार चमकून गेला, पुढच्या वर्षी धाकटीची पण शाळा सकाळ ऎवजी दुपारची होईल. मग फक्त मैत्रिणींबरोबर गंमत करत जाता येणार नाही. हिच्याकडे पण लक्ष द्यावे लागेल. पण मी हिला का सांभाळत नेऊ? मी इतके दिवस नियमीत पाणी घालून छान वाढवलेल्या गुलाबाच्या रोपाला पहिले फूल आले तर कुणाला दाखवायच्या आत हिने तोडले? आणि माझा नविन ड्रेसही परवा खराब केला. मीच का दरवेळी तिला सांभाळायचं? जाऊ देत..

" अगं, हातावर कसले हे ओरखडे? कुठे गेली होतीस एवढ्या दुपारी? "

" कुठे नाही गं आई, ते माझं गुपित आहे "

" जखमांमधे कसलं आलंय गुपित? आणि तुमचं काय चाललयं काय सध्या? इकडे तिकडे खेळत बसण्यापेक्षा अभ्यास वाढवलास तर बरं होईल. पुढच्या वर्षी ताईबरोबर जाणार ना तू? "

" हो तर.. पण मला बरोबर नेईल की नाही कुणास ठाऊक! रागवली आहे माझ्यावर.. "

ही दुपार जशी सरसरत गेली, तशा पुढच्या पाच दुपारवेळा हजेरी लावून गेल्या. आता आठवडा अखेर! मग काय, दिवसभरच सुट्टी.

’ही छोटी काय करत असते दरवेळी? नेहमी प्रमाणे मला मस्का मारायलाही नाही आली? यावेळी काही बोलेल तेव्हा सांगतेच.. आई पण म्हणाली, ती दुपारी कोठे जाते जरा लक्ष ठेव. पण मला काय अडलयं? मला आत्ता जायचयं तयारीला..’ असे म्हणून मोठी बहीण मैत्रिणीकडे जायला बाहेर पडली. त्यांच्या शाळेत भरणार्‍या कलाप्रदर्शनाची तयारी करायची होती ना!

दुपार सरता सरता ती परत आली, तशी बाहेरच्या पायरीवरच बसलेली छोटी तिला दिसली. तशीच.. विस्कटलेले केस, दमलेली, हात मळलेले, ओरखड्याचे.. आँ, ओरखडे? काय कुठे मारामारी करुन आली की काय? की हिलाच कोणी दमदाटी केली? विचारु का तिला? की काय करु? नकोच.. ही आज सरळ माझ्या डोळ्यात पहाते आहे? आशेने? आनंदाने? काय माहीत.. विचित्रच आहे.

ती छोटा जिना चढून वर आली. वरच्या दोघींच्या खोलीत बदलेलं असं काही नव्हतं, स्वच्छ पलंग, खिडक्यांवर झुळझुळणारे निळे पडदे, दोन दप्तरं, अभ्यासाचे टेबल, आणि हे हे काय आहे टेबलावर? तिने उत्सुकतेने तिकडे पाहिलं, तिथे एका शिसवी लाकडात कोरलेलं थोडसं ओबडधोबड पण सुंदर गुलाबाच फूल होतं. जवळच वहीच्या फाडलेल्या कागदावर पेन्सिलीने लिहलेली एक छोटीशी चिठ्ठी होती. चिठ्ठी वाचताना तिचे डोळे आनंदाने आणि आठवडी अबोला संपल्याच्या जाणिवेने भरुन आले. चिठ्ठीतली अक्षरे होती,

’ ताई, तुझं फूल मला फारचं आवडलेल होत म्हणून मी तोडलं. सॉरी. पलिकडच्या रस्त्यावरच्या टेबल खुर्चीवाल्या काकांनी मला रोज दुपारी हे फूल करायला शिकवलं. ते तू तुझ्या कलाप्रदर्शनातही ठेवू शकतेस. मला पुढच्या वर्षी शाळेत तुझ्याबरोबर दुपारी नेशील नां?’*************************************************************************

बुध्दीमत्ता, नैतिकता, भावनाशिलता, धैर्य, परोपकारी वृत्ती, कार्यशिलता, कोमलता या रुपाने आसपास वावरणार्‍या, या गोष्टींशी परिचय करुन देणार्‍या, अनोळखी, ओळखीच्या सर्व स्त्रियांना ’महिला दिनाच्या’ हार्दीक शुभेच्छा..!

Saturday, February 20, 2010

डोहवाटासुशिलला मी पहिल्यांदा पाहिलं, ते पाच सहा वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात. नवर्‍यामुलीचा भाऊ म्हणून मिरवत होता. भरपूर उंच, धिप्पाड भारीभरकम देहाचा मालक! नातेवाईक म्हणून जुजबी ओळख करुन दिली गेली तेव्हा ’हं, हॅलो’ या पलिकडे बोललाही नाही. लांबच्या नातेवाईकांकडील लग्न, त्यामुळे जेवणानंतर फारसे रेंगाळणे वगैरेही झाले नाही.

पुढे कधीतरी त्याच्या आजारपणाविषयी ऎकण्यात आले. वरकरणी एवढ्या सुदृढ दिसणार्‍या मुलाच्या दोनही किडनी फ़ेल झाल्या असतील असे चुकूनही वाटत नव्हते. अर्थात, तस कोणत्याच आजाराविषयी वरुन तर्क करता येत नाही. त्याच्या आईने तिची किडनी देवू केली. उपचारासाठी लागणारा पैसा पावसाळ्यात छ्परावरुन पाणी ओघळावे तसा जात होता. सुशिलने तशातही वाहत्या पाण्याला बांध म्हणून छोटी नोकरी करायला सुरवात केली.

तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घरी जाणे झाले तेव्हा अशक्तपणाची छटा त्याच्या अंगावर पसरत चाललेली दिसली पण त्यामुळे त्याच्या उत्साहात कुठेच खीळ बसली नव्हती. त्याने बाहेरुन केक्स आणले. भरभरुन बोलत राहिला. कुठले कुठले संदर्भ देवून गप्पा फुलवत राहिला.

पुढच्या दोन वर्षात त्याची प्रत्येक महिन्याला करावी लागणारी ’ब्लड ट्रान्सप्लांट’ ट्रीटमेंट आठवड्यावर आलेली समजले. काही दिवसांनी तर एक दिवसाआड त्याला रक्त बदलावे लागे. आता मात्र तो या वेदनेच्या आवर्तनाला कंटाळला होता. कुठल्यातरी निर्णायक जाणिवेने हॉस्पिटलला जायलाच नकार देत होता. मर्सी किलींगचा वाद कोर्टात संपेल तेव्हा संपेल पण नात्यांच्या मोहदुनियेत त्याला कधीच झुकते माप मिळणार नाही. वेळोवेळी समजूत घालून, चुचकारुन या तीस वर्षाच्या मुलाला त्याचे आई-वडील मिशन हॉस्पिटलला घेवून जात.

या खेपेला भेटला तेव्हा मात्र त्याच्यात कमालीचा फरक पडलेला दिसला. पंधरा वीस किलो वजन कमी झाले होते. त्याला इतके अशक्त झालेले पाहुन कसेसेच वाटले. आडवे झॊपता येत नसल्यामुळे त्या भकास दुपारी टेबलावर डोके ठेवून तो तसाच बसल्या बसल्या झोपला होता. संध्याकाळ्च्या चहाच्या गप्पा झाल्यावर अभ्यास, करियर यांवर लांबलचक सूचना देवून शेवटी तो मिस्कील हसत म्हणाला, " तायडे, ते सगळं ठीक आहे, पण तू भरल्या घरातल्याच छानशा मुलाशी लग्न कर बरं कां.. मी एक आत्ता सुचवू का?"

नंतर हलक्या फुलक्या फुग्याला पिन लागावी तसा फिरुन विषय परत डॉक्टर, हॉस्पिटलवर आला. त्याच्या अवघडलेल्या हाताकडे नजर गेली तेव्हा " हे काय चालायंचच! मनगटावर हात ठेव. रक्ताचा जोर तुला जाणवेल बघ! " म्हणत त्याने हात उलटा केला. सुया टॊचून घायाळ झालेल्या त्या हातावर बिचकत हात ठेवला तेव्हा खरचं रक्ताचा जोर खळखळत्या पाण्याप्रमाणे स्पष्ट जाणवत होता. त्याचा आवाजही येत असल्याचा क्षणिक भास झाला. काही सेकंदांच्या त्या चमत्कारीक अनुभवाने परतीचा रस्ता पार गहनगूढ बनून गेला. हीच त्याची शेवटची भेट. इन मिन भेटीतली तिसरी!

मागच्या काही उधारी त्याने तीस वर्षात तुकड्या तुकड्याने वेदनेच्या स्वरुपात फेडून टाकल्या असाव्यात. दयामरण त्याला लाभले नाही. अर्थात, पूर्ण वसूली झाल्याशिवाय हे हिशोब ठेवणारा त्याला जाऊ देत नाही म्हणा! दया नक्की कुणी करायची ही सूक्ष्म शंका राहतेच. परमेश्वराने माणसावर, माणसांनी तडफडणार्‍या सोयर्‍यावर की दोन जगाच्या सीमारेषेवर उभ्या जीवाने, त्या वेठीला धरलेल्या परमेश्वरावर?

Wednesday, January 13, 2010

आवडतं घड्याळ

शनिवार रविवार मजेत घालवण्यासाठी श्रीयुत क. सहलीला जाण्याची तय़ारी करत होते. त्यांच्या कोटाच्या खिशालतला छोटासा रेडिओ हवामानाचा अंदाज सांगत होता.

" उद्या हवा छान असेल..."

खुषीत येऊन शीळ घालत श्रीयुत क. यांनी हातरुमाल काढला आणि आपलं मनगटी घड्याळ हलकेच पुसलं. असं करण्याची त्यांना सवयच लागली होती.

पण सवय म्हटली तरी डोकं खाजवण किंवा कान चिमटीत पकडणं असल्या एखाद्या निरर्थक सवयीसारखी ती सवय नव्हती. श्रीयुत क. त्या मनगटी घड्याळाची फार काळजी घ्यायचे. त्या घड्याळावर त्यांचं प्रेम होतं अस म्हटल तरी अतिशयोक्ती झाली नसती.

श्रीयुत क. यांनी ते घड्याळ घेतल्याला पाच वर्षे होऊन गेली होती. एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या घड्याळांच्या काउंटरजवळून ते जात असताना त्यांना ते दिसलं होतं. काचेच्या शोकेसमध्ये कितीतरी घड्याळं होती, पण ते एकच घड्याळ चमचमत होतं. एखाद्या मुलीनं डोळा मारावा तस. श्रीयुत क. यांना वाटलं, ते घड्याळ हलक्या आवाजात आपल्याला उद्देशून पुटपुटतंय,

" घे ना मला! प्लीज..."

डायलसाठी कुठल्य़ातरी दुसर्‍याच देशातलं जुन्या काळच सोन्याचं नाण वापरल होतं. श्रीयुत क. कंपनीत कामाला लागल्यापासून त्यांना पहिल्यांदाच बोनस मिळाला होता.

" ठीक. घेतो मी तुला. "

नकळत श्रीयुत क. असं पुटपुटले. तेव्हापासून श्रीयुत क. आणि ते घड्याळ कधीही वेगळे झाले नव्हते.
आपल्या शरीराचाच भाग असावा, तसं ते घड्याळ श्रीयुत क. वापरायचे. अजून तरुण असल्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी वगैरे करण्याच्या भानगडीत ते स्वतः अजून पडले नव्हते. पण घड्याळाची मात्र नियमीत तपासणी करुन घ्यायला ते कधीही विसरत नसत. घड्याळ तपासणीला दिलं आणि त्या दिवसात दुसरं घड्याळ वापराव लागलं, की त्यांना एकटं एकटं वाटून दिवस जाता जायचा नाही.
त्यामुळे ते घड्याळ कधीही बंद पडायच नाही किंवा मागेपुढे व्हायचं नाही. कोणताही बिघाड न होता ते इमानेइतबारे योग्य वेळ दाखवायचं.

रेडिओनं नेहमीप्रमाणे वेळ सांगितली. श्रीयुत क. यांनी वेळ न पटल्यासारखी मान हलवली.

" अरेच्चा ! रेडिओच्या वेळ सांगण्यात गडबड होते म्हणजे काय? "

स्वत:च्या घड्याळातली वेळ चूक असण ही तर श्रीयुत क. यांच्या दृष्टीने अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण रेडिओच बटन फिरवून इतर रेडिओ स्टेशनांवरची वेळ त्यांनी ऎकली, तेव्हा रेडिओच्या वेळेत काहीही चूक नसल्याच त्यांच्या लक्षात आलं. श्रीयुत क. चांगलेच भांबावले.

आधीच तिकिटं काढून ठेवलेल्या बसमध्ये चढण्यासाठी वेळेत पोहोचणं आता त्यांना शक्या झालं नसतं. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि तक्रारीच्या सुरात ते म्हणाले,

" आता काय म्हणावं तुला! तुझी इतकी काळजी काय उगीच घेतो का मी? "

पण आता तक्रारीचा काही उपयोग नव्हता. त्यांनी सहलीचा नाद सोडला आणि जरा फिरायला म्हणून ते बाहेर पडले. वाटेवरच्याच घड्याळाच्या दुकानात गेले.

" घड्याळात काहीतरी बिघाड झालाय. मागे पडू लागलय हे! एका आठवड्यानं येणारी सुट्टीही फ़ुकट गेली..."

" पण तुम्ही तर अलीकडेच तपासणीला दिलं होतंत..." दुकानदाराने ते घड्याळ घेतल आणि त्याचा प्रत्येक भाग काळजीपूर्वक निरखून पाहिला. जराशा चकित झालेल्या आवाजात तो म्हणाला,

" विचित्रच आहे! कुठेही कसलाही बिघाड झालेला दिसत तरी नाही. "

" असं होणंच शक्य नाही. "

तितक्यातच श्रीयुत क. यांच्या कोटाच्या खिशातल्या मघापासून चालू राहिलेल्या रेडिओवर बातम्या सुरु झाल्या.

" पर्यटनाचा सिझन सुरु झालेला आहे. स पर्वताकडे जाणारी बस..."

ते ऎकून श्रीयुत क. जराशा चढलेल्या सुरात म्हणाले,

" याच बसने मी जाणार होतो. पण उशीर झाल्यामुळे जाता आलं नाही. या घड्याळाला नक्कीच काहीतरी झालंय. "

पण बातमीदाराचा आवाज पुढे सांगत होता.

"... अपघात होऊन दरीत कोसळली आणि... "---------------------------------~~~~~~~~~~~~~~~~~~-----------------------------

जपानमधील सुप्रसिध्द लघु-लघुकथा लेखक शिनीची होशी यांच्या मूळ कथांचा निसीम बेडेकर यांनी मराठीत अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. ’बोक्कोचान आणि इतर जपानी कथा’ या त्यांच्या कथासंग्रहात ३६ लघुकथांचा समावेश आहे. ही कथा त्यातलीच आहे. मनोविकास प्रकाशन असलेले हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे.

Monday, January 11, 2010

छोटा प्रश्न


छोटासा प्रश्न आहे आणि त्याची माझ्यापरीनं शोधलेली उत्तरेही आहेत. सकाळ, इन्फिनिटी इव्हेंटच्या ’ ऊर्जा ’ चे कार्यक्रम महाराष्ट्र व गोवा येथे होत आहेत. त्याचे मोठमोठे पोस्टर्स चौकात, रस्त्यावर जागोजागी लावलेले दिसत आहेत. झाकीर हुसेन, तौफ़िक कुरेशी आणि नीलाद्री कुमार यांचे अतिशय सुंदर पोट्रेट्स दिमाखात झळकताहेत. विशेषत: झाकीर हुसेनचे गोड चेहर्‍याचे चित्र ! त्याचे तबलावादन श्रवणीयच नव्हे तर प्रेक्षणीयही असते. दूरदर्शनवरच्या ’बजे सरगम’ मधला त्याचा प्रसिध्द ’ हेअर जॉगल ’ पाहताना खूप गंमत वाटायची. हा व्हिडीओ इथे परत एकदा पहायला मिळाला. प्रत्येक ठेक्याबरोबर दाद देणार्‍या केसांशिवाय तो अपूर्णच वाटतो. या माणसाने वयाची ५८ वर्षे पूर्ण केली (तरी आमच्यासारखे क्षुद्र जीव त्यांना तो वगैरे म्हणतात पण झाकीर हुसेन परका, वयाने खूप मॊठा वगैरे वाटतच नाही) त्यांची दूरदर्शनवर ताल,लय यांविषयी माहिती देणारे काही भाग प्रसिध्द झाले होते. त्याविषयी सर्व माहिती या साईटवर मिळाली. चांगली आहे.

http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=1277804रविवारच्या लोकरंगमधेही भिमसेन जोशी, झाकीर वगैरे यांचे किती छान फ़ोटो आले आहेत. मटाचा भिमसेन जोशींचा वॉलपेपर तर लाजवाबच! तर, छोटा प्रश्न असा आहे की यांचे नेहमी एवढे चांगले फोटो कसे येतात? बरं, काढणारे प्रोफेशनल फोटोग्राफर्सच असतील असही नाही. कार्यक्रमाला जाणारे आणि हौसेखातर (किंवा आपण तिथे उपस्थित होतो याचा पुरावा म्हणून) फोटो काढणारे पण असतातच की! तरीपण त्या साध्या फोटोत कलावंताचं असाधारण असणं लपत नाही. कदाचित हेच उत्तर असावं. कला सादर करतानाचा आनंद आणि केल्यानंतरचे समाधान दोन्ही गोष्टी फोटोभर उमटत असाव्यातं!

कलावंतांप्रमाणे कोणत्याही लहान मुलाचे वाईट फोटो आलेले मी पाहिले नाहीत. कसेही काढा, कधीही काढा, गोडचं फोटो येतात. आणि ते का येतात हे नमूद करायची गरजच नाही.

मला स्वतःचे फोटो फारसे चांगले येतात अस अजिबात वाटत नाही. (अर्थात मुद्दलच भक्कम नाहिये पण तो मुद्दा गृहित नको धरायला) आलेल्या फोटोला नावं ठेवली की, ’ आता, आहे तसचं येणार की ! ’ अशी कुचकट वाक्यं एकदोनदा ऎकल्यामुळे चांगल्या फोटोचा आग्रह मी सोडल्यातच जमा आहे. :-)

असॊ, १२ जानेवारीला ’ऊर्जा- द फ्युजन एक्‍सपिरिअन्स' चा पहिला कार्यक्रम कोल्हापूर येथे होईल. बघू, मी काढलेले फोटो कसे येतात ते!