Monday, January 11, 2010

छोटा प्रश्न


छोटासा प्रश्न आहे आणि त्याची माझ्यापरीनं शोधलेली उत्तरेही आहेत. सकाळ, इन्फिनिटी इव्हेंटच्या ’ ऊर्जा ’ चे कार्यक्रम महाराष्ट्र व गोवा येथे होत आहेत. त्याचे मोठमोठे पोस्टर्स चौकात, रस्त्यावर जागोजागी लावलेले दिसत आहेत. झाकीर हुसेन, तौफ़िक कुरेशी आणि नीलाद्री कुमार यांचे अतिशय सुंदर पोट्रेट्स दिमाखात झळकताहेत. विशेषत: झाकीर हुसेनचे गोड चेहर्‍याचे चित्र ! त्याचे तबलावादन श्रवणीयच नव्हे तर प्रेक्षणीयही असते. दूरदर्शनवरच्या ’बजे सरगम’ मधला त्याचा प्रसिध्द ’ हेअर जॉगल ’ पाहताना खूप गंमत वाटायची. हा व्हिडीओ इथे परत एकदा पहायला मिळाला. प्रत्येक ठेक्याबरोबर दाद देणार्‍या केसांशिवाय तो अपूर्णच वाटतो. या माणसाने वयाची ५८ वर्षे पूर्ण केली (तरी आमच्यासारखे क्षुद्र जीव त्यांना तो वगैरे म्हणतात पण झाकीर हुसेन परका, वयाने खूप मॊठा वगैरे वाटतच नाही) त्यांची दूरदर्शनवर ताल,लय यांविषयी माहिती देणारे काही भाग प्रसिध्द झाले होते. त्याविषयी सर्व माहिती या साईटवर मिळाली. चांगली आहे.

http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=1277804रविवारच्या लोकरंगमधेही भिमसेन जोशी, झाकीर वगैरे यांचे किती छान फ़ोटो आले आहेत. मटाचा भिमसेन जोशींचा वॉलपेपर तर लाजवाबच! तर, छोटा प्रश्न असा आहे की यांचे नेहमी एवढे चांगले फोटो कसे येतात? बरं, काढणारे प्रोफेशनल फोटोग्राफर्सच असतील असही नाही. कार्यक्रमाला जाणारे आणि हौसेखातर (किंवा आपण तिथे उपस्थित होतो याचा पुरावा म्हणून) फोटो काढणारे पण असतातच की! तरीपण त्या साध्या फोटोत कलावंताचं असाधारण असणं लपत नाही. कदाचित हेच उत्तर असावं. कला सादर करतानाचा आनंद आणि केल्यानंतरचे समाधान दोन्ही गोष्टी फोटोभर उमटत असाव्यातं!

कलावंतांप्रमाणे कोणत्याही लहान मुलाचे वाईट फोटो आलेले मी पाहिले नाहीत. कसेही काढा, कधीही काढा, गोडचं फोटो येतात. आणि ते का येतात हे नमूद करायची गरजच नाही.

मला स्वतःचे फोटो फारसे चांगले येतात अस अजिबात वाटत नाही. (अर्थात मुद्दलच भक्कम नाहिये पण तो मुद्दा गृहित नको धरायला) आलेल्या फोटोला नावं ठेवली की, ’ आता, आहे तसचं येणार की ! ’ अशी कुचकट वाक्यं एकदोनदा ऎकल्यामुळे चांगल्या फोटोचा आग्रह मी सोडल्यातच जमा आहे. :-)

असॊ, १२ जानेवारीला ’ऊर्जा- द फ्युजन एक्‍सपिरिअन्स' चा पहिला कार्यक्रम कोल्हापूर येथे होईल. बघू, मी काढलेले फोटो कसे येतात ते!9 comments:

Anonymous said...

> छोटा प्रश्न असा आहे की यांचे नेहमी एवढे चांगले फोटो कसे येतात?
>---

मीनलबाई : सतीश पाकणीकरांच्या तुम्ही दिलेल्या फोटोत भीमसेनजी कुठे चांगले दिसताहेत? माझ्या म्हणण्याचा रोख असा की एरवी त्यांच्या चेहर्‍यावर ज़े साधनेचं तेज दिसतं, ते त्या फोटोत (मला) दिसत नाही. अमजद अली जितका वाजवतो बेकार तितकाच राजबिंडा दिसतो खरा. एके काळी भारताला भेट देणार्‍या गोर्‍या परदेशी स्त्रिया साहेबांवर फार लोभ करीत, असं मी ऐकून आहे.

> कला सादर करतानाचा आनंद आणि केल्यानंतरचे समाधान दोन्ही गोष्टी फोटोभर उमटत असाव्यातं!
>---

भीमसेनजींच्या मी अनेक मैफ़िली ऐकल्या आहेत. त्यात कला सादर करण्याचा भाग कमी (कधीकधी तर अगदीच शून्य) आणि पैसे उकळण्याचा भाग जास्त असे. कला सादर न केल्याचं असमाधान आमच्या चेहर्‍यावर उमटत असे; ते टिपायला कोणी आमचा फोटो काढला नाही, हा भाग वेगळा. मधूनच एखादा राग अचानक प्रभावी सादर होई. त्या भरवशावर आम्ही ज़ात राहिलो; उशीरा का होईना, नन्तर या मैफ़िलींना ज़ाऊ नये या मताची कार्यवाही करू लागलो.

ज़ाकिर हुसेनच्या फोटोंवरूनच हा माणूस उथळ आहे हे लक्षात येतं. एवढा मोठा (आणि चिकणा) कलाकार. पण आपलं कौशल्य गाण्यात सौंदर्य भरायला वापरलं पाहिजे, त्याची (कौशल्याची) स्वत:ची जाहिरात करायला नाही, ही साधी समज़ नसल्याने वाया गेला. कलेला आवश्यक तो संयम पाळणारा अतिशय दिमाखदार तबला ठेका ऐकायचा असेल तर कुमार गंधर्वांच्या अनेक आणि भीमसेनजींच्या काही एल पीं वरचा वसन्तराव आचरेकरांचा तबला ऐका. किंवा यू-ट्यूब वर असल्यास मल्लिकार्जुन मनसूरांच्या बहादुरी तोडीला किंवा किशोरीच्या पटबिहागाला नारायणराव इंदोरकरांनी केलेली साथ ऐका. तबला-सोलो मला कळतही नाही, आवडतही नाही, आणि तो आवडणार्‍यांपैकी बहुतेकांना तबला कळत नाही; म्हणून त्या प्रकारावर नो कॉमेंट.

माणसांच्या श्रद्‌धा व्यक्त करणारे फोटो पु लं च्या गणगोत मधे दिसतात. धार्मिक संदर्भात गुरु नानक, रामकृष्ण परमहंस (विवेकानन्द नाही), गोळवलकर गुरुजी या लोकांचे फोटो चांगले आहेत. 'पहा पहा हो माझे केस, माझे दात, माझं थोबाड' हा ज़ाकिर हुसेनी प्रकार तिथे नाही. काही लोक आपलं काम करताना चांगले दिसतात. माझ्या मते स्टेफ़ी ग्राफ़ला काही रूप नाही, पण टेनिस कोर्टवर ती एकदम परीसारखी दिसायची.

आमिर खानचा कुठलाच चित्रपट मी पाहिलेला नाही. पण त्याच्यावर पोरी का मरतात, मला कळत नाही. त्याचा चेहरा पाहिल्यावर याचे दुधाचे दात अज़ून पडले नाहीत, याची खात्रीच पटते.

- डी एन

Anand said...

प्रश्न विचारुन उत्तरही तुम्हीच दिलयं...

>> कला सादर करतानाचा आनंद आणि केल्यानंतरचे समाधान दोन्ही गोष्टी फोटोभर उमटत असाव्यातं!

Ajay Sonawane said...

काही लोकांचे चेहरेच जास्त बोलके असतात, तुझ्या ब्लॉग वर थोडं हलकंफुलकं वाचणं आणि झाकीरचा ही हसरा फोटो दोन्ही एकसाथ मिळाल्यामुळे सकाळी सकाळी मुड फ्रेश झाला. :-)

-अजय

मीनल said...

श्री. डी एन,
काय प्रतिक्रीया द्यावी समजत नहिये. कारण मला तोडी किंवा पटबिहाग यांपैकी खूप काही समजते असं मुळीच नाही. मी अशा मैफ़िली ऎकल्या आहेत असही नाही. म्हणूनच त्यासंबंधात काही लिहायचं धाडस केल नाहिये. आपण सांगितल्याप्रमाणे नारायणराव इंदोरकर आणि वसंतराव आचरेकरांचा तबला जरुर श्रवणीय असेल. सुचवल्याबद्दल धन्यवाद!

सतीश पाकणीकरांच्या फोटोबद्दल तुम्ही म्हटल आहे
> त्यांच्या चेहर्‍यावर ज़े साधनेचं तेज दिसतं, ते त्या फोटोत (मला) दिसत नाही.
कंसातला ’मला’ चपखल आहे. ही आवड नावड वैयक्तीक स्वरुपाचीच असते. मला आवडला म्हणजे आपल्यालाही आवडावाच असा माझा मुळीच आग्रह नाही.

ज़ाकिर हुसेनच्या फोटोंवरूनच हा माणूस उथळ आहे असं आपल म्हणणं मला पटत नाही. जाकिरच्या किंवा कुणाही कलावंताच्या वैयक्तीक बाबीविषयी मला कोणतीच टिप्पणी करायची नाही. चांगल दिसणं हा त्याचा दोष आहे असंही मला वाटत नाही. अर्थात, तुम्ही त्याच्या दिसण्यापेक्षा त्याच्या स्वत:विषयी प्रदर्शन करण्याच्या सवयीवर नाराजी दाखवली आहे. 'पहा पहा हो माझे केस, माझे दात, माझं थोबाड' यांवरुन ते स्पष्ट होतं. मुख्य म्हणजे तो मुद्दाच नाहिये. ज्या काही थोड्याफार कलावंतांचे फोटो किंवा लाईव्ह परफॉमन्स पाहण्यात आले आहेत त्यात (मला) आत्तापर्यंत तरी कुरुपता दिसून आलेली नाही. आणि हे सांगावस वाटलं इतकच! ही अतिशय सामान्य गोष्ट आहे आणि तशाच सामान्य पध्द्तीने मांडली आहे.

आमिर खानचा इथे काही संबंध नाही परंतु, तुम्ही त्याचा कुठलाच चित्रपट पाहिलेला नाही आणि म्हणूनच त्याच्यावर पोरी का मरतात हे तुम्हाला कळत नाही. (मी त्याची फॅन नाही पण नुसत्या चेहरा असा आहे म्हणून त्याला तुच्छ लेखण्यात मला काही तथ्य वाटत नाही.)

मीनल said...

@ आनंद,
हे एकप्रकारे स्वगत झाल्यासारखचं वाटतयं! २ दिवसांपूर्वी शेजारच्या एका मुलीचा कथ्थक कार्यक्रमाचा अल्बम पाहताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. धन्यवाद!

@ अजय,
खरं आहे तुझ म्हणणं, काही लोकांचे चेहरे खूप बोलके असतात. झाकीरचे फोटो बघायला छान वाटतं. त्याच ’बजे सरगम’ आणि सुरभीच टायटल सॉंग किती वर्षांनी ऎकलं..

Naniwadekar said...

> ज़ाकिर हुसेनच्या फोटोंवरूनच हा माणूस उथळ आहे असं आपल म्हणणं मला पटत नाही. जाकिरच्या किंवा कुणाही कलावंताच्या वैयक्तीक बाबीविषयी मला कोणतीच टिप्पणी करायची नाही.
>-----

मीनलबाई : माझी ज़ाकिर हुसेनवर टीका वैयक्तिक स्वरुपाची नाही. तुम्ही मुद्‌दा मांडला की हे थोर कलाकार आहेत, आणि त्यांची साधना चेहर्‍यावर (तेज म्हणा, सात्विकता म्हणा) झळकते. याला माझा विरोध नाही. मी त्या नाण्याची दुसरी बाज़ू मांडली. जितेन्द्र अभिषेकींचा चेहरा (ज़ाकिरशी एक तुलना म्हणून) सात्विक आहे. ज़ाकिरचा तसा नाही. तो उथळ कलाकार आहे, आणि त्याचा उथळपणा चेहर्‍यावर दिसतो. हे 'mind's construction reflected by the face' चे प्रकार आहेत.

पण 'There is no (foolproof) art to find the mind's construction in the face, उर्फ़ दिसतं तसं (बरेचदा) नसतं' हे सुद्‌धा खरं आहे. काही वर्षांपूर्वी एक तसे साधे म्हणता येईल असे गायक माझ्या मित्राकडे उतरले. (त्यांचं नाव जाहीरपणे सांगणं योग्य नाही, म्हणून फक्त 'एक गायक'.) त्यांचीही आत्मस्तुती ऐकून तो मित्र कंटाळला. आणि यापुढे कोणाही कलाकाराचं यजमानपण न करायचा त्यानी निर्णय घेतला. इतर अनेक कलाकार तर आत्मस्तुतीत या 'एक गायक'ला पार मागे टाकतील. ज़ाकिर त्याच्या यजमानांना असा त्रास देत नाही, अशी माझी उडत उडत ऐकलेली माहिती आहे. श्रुती सडोलीकर, अश्विनी भिडे या माझ्या काही मित्रांकडे उतरतात. त्यांचेही अनुभव चांगले आहेत.

आपलं मन आपल्याशी खेळतं, हा भागही आहेच. अमजाद अली चांगला कलाकार असता तर मला त्याचा चेहरा उथळ वाटला असता का? हे मी स्वत:च माझं मला सांगू शकत नाही.

- नानिवडेकर

मीनल said...

आत्मस्तुती करणार्‍या माणसांचा मलाही तिटकारा आहे. आणि यजमान म्हणून त्यांना सहन करणे सॊपी गोष्ट नाही. आपण/ आपल्या मित्रांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्याने या गोष्टीत तथ्य आढळते. त्यामुळे सरसकट सगळेच कलाकार चांगले, थोर, सात्विक वगैरे दिसतात, हा मुद्दा खोडावा लागेल.
धन्यवाद!

Naniwadekar said...

> सरसकट सगळेच कलाकार चांगले, थोर, सात्विक वगैरे दिसतात, हा मुद्दा खोडावा लागेल.
>---

हा असला भाबडेपणा लोकांत प्रचंड प्रमाणात असतो, ही मला बातमी नाही. पण तुम्ही त्या रोगाची शिकार असाल याची कल्पना नव्हती. कंटाळा आला तर स्पष्ट सांगा, मी लगेच थांबीन. पण काही गोष्टी लिहिण्याचा मोह होतो आहे.

'आत्मस्तुती न करणारे कलाकार' हा एक शोधाचा विषय ठरेल. नारायणराव बालगंधर्व स्वत:बद्‌दल बोलत नसत, हे गोविंदराव टेंबे कौतुकानी सांगत. (पण नारायणराव इतके उधळे होते,की त्यांचं सबंध आयुष्य कर्ज़ात गेलं.) स्वत: टेंबे आत्मस्तुती करत नसत पण त्यांच्यातही ठळक दुर्गुण होतेच. दारु पिणे असात्विक आहे का, मला माहीत नाही. पण दीनानाथ, भीमसेन, कुमार गंधर्व, वसंत प्रभू, सी रामचन्द्र वगैरे मंडळी, आणि एकच प्याला लिहिणारे गडकरीसुद्‌धा (पण त्यांच्या बद्दल नक्की माहिती नाही), इतके पीत की त्यामुळे त्यातले बरेच अकाली मेले. 'मूर्खासारखं बोलायचं', आणि तेही आपल्या विषयावर हा अधिकारही ९०% कलाकार उपभोगत असावेत. डागर घराण्यानी धृपद गायकीची केलेली सेवा सर्वच ज़ाणतात, पण हे थोर गायक संगीताविषयी कसे बरळतात, हे त्या क्षेत्रातले लोक ज़ाणतात. मोठ्या कलाकारांची टर उडवल्यावर त्यांच्या चमच्यांनी धमक्या देणे, हा प्रकार सर्रास चालतो. मला स्वत:ला अशा धमक्या इंटरनेटवर आणि ईमेलद्‌वारा मिळाल्या आहेत. अमेरिकेत चार ठिकाणी गायचं, पैकी तीन आयोजकांकडून विमानप्रवासाचे पैसे घ्यायचे, आणि त्यावर कुठल्याच देशात कर भरायचा नाही, असले प्रकार चालतात; पण मी या महाभागांची नावं जाहीरपणे सांगू शकणार नाही.

अमेरिकेत गेली पन्नास वर्षे कलाकारांना घरी ठेवणारे आणि २०-३० वर्षं संगीतदौरे आयोजित करणारे बळवंतराव दिक्षित एकदा मला बोलले की आत्मस्तुती न करणारे त्यांना भेटलेले कलाकार दोनच. दत्तात्रय विष्णु पलुस्कर आणि अल्ला रखा क़ुरेशी. ह्‌या एका बाबतीत ज़ाकिरमधे बापाचा गुण आहे. पण बाकी सवंगपणाचं काय? बहुतेक सगळे कलाकार इतकी आत्मस्तुती करतात की त्यांच्याशी बोलू नये, किंवा त्यांच्या मूर्खपणाचा 'आनन्द' घ्यायला 'आप की तो बात ही अलग' वगैरे बोलावं आणि लवकरात लवकर टळावं.

हे असूनही थोर कलाकारांच्या चेहर्‍यावर ते तेज असतं, हे खरं आहे. (पण ते ज़ाकिरच्या चेहर्‍यावर नाही.) त्यांच्यातल्या दोषांचं चित्र चेहर्‍यावर का उतरत नाही याची कल्पना नाही.

> > सरसकट सगळेच कलाकार चांगले, थोर, सात्विक वगैरे दिसतात, हा मुद्दा खोडावा लागेल.
>---

सात्विक दिसतात, हा मुद्‌दा चालेल. तसे ते असतात हा समज़ गंगार्पण करा.

- डी एन

मीनल said...

मी भाबडेपणाची शिकार नाही. मद्यपान आणि इतर उथळपणाबद्दल मीही ऎकून आहे पण हो, प्रत्यक्ष कुणासमवेत(मोठे कलाकार)वेळ घालवण्याचा प्रसंग न आल्याने बाकीच्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत.