Wednesday, January 13, 2010

आवडतं घड्याळ

शनिवार रविवार मजेत घालवण्यासाठी श्रीयुत क. सहलीला जाण्याची तय़ारी करत होते. त्यांच्या कोटाच्या खिशालतला छोटासा रेडिओ हवामानाचा अंदाज सांगत होता.

" उद्या हवा छान असेल..."

खुषीत येऊन शीळ घालत श्रीयुत क. यांनी हातरुमाल काढला आणि आपलं मनगटी घड्याळ हलकेच पुसलं. असं करण्याची त्यांना सवयच लागली होती.

पण सवय म्हटली तरी डोकं खाजवण किंवा कान चिमटीत पकडणं असल्या एखाद्या निरर्थक सवयीसारखी ती सवय नव्हती. श्रीयुत क. त्या मनगटी घड्याळाची फार काळजी घ्यायचे. त्या घड्याळावर त्यांचं प्रेम होतं अस म्हटल तरी अतिशयोक्ती झाली नसती.

श्रीयुत क. यांनी ते घड्याळ घेतल्याला पाच वर्षे होऊन गेली होती. एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या घड्याळांच्या काउंटरजवळून ते जात असताना त्यांना ते दिसलं होतं. काचेच्या शोकेसमध्ये कितीतरी घड्याळं होती, पण ते एकच घड्याळ चमचमत होतं. एखाद्या मुलीनं डोळा मारावा तस. श्रीयुत क. यांना वाटलं, ते घड्याळ हलक्या आवाजात आपल्याला उद्देशून पुटपुटतंय,

" घे ना मला! प्लीज..."

डायलसाठी कुठल्य़ातरी दुसर्‍याच देशातलं जुन्या काळच सोन्याचं नाण वापरल होतं. श्रीयुत क. कंपनीत कामाला लागल्यापासून त्यांना पहिल्यांदाच बोनस मिळाला होता.

" ठीक. घेतो मी तुला. "

नकळत श्रीयुत क. असं पुटपुटले. तेव्हापासून श्रीयुत क. आणि ते घड्याळ कधीही वेगळे झाले नव्हते.
आपल्या शरीराचाच भाग असावा, तसं ते घड्याळ श्रीयुत क. वापरायचे. अजून तरुण असल्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी वगैरे करण्याच्या भानगडीत ते स्वतः अजून पडले नव्हते. पण घड्याळाची मात्र नियमीत तपासणी करुन घ्यायला ते कधीही विसरत नसत. घड्याळ तपासणीला दिलं आणि त्या दिवसात दुसरं घड्याळ वापराव लागलं, की त्यांना एकटं एकटं वाटून दिवस जाता जायचा नाही.
त्यामुळे ते घड्याळ कधीही बंद पडायच नाही किंवा मागेपुढे व्हायचं नाही. कोणताही बिघाड न होता ते इमानेइतबारे योग्य वेळ दाखवायचं.

रेडिओनं नेहमीप्रमाणे वेळ सांगितली. श्रीयुत क. यांनी वेळ न पटल्यासारखी मान हलवली.

" अरेच्चा ! रेडिओच्या वेळ सांगण्यात गडबड होते म्हणजे काय? "

स्वत:च्या घड्याळातली वेळ चूक असण ही तर श्रीयुत क. यांच्या दृष्टीने अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण रेडिओच बटन फिरवून इतर रेडिओ स्टेशनांवरची वेळ त्यांनी ऎकली, तेव्हा रेडिओच्या वेळेत काहीही चूक नसल्याच त्यांच्या लक्षात आलं. श्रीयुत क. चांगलेच भांबावले.

आधीच तिकिटं काढून ठेवलेल्या बसमध्ये चढण्यासाठी वेळेत पोहोचणं आता त्यांना शक्या झालं नसतं. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि तक्रारीच्या सुरात ते म्हणाले,

" आता काय म्हणावं तुला! तुझी इतकी काळजी काय उगीच घेतो का मी? "

पण आता तक्रारीचा काही उपयोग नव्हता. त्यांनी सहलीचा नाद सोडला आणि जरा फिरायला म्हणून ते बाहेर पडले. वाटेवरच्याच घड्याळाच्या दुकानात गेले.

" घड्याळात काहीतरी बिघाड झालाय. मागे पडू लागलय हे! एका आठवड्यानं येणारी सुट्टीही फ़ुकट गेली..."

" पण तुम्ही तर अलीकडेच तपासणीला दिलं होतंत..." दुकानदाराने ते घड्याळ घेतल आणि त्याचा प्रत्येक भाग काळजीपूर्वक निरखून पाहिला. जराशा चकित झालेल्या आवाजात तो म्हणाला,

" विचित्रच आहे! कुठेही कसलाही बिघाड झालेला दिसत तरी नाही. "

" असं होणंच शक्य नाही. "

तितक्यातच श्रीयुत क. यांच्या कोटाच्या खिशातल्या मघापासून चालू राहिलेल्या रेडिओवर बातम्या सुरु झाल्या.

" पर्यटनाचा सिझन सुरु झालेला आहे. स पर्वताकडे जाणारी बस..."

ते ऎकून श्रीयुत क. जराशा चढलेल्या सुरात म्हणाले,

" याच बसने मी जाणार होतो. पण उशीर झाल्यामुळे जाता आलं नाही. या घड्याळाला नक्कीच काहीतरी झालंय. "

पण बातमीदाराचा आवाज पुढे सांगत होता.

"... अपघात होऊन दरीत कोसळली आणि... "---------------------------------~~~~~~~~~~~~~~~~~~-----------------------------

जपानमधील सुप्रसिध्द लघु-लघुकथा लेखक शिनीची होशी यांच्या मूळ कथांचा निसीम बेडेकर यांनी मराठीत अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. ’बोक्कोचान आणि इतर जपानी कथा’ या त्यांच्या कथासंग्रहात ३६ लघुकथांचा समावेश आहे. ही कथा त्यातलीच आहे. मनोविकास प्रकाशन असलेले हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे.

22 comments:

yog said...

mastch ahe laghu katha..

मीनल said...

ho, sagalyach katha chhan ahet..
milal tar nakki vachun paha

Anand said...

छान गोष्ट आहे, पुस्तक कुठे मिळते का ते पहावं लागेल...

मीनल said...

bakichya baryach vidyan-katha ahet, majeshir ahet ekdum.
thanks for replying..

shardul said...

मस्तच आहे...

Ajay Sonawane said...

vachayala havaa...

मीनल said...

@ शार्दुल,
धन्यवाद. तुमच्या २०१० च्या अंतर्गत येणार्‍या पोस्टच्या प्रतिक्षेत आहोत.

@ अजय,
हो, मूळ बोक्कोचानची कथा देण्याचा पण खूप मोह होतो आहे पण पुस्तकाचा असा काही भाग प्रसिध्द करणे योग्य होणार नाही म्हणून इथे लिहीत नाही.

हेरंब ओक said...

मस्त कथा आहे. वाचलच पाहिजे हे पुस्तक ..

मीनल said...

Thanks Heramb, keep visiting.

मी‌ said...

कथा छान आहे, कथासंग्रह मिळवण्याची सोय करतो, धन्यवाद !

अपर्णा said...

छान आहे गं ...वाचलं पाहिजे..

मीनल said...

सोमेश, अपर्णा Thanks!

अपर्णा, तुझा mailID काय?
तुला माझा email मिळाला का?

shillpa said...

yes..ive read it..and many others...maharashtra times madhye yata hotya...pan chanacha...!

सिद्धार्थ said...

खरचं खूप छान कथा आहे.

yog said...

mahina 28 chach ahe..
post havi chhansi ekhadi..

भानस said...

मीनल,सहीच आहे कथा... पुस्तक मिळवायला हवेच. अनुवाद मस्त.

मीनल said...

Shilpa, Siddharth, Yog, Bhanas

Thanks.. Nakki wacha he pustak.

davbindu said...

सहीच....

THE PROPHET said...

फार मस्त आहे कथा...
मी अशीच एक रँडम पोस्ट शोधली आत्ता :P

मीनल said...

Devendra,
Vidyadhar
Thanks.. :)

Nissim said...

नमस्कार मंडळी! अचानक इंटरनेटवर हा ब्लॉग सापडला. मी निसीम बेडेकर. मी केलेला अनुवाद आवडला
हे ऐकून खूप छान वाटले. हे पुस्तक तुम्हाला मनोविकास प्रकाशनाकडे मिळेल.

Nissim Bedekar
nissimb@hotmail.com

MANOVIKAS PRAKASHAN
3A /4th floor shakti towars,
672 Narayan peth,
near by lokhnde talim
pune- 411 30 INDIA
phone- head office
91 020 65213203
91 020 65262950

Ashish Patkar 09822649408
Arvind Patkar 09922556663

मीनल said...

Oh God,निसीम,
तुमची कमेंट बघून खूप छान वाटले. तुमच्या पुस्तकातील एकूण एक कथा सुंदर आणि मूळ लय अजिबात बिघडू न देता अनुवादित केल्या आहेत. आणखी लोकांना त्या विषयी माहिती व्हावी म्हणूनच एक कथा इथे टंकित केली. प्रकाशनाची, पुस्तकाची अधिक माहिती दिल्याबद्दल आणि महत्वाचे म्हणजे प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार..!