Saturday, February 20, 2010

डोहवाटासुशिलला मी पहिल्यांदा पाहिलं, ते पाच सहा वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात. नवर्‍यामुलीचा भाऊ म्हणून मिरवत होता. भरपूर उंच, धिप्पाड भारीभरकम देहाचा मालक! नातेवाईक म्हणून जुजबी ओळख करुन दिली गेली तेव्हा ’हं, हॅलो’ या पलिकडे बोललाही नाही. लांबच्या नातेवाईकांकडील लग्न, त्यामुळे जेवणानंतर फारसे रेंगाळणे वगैरेही झाले नाही.

पुढे कधीतरी त्याच्या आजारपणाविषयी ऎकण्यात आले. वरकरणी एवढ्या सुदृढ दिसणार्‍या मुलाच्या दोनही किडनी फ़ेल झाल्या असतील असे चुकूनही वाटत नव्हते. अर्थात, तस कोणत्याच आजाराविषयी वरुन तर्क करता येत नाही. त्याच्या आईने तिची किडनी देवू केली. उपचारासाठी लागणारा पैसा पावसाळ्यात छ्परावरुन पाणी ओघळावे तसा जात होता. सुशिलने तशातही वाहत्या पाण्याला बांध म्हणून छोटी नोकरी करायला सुरवात केली.

तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घरी जाणे झाले तेव्हा अशक्तपणाची छटा त्याच्या अंगावर पसरत चाललेली दिसली पण त्यामुळे त्याच्या उत्साहात कुठेच खीळ बसली नव्हती. त्याने बाहेरुन केक्स आणले. भरभरुन बोलत राहिला. कुठले कुठले संदर्भ देवून गप्पा फुलवत राहिला.

पुढच्या दोन वर्षात त्याची प्रत्येक महिन्याला करावी लागणारी ’ब्लड ट्रान्सप्लांट’ ट्रीटमेंट आठवड्यावर आलेली समजले. काही दिवसांनी तर एक दिवसाआड त्याला रक्त बदलावे लागे. आता मात्र तो या वेदनेच्या आवर्तनाला कंटाळला होता. कुठल्यातरी निर्णायक जाणिवेने हॉस्पिटलला जायलाच नकार देत होता. मर्सी किलींगचा वाद कोर्टात संपेल तेव्हा संपेल पण नात्यांच्या मोहदुनियेत त्याला कधीच झुकते माप मिळणार नाही. वेळोवेळी समजूत घालून, चुचकारुन या तीस वर्षाच्या मुलाला त्याचे आई-वडील मिशन हॉस्पिटलला घेवून जात.

या खेपेला भेटला तेव्हा मात्र त्याच्यात कमालीचा फरक पडलेला दिसला. पंधरा वीस किलो वजन कमी झाले होते. त्याला इतके अशक्त झालेले पाहुन कसेसेच वाटले. आडवे झॊपता येत नसल्यामुळे त्या भकास दुपारी टेबलावर डोके ठेवून तो तसाच बसल्या बसल्या झोपला होता. संध्याकाळ्च्या चहाच्या गप्पा झाल्यावर अभ्यास, करियर यांवर लांबलचक सूचना देवून शेवटी तो मिस्कील हसत म्हणाला, " तायडे, ते सगळं ठीक आहे, पण तू भरल्या घरातल्याच छानशा मुलाशी लग्न कर बरं कां.. मी एक आत्ता सुचवू का?"

नंतर हलक्या फुलक्या फुग्याला पिन लागावी तसा फिरुन विषय परत डॉक्टर, हॉस्पिटलवर आला. त्याच्या अवघडलेल्या हाताकडे नजर गेली तेव्हा " हे काय चालायंचच! मनगटावर हात ठेव. रक्ताचा जोर तुला जाणवेल बघ! " म्हणत त्याने हात उलटा केला. सुया टॊचून घायाळ झालेल्या त्या हातावर बिचकत हात ठेवला तेव्हा खरचं रक्ताचा जोर खळखळत्या पाण्याप्रमाणे स्पष्ट जाणवत होता. त्याचा आवाजही येत असल्याचा क्षणिक भास झाला. काही सेकंदांच्या त्या चमत्कारीक अनुभवाने परतीचा रस्ता पार गहनगूढ बनून गेला. हीच त्याची शेवटची भेट. इन मिन भेटीतली तिसरी!

मागच्या काही उधारी त्याने तीस वर्षात तुकड्या तुकड्याने वेदनेच्या स्वरुपात फेडून टाकल्या असाव्यात. दयामरण त्याला लाभले नाही. अर्थात, पूर्ण वसूली झाल्याशिवाय हे हिशोब ठेवणारा त्याला जाऊ देत नाही म्हणा! दया नक्की कुणी करायची ही सूक्ष्म शंका राहतेच. परमेश्वराने माणसावर, माणसांनी तडफडणार्‍या सोयर्‍यावर की दोन जगाच्या सीमारेषेवर उभ्या जीवाने, त्या वेठीला धरलेल्या परमेश्वरावर?