Saturday, February 20, 2010

डोहवाटासुशिलला मी पहिल्यांदा पाहिलं, ते पाच सहा वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात. नवर्‍यामुलीचा भाऊ म्हणून मिरवत होता. भरपूर उंच, धिप्पाड भारीभरकम देहाचा मालक! नातेवाईक म्हणून जुजबी ओळख करुन दिली गेली तेव्हा ’हं, हॅलो’ या पलिकडे बोललाही नाही. लांबच्या नातेवाईकांकडील लग्न, त्यामुळे जेवणानंतर फारसे रेंगाळणे वगैरेही झाले नाही.

पुढे कधीतरी त्याच्या आजारपणाविषयी ऎकण्यात आले. वरकरणी एवढ्या सुदृढ दिसणार्‍या मुलाच्या दोनही किडनी फ़ेल झाल्या असतील असे चुकूनही वाटत नव्हते. अर्थात, तस कोणत्याच आजाराविषयी वरुन तर्क करता येत नाही. त्याच्या आईने तिची किडनी देवू केली. उपचारासाठी लागणारा पैसा पावसाळ्यात छ्परावरुन पाणी ओघळावे तसा जात होता. सुशिलने तशातही वाहत्या पाण्याला बांध म्हणून छोटी नोकरी करायला सुरवात केली.

तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घरी जाणे झाले तेव्हा अशक्तपणाची छटा त्याच्या अंगावर पसरत चाललेली दिसली पण त्यामुळे त्याच्या उत्साहात कुठेच खीळ बसली नव्हती. त्याने बाहेरुन केक्स आणले. भरभरुन बोलत राहिला. कुठले कुठले संदर्भ देवून गप्पा फुलवत राहिला.

पुढच्या दोन वर्षात त्याची प्रत्येक महिन्याला करावी लागणारी ’ब्लड ट्रान्सप्लांट’ ट्रीटमेंट आठवड्यावर आलेली समजले. काही दिवसांनी तर एक दिवसाआड त्याला रक्त बदलावे लागे. आता मात्र तो या वेदनेच्या आवर्तनाला कंटाळला होता. कुठल्यातरी निर्णायक जाणिवेने हॉस्पिटलला जायलाच नकार देत होता. मर्सी किलींगचा वाद कोर्टात संपेल तेव्हा संपेल पण नात्यांच्या मोहदुनियेत त्याला कधीच झुकते माप मिळणार नाही. वेळोवेळी समजूत घालून, चुचकारुन या तीस वर्षाच्या मुलाला त्याचे आई-वडील मिशन हॉस्पिटलला घेवून जात.

या खेपेला भेटला तेव्हा मात्र त्याच्यात कमालीचा फरक पडलेला दिसला. पंधरा वीस किलो वजन कमी झाले होते. त्याला इतके अशक्त झालेले पाहुन कसेसेच वाटले. आडवे झॊपता येत नसल्यामुळे त्या भकास दुपारी टेबलावर डोके ठेवून तो तसाच बसल्या बसल्या झोपला होता. संध्याकाळ्च्या चहाच्या गप्पा झाल्यावर अभ्यास, करियर यांवर लांबलचक सूचना देवून शेवटी तो मिस्कील हसत म्हणाला, " तायडे, ते सगळं ठीक आहे, पण तू भरल्या घरातल्याच छानशा मुलाशी लग्न कर बरं कां.. मी एक आत्ता सुचवू का?"

नंतर हलक्या फुलक्या फुग्याला पिन लागावी तसा फिरुन विषय परत डॉक्टर, हॉस्पिटलवर आला. त्याच्या अवघडलेल्या हाताकडे नजर गेली तेव्हा " हे काय चालायंचच! मनगटावर हात ठेव. रक्ताचा जोर तुला जाणवेल बघ! " म्हणत त्याने हात उलटा केला. सुया टॊचून घायाळ झालेल्या त्या हातावर बिचकत हात ठेवला तेव्हा खरचं रक्ताचा जोर खळखळत्या पाण्याप्रमाणे स्पष्ट जाणवत होता. त्याचा आवाजही येत असल्याचा क्षणिक भास झाला. काही सेकंदांच्या त्या चमत्कारीक अनुभवाने परतीचा रस्ता पार गहनगूढ बनून गेला. हीच त्याची शेवटची भेट. इन मिन भेटीतली तिसरी!

मागच्या काही उधारी त्याने तीस वर्षात तुकड्या तुकड्याने वेदनेच्या स्वरुपात फेडून टाकल्या असाव्यात. दयामरण त्याला लाभले नाही. अर्थात, पूर्ण वसूली झाल्याशिवाय हे हिशोब ठेवणारा त्याला जाऊ देत नाही म्हणा! दया नक्की कुणी करायची ही सूक्ष्म शंका राहतेच. परमेश्वराने माणसावर, माणसांनी तडफडणार्‍या सोयर्‍यावर की दोन जगाच्या सीमारेषेवर उभ्या जीवाने, त्या वेठीला धरलेल्या परमेश्वरावर?

28 comments:

हेरंब said...

अप्रतिम.. !!!

आनंद पत्रे said...

"दया नक्की कुणी करायची ही सूक्ष्म शंका राहतेच. परमेश्वराने माणसावर, माणसांनी तडफडणार्‍या सोयर्‍यावर की दोन जगाच्या सीमारेषेवर उभ्या जीवाने, त्या वेठीला धरलेल्या परमेश्वरावर? "

खरंय...अप्रतिम लिहिले आहे...

मीनल said...

हेरंब, आनंद

विचार करु तितका हा विषय गोंधळवून टाकणारा आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

Pankaj - भटकंती Unlimited said...

निःशब्द केलंस बघ.

अपर्णा said...

काय लिहु?? खरंच निःशब्द केलंस...

भानस said...

मीनल,वाट्याचे भोग सोसल्याशिवाय सुटका नाही हेच खरे.सोसवत नाही आणि पाहवत नाही. कोणी कोणावर दया करायची हा प्रश्न आहेच.न सुटणारे-झेपणारे आहे सारे.

संवेदना said...

:(

मीनल said...

पंकज, अपर्णा, भानस, संवेदना धन्यवाद..

तुम्ही म्हणता ते खरं आहे. वाट्याचे भोग सोसल्याशिवाय सुटका नसावी. काही कारण नसताना सरळमार्गी माणसे विचित्र कोंडीत पकडली जातात, हतबल होतात. आणि याबाबतीत भारतीय मने एवढी प्रॅक्टीकल झाली नाहीत. (मात्र स्त्री भ्रूण हत्येबाबतीत ती कमालीची निर्दयी आहेत.)

davbindu said...

खरच काही प्रतिक्रिया देण्या पलिकडच पोस्ट आहे हे...

मीनल said...

Thank you Devendra.

Rahul........ said...

Aprateem!!!

Rahul........ said...

Sundar lihil aahes!!! He sagal Bhavane chya palikadal aahe!!!

Anonymous said...

"डोहवाटा"
naav chhan aahe. what does that mean?

मीनल said...

Thank you Rahul, Anonymous..

"डोहवाटा" may possess meaning as esoteric or tangled way..Difficult to choose.. difficult to understand.

yog said...

mast ahe .. as usual

मीनल said...

Thnak you Yog,

mahina 28 sampayachya aat post takli aahe. :)

shillpa said...

touching.....i dont know but...why the death of a young person touches u more...and if thats of a very smart,handsome face kills u...why..i wonder..?

मनमौजी said...

"दया नक्की कुणी करायची ही सूक्ष्म शंका राहतेच. परमेश्वराने माणसावर, माणसांनी तडफडणार्‍या सोयर्‍यावर की दोन जगाच्या सीमारेषेवर उभ्या जीवाने, त्या वेठीला धरलेल्या परमेश्वरावर? ". . . खरं आहे...निःशब्द!!!!

मीनल said...

@shilpi,
तरुण व्यक्तीचा मृत्यू ज्यास्त चटका लावतो का, ते माहीत नाही. ज्या परिस्थितीत एखादी व्यक्ती जगाचा निरोप घेते ती वेळ अस्वस्थ करते. माझ्यापुरतं बोलायच तर,अश्या प्रसंगी जन्म-मृत्यूशी निगडीत असंख्य प्रश्न पुन्हा डोके वर काढतात.सविस्तर बोलूच.

@मनमौजी,
धन्यवाद, अशा बर्‍याच सूक्ष्म शंका आहेत. पुढेही चर्चा करुच!

yog said...

mahina 28 sampayachya aat post takli aahe. :)

oops.. lets now 'March'ing for April, 'May' there June raining come or not!

Anonymous said...

Is it blood transfusion or dialysis?

shinu said...

मीनल


अपर्णाच्या ्ब्लॉगवरून इथे आले.खुपच ट्ची झालाय लेख

मीनल said...

शिनू,
स्वागत आणि धन्यवाद. तशी,अपर्णा चांगली कनेक्टर आहे. भरपूर लिंक्स देते. :)

अपर्णा said...

तशी म्हणजे कशी??? मागे शिनुच्या ब्लॉगवर हेरंबला पाठवलेय...हो तशी मी चांगली कनेक्टर आहे...:) आता तुम्ही दोघी माझ्या ब्लॉगवर कुणाला पाठवताय???

आर्यन केळकर said...

काय लिहावे कळत नाहिये पण माझ्या काकांना डायलिसिस कराव लागत आठवड्यातुन दोनदा, त्यांच्या हाताला पण मी जेव्हा हात लावुन पाहिला तेव्हा तो प्रवाहाचा आवाज, फिल अजुनही तस्साच्या तस्सा आठवतो मला. खुप वेदनादायी असणार हे सगळं.
सोनाली केळकर

मीनल said...

सोनाली,
हे वेदनादायी तर आहेच, पण तुमच्या काकांना लवकर बरे वाटो..

रोहन चौधरी ... said...

कसले लिहिले आहेस तू.... झोपायला जात होतो ती झोप गेली... आता अजून पोस्ट्स वाचायला लागणार... :)

मीनल said...

ब्लॉगवर स्वागत रोहन, आणि प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!