Sunday, March 7, 2010

त्या..

त्या दोघी बाहिणीत काय बिनसलं होत कोण जाणे! बोलणं अजिबात बंद नसलं तरी तुरळक शब्दांपलीकडे संवाद असा व्हायचाच नाही. अगदी परवापर्यंत दोघींच्या दबक्या कधी तार स्वरातल्या हसण्याला त्यांची आई वैतागून गेली होती. निवांत वेळेत काय काय करायचे याची भली मोठी यादी तयार होती तिच्याकडे. पण मुलींचा दंगा नसल्यामुळे आपल्याला इतके चुकचुकल्यासारखे वाटेल याचे तिला आश्चर्य वाटले. तीन जणांच्या कुटुंबात दोघांचे बोलणे बंद म्हणजे घर सामसूमच! पण यावेळी तिने दोघींच्या मधे न पडण्याचे ठरवले.

दुपारी शाळेत जाण्यासाठी मैत्रिणीने हाक मारली तसा मोठ्या मुलीच्या मनात विचार चमकून गेला, पुढच्या वर्षी धाकटीची पण शाळा सकाळ ऎवजी दुपारची होईल. मग फक्त मैत्रिणींबरोबर गंमत करत जाता येणार नाही. हिच्याकडे पण लक्ष द्यावे लागेल. पण मी हिला का सांभाळत नेऊ? मी इतके दिवस नियमीत पाणी घालून छान वाढवलेल्या गुलाबाच्या रोपाला पहिले फूल आले तर कुणाला दाखवायच्या आत हिने तोडले? आणि माझा नविन ड्रेसही परवा खराब केला. मीच का दरवेळी तिला सांभाळायचं? जाऊ देत..

" अगं, हातावर कसले हे ओरखडे? कुठे गेली होतीस एवढ्या दुपारी? "

" कुठे नाही गं आई, ते माझं गुपित आहे "

" जखमांमधे कसलं आलंय गुपित? आणि तुमचं काय चाललयं काय सध्या? इकडे तिकडे खेळत बसण्यापेक्षा अभ्यास वाढवलास तर बरं होईल. पुढच्या वर्षी ताईबरोबर जाणार ना तू? "

" हो तर.. पण मला बरोबर नेईल की नाही कुणास ठाऊक! रागवली आहे माझ्यावर.. "

ही दुपार जशी सरसरत गेली, तशा पुढच्या पाच दुपारवेळा हजेरी लावून गेल्या. आता आठवडा अखेर! मग काय, दिवसभरच सुट्टी.

’ही छोटी काय करत असते दरवेळी? नेहमी प्रमाणे मला मस्का मारायलाही नाही आली? यावेळी काही बोलेल तेव्हा सांगतेच.. आई पण म्हणाली, ती दुपारी कोठे जाते जरा लक्ष ठेव. पण मला काय अडलयं? मला आत्ता जायचयं तयारीला..’ असे म्हणून मोठी बहीण मैत्रिणीकडे जायला बाहेर पडली. त्यांच्या शाळेत भरणार्‍या कलाप्रदर्शनाची तयारी करायची होती ना!

दुपार सरता सरता ती परत आली, तशी बाहेरच्या पायरीवरच बसलेली छोटी तिला दिसली. तशीच.. विस्कटलेले केस, दमलेली, हात मळलेले, ओरखड्याचे.. आँ, ओरखडे? काय कुठे मारामारी करुन आली की काय? की हिलाच कोणी दमदाटी केली? विचारु का तिला? की काय करु? नकोच.. ही आज सरळ माझ्या डोळ्यात पहाते आहे? आशेने? आनंदाने? काय माहीत.. विचित्रच आहे.

ती छोटा जिना चढून वर आली. वरच्या दोघींच्या खोलीत बदलेलं असं काही नव्हतं, स्वच्छ पलंग, खिडक्यांवर झुळझुळणारे निळे पडदे, दोन दप्तरं, अभ्यासाचे टेबल, आणि हे हे काय आहे टेबलावर? तिने उत्सुकतेने तिकडे पाहिलं, तिथे एका शिसवी लाकडात कोरलेलं थोडसं ओबडधोबड पण सुंदर गुलाबाच फूल होतं. जवळच वहीच्या फाडलेल्या कागदावर पेन्सिलीने लिहलेली एक छोटीशी चिठ्ठी होती. चिठ्ठी वाचताना तिचे डोळे आनंदाने आणि आठवडी अबोला संपल्याच्या जाणिवेने भरुन आले. चिठ्ठीतली अक्षरे होती,

’ ताई, तुझं फूल मला फारचं आवडलेल होत म्हणून मी तोडलं. सॉरी. पलिकडच्या रस्त्यावरच्या टेबल खुर्चीवाल्या काकांनी मला रोज दुपारी हे फूल करायला शिकवलं. ते तू तुझ्या कलाप्रदर्शनातही ठेवू शकतेस. मला पुढच्या वर्षी शाळेत तुझ्याबरोबर दुपारी नेशील नां?’*************************************************************************

बुध्दीमत्ता, नैतिकता, भावनाशिलता, धैर्य, परोपकारी वृत्ती, कार्यशिलता, कोमलता या रुपाने आसपास वावरणार्‍या, या गोष्टींशी परिचय करुन देणार्‍या, अनोळखी, ओळखीच्या सर्व स्त्रियांना ’महिला दिनाच्या’ हार्दीक शुभेच्छा..!

14 comments:

हेरंब said...

अप्रतिम. सुंदरच..

अपर्णा said...

छान आहे गं ही दोन बहिणींची गोष्ट...

’महिला दिनाच्या’ हार्दीक शुभेच्छा

मीनल said...

धन्यवाद हेरंब, चिकन सूप फॉर वूमन्स सोलच्या संकल्पनेला कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे म्हटंलेस तरी चालेल.. :)

मीनल said...

अपर्णा, तुलाही अनेक शुभेच्छा..

मनमौजी said...

मस्त!!! छान लिहलय!!

’महिला दिनाच्या’ हार्दीक शुभेच्छा

Sheetal said...

Happy women's day.

मीनल said...

धन्यवाद मनमौजी, तुम्हालाही शुभेच्छा.. (महिलादिनाच्या नव्हे.. :))

मीनल said...

Thank you Sheetal,
Happy women's day..!

आनंद पत्रे said...

अतिशय सुंदर...तुम्हाला महिलादिनाच्या शुभेच्छा!!

मीनल said...

धन्यवाद आनंद, तुम्हालाही शुभेच्छा..

Ajay Sonawane said...

shubhecha...barach ushira jhala khara ...pan thik e :-)

मीनल said...

Thank you Ajay.
Ha mahina sampeparyant validity aahe. :)

आर्यन केळकर said...

खुपच सुंदर.
मलाही लहान बहिण आहे त्यामुळे लहनपणीच्या सगळ्या गोष्टी आठवल्या पोस्ट वाचताना.
सोनाली केळकर

मीनल said...

धन्यवाद सोनाली.