Thursday, April 22, 2010

जंगलातली गोष्ट

एका मराठीब्लॉगविश्व नावाच्या जंगलात सगळे प्राणी सुखासमाधानाने रहात होते. आपापल्या पोस्ट पब्लिश करत होते, हिट काउंटर वाढवत होते. काही बरे वाचायला मिळाल्यास वाचक प्राणी लेखक प्राण्यांना प्रतिक्रियाही देत. काही आळशी प्राणी पोस्ट लिहण्यास टाळाटाळ करीत. तेव्हा त्यांचे इतर मित्र त्यांना प्रेमाने दमदाटीही करीत. सारे आनंदाने चालले होते. हे जंगल थोडे वेगळे होते. इथे सिंह हा राजा मानला जात नव्हता, उंदीर दुबळा मानला जात नव्हता. एक सत्ता नसून सारे जंगलराज्य लेखन गुणवत्तेवर चाले. एके दिवशी एका वाघाला दुसर्‍या वाघाची पोस्ट तिसर्‍याच्या पिशवित दिसली. त्याला नवल वाटले. दुसर्‍या वेळेला तर त्याला स्वतःचीच पोस्ट त्याच्या पिशवित दिसली. त्याबद्द्ल त्या प्राण्याला हटकले असता त्याने सरळ कानावर हात ठेवले. मग मात्र पहिल्या वाघाने ठरवले की याची शहानिशा करायची आणि त्याने स्वतंत्र ब्लॉग सुरु केला. बर्‍याच प्राण्यानी त्याला चांगला प्रतिसाद दिला. ’पोलिस वाघ’ म्हटले पण दुसर्‍या बाजूचे प्राणीही होते, त्यांचही काही म्हणण होत. आता काय करायचे? दुसर्‍या कमजोर गटात एक ’ जातीय फूट पाडा आणि हरवा ’ संकल्पनेवर विश्वास असणारा प्राणी होता. त्याने सरळ त्या ब्लॉगच्या प्रतिक्रियेमध्ये तू वाघ आहेस, तुझेच राज्य का असावे? तू स्वतःला कोण समजतोस? असली काही वाक्ये लिहली. खरं म्हणजे त्या जंगलाची एकच जात होती ती म्हणजे ’मराठी’. त्या एकात्मतेचा भंग केल्यामुळे वाघाला आणि इतर प्राण्यांना काही काळ वाईट वाटले. पण अशा फुसक्या वल्गनेला अजिबात दाद न देता, त्याने आपले काम सुरु ठेवले. सर्व प्राण्यांनी Kill by ignarance हा पर्याय अवलंबला आणि पुन्हा एकदा सर्वजण आपल्या पोस्ट सुखाने (स्वतःच्या नावाने) खरडू लागले.

तात्पर्य :-  बुध्दीमत्ता आणि प्रतिभा ही जात पाहून येत किंवा जात नाही. एक तर ती असते, किंवा नसते. म्हणून अशा गोष्टी उकरुन कोणी जंगलातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे.


संदर्भ-  http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_18.html

Saturday, April 3, 2010

आठवण घटिका

पाच मिनीटे पाच मिनीटे करत चांगली वीस पंचवीस मिनीटांपर्यंत लांबवलेली आणखी थोडी झोप, कामाची, पुढच्या दिवसाची तयारी यात बरेचदा सकाळ कधी वाहून जाते कळतच नाही. माझ्या लक्षात राहीलेली ती सकाळ म्हणजे घरच्याच एका लग्नसराईतली आहे. गच्च थंडीतले दिवस.. चार दिवसांवर आलेल्या लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांनी घर भरुन गेलेले. सहा वाजता स्वयंपाकघरातून पहिल्यांदा दबक्या आणि नंतर खळखळून हसण्याच्या आवाजाने जाग आली. घरच्या स्त्रियांचा चहाचा पहीला राऊंड चालला होता. मस्त धुके पडले होते. अंगणातल्या सडा रांगोळीने मांडव खुलला होता पण असल्या थंडीत बाहेर उभी रहायची सोय नव्हती. तशीच गार पावलांनी मागे फ़िरले. मांजरीसारखं उबेसाठी आईला खेटून परत झोपण्याच्या प्रयत्नात केला पण ’अग उठ उठ.. आंघोळ आटप. नंतर बाथरुम रिकाम्या रहायच्या नाहीत’ म्हणत ती कामाच्या रगाड्यात परत फिरलीसुध्दा!

" अक्का, निपाणीकरचा चिवडा बघ, फार तेलकट झालाय काय? " (तो नेहमी तेलकटच चिवडा करतो हे माहीत असूनही त्याच्याकडेच कंत्राट द्यायचा अट्टाहास का हे कळाले नाहीये अजून.)

" नाही गं, चांगला आहे की, दही घालून बघं..जाणवत पण नाही! "
(सकाळी सहा वाजता तेलकट चिवडा आणि दही वगैरे घालून त्याचे केलेले अद्भुत रुपांतर खाणारी मंडळी आहेत तर!)

" हे हे, म्हणजे सगळ्या वर्‍हाडाला चिवड्याबरोबर दह्याचे कुंडे पण द्यायला हवेत.. " (पण सगळीच लोकं असलं, रुपांतर पचवतात हे यांनी गृहीत धरलं कसं?)

थंडीत वेढलेल्या अश्या फुटकळ गप्पांतून दोन तास भुरुभुरु उडाले. मस्त वाटतं ना, आजूबाजूला अशा उगाचच गप्पा, उकळत्या चहाचा वास, धुरकटलेली थंडी, दुलईत गुरफटलेले, परत झोपायच्या प्रयत्नात आपण!

मग दुसर्‍या फेजमध्ये उठणारी माणसे हळूहळू जमू लागली. पूजेच्या फुलांचा वास घमघमला. फोडणीच्या पोह्यांचा आणि उकळत्या चहाचा मिश्र वास अंगणापर्यंत पोहोचला असावा कारण बाहेर पहुडलेल्या रामाने आत डोकावून अंदाज घ्यायला सुरवात केली होती. " त्याचा आत्मा आधी शांत कर बाई!" म्हणून कुणीतरी पोह्याची डिश आणि चहा त्याला देण्यासाठी हातात ठेवली.
नऊ वाजले तरी धुक्याचा विरळ पदर दिसतच होता. चेहरा सोडून संपूर्ण पांढर्‍या रंगाचं साम्राज्य वागवणारा रामा पुढे झाला. "वाईच झाडून घेतु आगोदर मंग च्या घेतो. ठेवा! "
तो असं काहीएक करणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे. " ए चल ना, गंमत चालली आहे वर " असं म्हणत, ड्रेसचे टोक ओढत एका चिमण्या हाताने वरच्या माडीवर नेले. तीन गट पाडून मला सर्वात कमजोर गटात घालून खेळ सुरु झालासुध्दा! मस्त फ्रेश होती ती सकाळ!

आठवणीतल्या दुपार (अनेकवचन काय?) बर्‍याच आहेत आणि बहुदा मे महिन्यातल्याच आहेत. वार्षिक परीक्षा संपलेली दुपार, पत्त्याचा डाव उधळलेली दुपार, उन्हात नारळीच्या झावळ्यांनी छोटे घर बांधलेली आणि त्याला ’मीनिगौ’ असे विचित्र नाव (स्थापत्यकारांचे आद्याक्षर) देवून कॄतकृत्य झालेली दुपार! मोठ्या पातेल्यात रसना ढवळत बसलेली आमची चौकडी, तयार केलेलं रसायन चवीपुरतं म्हणून घेत असता निम्म्या झालेल्या पातेल्यात डोकावून बघणारी दुपार.

’अरे ए, भरं उन्हाचं बाहेर खेळू नका’ म्हणून ओरडून घेतल्यावर मागच्या खोलीत जमवलेली एक बैठक!

" एका भविष्यकाराने सांगितलयं, भारतातला ’क’ अक्षराने नाव सुरु होणारा माणूस जगावर राज्य करणार! "

" कुणाला सांगितलयं? "

" म्हंजे लिहून ठेवलयं! तो माणूस कोणीही असू शकतो, किरण काका सुध्दा असू शकतो.. कारण त्या माणसाचा जन्म झालाय! "

" कॄष्णा मामा? (वय ७१) "

" अम्मं..काही सांगता येत नाही. ते नसतील बहुतेक, त्यांना निट लढता यायच नाही. "

" क म्हणजे कोल्हापूरातला असेल का? "

" ए, नाव ’क’ ने सुरु होणारं, गाव नाही काई.. "

" हो? मग असं झाल तर आपण राज्य करणार? "

असल्या कितीतरी तत्सम चर्चा आ वासून ऎकणारी दुपार! आंब्याच्या अढीमध्ये बसून कुचके आंबे वेचणारी, हापूस पेक्षा गोटी आंब्याला प्राधान्य देणारी गोड दुपार! चांदोबात मिळतो तसा आपल्या घराच्या मागच्या अंगणातही खजिना मिळेल म्हणून बाग खणून काढणारी दमवणारी दुपार! ’त्यावेळी खोदकाम करताना गाडून टाकलेली फुटलेली महादेवाची पिंड सोमवारीच मिळाली यांमागे नक्कीच काहीतरी अर्थ असावा’ या गंभिर चर्चेत सहभागी झालेली दुपार! आजीच्या आंबटगोड पन्ह्याने थंडावलेली सुस्त दुपार! अनेक मे महिन्यातल्या या दुपारी का कुणास ठाऊक एकसंध अशा एकच वाटतात.

आठवणीतल्या रात्रीवर आजोळचा शिक्कामोर्तब आहे. घरापेक्षाही मोठ्ठ्या असलेल्या अंगणात नक्की कधी झोप यायची कळायचंच नाही. उन्हाळा असला तरी, सारवलेल्या अंगणात आजूबाजूच्या पपई, चिकू, पेरू मधून फ़िरणारा गारवा शोषला गेलेला असायचा. त्यावर टाकलेल्या पिवळ्या जोड चटयांवर वर एकेक एकेक मातुलाप्तेष्ट खडीसाखर, बडिशेप चघळत यायचे. आम्ही आधिच जागा पटकावलेल्या असायच्या. एक पंजाबी ढाब्यावर दिसते तशी अक्षरशः खाट्खाट् करणारी खाटही होती. गुढगेदुखीवाले मेंबर उच्चस्थानावर बसायचे. चंद्राच्या दुधी प्रकाशात आजोबांचे केस ज्यास्तच पांढरे होवून चमकायचे. गडद काळ्या आभाळात चांदण्यांच्या खैरातीवर नजर ठरत नसे. उंच इमारतींचा कुठेच अडसर नसल्याने दूरपर्यंत ती चांदणखडी चमचमताना दिसायची. यात एकच डोकेदुखी होती. ’हे जाणून घ्या’ या सदराखाली पेपर मधे काहीतरी चंद्र तार्‍यांविषयी येते ना, तसले स्तंभ वाचून खगोलशास्त्रात रुची निर्माण झालेल्या मामाची प्रश्नावली.

" काल तुला दाखवलेली व्याधाची चांदणी शोधून दाखव.. "

" ती? "

" छ्या, ती तर.. अं.. माहित नाही नाव त्याचे, पण ती नव्हे. सप्तर्षी तरी दाखव.. "

" हा चार तार्‍यांचा चौकोन, आणि ती तिन तार्‍यांची शेपटी. "

" तिकडे कुठे शेपटी? इकडे, विरुध्द बाजूला. काय तू पण! त्यातला दोन नंबरचा तारा आहे ना, त्याच्या बरोब्बर खाली अगदी छॊटी चांदणी आहे दिसली? "

" कुठे? "

" ती दिसली तर तुमचे डोळे चांगले आहेत. "

" दिसली. दिसली! "

आजतागायत मला सप्तर्षींची शेपटी अचूक ओळखता येत नाही. त्या दोन नंबर तार्‍याच्या आश्रयाला राहणार्‍या चांदणीच्या अस्तित्वाची पण शंकाच आहे. पण उगाच तुझे डोळे खराब आहेत असे कशाला ऎकून घ्या? मंगळ ओळखणे मात्र काहीच अवघड नाही. लालसर तेजोहीन तारा! (ग्रह म्हणायला बोजड वाटतं, अज्ञानाविषयी ग्रह करुन घेऊ नये.) चांदण्यांनी कसं, अस्ताव्यस्त पसरलेलंच असावं, या पंथातले आम्ही! तीन दिवसांनी हा तारा इथे येतो, तो तिकडे जातो. कशाला लक्षात ठेवा?

खाटेवर बौध्द तत्वाच्या, चाणक्यनितीच्या, साहित्यसंमेलनाच्या वेगवेगळ्या गप्पा व्हायच्या. आम्हाला सगळेच कळायचे असे नाही, पण ते अवघड शब्द ऎकत तारांकीत घुमट बघता बघता छान झोप चढायची.

आजही रात्रीचे बर्‍यापैकी मोकळे आकाश दृष्टीस पडले की, नजर भिरभिरत सप्तर्षींची दिशा शोधते. दुसर्‍या तार्‍याचा आश्रित अजूनही गायबच आहे.