Saturday, April 3, 2010

आठवण घटिका

पाच मिनीटे पाच मिनीटे करत चांगली वीस पंचवीस मिनीटांपर्यंत लांबवलेली आणखी थोडी झोप, कामाची, पुढच्या दिवसाची तयारी यात बरेचदा सकाळ कधी वाहून जाते कळतच नाही. माझ्या लक्षात राहीलेली ती सकाळ म्हणजे घरच्याच एका लग्नसराईतली आहे. गच्च थंडीतले दिवस.. चार दिवसांवर आलेल्या लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांनी घर भरुन गेलेले. सहा वाजता स्वयंपाकघरातून पहिल्यांदा दबक्या आणि नंतर खळखळून हसण्याच्या आवाजाने जाग आली. घरच्या स्त्रियांचा चहाचा पहीला राऊंड चालला होता. मस्त धुके पडले होते. अंगणातल्या सडा रांगोळीने मांडव खुलला होता पण असल्या थंडीत बाहेर उभी रहायची सोय नव्हती. तशीच गार पावलांनी मागे फ़िरले. मांजरीसारखं उबेसाठी आईला खेटून परत झोपण्याच्या प्रयत्नात केला पण ’अग उठ उठ.. आंघोळ आटप. नंतर बाथरुम रिकाम्या रहायच्या नाहीत’ म्हणत ती कामाच्या रगाड्यात परत फिरलीसुध्दा!

" अक्का, निपाणीकरचा चिवडा बघ, फार तेलकट झालाय काय? " (तो नेहमी तेलकटच चिवडा करतो हे माहीत असूनही त्याच्याकडेच कंत्राट द्यायचा अट्टाहास का हे कळाले नाहीये अजून.)

" नाही गं, चांगला आहे की, दही घालून बघं..जाणवत पण नाही! "
(सकाळी सहा वाजता तेलकट चिवडा आणि दही वगैरे घालून त्याचे केलेले अद्भुत रुपांतर खाणारी मंडळी आहेत तर!)

" हे हे, म्हणजे सगळ्या वर्‍हाडाला चिवड्याबरोबर दह्याचे कुंडे पण द्यायला हवेत.. " (पण सगळीच लोकं असलं, रुपांतर पचवतात हे यांनी गृहीत धरलं कसं?)

थंडीत वेढलेल्या अश्या फुटकळ गप्पांतून दोन तास भुरुभुरु उडाले. मस्त वाटतं ना, आजूबाजूला अशा उगाचच गप्पा, उकळत्या चहाचा वास, धुरकटलेली थंडी, दुलईत गुरफटलेले, परत झोपायच्या प्रयत्नात आपण!

मग दुसर्‍या फेजमध्ये उठणारी माणसे हळूहळू जमू लागली. पूजेच्या फुलांचा वास घमघमला. फोडणीच्या पोह्यांचा आणि उकळत्या चहाचा मिश्र वास अंगणापर्यंत पोहोचला असावा कारण बाहेर पहुडलेल्या रामाने आत डोकावून अंदाज घ्यायला सुरवात केली होती. " त्याचा आत्मा आधी शांत कर बाई!" म्हणून कुणीतरी पोह्याची डिश आणि चहा त्याला देण्यासाठी हातात ठेवली.
नऊ वाजले तरी धुक्याचा विरळ पदर दिसतच होता. चेहरा सोडून संपूर्ण पांढर्‍या रंगाचं साम्राज्य वागवणारा रामा पुढे झाला. "वाईच झाडून घेतु आगोदर मंग च्या घेतो. ठेवा! "
तो असं काहीएक करणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे. " ए चल ना, गंमत चालली आहे वर " असं म्हणत, ड्रेसचे टोक ओढत एका चिमण्या हाताने वरच्या माडीवर नेले. तीन गट पाडून मला सर्वात कमजोर गटात घालून खेळ सुरु झालासुध्दा! मस्त फ्रेश होती ती सकाळ!

आठवणीतल्या दुपार (अनेकवचन काय?) बर्‍याच आहेत आणि बहुदा मे महिन्यातल्याच आहेत. वार्षिक परीक्षा संपलेली दुपार, पत्त्याचा डाव उधळलेली दुपार, उन्हात नारळीच्या झावळ्यांनी छोटे घर बांधलेली आणि त्याला ’मीनिगौ’ असे विचित्र नाव (स्थापत्यकारांचे आद्याक्षर) देवून कॄतकृत्य झालेली दुपार! मोठ्या पातेल्यात रसना ढवळत बसलेली आमची चौकडी, तयार केलेलं रसायन चवीपुरतं म्हणून घेत असता निम्म्या झालेल्या पातेल्यात डोकावून बघणारी दुपार.

’अरे ए, भरं उन्हाचं बाहेर खेळू नका’ म्हणून ओरडून घेतल्यावर मागच्या खोलीत जमवलेली एक बैठक!

" एका भविष्यकाराने सांगितलयं, भारतातला ’क’ अक्षराने नाव सुरु होणारा माणूस जगावर राज्य करणार! "

" कुणाला सांगितलयं? "

" म्हंजे लिहून ठेवलयं! तो माणूस कोणीही असू शकतो, किरण काका सुध्दा असू शकतो.. कारण त्या माणसाचा जन्म झालाय! "

" कॄष्णा मामा? (वय ७१) "

" अम्मं..काही सांगता येत नाही. ते नसतील बहुतेक, त्यांना निट लढता यायच नाही. "

" क म्हणजे कोल्हापूरातला असेल का? "

" ए, नाव ’क’ ने सुरु होणारं, गाव नाही काई.. "

" हो? मग असं झाल तर आपण राज्य करणार? "

असल्या कितीतरी तत्सम चर्चा आ वासून ऎकणारी दुपार! आंब्याच्या अढीमध्ये बसून कुचके आंबे वेचणारी, हापूस पेक्षा गोटी आंब्याला प्राधान्य देणारी गोड दुपार! चांदोबात मिळतो तसा आपल्या घराच्या मागच्या अंगणातही खजिना मिळेल म्हणून बाग खणून काढणारी दमवणारी दुपार! ’त्यावेळी खोदकाम करताना गाडून टाकलेली फुटलेली महादेवाची पिंड सोमवारीच मिळाली यांमागे नक्कीच काहीतरी अर्थ असावा’ या गंभिर चर्चेत सहभागी झालेली दुपार! आजीच्या आंबटगोड पन्ह्याने थंडावलेली सुस्त दुपार! अनेक मे महिन्यातल्या या दुपारी का कुणास ठाऊक एकसंध अशा एकच वाटतात.

आठवणीतल्या रात्रीवर आजोळचा शिक्कामोर्तब आहे. घरापेक्षाही मोठ्ठ्या असलेल्या अंगणात नक्की कधी झोप यायची कळायचंच नाही. उन्हाळा असला तरी, सारवलेल्या अंगणात आजूबाजूच्या पपई, चिकू, पेरू मधून फ़िरणारा गारवा शोषला गेलेला असायचा. त्यावर टाकलेल्या पिवळ्या जोड चटयांवर वर एकेक एकेक मातुलाप्तेष्ट खडीसाखर, बडिशेप चघळत यायचे. आम्ही आधिच जागा पटकावलेल्या असायच्या. एक पंजाबी ढाब्यावर दिसते तशी अक्षरशः खाट्खाट् करणारी खाटही होती. गुढगेदुखीवाले मेंबर उच्चस्थानावर बसायचे. चंद्राच्या दुधी प्रकाशात आजोबांचे केस ज्यास्तच पांढरे होवून चमकायचे. गडद काळ्या आभाळात चांदण्यांच्या खैरातीवर नजर ठरत नसे. उंच इमारतींचा कुठेच अडसर नसल्याने दूरपर्यंत ती चांदणखडी चमचमताना दिसायची. यात एकच डोकेदुखी होती. ’हे जाणून घ्या’ या सदराखाली पेपर मधे काहीतरी चंद्र तार्‍यांविषयी येते ना, तसले स्तंभ वाचून खगोलशास्त्रात रुची निर्माण झालेल्या मामाची प्रश्नावली.

" काल तुला दाखवलेली व्याधाची चांदणी शोधून दाखव.. "

" ती? "

" छ्या, ती तर.. अं.. माहित नाही नाव त्याचे, पण ती नव्हे. सप्तर्षी तरी दाखव.. "

" हा चार तार्‍यांचा चौकोन, आणि ती तिन तार्‍यांची शेपटी. "

" तिकडे कुठे शेपटी? इकडे, विरुध्द बाजूला. काय तू पण! त्यातला दोन नंबरचा तारा आहे ना, त्याच्या बरोब्बर खाली अगदी छॊटी चांदणी आहे दिसली? "

" कुठे? "

" ती दिसली तर तुमचे डोळे चांगले आहेत. "

" दिसली. दिसली! "

आजतागायत मला सप्तर्षींची शेपटी अचूक ओळखता येत नाही. त्या दोन नंबर तार्‍याच्या आश्रयाला राहणार्‍या चांदणीच्या अस्तित्वाची पण शंकाच आहे. पण उगाच तुझे डोळे खराब आहेत असे कशाला ऎकून घ्या? मंगळ ओळखणे मात्र काहीच अवघड नाही. लालसर तेजोहीन तारा! (ग्रह म्हणायला बोजड वाटतं, अज्ञानाविषयी ग्रह करुन घेऊ नये.) चांदण्यांनी कसं, अस्ताव्यस्त पसरलेलंच असावं, या पंथातले आम्ही! तीन दिवसांनी हा तारा इथे येतो, तो तिकडे जातो. कशाला लक्षात ठेवा?

खाटेवर बौध्द तत्वाच्या, चाणक्यनितीच्या, साहित्यसंमेलनाच्या वेगवेगळ्या गप्पा व्हायच्या. आम्हाला सगळेच कळायचे असे नाही, पण ते अवघड शब्द ऎकत तारांकीत घुमट बघता बघता छान झोप चढायची.

आजही रात्रीचे बर्‍यापैकी मोकळे आकाश दृष्टीस पडले की, नजर भिरभिरत सप्तर्षींची दिशा शोधते. दुसर्‍या तार्‍याचा आश्रित अजूनही गायबच आहे.

44 comments:

Ajay Sonawane said...

इतकं छान लिहलं आहेस की डोळ्यापुढे चित्रच उभं राहिलं.

-अजय

मीनल said...

धन्यवाद अजय,
फारा दिवसांनी येणे केलेत!

yog said...

kharch... chitra ubhe rahatey..

kiti goshti mandalyat ithe...
ek se badh ke ek..
Great nostalgic post!

मीनल said...

Thanks Yog,

unhala suru zala ki pariksheche aani suttiche diwas aathawatatach.

हेरंब said...

सासोसु.. साधं सोपं सुटसुटीत. !! मस्त झालीये पोस्ट.

Disclaimer : त्या अद्भूत रुपांतरवाल्या मंडळीत मीही आहे. मी आयुष्यभर चिवडा हा फक्त दही घालूनच खाल्लेला आहे. :-)

अपर्णा said...

मस्तच लिहिलंस गं...एकाच बॅचमधल्या आपल्या दुपारी असाव्यात असं....

मीनल said...

हेरंब,

खूखूआ, खूप खूप आभार.!
ते रुपांतर तसे बरे लागते, पण सकाळी सहा वाजता?
अर्थात, मिश्रण कसे खावे ही वैयक्तीक आवड आहे. एकाला चहात मसालेभात घालून (आवडीने)खाताना मी पाहिले आहे. :)

मीनल said...

अपर्णा,

हो गं, मला वाटलंच लिहताना, सत्तर टक्के मुलांच्या उन्हाळ्याच्या दुपारी (हे अनेकवचन बरोबर वाटतयं) थोड्याफार अशाच असाव्यात. एकच वेगळी अशी नाही आठवत, पण आख्खी सुट्टी मात्र आठवते.

shardul said...

मस्त आहे. मजा आली वाचायला.. :)

भानस said...

मीनल, आठवण घटिका खूपच आवडले. खरेच लग्नसराई म्हणजे काय काय घडत असते गं.... चिवडा दह्यात घालून खरे तर छान लागतो पण भल्या पहाटे....म्हणजे जर... हा हा.. पोस्ट एकदम सहीच गं...

मनमौजी said...

मस्त झाली आहे पोस्ट!!! एकदम साधं पण खूप भावणारं लिहलय!!!

मीनल said...

प्रतिक्रियेबद्द्ल आभार शार्दुल..

मीनल said...

भाग्यश्रीताई,

लग्नसराईची सकाळच नव्हे तर सगळा दिवस लिहून काढण्यासारखा असतो. हो नं?
दही चिवड्यासारखे दही चकली, तिखट शेव चिवडा दही मिक्स मस्त कॉम्बिनेशन आहे.

मीनल said...

मनमौजी,

खूखूआ, आपण मनापासून अनुभवलेलं, आवडलेलंच, सोप्या शब्दात मांडता येतं ज्यास्त विचार पण नाही करावा लागत. :)

मी अत्त्यानंद said...

छान लिहिलंय. :)

सागर said...

खुपच सुंदर लिहील आहे..मला लिहिण्याचो पद्धत आवडली..

मीनल said...

धन्यवाद देवकाका..! :)

मीनल said...

ब्लॉगवर स्वागत आणि आभार सागर..

Anonymous said...

बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि दही घातलेला चिवडा माझा फेवरेट. खरं म्हणजे चिवडा दही न घालता खायचा असतो ही कल्पनाच मला सहन होत नाही.

दही घालून चिवडा, तसेच फरसाण+ दही + कांदा+ चाट मसाला= अप्रतिम कॉम्बॊ. सोबत हवं तर थोडं चिंचेचं सॉस पण घेउ शकता..

अरे काय होतंय, की इथे पण खादाडीवर पोस्ट लिहायला लागलो .. पोस्ट मस्त झालंय .. अगदी साधं सुटसुटीत..

बाय द वे , तो मंगळ कधी सापडला कां? मला तर सप्तर्शी शिवाय काहीच सापडलं नाही आजपर्यंत.!!

मीनल said...

महेंद्र काका,

खादाडीवर कमेंट/पोस्ट करायला कधीही मुभा आहे. :)
इथे चिंचेचं सॉस मस्तच. हा पदार्थ भेळेचा भाऊ म्हणूनही चालेल.
मंगळ सापडतो हो, पण बाकीचे शिलेदार नाही ओळखता येत!

tanvi said...

खुपच छान लिहिलयेस गं....एकदम हुबेहूब....ए उन्हाचे बाहेर खेळू नका सांगणारा एक गृप आत घरात आणि ते रसनाचे अर्धे पातेले..तंतोतंत!!!! बाकि सप्तर्षी अपनेको सापडता है!! उन्हाळ्याच्या अनेक सुट्ट्या गच्चीत झोपल्यामुळे असेल कदाचित.. :)

पोस्ट एकदम मस्त झालयं पण!!!

मीनल said...

आभार तन्वी,

अपर्णाला सांगितले तसेच,उन्हाळ्याच्या दुपारी थोड्याफार सारख्याच असाव्यात. दंगा असा करा किंवा तसा, सारखाच! :)
तुझ्या शेवटच्या ओळींवरुन ते गाणे आठवले बघ, तारोंको देखतें रहें छतपर पडे हुए..

Sheetal said...

surmai sham ke bare me kya?

आनंद पत्रे said...

एकदम सही वर्णन! अजय म्हणाल्याप्रमाणे डोळ्यासमोर उभं राहिलं...
माझा मे सुद्धा असाच जायचा...

मीनल said...

शीतल,
अब्बी सुरमई शाम नही आयेली है।

मीनल said...

धन्यवाद आनंद,

तुमचा पण मे असाच जायचा? एकूण आपण सगळे सुट्टीत विशेष प्राविण्याचे क्लास न लावणारे, उनाड गटात मोडणारे दिसतो आहोत. :)

आनंद पत्रे said...

अहो/जाहो नको, एकेरी पळेल... :)

विशेष प्राविण्याचे क्लास त्यावेळी फक्त ज्यांत काही प्राविण्य नाही त्यांना लावायचे :)
आपल्या मध्ये इतर विशेष कला होत्याच ना ? :)

Rahul........ said...

Tumha sagalya lekhak lokan itaki chhan comment nahi lihita yet. Aapalya bhavana vyakt kartana, aapalyakadacha shabdancha satha khup kami padato he laxat yet. Aso. Vadatit aahe.

मीनल said...

@Anand
बरं झालं.. तुला पळेल तर मलाही उडेल..

>>विशेष प्राविण्याचे क्लास त्यावेळी फक्त ज्यांत काही प्राविण्य नाही त्यांना लावायचे :)

:))

मीनल said...

@Rahul

लेखक वगैरे काय? प्रतिक्रियेसाठी शब्दांचा साठा कुठे लागतो? ’:)’ एवढी कमेंटही (बोलकी)असते. आम्हा ब्लॉगवाल्यांना पोस्टची दखल घेतली गेली हेच खूप असतं.तुझ्या कमेंटच मोल इतर कुठल्याही कमेंट्पेक्षा कमी नाही.
Thanks a lot!

Satish said...

Chhan jamliye shabdanchi bhatti, bhasha agdi oghavati janu dhabdhaba, asech disamaji lihit jave! good luck

मीनल said...

प्रतिक्रियेबद्द्ल अनेक आभार..

सिद्धार्थ said...

मिनल, किती मस्त लिहलं आहेस. मला लहानपणीच्या अनेक दुपार (अनेकवचन Good Question!!!) संध्याकाळ आणि रात्री आठवल्या. आमच्या घरीपण मस्त अंगण होते सारवलेलं आणि रात्री तार्‍याबरोबर रत्नागिरीच्या दिपगृहाचा प्रकाशझोत देखील दिसायचा. त्या सगळ्या आठवणींनी नकळत हळव व्हायला झालं.

Anonymous said...

Khupach chan liheles! Tuza ha pailu mahit navhata kadhi. Rahul pan bolala nahi. Anyway wachun khup mast vatala!

-Deepak Navangule.

मीनल said...

सिध्दार्थ,
खरा असां.. सारवलेल्या अंगणाची मजाच वेगळी!आणि त्यात रत्नागिरीच्या दिपगृहाचा प्रकाश..विचार करुन पण छान वाटतयं..
आपण हयसर निस्त्या गजाल्या करुक जमलोयं.. तुमका पोष्ट बरां वाटला,हे वाचूक माका पण बरां वाटला.

मीनल said...

प्रतिक्रियेबद्द्ल आभार दिपक..

आर्यन केळकर said...

माझ सगळं बालपण कोकणातच गेले, त्यामुळे सगळे वर्णन अगदी डोळ्यासमोर उभे राहिले.
आणि चिवडा - दही कोम्बो मस्तच चकली, कडबोळ्याबरोबर पण दही खुप मस्त लागते.
सोनाली केळकर

मीनल said...

स्वागत सोनाली,
दही ओ +ve सारखे आहे.सगळ्यांबरोबर फ़िट होते..

Maithili said...

Khoop mast....!!!
Sagale chitr ubhe rahile dolya samor...aani specially sakal che varnan tar apratim...!!!
Aani dahi ghalun chivada..???
Mi tar kadhich try nahi kelay he...Aani konala karatana pan pahile nahiye tyamule jara odd ch watale mala...!!! :)

मीनल said...

स्वागत आणि आभार मैथिली..

पातळ पोह्याचा नव्हे, लग्नात करतात तो चिवडा आणि दही एकदा ट्राय करुनच पहा..
नाही आवडले तर इकडे पाठवून दे..!! :)

Vivek said...

मीनल

लग्नसराईतलं पाहुण्यांनी भरलेलं घर आता इतिहासजमा झाल्यासारखंच आहे.

मलाही उन्हाळ्यात उडाणटप्पूपणा करत घालवलेल्या दुपारी आठवणीत आहेत. आणि खरंच तेंव्हा छंदवर्ग वगैरे प्रकार अस्तित्त्वातच नव्हते.

:) अपर्णाचं बरोबर आहे... ती दुपार-त्या दुपारी. ती विहीर-त्या विहीरीप्रमाणे.

पण ‘त्या दुपारी’ हे सप्तमीचा प्रत्यय लागून होणारं रूपही होऊ शकतं. उदा. त्या दुपारी मी घरी नव्हतो... वगैरे.

आणि संध्याकाळ तर खासच. गच्चीवर बसून आकाशनिरिक्षण आणि भावंडांच्या endless गप्पा. सुट्टीत आठ-दहा भावंडं तरी आजी-आजोबांकडं जमायची.

टीव्ही, डीव्हीडी, आयपॉड, मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, ब्लॉग्ज काही काही नसलेलं ते जग होतं.

एकदम nostalgic लेख झालाय. हरवलेले दिवस आठवले. मी कोल्हापुरात खूप वर्षं राहिलोय.

विवेक.
(pl. अहो-जाहो नको.)

मीनल said...

धन्यवाद विवेक,

ही प्रतिक्रियाही nostalgic झाली आहे. :)
खरं आहे, इंटरनेटवगैरे शिवाय घालवलेल्या सुट्ट्यांमधे बरंच काही सांगण्यासारख असतं.
आपल्या खूपजणांच्या सुट्ट्या एकसारख्याच जात असाव्यात.
लग्नसराईतलं पाहुण्यांनी भरलेलं घर आता इतिहासजमा झालय खरं, पण आपल्याइथे काही ठिकाणी (मेट्रो सिटी वगैरे सोडूनची गावे) सुदैवाने लग्नसराईशिवायही पाहुण्यांनी घर भरलेली असतात.

या निमित्याने ’त्या दुपारीं’चा घोळ बाकी मिटला.

Sameer_No1 said...

सुन्दर... आणि वाचन ही मस्त केलेस... एक्झाम साठी शुभेछ्छा

मीनल said...

धन्यवाद समीर!