Tuesday, May 4, 2010

गारपीट

परवा झालेली गारपीट पाहिल्यामुळे गारा लागून माणसे जबर जखमी होवू शकतात हे पटले. ’आमच्या घराजवळ लिंबाएवढी गार पडली’ पासून ’चांगल्या पेरुएवढ्या गारा ह्या अश्श्या समोर पडल्या होss’ हे बिनधास्त सांगण्यापर्यंत कोल्हापूरकरांनी धाडस केले आहे.पावसाळा आता महिन्यावर आला! पाऊस आणि कविता हे कधी वेगळे न होणारे, कधी न बिघडणारे समीकरण आहे. ही अशाच काही आठवणीतल्या कवितांची उजळणी !

शांताबाई आणि पावसाची कविता काय ग्रेट कॉम्बिनेशन आहे नां? ही त्यांची बरीच जुनी कविता आहे.

पावसाच्या धारा, येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ, जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये, तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली, गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया, बसली पाखरें

हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे, डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे, शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे, जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें, रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे, भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें, पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने, मनी संतोषली..!

- शांता शेळके

*******************************
गुलजार पावसाबद्दल काय म्हणतात याची उत्सुकता होतीच, पण त्यांना पावसापेक्षा चंद्र जास्त प्रिय आहे. तरी, या पावसाच्या त्यांच्या काही ओळी.

बारिश आती है तो पानी को भी लग जाते हैं पांव ,
दरो दीवार से टकरा कर गुजरता है गली से,
और उछलता है छपाकों में ,
किसी मॅच में जीते हुए लड़को की तरह...

जीत कर आते हैं जब मॅच गली के लड़के
जुते पहने हुए कॅनवस के ,
उछलते हुए गेंदों की तरह ,
दरो दीवार से टकरा के गुजरते हैं,
वो पानी के छपाकों की तरह...|

-गुलजार
**********************************

25 comments:

yog said...

may rain comes....now, what advanced world is!!

baki kavita ani photos ultimate ahet..
pawsalyachya shubhechchha!!

Naniwadekar said...

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे, शोधिती निवारा
----

मीनलबाई : या ओळी तुम्ही आठवतात तशा लिहिल्या आहेत, की पुस्तकात पाहून? पुस्तकाचे नांव?

सर्व कडव्यांत पहिल्या ओळीत ६ वर्ण आहेत, आणि दुसर्‍या ओळीत आठ. (हा 'गया' नावाचा अक्षरसंख्याक छन्द आहे.) ज़र शान्ताबाईंकडून छन्दहानी झाली असेल तर ती त्यांच्या प्रतिष्ठेला साज़ेशी नाही. पण शान्ताबाई छन्दबद्‌धतेबद्‌दल काटेकोर होत्या, तेव्हा दुसरी ओळ 'रानातील गुरेढोरे, शोधिती निवारा' अशी असू शकेल.

भानस said...

अगदी बेसबॉलपासून ते लिंबे,बोरे...बारिक भुगा मोठे मोठे तुकडे आणिक ब~याच प्रकारे गारा, बर्फाचे कण-पुंजके, सारे झेलून झालेयं... आता सरावलोय खरे तरीही लहानपणी अचानक वळवाच्या पावसात झालेल्या गारपीटीची मजा औरच होती. मीनल, शांताबाईंची ही कविता फार दिवसांनी वाचली गं. धन्सं. गुलजार के क्या कहने...!!!

मीनल said...

Thanks Yog,

तुलाही पावसाच्या शुभेच्छा..!

मीनल said...

नानिवडेकर,

ओळी आठवतात तशा लिहिल्या आहेत. चूक होण्याची शक्यता आहे.
>>
झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे, शोधिती निवारा
हो, बरोबर आहे, येथे १२-१४ ऎवजी १२-१२ होत आहे. तसे कुठेच झालेले नाही. गुरेढोरे हा शब्द बरोबर आहे का?

मीनल said...

बापरे! भाग्यश्रीताई,

बेसबॉल एवढ्या गारा? तुला आता कण-पुंजक्यांची जास्त सवय झाली असेल नं?

आनंद पत्रे said...

बापरे गारा भलत्याच मोठ्या आहेत... सर्व फोटो सुंदर आहेत.

मीनल said...

धन्यवाद आनंद,

यावेळेच्या गारा बर्‍याच मोठ्या होत्या..

सिद्धार्थ said...

अबब!!! केवढ्या मोठ्या गारा.

[अबब हा शब्द मी शाळा सोडल्यावर आज पहिल्यांदा प्रत्यक्षात वापरतोय ;-)]

मीनल said...

सिध्दार्थ,

याही फुटून आलेल्या आहेत.. मूळ आणखी मोठ्या असाव्यात!

(अबब!! :))

tanvi said...

मस्तच आहेत फोटो... गारा अनुभवून किती वर्षे झालीत ते ही आठवत नाही आता....त्यामूळे पहायला मजा आली...

मनमौजी said...

मस्त फोटू आहेत!!!

कोणता कॅमेरा आहे तुझ्याकडे???

तू वॉटर मार्क फोटूच्या मध्यभागी का नाही टाकत...कडेचा वॉटर मार्क क्रॉप करता येतो.

मनमौजी said...

शांता शेळके..म्हणल की मला त्यांचा दूरदर्शन वरील कार्यक्रम आठवतो....मस्त असायचा तो..

मीनल said...

धन्यवाद तन्वी..

इथेही कित्ती वर्षांनी एवढा गारांचा पाऊस पडला. (आम्ही तत्परतेने भज्याही करुन खाल्ल्या)

Vivek said...

वळीवाच्या पावसानंतर कांदाभजी नाही खाल्ली तर पाऊस पडल्यासारखं वाटतच नाही मुळी.

आणि कांदाभजी करण्याची कोल्हापुरी पद्धत दुसरीकडं कुठच नाही बहुतेक. त्यामुळं खूप चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.

मीनल said...

योगेश,

Canon Ixus 970 IS कॅमेरा! वॉटर मार्क मध्यभागी टाकणार होते, पण फोटॊ बिघडेल, म्हणून कडेला टाकला.
शांता शेळकेंचा दूरदर्शन वरील कोणता कार्यक्रम?

मीनल said...

हो विवेक,

पावसानंतर चहा भजी खाणे हे पावसाचं सेलिब्रेशन आहे.
कोल्हापूरी ’पेशल’ भजी म्हणजे, खेकडा भजी नं? यात आख्खे धणे असतात. खरयं, अशी चव कुठे नाही.

मनमौजी said...

मीनल नक्की नाव आठवत नाही मला....बहुतेक त्याच नाव रानावारा होत....त्यामध्ये स्वतः शांता शेळके असायच्या...नाव आठवल की सांगीन.

मीनल said...

वक्के..

हेरंब said...

मीनल, योगेश,

त्या कार्यक्रमाचं नाव 'रानजाई'. शांता शेळके आणि सरोजिनी बाबर होत्या त्यात. तो कार्यक्रम माझ्या आजीला प्रचंड आवडायचा आणि त्यामुळे मलाही हळूहळू आवडायला लागला.

त्याचं शीर्षकगीत खूप सुंदर होतं.

"दर्‍याखोर्‍यात फूलशी तू ग रानजाई, भोळा शंकर भुलोबा त्याची भुलाबाई"

असो. ही पोस्ट बघायची कशी राहून गेली काय माहीत.

मीनल, गारा आणि कविता दोन्ही एकदम भार्री !! :)

Maithili said...

Mastach.... Gara, kavita, photos sagalech...ekdam bharii....!!!
[ Me kadhich garancha paaus nai baghitalaay...] :( :( :(

मीनल said...

धन्यवाद हेरंब,

रानजाई कार्यक्रम का? गुगलवर माहिती मिळाली. शीर्षकगीत खरंच सुंदर आहे.

मैथिली,

तसा गारांचा पाऊस आता दुर्मिळच म्हणायला पाहिजे.. तो पूर्ण जायच्या आधि तुला पहायला मिळो..

अपर्णा said...

पावसाळ्याच्या आठवणी काढाव्या तितक्या कमी पण मुंबईत गारा कुठल्या आणि नेमकं माझ्या अमेरिकेच्या पहिल्या आठवड्यातच माझ्या स्वागतासाठी त्या आल्या...नंतर वेगवेगळ्या रुपात येतच राहिल्या...माझ्या अगदी जुन्या एका पोस्टचा शेवट गारपिटीने झाला होता ते आठवलं..फ़ोटो झक्कास आहेत गं...आमच्या पुढच्या मायदेश दौर्‍यात कदाचित कोल्हापुर असेल...तेव्हा तिथले अख्खे धणेवाले खेकडा भजी नक्की चाखावे लागतील...

मीनल said...

अरे वा! स्वागत छान झालं की!!पुढच्या दौर्‍यात कोल्हापुर ठेवच! आपण मिळून (उन्हाळा असला तरी) खेकडा भजी ्खाऊ.. :)

Suresh - सुरेश शिरोडकर said...

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे, शोधिती निवारा
----

मीनलबाई : या ओळी अशा आहेत;

पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा