Thursday, May 20, 2010

मराठीचा शिवाजी

इ.स.१८१८ ते १८७४ या अर्ध्या शतकाहूनही अधिक काळ अभ्यासकांनी मराठीचा कठीण काळ म्हटले आहे. अ.ना. देशपांडे यांच्या संदर्भग्रंथात याबद्दल म्हटले आहे, "पेशवाईच्या अखेरच्या दिवसात सुदृढ आणि आरोग्यसंपन्न असलेली मराठी पेशवाई अस्तानंतर एकाएकी अनेक वर्षांच्या आजारातून उठलेल्या रुग्ण स्त्री सारखी दिसू लागली." सद्यस्थिती पाहता, परकीय आक्रमण (मग ते सत्तेचे असो किंवा भाषेचे असो) मूळ संस्कृतीला महागात पडू शकते. तसे ते तेव्हाही पडले असावे. इंग्रजी राजवटीत परकीय अंमलाखाली स्वतःच स्वतःला अनोळखी झालेली मराठी आपल्या लेकरांची घुसमटही पहात असावी.

१८७४ मध्ये ’विष्णुशास्त्री चिपळूणकर’ यांनी निबंधमाला सुरु केली.तेव्हा जणू तिला जहाल पण परिणामकारक औषधच मिळाले. स्वभाषेचा अभ्यास, अभिमान, पारतंत्र्याबद्दल चीड यांनी भरलेले एक एक निबंध लोकांसमोर येवू लागले. सात वर्षात तिचे ८१ अंक निघाले. या अंकात वेगवेगळे विषय हाताळले गेले. भाषाविषयक, वाङ्‌मयविषयक, सामाजिक, राजकीय इ. याबद्दल त्यांनी कुणाच्या लेखाची उसनवारी केली नाही, आर्थिक मदत मागितली नाही किंवा सरकारी गैरमर्जीची पर्वा केली नाही. निबंधमालेचा पहिला लेख ’ मराठी भाषेची स्थिती’ हा होता. मालेचे प्रमुख कार्य जागृती हे असले तरी ते हळूहळू करणे भाग होते. एकदम पारतंत्र्यावर (भाषिक आणि राजकीय दोन्ही) जहाल टिका करणे योग्य नव्हते. म्हणून कदाचित प्रथम त्यांनी लेखनशुध्दी, वक्तृत्व, संस्कृत कवी, मोरोपंतांची कविता, इ. विषय हाताळले. मराठीचा व्यापक परिचय करुन दिला व नंतर तीव्र शब्दांत द्वेष्ट्यांवर टिकेची झोड उठवली. नंतर अर्थातच या मंडळींनी रागाने आगपाखड केली. परंतु, तोपर्यंत निबंधमालेची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा अंक बंद करणे किंवा चिपळूणकरांच्या लिखाणावरच बंदी घालणे यापैकी काहीच सुधारकांना शक्य झाले नाही. मराठी भाषेपासून सुरु झालेला प्रवास ’आमच्या देशाची स्थिती’ पर्यंत आला आणि मालेचे कार्य सफल झाल्याचे जाणवून त्यांनी निबंधमाला बंद केली. महाराष्ट्रात रुजू पाहणारी न्यूनगंडाची भावना तिथेच उपटून काढण्याचे महत्वाचे काम निबंधमालेने केले.

भांडारकर(दक्षिणपथाचा इतिहास), कुंटे(आर्यसंस्कृतीची स्थित्यंतरे), रानडे(मरठ्यांच्या सत्तेचा अभ्युदय), तेलंग(शंकराचार्य) यांनी त्यांची पुस्तके मराठीत न लिहता फक्त इंग्लिशमध्ये लिहली. त्यांना चिपळूणकरांनी फटकारले. दोन्ही भाषेत ग्रंथनिर्मिती झाली असती तर मराठी वाङमयात केवढी मोलाची भर पडली असती! याचा अर्थ चिपळूणकर इंग्लिश भाषेचे द्वेष्टॆ होते असा मुळीच नसावा.
" इंग्रजीचा आम्ही द्वेश करीत नाही हे तर काय, पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. एकीकडून संस्कृत व एकीकडून इंग्रेजी अशा दोहोंचा आधार तीस बळकट सापडला पाहिजे विशेषतः या भाषेत जे अगाध ज्ञान भरले आहे त्याचा पाट फोडून जर आपल्या भाषेकडे वळविता येईल तर केवढी मजा होईल!" (सं-निबंधमाला)

तसेच, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी काही सामाजिक सुधारणा केल्या असल्या तरी, सांस्कृतिक बाबतीत खोडसाळ ख्रिस्ती प्रचारकांनी ढवळाढवळ करण्याचे काहीच कारण नाही हे त्यांनी ठासून सांगितले.
" आमच्या देशास काही एक झाले नाही. त्याची नाडी अद्याप साफ चालत असून शरीरप्रकृतीस म्हणण्यासारखा काही एक विकार नाही. "

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी वाङमयाचे जनक संबोधले जातात. १८७४ हा स्थित्यंतराचा काळ आहे. म्हणजे मालापूर्व काळात (१८१८ ते १८७४) ग्रंथनिर्मिती झालीच नाही असे मुळीच नाही. १९६४ पर्यंत ६६१ च्या आसपास मराठी पुस्तके प्रसिध्द झाली. यात इंग्रजी साहित्यातले काही विचार मराठीत आले. लघुकथेसारखे काही नविन प्रकारही भाषेला समृध्द करुन गेले. पण हे करताना आपण हीन आहोत, इंग्रजीमधले साहित्य भाषांतरीत करुन आपण मराठीला वर काढत आहोत हा सूरच चुकीचा होता. जांभेकर, परमहंस मंडळी, प्रार्थनासमाज, ज्योतीराव फुले, विष्णुवुवा ब्रह्मचारी (गोखले), लोकहितवादी ही मालापूर्व काळातली काही आदराची नावे! ही नावे टाळून पुढे जाताच येणार नाही. पण चिपळूणकरांच्या निबंधमालेच्या रुपाने परखड स्वत्वांचे तेज उमटले आणी नविन स्वाभिमानी युगाचा प्रारंभ झाला.

२० मे १८५० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला. त्यांना लिखाणाचे बाळकडूच मिळाले होते. ’शालापत्रक’ नावाचे मासिक त्यंचे वडील चालवत असत. त्यातील रासेलसच्या अठरा, वीस भागांनंतरचे भाषांतर करण्याचे काम चिपळूणकरांनी कॉलेजमध्ये असताना पूर्ण केले. निबंधमाला १८७४ मधे सुरु झाली आणि १८७५ मध्ये हे मासिक (सरकारतर्फे) बंद करण्यात आले! निबंधमालेच्या जन्माच्या वेळी चिपळूणकरांचे वय २४ वर्षे होते. ते पूना सरकारी हायस्कूलमधे शिक्षकाची नोकरी करीत होते. निबंधांच्या परखड आणि विरोधी मतांचे प्रतिबिंब नोकरीवर पडणे सहाजिक होते. वर्षाच्या आतच त्यांची बदली रत्नागिरीस झाली. नियमाप्रमाणे ते पुण्याहून रत्नागिरीस गेले पण, एक वर्षांनंतर त्यांच्या वडीलांच्या मृत्यूनंतर ते पुण्यास आले ते परत गेलेच नाहीत.सरकारी नोकरीचा राजिनामा देवून त्यांनी पुण्याला ’किताबखाना’ नावाचे पुस्तकाचे दुकान सुरु केले. १८८० मध्ये टिळक, चिपळूणकर, नामजोशी, आगरकर, आपटे यांनी ’न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. त्याच्याच पुढच्या वर्षी टिळक, आगरकर यांच्या सहाय्याने चिपळूणकरांनी ’केसरी’, ’मराठा’ ही वर्तमानपत्रेही सुरु केली. त्याशिवाय काव्येतिहास, चित्रशाळा हे अंकही सुरु केले. केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी लेखणीद्वारे सरकारी अधिकारी व मिशनरी यांना न जुमानता अखंड मराठी भाषेची सेवा केली. केवळ मराठीचीच म्हणणे चुकीचे ठरेल. संपूर्ण भारत स्वतंत्रपणे, स्वाभिमानाने झळकत रहावा हिच त्यांची इच्छा होती. त्याची सुरवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली इतकेच!

आज २० मे, चिपळूणकरांची जयंती! यानिमित्य मराठीचे शिवाजी ’विष्णुशास्त्री चिपळूणकर’ यांना मानाचा मुजरा..!

------------------------------------------------------------------------------
संदर्भ- आधुनिक मराठी वाङ्‌मयाचा इतिहास- अ.ना. देशपांडे

13 comments:

आनंद पत्रे said...

खुप सुंदर माहिती... माझाही मानाचा मुजरा.

मीनल said...

धन्यवाद आनंद!

THE PROPHET said...

मस्त लेख. खूपच अभ्यासपूर्ण आणि आमच्यासाठी माहितीपूर्ण!
धन्यवाद!

Naniwadekar said...

मीनल, माहिती चांगली आहेच, पण त्यांच्या वडिलांचा, म्हणजे कृष्णशास्त्रींचा, प्रत्यक्ष नाव न देता ओझरता उल्लेख काय तो आहे. कृष्णशास्त्रींनी बाणभट्टाची 'कादंबरी' आणि 'अरेबियन टेल्‌स/कथा' यांचे भाषान्तर हाती घेतले होते, ज़े त्यांच्या मृत्युसमयी १८७८ मधे अपूर्ण होते. विष्णुशास्त्रींनी ते काम पुढे चालवले, आणि त्यांच्या १८८२ मधल्या निधनानन्तर हरी दामले यांनी अरेबियन सुरस कथांचे काम चालू ठेवले. कृष्णशास्त्री हा फार मोठा साहित्यिक होता. त्यांच्या अन्योक्ती याची साक्ष द्‌यायला पुरेशा आहेत.

महात्मा फुले यांचे नाव ज्योतीराव वा ज्योतीबा नसून 'जोतीराव / जोतीबा' आहे, याची नोन्द घेणे. पण ही नावाची मोडतोड जोतिबांच्या नशिबातच दिसते.

मीनल said...

धन्यवाद विद्याधर..

ही माहिती मलाही शेअर कराविशी वाटली.नेमका आज त्यांचा जन्मदिवसही आहे.

मीनल said...

श्री. नानिवडेकर,

’विष्णुशास्त्रींनी अरेबियन टेल्‌सचे भाषांतर केले’ असा कुठेही उल्लेख नाही.

"१८१८ नंतरच्या इंग्रेजी आमदनीच्या काळात मराठीची अपत्ये विविध विषयांवरील शालोपयोगी इंग्रेजी पुस्तकांची भाषांतरे करण्यात स्वतःला कृतार्थ मानूं लागली "

अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य याला पुष्टीही देत नाही.
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी १८६१ मधे ’अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ लिहण्यास सुरवात केली. दहा वर्षे उलटूनही ते पुस्तक अपूर्ण असेल असे वाटत नाही तरी, हरी दामले यांनी काही काही कारणास्तव अपूर्ण राहिलेला भाग पूर्ण केला असेल.कृष्णशास्त्रींच्या मोठेपणाबद्दल दुमत नाही. ते तर ’मराठी कथात्मक वाङ्‌मयाचे पहिले कलमबहाद्दर जादुगार’ म्हणून प्रसिध्द आहेत.

महात्मा फुले यांचे नाव मी पुस्तकात ज्योतिबा असेच लिहलेले वाचले. पण जोतिबा असण्याची ज्यास्त शक्यता आहे. खात्री करुन बदल करेन.
पण ही नावाची छेडछाड त्यांच्याच नशिबी आहे असे मात्र नाही. असो, बाईची उपाधी गाळल्याबद्दल धन्यवाद!

Naniwadekar said...

मीनलबाई : दोन-तीन मुद्‌दे पुढे चालवतो.

> महात्मा फुले यांचे नाव मी पुस्तकात ज्योतिबा असेच लिहलेले वाचले. पण जोतिबा असण्याची ज्यास्त शक्यता आहे. खात्री करुन बदल करेन.
>---

जोतिबांचे नाव 'ज्योतिबा' नाही, 'जोतिबा' पण नाही, तर 'जोतीबा' होते. पु लं च्या 'अ‍ेक शून्य मी' पुस्तकातला 'नामस्मरणाचे रोग' लेख वाचून खात्री करणे.

> ’विष्णुशास्त्रींनी अरेबियन टेल्‌सचे भाषांतर केले’ असा कुठेही उल्लेख नाही.
>----

त्या काळच्या साहित्यावर 'कुठेही उल्लेख नाही' असे विधान करण्याज़ोगा तुमचा बाबासाहेब पुरन्दरे पातळीचा अभ्यास आहे, असे वाटत नाही. ते भाषान्तर कृष्णशास्त्री आणि हरी दामले या दोघांनीच केल्याची माहितीही तुम्हाला नसावी; अ‍ेरवी तो पुरावा चालेल. 'शालोपयोगी' पुस्तकांच्या भाषान्तरांवर विष्णुशास्त्रींनी केलेली टीका त्यांनी स्वत: भाषान्तरे केली नसावीत असे काहीही सुचवत नाही, कारण 'अ‍िंग्रजीतले अगाध ज्ञान' मराठीत आणण्याची त्यांची अ‍िच्छाही तुम्हीच नमूद केली आहे. १८६१ साली सुरु केलेले काम १८७८ पर्यंत का झाले नाही ही शंका त्यामानानी ग्राह्‌य आहे, पण मग पुस्तक १८९० साली प्रकाशित झाले यामागे कारण काय? विकीपिडियावर कृष्णशास्त्री, विष्णुशास्त्री आणि दामले यांचा अ‍ुल्लेख आहे, पण तो मीच टाकला असावा. तेव्हा आपल्या दोघांच्या भाण्डणात तो पुरावा चालणार नाही. याविषयी माहिती मी गूगल-बुक्स किंवा जी अ‍ें च्या पत्रसंग्रहात वाचली असावी. ती शनिवारच्या सुट्टीत पाहीन. तेव्हापर्यंत तरी हा मुद्‌दा अनिर्णित ठेवूया.

> बाईची उपाधी गाळल्याबद्दल धन्यवाद!
>
घाअ‍ीघाअ‍ीत आणि आळशीपणामुळे तो प्रमाद घडला खरा. ते लक्षात येताच माझ्या अ‍ुद्‌धटपणाचा तुम्हाला राग येअ‍ील याची भीती वाटलीच. पण अगदी अ‍ितका राग न यावा अशी करुणा भाकत होतो. त्याचा फायदा झाला नाही. पन्हाळगड माझ्या ताब्यात असता तर या अक्षम्य अपराधाचे क्षालन म्हणून तुम्हाला अर्पण केला असता; पण आता फक्त नाक घासून सपशेल माफी मागतो.

थोडाफार तरी लोभ ठेवावा, ही विनन्ती.

- डी एन

samidha said...

छान,
माहिती छान आहे।
ही निबंधमाला जर उपलब्ध होइल तर वाचकांना चांगली माहिती मिळेल।
आणी मराठीचा कैवार घेणा-यांना काही प्रबोधन मिळेल

मीनल said...

श्री. नानिवडेकर,

इथल्या मतमतांतराला आपण भांडण समजत असाल, तर मग विषयच संपला!

प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.

मीनल said...

प्रशांत,

निबंधमाला ई-पुस्तक स्वरुपात उपलब्ध होईल असे लोकसत्ता मधे प्रसिध्द झाले होते.

http://www.loksatta.com/old/daily/20040820/nmv02.htm

पण पुढील कार्यवाहीची कल्पना नाही.

प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.

Naniwadekar said...

> इथल्या मतमतांतराला आपण भांडण समजत असाल, तर मग विषयच संपला!
>----

तुमच्यासारखे काटेकोरपणे मला शब्द वापरता येत नाहीत, तेव्हा एखाद्‌या शब्दाची भलतीच छटा उमटली असेल. आता माफी मागताना घासायला नाकही शिल्लक नाही. पण मी 'भाण्डण' समज़लो तरी विषय का सम्पवा? तो चालू राहू द्‌या. आता एक उगीच चाळा म्हणून अन्दाज़ बान्धतो. माझ्याज़वळ मराठी शब्दकोश नाही, पण त्यात 'मतांतर' असला एखादा सौम्य छटेचा शब्द 'भाण्डण' शब्दाचे ज़े काही ४-५ अर्थ दिले असतील त्यात असावा.

मीनल said...

>तुमच्यासारखे काटेकोरपणे मला शब्द वापरता येत नाहीत.
भलतीच चेष्टा करताय राव!
काटेकोर शब्दांविषयी काटेकोर राहिलेले आपल्याखेरीच कोणाला (इथे)पाहिलेले नाही. (अर्थात, यासंदर्भातही माझा सखोल वगैरे अभ्यास नाही, पण जेवढे ब्लॉग (माझ्याकडून)वाचले जातात ते धरुन)

आपण माहितीमध्ये सुधारणा सुचवा. सदोष माहिती नक्कीच बदलेन.

धन्यवाद.

Naniwadekar said...

जी एं ची निवडक पत्रे, खंड तीन, पान ४२/३९६.

'अरबी भाषेतील कथांचे मराठी भाषांतर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी इंग्रजीवरून करावयास १८६१ साली सुरुवात केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि हरी कृष्ण दामले यांनी त्यास हातभार लावल्यावर १८९० मधे 'अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' या नावाने त्या कथा पुस्तकरुपाने प्रसिद्‌ध झाल्या.'

हातभाराचे स्वरूप आणि वेळ यांचा त्या पानावर उल्लेख नाही, पण ही टिपणे मौज़ प्रकाशनाच्या कोणी माहीतगारानी तयार केली असणार. कृष्णशास्त्री हयात असतानाही या दोघांनी मदत केली असेल, किंवा ते हयात नसतानाच मदत केली असेल. विकीपिडियावरची किती माहिती माझी आहे आणि किती इतरांची याचा मला आता काहीही अंदाज़ नाही. 'कादंबरी'च्या भाषान्तरात इतरांचे योगदान असल्याची माहिती मला काल-परवाच मिळाली. अरबी कथांचे भाषांतर मुख्यत: कृष्णशास्त्रींचे असावे आणि इतर दोघांनी काही भाग ज़ोडला असेल, हा कयास मला योग्य वाटतो.