Tuesday, July 27, 2010

मौनाची भली अक्षरे

सुंदर हस्ताक्षराचा हेवा हा प्रकार हेवा-असूया या गटात मोडत असेल असे वाटतच नाही. यात कौतुकच जास्त डोकावते. प्रत्येक हस्ताक्षराला स्वतःचा पोत, लकब असते. कुणाचे गोल आणि गोड दोन्ही, बंगाली रोशोगुल्ल्यासारखे, कुणाचे काटेरी तिळगुळाच्या काट्याची आठवण करुन देणारे, कुणाचे नुसतेच फर्राटे (फराटे शब्दामधेच फराटा नाही म्हणून फर्राटे!), कुणाचे तक्क्याला टेकून बसणार्‍या शेठासारखे वरच्या रेषेला टेकून ऎसपैस पसरणारे, कुणाचे गिचमिड शब्दालाही मागे टाकेल असे गिच्चमिडं.. ब्लॉगविश्वात सुंदर अक्षर कुठे आहे? विचारले असता, सोमेशच्या ब्लॉगकडे बोट आपलं, कर्सर दाखवले जाईल यात शंका नाही. बर्‍याच वर्षांपूर्वी अतिशय सुंदर अक्षर असणार्‍या माझ्या मामाने एक पिवळे पोस्टकार्ड पाठवले होते. पत्र छापिल असेल तर जादा किंमत आकारली जाते. त्याप्रमाणे पोस्टमनने ’येक्श्ट्रा’ बिल मागितले. त्याला कितीही समजावले की, हे हातानेच लिहिलेले आहे तरी त्याला पटेचना! शेवटी येक्श्ट्रा देऊनच त्याची बोळवण करावी लागली. कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यात कावणेकर नावाचे अक्षरयात्री आहेत. त्यांचे दरवर्षी अक्षरांचे प्रदर्शन भरते. त्यांनी सुंदर अक्षरात ओव्या, ज्ञानेश्वरी, दोहे लिहून काढले आहेत. छंद म्हणून बर्‍याच जणांना पत्र देखिल पाठवत असतात. हा त्यांच्या अक्षरांचा नमुना.

पत्र हे इमेलपेक्षा जवळचे वाटावे यात नवल नाही. निळ्या, काळ्या अक्षरात त्या त्या व्यक्तीला पाहिले जाते. अक्षरातून माणसे भेटतात हे खोटे नाही. कधी खोडलेला शब्द तर कधी खोडलेली आख्खी ओळच मनाला चाळा लावून जाते. लिहण्याच्या सुध्दा व्यक्ती तितक्या पध्दती! कुणाचे मन हे बोटांपेक्षा जास्त धावत असल्याने एका वाक्याला पुढच्या वाक्याची शेपूट, तर कुठे काय लिहावे न कळल्यामुळे रेंगाळलेली बोटे आणि वाढत जाणारे शाईचे डाग! कुणाला प्रत्येक दोन ओळींनंतर काहीतरी बहुमोल आठवल्याने दोन शब्दांच्या मधे /\ बाण करुन टोप्या चढवायची सवय, तर कुणाला एकाच शब्दाच्या अक्षरांची - ने ताटातूट करण्याची खोडी! (अशा वेळी चितळे मास्तरांचे एका ओळीत सात शब्द आठवतात)

तर सांगायचा मुद्दा होता की, सर्वसाधारण अक्षरासंबंधी येणारी विशेषणे वळणदार, टपोरे, रेखिव, सुंदर, मोती ही आहेत पण ’मौनाचे अक्षर’ हे विशेषण पुढील प्रसंगावरुन समजले.
तापी नदीकाठी मठात एक महान योगी रहात होते. त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी पुष्कळ काही ऎकले व त्यांना एकदातरी भेटावेसे वाटू लागले. त्याविषयी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवण्याची इच्छा तर होती, परंतु एक अडचण आली. मायना लिहिताना, ज्ञानेश्वर वयाने लहान म्हणून त्यांना ’आशिर्वाद’ लिहावा की अनुभवाने थोर म्हणून ’तीर्थरुप’ लिहावे असा त्यांना प्रश्न पडला. शेवटी काहीच न लिहिता एक कोरे पत्र त्यांनी ज्ञानेश्वरांना पाठविले. यावर उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी ६५ ओव्या रचून त्यांना पाठवल्या. हिच ’चांगदेव पासष्टी’! चांगदेवांचा व ज्ञानेश्वरांचा हा पत्रसंवाद म्हणजे ’मौनाची भली अक्षरे’ आहेत. तळहाताने तळहातास मिठी द्यावी, किंवा गोडीने गोडी चाखावी त्याप्रमाणे तुझा-माझा संवाद आहे, तेव्हा आपण परस्परांना मुकेपणानेच भेटणार असे ज्ञानेश्वर चांगदेवांना म्हणतात. एवढ्या सुंदर पत्रव्यवहाराची गोडी वर्षानुवर्षे मराठी भाषा चाखत आहे. या ह्रदयीचे त्या ह्र्दयी कळविणारी चांगदेवांच्या पत्रातली अदृश्य अक्षरे ज्ञानेश्वरांनी नक्कीच वाचली असतील. काय लिहले असेल बरं त्या पत्रात?

Thursday, July 22, 2010

परिक्षा परिक्षा..

शाळा असो कॉलेज असो थोड्याफार फरकाने परिक्षेच्या काही मिनिटे आधी एक ठराविक प्रकारचा माहौल आवारात पहायला मिळतोच! बंद दाराच्या समोर खाकी कपड्यातले शिपाई मामा उभे आहेत. जवळच्या बोर्डवर नंबर व वर्ग लिहलेले आहेत. २०० ते २३०-Class B असे वाचून लाल शर्ट घातलेला रोल नं २३० आपला नंबर शेवटच्या बाकावर आल्याबद्दल आनंद लपवू शकत नाहीये. समोरच्या कट्ट्यावर थोडी, पायर्‍यांवर थोडी, पुस्तकात खुपसलेली डोकी दिसत आहेत. Imp, V.Imp आणि पुढे एक दोन चांदण्या गिरगटलेल्या नोट्स, झेरॉक्स इथून तिथून सांडत आहेत. पानं भराभर उलटली जात आहेत. पाच जणांच्या घोळक्यात तिघांचे चेहरे ऑप्शनला टाकलेल्या काही मुद्यांबाबत काळजीने काळवंडलेले आहेत. समोरुन एखादा आग्रही चेहरा जात असला तरी कटाक्ष टाकण्याचीही बुध्दी होत नाहीये. नाकावर चष्म्याच्या रेषेत दिसेल न दिसेल असा अंगारा लावलेला आहे. एरवी हिरो माफिक वावरणार्‍या पण परिक्षेच्या ऎन वेळी हातपाय गाळणार्‍या कुणा जिवलग मित्राला " हे बघ, शक्य तितक्या डायग्रॅम काढ.. काय? आणि तेच मुद्दे परत परत लिही. पानं भरवं. " असा त्यावेळी देता येणारा बहुमोल सल्ला दिला जातोय. क्वचित कुणीतरी बेफिकीरीने इकडे तिकडे पहात फिरतोय. ’अ’चा आज तिसर्‍या पेपरला सुध्दा तोच ड्रेस? असे मनात म्हणणार्‍या चाणाक्ष ’ब’चा पेपर सुटल्यावर ही गोष्ट ’क’ आणि ’ड’च्या निदर्शनास आणून देण्याचा बेत चालू आहे. (या मुलीच असणार हे सांगायला नको)

आणि तेवढ्यात घंटा होते. हातातली पुस्तके सांभाळत आपापल्या वर्गांकडे धाव घेतली जाते. क्रमांक निट तपासून स्थिरस्थावर होताच लकी पेन बरोबर असल्याची नकळत चाचपणी होते. कुणाची डोळे मिटून काही प्रार्थना चालू असते कुणी हाती पडणार्‍या प्रश्नपत्रिकेबाबत उत्सुक झालेला असतो. कुठे "जरा अक्षर मोठं काढ रे, मला निटं दिसत नाही" अशी रोल नं १०६ ची १०५ ला धमकावणी पोहोचते. तर कुठे "आज सेकंड सेक्शन थोडा सांग उद्या माझा विषय आहे मी सगळं सांगतो " अशी मांडवली चालू असते. कुणी आत्मविश्वासाने उत्तरपत्रिका लिहायला घेतो, कुणी तीन तासांचे वेळापत्रक बसवू लागतो. पहिला तास निर्विवादपणे सगळेच विद्यार्थी भराभर लिहीत असतात.(जे येते ते आधि लिहणे तत्वानुसार) नंतर काही अवघड प्रश्नांपाशी पेनाचा वेग मंदावतो. कॅल्युलेटरवरची बोटे अडखळतात. मान वर करुन बाकीच्या प्रजेचा अंदाज घेतला जातो. स्मरणशक्तीवर ताण देवून पुढची मजल मारायला सुरवात होते. शेवटची दहा मिनिटे उरल्याची घंटा झाल्यावर उडालेल्या धांदलीची तुलना अक्षतेच्या वेळी ’नवरीला बोलवा’ असे तिसर्‍यादा सांगून झाल्यावर वधूपक्षात उडालेल्या धांदलीशीच होवू शकते. इथेही संमिश्र भाव पहायला मिळतात. कुणाचा पेपर पूर्ण झालेला असतो, कुणाची फेरतपासणी चालू असते, कुणी अजून १० मार्कांचे राहिले आहे म्हणून भराभर खरडत असतो तर कुणी ’ए, पेपर झाल्यावर सांगतो म्हणाला होतास की, सांग ना उत्तर पट्कन" म्हणून एखाद्याची विनवणी करत असतो.

पर्यवेक्षकांचेही अनेक प्रकार पहायला मिळतात. जो चोख, सतर्क असतो तो ’खडूस’. जो आळशी, सैल असतो तो ’चांगला’ अशी विद्यार्थ्यांच्या मतांनुसार ढोबळ विभागणी करायला हरकत नाही. खडूस माणूस प्रश्नपत्रिकंचे सील आधी मुलांना दाखवतो व नंतर काळजीपूर्वक फोडतो. ओळखपत्रावरचा फोटॊ विद्यार्थ्यांच्या चेहर्‍याशी ताडून पाहतो. कुठेही खुस्स झाले तर करडी नजर रोखून एकही शब्द न बोलता गोठवून ठेवतो. तर चांगला माणूस पहिली काही मिनिटे कडक असल्याचे भासवून नंतर दारात जाऊन उभारतो. शेजारच्या वर्गांतल्या मानेबाईंची एखादा मिनिट विचारपूस करतो. टेबलावर ठेवलेल्या काही वस्तूशी चाळा सुरु करतो. शेवटच्या दहा मिनिटात तर त्याच्या औदार्याचा कळस होतो. पेपर संपल्यावर कृतज्ञतेचे कटाक्ष झेलत तो पेपरची चळत सांभाळत स्टाफ रुमच्या दिशेने चालता होतो.

प्रत्यक्ष पेपर संपवून वर्गाबाहेर आल्यावर तर गोंगाटाने सगळी जागा व्यापून गेलेली असते.

~तू याचे उत्तर काय लिहलेस?

~कोणतेही तीन प्रश्न सोडवा मधे हा प्रश्न तिथे हवा होता आणि तो कंपल्सरी प्रश्न ऎच्छिकमधे हवा होता. काय पण पेपर सेट केलाय, छ्या..!

~पेपर बाकी मस्त, नव्वदच्या पुढे स्कोअरिंग होणार, मन्या तुला कटिंग देतो चल..

~कसंही करुन पेपर सुटायला हवा. ग्रेस मार्क्स मिळू देत. पेपर तपासताना मास्तराच डोकं शांत असू दे

~आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न टाकतातच कसे?

अरे हा सिलॅबस मधलाच प्रश्न आहे. तू सिलॅबसच्या पुस्तकालाच आऊट केलास त्याला ते तरी काय करणार?

~काय मंजू यंदा पण टॉपर ना?

~मी तर एसी (All Clear) होऊन राहिलो ना भावा..!

~ते पश्या तर्कट, दोन दोन सप्लीमेंटा घेऊन टराटर लिहित होतं, पास होतय वाटतं यंदा..

~सोप्पा!

यापैकी कोणताही संवाद परिक्षेनंतरच्या काही मिनिटातच ऎकायला मिळतो. अर्थात कुणी पेपर मनासारखा सोडवल्याच्या आनंदात, कुणी ऑप्शनला टाकलेले प्रश्न न आल्यामुळे दैवावर खूष, कुणी नाराज.. जसा अभ्यास केला आहे तसेच रंग परिक्षा दाखवत असते. लकी पेनाचा आणि चार चार दिवस न बदललेल्या लकी कपड्यांचा यात काही सहभाग असो, नसो, पण असल्या वेगवेगळ्या गोष्टी परिक्षा हंगामात पहायला मिळतातच! एक विषय पार पडलेला असला तरी अजून पुढची लढाई बाकी असते. दुसर्‍या विषयाची तजवीज करण्यासाठी जास्त न रेंगाळता समस्त परिक्षार्थींची गर्दी विरळ होवू लागते. तासाभरातच शिपाईमामा इथे तिथे पडलेले कपटे साफ करु लागतात. काहीवेळाने लोखंडी दार कुलुपबंद होते आणि दुसर्‍या दिवशी याच आवृत्तीची वाट पहात पेंगू लागते.