Thursday, July 22, 2010

परिक्षा परिक्षा..

शाळा असो कॉलेज असो थोड्याफार फरकाने परिक्षेच्या काही मिनिटे आधी एक ठराविक प्रकारचा माहौल आवारात पहायला मिळतोच! बंद दाराच्या समोर खाकी कपड्यातले शिपाई मामा उभे आहेत. जवळच्या बोर्डवर नंबर व वर्ग लिहलेले आहेत. २०० ते २३०-Class B असे वाचून लाल शर्ट घातलेला रोल नं २३० आपला नंबर शेवटच्या बाकावर आल्याबद्दल आनंद लपवू शकत नाहीये. समोरच्या कट्ट्यावर थोडी, पायर्‍यांवर थोडी, पुस्तकात खुपसलेली डोकी दिसत आहेत. Imp, V.Imp आणि पुढे एक दोन चांदण्या गिरगटलेल्या नोट्स, झेरॉक्स इथून तिथून सांडत आहेत. पानं भराभर उलटली जात आहेत. पाच जणांच्या घोळक्यात तिघांचे चेहरे ऑप्शनला टाकलेल्या काही मुद्यांबाबत काळजीने काळवंडलेले आहेत. समोरुन एखादा आग्रही चेहरा जात असला तरी कटाक्ष टाकण्याचीही बुध्दी होत नाहीये. नाकावर चष्म्याच्या रेषेत दिसेल न दिसेल असा अंगारा लावलेला आहे. एरवी हिरो माफिक वावरणार्‍या पण परिक्षेच्या ऎन वेळी हातपाय गाळणार्‍या कुणा जिवलग मित्राला " हे बघ, शक्य तितक्या डायग्रॅम काढ.. काय? आणि तेच मुद्दे परत परत लिही. पानं भरवं. " असा त्यावेळी देता येणारा बहुमोल सल्ला दिला जातोय. क्वचित कुणीतरी बेफिकीरीने इकडे तिकडे पहात फिरतोय. ’अ’चा आज तिसर्‍या पेपरला सुध्दा तोच ड्रेस? असे मनात म्हणणार्‍या चाणाक्ष ’ब’चा पेपर सुटल्यावर ही गोष्ट ’क’ आणि ’ड’च्या निदर्शनास आणून देण्याचा बेत चालू आहे. (या मुलीच असणार हे सांगायला नको)

आणि तेवढ्यात घंटा होते. हातातली पुस्तके सांभाळत आपापल्या वर्गांकडे धाव घेतली जाते. क्रमांक निट तपासून स्थिरस्थावर होताच लकी पेन बरोबर असल्याची नकळत चाचपणी होते. कुणाची डोळे मिटून काही प्रार्थना चालू असते कुणी हाती पडणार्‍या प्रश्नपत्रिकेबाबत उत्सुक झालेला असतो. कुठे "जरा अक्षर मोठं काढ रे, मला निटं दिसत नाही" अशी रोल नं १०६ ची १०५ ला धमकावणी पोहोचते. तर कुठे "आज सेकंड सेक्शन थोडा सांग उद्या माझा विषय आहे मी सगळं सांगतो " अशी मांडवली चालू असते. कुणी आत्मविश्वासाने उत्तरपत्रिका लिहायला घेतो, कुणी तीन तासांचे वेळापत्रक बसवू लागतो. पहिला तास निर्विवादपणे सगळेच विद्यार्थी भराभर लिहीत असतात.(जे येते ते आधि लिहणे तत्वानुसार) नंतर काही अवघड प्रश्नांपाशी पेनाचा वेग मंदावतो. कॅल्युलेटरवरची बोटे अडखळतात. मान वर करुन बाकीच्या प्रजेचा अंदाज घेतला जातो. स्मरणशक्तीवर ताण देवून पुढची मजल मारायला सुरवात होते. शेवटची दहा मिनिटे उरल्याची घंटा झाल्यावर उडालेल्या धांदलीची तुलना अक्षतेच्या वेळी ’नवरीला बोलवा’ असे तिसर्‍यादा सांगून झाल्यावर वधूपक्षात उडालेल्या धांदलीशीच होवू शकते. इथेही संमिश्र भाव पहायला मिळतात. कुणाचा पेपर पूर्ण झालेला असतो, कुणाची फेरतपासणी चालू असते, कुणी अजून १० मार्कांचे राहिले आहे म्हणून भराभर खरडत असतो तर कुणी ’ए, पेपर झाल्यावर सांगतो म्हणाला होतास की, सांग ना उत्तर पट्कन" म्हणून एखाद्याची विनवणी करत असतो.

पर्यवेक्षकांचेही अनेक प्रकार पहायला मिळतात. जो चोख, सतर्क असतो तो ’खडूस’. जो आळशी, सैल असतो तो ’चांगला’ अशी विद्यार्थ्यांच्या मतांनुसार ढोबळ विभागणी करायला हरकत नाही. खडूस माणूस प्रश्नपत्रिकंचे सील आधी मुलांना दाखवतो व नंतर काळजीपूर्वक फोडतो. ओळखपत्रावरचा फोटॊ विद्यार्थ्यांच्या चेहर्‍याशी ताडून पाहतो. कुठेही खुस्स झाले तर करडी नजर रोखून एकही शब्द न बोलता गोठवून ठेवतो. तर चांगला माणूस पहिली काही मिनिटे कडक असल्याचे भासवून नंतर दारात जाऊन उभारतो. शेजारच्या वर्गांतल्या मानेबाईंची एखादा मिनिट विचारपूस करतो. टेबलावर ठेवलेल्या काही वस्तूशी चाळा सुरु करतो. शेवटच्या दहा मिनिटात तर त्याच्या औदार्याचा कळस होतो. पेपर संपल्यावर कृतज्ञतेचे कटाक्ष झेलत तो पेपरची चळत सांभाळत स्टाफ रुमच्या दिशेने चालता होतो.

प्रत्यक्ष पेपर संपवून वर्गाबाहेर आल्यावर तर गोंगाटाने सगळी जागा व्यापून गेलेली असते.

~तू याचे उत्तर काय लिहलेस?

~कोणतेही तीन प्रश्न सोडवा मधे हा प्रश्न तिथे हवा होता आणि तो कंपल्सरी प्रश्न ऎच्छिकमधे हवा होता. काय पण पेपर सेट केलाय, छ्या..!

~पेपर बाकी मस्त, नव्वदच्या पुढे स्कोअरिंग होणार, मन्या तुला कटिंग देतो चल..

~कसंही करुन पेपर सुटायला हवा. ग्रेस मार्क्स मिळू देत. पेपर तपासताना मास्तराच डोकं शांत असू दे

~आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न टाकतातच कसे?

अरे हा सिलॅबस मधलाच प्रश्न आहे. तू सिलॅबसच्या पुस्तकालाच आऊट केलास त्याला ते तरी काय करणार?

~काय मंजू यंदा पण टॉपर ना?

~मी तर एसी (All Clear) होऊन राहिलो ना भावा..!

~ते पश्या तर्कट, दोन दोन सप्लीमेंटा घेऊन टराटर लिहित होतं, पास होतय वाटतं यंदा..

~सोप्पा!

यापैकी कोणताही संवाद परिक्षेनंतरच्या काही मिनिटातच ऎकायला मिळतो. अर्थात कुणी पेपर मनासारखा सोडवल्याच्या आनंदात, कुणी ऑप्शनला टाकलेले प्रश्न न आल्यामुळे दैवावर खूष, कुणी नाराज.. जसा अभ्यास केला आहे तसेच रंग परिक्षा दाखवत असते. लकी पेनाचा आणि चार चार दिवस न बदललेल्या लकी कपड्यांचा यात काही सहभाग असो, नसो, पण असल्या वेगवेगळ्या गोष्टी परिक्षा हंगामात पहायला मिळतातच! एक विषय पार पडलेला असला तरी अजून पुढची लढाई बाकी असते. दुसर्‍या विषयाची तजवीज करण्यासाठी जास्त न रेंगाळता समस्त परिक्षार्थींची गर्दी विरळ होवू लागते. तासाभरातच शिपाईमामा इथे तिथे पडलेले कपटे साफ करु लागतात. काहीवेळाने लोखंडी दार कुलुपबंद होते आणि दुसर्‍या दिवशी याच आवृत्तीची वाट पहात पेंगू लागते.

28 comments:

हर्षद said...

मस्तच लिहिलं आहे. आणि एकदम खर पण आहे.
आवडलं.

मीनल said...

धन्यवाद हर्षद.
आणि ब्लॉगवर स्वागत.

सुहास झेले said...

हे हे हे ...मस्त
एकदम शाळेच्या परीक्षावर्गात बसवलस बघ मीनल. आवडेश. पुढच्या पेपरची वाट बघतोय :)

आनंद पत्रे said...

जबरी.. अगदी अगदी असंच असायचं...

मिलिंद बोकिलांच्या शाळा पुस्तकात सुद्धा असाच परिक्षेबद्दल प्रसंग आहे....

आवडती मुलगी आपल्याच हॉल मध्ये आहे की नाही हा सुद्धा खुप उत्सुकतेचा प्रश्न असतो, ती असेल तर वागण्यात कमालीचा बदल येतो... ;)

सचिन उथळे-पाटील said...

एकदम मस्त. आवडल.

परीक्षा संपल्यावर २ किलोमीटर पर्यंतचा परिसर अगदी मिनी-झेरोक्स च्या पानांनी काळा-पांढरा झालेला असतो.

सकाळी लवकर येऊन नंबर कुठे आलाय हे पाहून सगळी सेटिंग करून ठेवायची.

मीनल said...

धन्यवाद सुहास,
पण आता पेपर संपले. :)
अ‍ॅडमिशन्स सुरु झाल्या. याचे प्रकारही वेगळेच आहेत.
(अरे, ’अ‍ॅ’ लिहता येऊ लागलयं की!)

मीनल said...

धन्यवाद आनंद,
मिलिंद बोकिलांचे पुस्तक अजून नाही वाचलेले. वाचून पाहीन.
BTW, तुझ्या परिक्षा हॉल मधे कोण कोण असायचं? ;)

THE PROPHET said...

अशक्य भारी!
आउट ऑफ सिलॅबस हा परवलीचा शब्द होता आमचा!
त्या दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

मीनल said...

धन्यवाद सचिन,
हो, परीक्षा संपल्यावर त्या रस्त्याचे वर्णन झेरॉक्स खाल्लेला रस्ता म्हणून करायला हरकत नाही.
कॉपी हा संशोधनाचा विषय आहे..
माहितगारानेच तो हाताळावा ;)

मीनल said...

धन्यवाद विद्याधर,
प्रश्न फिरवून विचारला असेल तर आउट ऑफ सिलॅबसचा शिक्का त्यावर बसलाच म्हणून समजा!
मजा असायची ते प्रश्नपत्रिका तपासून पहाणे वगैरे..

Ajay Sonawane said...

परीक्षाच्या आधी माझ्या *आवडत्या* मैत्रीणीला मी तिच्या रुममध्ये जाऊन 'ऑल द बेस्ट' म्हणण्यासाठी तडफडत असे. भले इकडे उशीर झाला तरी चालेन पण मी तिच्याशी बोलूनच येत असे. हा लेख वाचून काही गोष्टी आठवल्या परीक्षाच्या काळातल्या. माझा एक मित्र (स्कॉलर) शेवटच्या सेकंदापर्यंत पुस्तक वाचत असे. आम्ही त्याची फार खेचायचो. त्याला शेवटी शेवटी आम्ही मुद्दाम विचारायचो की हे वाचल का, ते वाचलं का. आणि मग तो सगळं सोडून ते वाचत बसायचा. फार त्रास द्यायचो आम्ही त्याला.

छान वाटलं ही पोस्ट वाचून. मजा आली.

-अजय

मीनल said...

अजय, :D
देवीच्या दर्शनाने परीक्षा चांगली जात असेल तुझी. ;)
अभ्यासाव्यतिरिक्तही परीक्षेच्या खूप आठवणी असतात. फोन वरुन मैत्रिणीचा अभ्यास किती झालाय याची चाचपणी करणे, तिने ’अजून कुठे काय? पहिला पार्टच चाल्लाय!’ म्हटल्यावर हायसे वाटणे, नाइट मारणे, ते झेरॉक्सचे डोंगर..
तू म्हणतोस तसे शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याची खोड बर्‍याच जणांना असते..
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

Maithili said...

Mastach lihiley....!!! :D Jaam aawadale...!!!

yog said...

kay solid lihileyas....

jam maja ali..

mi CA chya papers la 'gelelo' tevha.... same film 'pahun alo!'

मीनल said...

धन्यवाद मैथिली,
बाकी तू सध्या याच फेज मधे आहेस.. अजून खूप परिक्षा परीक्षा व्हायच्या आहेत तेव्हा, All the Best!

मीनल said...

धन्यवाद योगेश,
परीक्षेची फिल्म थोड्याफार फरकाने सगळीकडे तीच असावी.. :)

मनमौजी said...

आयला इजिंनिअरिंगचे दिवस आठवले..Out of Syllabus, किती चा attempt मारला....किती मार्कांची जुळणी होते आहे...सर्व आठवणी ताज्या झाल्या...मस्त झाली आहे पोस्ट..

मीनल said...

अरे हो, कितीचा attempt हे तर राहिलंच! ते तर ब्रिद वाक्य होतं..
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद योगेश.

सोहम said...

डिग्रीची ३ वर्ष मी एकच नीळा शर्ट घालुन एक्झाम दिलीये. आता त्या रंगाच शर्ट दिसलं जरी तरी माझ्यावरच मला हसु येतं.
( शर्टाचा एक्झॅट कलर पहायचा असल्यास .. पहली पहली बार बलीये हे अक्षय कुमारचं गाण पहा.)

लकी पेन आणि लकी कपड्यांसोबत .. लकी चेहरेही असतात काही. ;)

मीनल said...

धन्यवाद आणि स्वागत सोहम,
त्या शर्टच नाव एक्झाम शर्ट ठेवायला हवं मग!
निळा रंग पाहण्यासाठी ’पहली पहली बार’ पाहिलं. :)
लकी चेहरे तर असतातच, काही अनलकी म्हणून अफवेचे शिकारही असतात. निकम नावाच्या सरांवर खार खाऊन असलेल्या एका विद्यार्थ्याने त्यांना पाहिलं की पेपर अवघड जातो म्हणून अफवा पसरवली होती, ती ज्यु.सिनिअर सगळीकडे पसरली. एरवी कोणी लक्ष देत नसे पण परिक्षेच्या काळात ते कुठेही दिसले की, मुले विरुध्द बाजूने पळत सुटायची.

भानस said...

हा हा... एकदम भारीच.

शाळेची आठवण झाली. प्रत्येक पेपराची वेगळीच धाकधुक... मेले ऑप्शनला टाकलेल्या सिलॅबसवरच हटकून प्रश्न हजर. बहुतेक सगळ्या शिक्षकांना कर्णपिशाच्च धार्जिणे असावे. :D आणि तो एकच एक ड्रेस, अंगारा... सगळेच कशात न कशात अडकलेले.

खूप आठवणी जाग्या केल्यास गं.धन्यू मीनल. :)

Anonymous said...

अप्रतीम!! एकच शब्द!

मीनल said...

धन्यवाद श्रीताई,
ऑप्शनला टाकलेल्या सिलॅबसचं, एकवेळ काहीतरी करुन वेळ निभावता येईल, पण ओरलला तसंही करता येतं नाही. तो एक वेगळाच प्रश्न आहे. यावरुन मला एका मुलीची आठवण झाली. ती ओरल्स देताना एवढी घाबरलेली असायची की, समोरच्या शिक्षकाला काही विचारण्याची इच्छाच होत असे. लवकर सुटका व्हायची तिची! :)

मीनल said...

धन्यवाद महेंद्रकाका,
परीक्षा, सुट्टी अशा गोष्टी बर्‍याच जणांच्या काही समान आठवणी घेऊन येणार्‍या आहेत. त्या शेअर करताना छान वाटते.

Sagar Kokne said...

येकदम मस्त...
आम्ही तशे 'स्कॉलर' कॅटेगरीतले त्यामुळे परीक्षा फार आवडायची...आणि त्या दिवसात सॉलिड भाव खायला मिळायचा...
बाकी वर्णन अगदी अचूक...मजा यायची परीक्षेच्या दिवसात...शाळेच्या किंवा कॉलेजच्या शेवटच्या परीक्षेला तर फार वाईट वाटले होते...
हल्लीच या विषयावर मी ही काहीसे खरडले होते...
http://majhyamanatalekaahi.blogspot.com/2010/06/blog-post.html

मीनल said...

धन्यवाद आणि स्वागत सागर,
तसा स्कॉलर लोकं तसा नेहमीच भाव खातात! :)
प्रतिक्रियेसाठी आभार.

Rahul........ said...

हे पत्र मी पाहिलेल आहे. अचानक आठवणी जाग्या जाहल्या.

मीनल said...

Thank you..
:)