Tuesday, July 27, 2010

मौनाची भली अक्षरे

सुंदर हस्ताक्षराचा हेवा हा प्रकार हेवा-असूया या गटात मोडत असेल असे वाटतच नाही. यात कौतुकच जास्त डोकावते. प्रत्येक हस्ताक्षराला स्वतःचा पोत, लकब असते. कुणाचे गोल आणि गोड दोन्ही, बंगाली रोशोगुल्ल्यासारखे, कुणाचे काटेरी तिळगुळाच्या काट्याची आठवण करुन देणारे, कुणाचे नुसतेच फर्राटे (फराटे शब्दामधेच फराटा नाही म्हणून फर्राटे!), कुणाचे तक्क्याला टेकून बसणार्‍या शेठासारखे वरच्या रेषेला टेकून ऎसपैस पसरणारे, कुणाचे गिचमिड शब्दालाही मागे टाकेल असे गिच्चमिडं.. ब्लॉगविश्वात सुंदर अक्षर कुठे आहे? विचारले असता, सोमेशच्या ब्लॉगकडे बोट आपलं, कर्सर दाखवले जाईल यात शंका नाही. बर्‍याच वर्षांपूर्वी अतिशय सुंदर अक्षर असणार्‍या माझ्या मामाने एक पिवळे पोस्टकार्ड पाठवले होते. पत्र छापिल असेल तर जादा किंमत आकारली जाते. त्याप्रमाणे पोस्टमनने ’येक्श्ट्रा’ बिल मागितले. त्याला कितीही समजावले की, हे हातानेच लिहिलेले आहे तरी त्याला पटेचना! शेवटी येक्श्ट्रा देऊनच त्याची बोळवण करावी लागली. कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यात कावणेकर नावाचे अक्षरयात्री आहेत. त्यांचे दरवर्षी अक्षरांचे प्रदर्शन भरते. त्यांनी सुंदर अक्षरात ओव्या, ज्ञानेश्वरी, दोहे लिहून काढले आहेत. छंद म्हणून बर्‍याच जणांना पत्र देखिल पाठवत असतात. हा त्यांच्या अक्षरांचा नमुना.

पत्र हे इमेलपेक्षा जवळचे वाटावे यात नवल नाही. निळ्या, काळ्या अक्षरात त्या त्या व्यक्तीला पाहिले जाते. अक्षरातून माणसे भेटतात हे खोटे नाही. कधी खोडलेला शब्द तर कधी खोडलेली आख्खी ओळच मनाला चाळा लावून जाते. लिहण्याच्या सुध्दा व्यक्ती तितक्या पध्दती! कुणाचे मन हे बोटांपेक्षा जास्त धावत असल्याने एका वाक्याला पुढच्या वाक्याची शेपूट, तर कुठे काय लिहावे न कळल्यामुळे रेंगाळलेली बोटे आणि वाढत जाणारे शाईचे डाग! कुणाला प्रत्येक दोन ओळींनंतर काहीतरी बहुमोल आठवल्याने दोन शब्दांच्या मधे /\ बाण करुन टोप्या चढवायची सवय, तर कुणाला एकाच शब्दाच्या अक्षरांची - ने ताटातूट करण्याची खोडी! (अशा वेळी चितळे मास्तरांचे एका ओळीत सात शब्द आठवतात)

तर सांगायचा मुद्दा होता की, सर्वसाधारण अक्षरासंबंधी येणारी विशेषणे वळणदार, टपोरे, रेखिव, सुंदर, मोती ही आहेत पण ’मौनाचे अक्षर’ हे विशेषण पुढील प्रसंगावरुन समजले.
तापी नदीकाठी मठात एक महान योगी रहात होते. त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी पुष्कळ काही ऎकले व त्यांना एकदातरी भेटावेसे वाटू लागले. त्याविषयी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवण्याची इच्छा तर होती, परंतु एक अडचण आली. मायना लिहिताना, ज्ञानेश्वर वयाने लहान म्हणून त्यांना ’आशिर्वाद’ लिहावा की अनुभवाने थोर म्हणून ’तीर्थरुप’ लिहावे असा त्यांना प्रश्न पडला. शेवटी काहीच न लिहिता एक कोरे पत्र त्यांनी ज्ञानेश्वरांना पाठविले. यावर उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी ६५ ओव्या रचून त्यांना पाठवल्या. हिच ’चांगदेव पासष्टी’! चांगदेवांचा व ज्ञानेश्वरांचा हा पत्रसंवाद म्हणजे ’मौनाची भली अक्षरे’ आहेत. तळहाताने तळहातास मिठी द्यावी, किंवा गोडीने गोडी चाखावी त्याप्रमाणे तुझा-माझा संवाद आहे, तेव्हा आपण परस्परांना मुकेपणानेच भेटणार असे ज्ञानेश्वर चांगदेवांना म्हणतात. एवढ्या सुंदर पत्रव्यवहाराची गोडी वर्षानुवर्षे मराठी भाषा चाखत आहे. या ह्रदयीचे त्या ह्र्दयी कळविणारी चांगदेवांच्या पत्रातली अदृश्य अक्षरे ज्ञानेश्वरांनी नक्कीच वाचली असतील. काय लिहले असेल बरं त्या पत्रात?

23 comments:

भानस said...

मीनल," मौनाची भली अक्षरे " अतिशय भावली. अक्षरातून माणसे भेटतात तशीच अश्या सुंदर लिखाणातूनही मनात उतरतात. :)

ज्ञानेश्वरमाऊली व चांगदेवांचा हा अनोखा संवाद झाला म्हणूनच आपण ही अमृतवाणी ” चांगदेव पासष्टी ’चाखतोयं.

मनमौजी said...

>>अक्षरातून माणसे भेटतात हे खोटे नाही. कधी खोडलेला शब्द तर कधी खोडलेली आख्खी ओळच मनाला चाळा लावून जाते>>

अगदी सहमत...

माउलीं नी त्या अदृश्य पत्रात काय वाचल??
आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या आकलनापलीकडचे आहे.

आनंद पत्रे said...

सुंदरच..
अक्षर वाचुन व्यक्तींच्या स्वभावाबद्दल सुद्धा निष्कर्ष काढता येतो (अर्थात अनुभवी व्यक्तीला)...

THE PROPHET said...

खरंय...अक्षरातून माणसं कळतात...
म्हणूनच मी आंतरजालाचे शतशः आभार मानतो की त्याने माझं हस्ताक्षर कुणासमोर येऊ दिलं नाही! ;)
ऑन अ सिरियस नोट..
ती एक कला आहे आणि फार थोड्या नशीबवान लोकांना लाभते!
बाकी 'माऊली आणि चांगदेव' हा माझ्या आवडत्या लेजेंड्स पैकी एक आहे!(कारण त्यात चालणारी 'भिंत' आहे.)
रच्याक, फ्रिक्वेन्सी वाढवल्याबद्दल समस्त वाचकवर्गातर्फे आभार!

सचिन उथळे-पाटील said...

सुंदर अक्षर हाच खरा दागिना.

खरच अक्षरातून माणस भेटतात.अगदी ती आपल्याशी बोलायला लागतात.

आणि एक सांगू का सुंदर अक्षराचे खर तर फायदे आणि तोटे पण आहेत ----

फायदे म्हणजे अगदी मित्रांची पत्रे लिहून देणे(आमच्यावेळी होत अस पण आजकाल इमेल मुळे सुंदर अक्षर वाल्यांच मार्केट डाऊन असेल तर काय माहित नाही) आणि शाळेत वर्गात डिमांड असते वहीवर,पुस्तकावर नाव टाकून द्यायला रांग लागते.

आणि तोटा पण हाच शाळेच कधी कधी आख्ख मासिक लिहाव लागायचं.

BinaryBandya™ said...

सुंदर झालीये पोस्ट " मौनाची भली अक्षरे"...
मस्तच ...

मीनल said...

भाग्यश्रीताई, या कौतुकाच्या अक्षरांविषयी काय लिहू? खूप खूप आभार.
मुकेपणाने सुरु झालेला संवाद ओव्या होवून थांबला आणि आपण चांगदेव पासष्टी वाचू शकलो.

मीनल said...

धन्यवाद योगेश,
>माउलीं नी त्या अदृश्य पत्रात काय वाचल??
तू म्हणतोस तसेच हे आकलनापलीकडचे आहे. मला चांगदेव पासष्टीचा प्रसंग माहित नव्हता, जेव्हा वाचला तेव्हा खूप छान वाटले.

मीनल said...

धन्यवाद आनंद,
लिपीशास्त्रानुसार, अक्षर वाचून व्यक्तीचा स्वभाव सांगतात.
नुसती सही बघूनही सांगतात. BTW, माझी सही चांगली आहे असं एका (अननुभवी) व्यक्तीने सांगितलयं!

मीनल said...

धन्यवाद विद्याधर!
याबाबतीत मी सुध्दा आंतरजालाचे आभार मानू इच्छिते. :)
ती कला तर आहेच पण आधिपासून प्रयत्न केल्यास फार सुंदर नसले तरी, वळणदार अक्षर जमू शकते.
रच्याक, प्रोत्साहनपर शब्दांसाठी समस्त वाचकवर्गाचे खूप खूप आभार.

मीनल said...

धन्यवाद सचिन,
सुंदर अक्षरवाले वह्यापुस्तकांवर नाव घालून देताना लै भाव खातात. आणखी एक फायदा म्हणजे पेपरमधे शेवटी शेवटी आपलेच अक्षर आपल्याला ओळखू येत नाही, तसे यांच्याबाबतीत होत नसावे.

मीनल said...

BinaryBandya,
प्रतिक्रियेसाठी खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत.

THE PROPHET said...

मी थोडासा आगाऊपणा करून तुला खो दिलाय...
संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी
http://samvedg.blogspot.com/2010/07/blog-post.html
आणि माझी आजची पोस्ट
http://thebabaprophet.blogspot.com/2010/07/blog-post_28.html

मीनल said...

अरे बापरे! बिकट प्रसंग आणलास की रे! (माझ्यावर नाही, वाचकांवर)
अनुवादाचा कधी प्रयत्न केलेला नाही. यानिमित्याने हेही...

Maithili said...

Sahiye post...!!! :)
Totally agreed to Vibhidada... ;)

मीनल said...

ठ्यॅंक्सअलॉट मैथिली.. :)

अपर्णा said...

भारी झालंय गं लेखन पुराण...आता हाताने लिहायची सवयच गेली असंही झालंय त्यामुळे अक्षराला निमित्त मिळतं....:) BTW चितळे मास्तर ओरडतलीहो....ओळीत नववा शब्द आला तर भोपळ्याचे चित्र काढीन म्हणतील...:) काही नाही गं रोजचं ऐकते नं काही नं काही पु.ल. त्यामुळे बाकी काही नाही...एक तीट लावली त्यानिमित्ताने लेखाला हे चांगलं...आणि हो हा विषयच मुळी वेगळा आणि मस्तच निवडलास...सध्या तू एकदम फ़ारममध्ये आहेस....

मीनल said...

अपर्णा,

चितळे मास्तरांना आठवा शब्द खपत नसे की नववा याबद्दल संभ्रम होता. दुरुस्त करते. थॅक्यू..
मी फारममध्ये? कसंच कसंच.. :)

Abhijit Bathe said...

Good blog - keep it up.

मीनल said...

Thanks Abhijit..

Anonymous said...

तुम्हा (साहित्यिक) लोकांच्या गप्पा गोष्टी ऐकून (वाचून) आनंद झाला (कि हेवा वाटला!)
सब एक से बड के एक ...

जहीर

मीनल said...

धन्यवाद जहीर,
पण साहित्यिक? कसंच कसंच!

माऊ said...

Meenal,Utkrusht.....