Friday, August 6, 2010

मावशीबोलीतल्या कविता

दोन दुचाकी कशाबशा जाऊ शकणारा एक बोळ आहे. जरा आडवाटेला, पण तरी गावातच! टिपीकल वाडा.. लाकडी अरूंद जिना दोन खोल्या एक करुन मोठा केलेला हॉल. तिथे संध्याकाळची शिकवणी असायची.. नावाजलेले कडक सर होते. (जाम भिती वाटायची त्यांची!) शिकवणीला सुध्दा प्रवेश परीक्षा वगैरे घेऊन मग प्रवेश दिलेला. शिकवणी चालू असतानाच मधे एखाद्याला उभे करुन अवघड प्रश्न विचारण्याची कधी फिरवून क्लिष्ट सूत्रे विचारण्याची त्यांची सवय होती. तशी शिकवण्याची ही पध्दत नविन नाही. तरीही, विद्याधरने खो दिल्यावर या ठिकाणी उगिचच त्यांची आठवण झाली. :)

अमृता प्रीतमची एक आवडलेली, वेगळी वाटलेली कविता. फाळणीच्या जखमा इथे तिथे लख्ख दिसतात. दुभंगत्या काळात भारतच नव्हे तर कोणत्याही देशाच्या शहराचा चेहरामोहरा असाच असावा.

शहर

मिरा शहर इक लम्बी बहिस वरगा है
सड़कां-बेतुकीआं दलीलां दी तरह
ते गलीआं इस तरह-
जिउं इको गल्ल नूं कोई इधर घसीटदा कोई उधर

हर मकान इक मुठ वांगु वटीआ होईआ
कंधा कची चीआं वांगु
ते नालीआं, जिउं मूहां ’चो झग वगदी है

एह बहिस खौरे सूरज तों शुरु होई सी
जु उस नूं वेख के हो़र गरम हुंदी
ते हर बूहे दे मुंह ’चों-
फ़िर साइकलां ’ते सकूटरां दे पहिए
गाहलां दी तरह निकलदे
ते घंटीआं ते हार्न इक दूजे ’ते झपटदे

जिह़डा़ वी बाल इस शहर विच जमदा
पुछदा कि किहडी़ गल्ल तों एह बहिस हो रही?
फ़िर उसदा सवाल ही इक बहिस बणदा
बहिस विचों निकलदा बहिस विच रलदा

संखा घड़िआलां दे साह सुक्के
रात अउंदी, सिर खपांदी ते चली जांदी
पर नींदर दे विचवी इह बहिस न मुक्के
मिरा शहर इक लम्बी बहिस वरगा है...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझं शहर एका लांबलचक भांडणासारखं
रस्ते-निरर्थक म्हणणं मांडल्यासारखे
आणि गल्ल्या तर अशा की,
जसं एकाच गोष्टीला कुणी इकडे खेचतयं, कुणी तिकडे

प्रत्येक घर एका मुठीप्रमाणे आकसलेलं
भिंती- किंचाळणार्‍या, कचकचणार्‍या
आणि नाले, जे तोंडातून फेस वाहून आणतात..

हे भांडण जणू सूर्यापासून सुरु झालं होतं
जे त्याला बघून आणखीच दाहक होत गेलं
आणि प्रत्येक दाराच्या मुखातून
मग सायकल आणि स्कूटरची चाकं
गल्लीच्या दिशेन बाहेर पडतात
आणि घंटा-हॉर्न एक दुसर्‍यावर कुरघोडी करु पाहतात

जे कुणी मूल या शहरी जन्म घेई
विचारत असे की कोणत्या गोष्टीवर हे भांडण होत आहे?
मग त्याचा प्रश्न सुध्दा एक भांडण होऊन जाई
भांडणातून येणारा भांडणातच विसर्जित होणारा

शंख घंटांचे श्वास कोरडे होतात
रात्र येते माथा आपटून निघून जाते
पण झोपेतसुध्दा भांडण संपत नाही
असंच माझं शहर एका लांबलचक भांडणासारखं..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एकाच अनुवादावर खरं म्हणजे थांबायला हवं, पण गुलजारची ’नज़्म’ मराठीत बसवायचा मोह आवरत नाही म्हणून.. कुछ और नज़्मे वाचायच राहिल होतं. वाचनालयात हे पुस्तक का कुणास ठाऊक बाल विभागात आढळलं. कोरं करकरीत पुस्तक.. हाताळलेलं जाऊन त्यान थोडं तरी जुनं-वृध्द व्हायला हरकत नव्हती. पुस्तक परत करण्याच्या शेवटच्या पानावर माझा एकच शिक्का आहे.

शेर लिहताना ’ उला’ आणि ’सानी’ असे दोन भाग पडतात. पहिल्या उलाच्या ओळी काहीतरी अर्थ सांगतात पण तो पूर्ण असत नाही. व्यक्ती किंवा भावसापेक्ष अर्थ बदलतो. पूर्णार्थासाठी सानीची गरज असते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ज्याला जसा भावेल तसा अर्थ घ्यावा. फक्त उला प्रकारातच ऎंशीच्या वर कविता आहेत. त्यातलीच एक-

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बन्द शीशों के परे देख दरीचों के उधर

सब्ज पेड़ों पे घनी शाख़ों पे फूलों पे वहाँ

कैसे चुपचाप बरसता है मुसलसल पानी


कितनी आवाज़ें हैं, यह लोग हैं, बातें हैं मगर

ज़हन के पीछे किसी और ही सतह पे कहीं

जैसे चुपचाप बरसता है तसव्वुर तेरा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बंद काचेच्या पलीकडे पहा, खिडकीच्या त्या तिकडे

हिरव्या झाडांवर घनदाट फांद्यांवर फुलांवर तिथे

कसा गुपचुप संततधार पाऊस बरसत असतो


किती आवाज आहेत, हे लोक आहेत, गप्पागोष्टी आहेत पण

खोल मनात वेगळ्याच कुठल्यातरी पटलावर कुठेतरी

जसा गुपचुप तुझा आठव बरसत असतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शब्दशः अनुवाद कवितेच्या बाबतीत तरी अवघड प्रकार आहे. त्यामुळे अनुवादित शब्दांचे बरेच स्वातंत्र्य घेतले आहे. दोन्ही कवी आणि वाचणार्‍यांची जाहीर माफी मागून हा स्वैर प्रयत्न संपवत आहे

माझा खो अपर्णातन्वीताई यांना ....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(टिप: डोळ्यांवर गार पाण्याच्या किंवा ताकाच्या पट्ट्या ठेवल्याने दाह कमी होतो असे म्हणतात. तरी, मानसिक क्लेशासाठी या पोस्टला खो देणार्‍यालाच जबाबदार धरावे.)

18 comments:

मनमौजी said...

मीनल....

"प्रत्येक घर एका मुठीप्रमाणे आकसलेलं
भिंती- किंचाळणार्‍या, कचकचणार्‍या
आणि नाले, जे तोंडातून फेस वाहून आणतात.."

हे जास्त आवडेश....

गुलजार यांची नज़्म मराठीत बसवण म्हणजे एक दिव्य आहे (माझ्यासारख्या पामरसाठी तरी)..तो शब्दशः अनुवाद जबर्‍या झाला आहे.

तळटीपेबद्दल धन्यवाद...गार पाणी उपलब्ध आहे परंतु ताकाची कमतरता आहे तरी पाठवण्याची तजवीज करावी...सोबत लस्सी व आइसक्रीम पाठवल तर उत्तम...मानसिक क्लेशाला लस्सी व आइसक्रीम अत्युत्तम असत अस म्हणतात.

tanvi said...

>>>>>>(टिप: डोळ्यांवर गार पाण्याच्या किंवा ताकाच्या पट्ट्या ठेवल्याने दाह कमी होतो असे म्हणतात. तरी, मानसिक क्लेशासाठी या पोस्टला खो देणार्‍यालाच जबाबदार धरावे.)

अक्षरश: खरी तळटीप... :)

गुलजारांची नज़्म तू निवडलीस... महान आहेस बाई.. आणि पेललीयेस व्यवस्थित...

मस्तच आवडले!!! :)

मीनल said...

योगेश,
ठ्यँक्स..
त्यातल्या त्यात जी नज़्म मराठीकरणासाठी सोपी जाईल तिच निवडली आहे याचा तुला अंदाज आला असेलच. :)
अर्थात,तशीच ती खूप आवडली होती हे सांगायला नको.
तळटीप पब्लिकला जास्त अपील होते आहे यावरुन काय ते समजून घेतले आहे. परिमार्जन म्हणून तजवीज करणेत येईल पण मा.क्ले. ची जबाबदारी अधिकृतपणे दुसर्‍या एकाकडे आहे. या.नों.घ्या.

मीनल said...

तन्वीताई,
ही माझी आवडती नज़्म आहे. मूळ लहेजा कितपत उमटेल याची कल्पना नव्हती, तरीही...

BTW, आता तुला खो दिला आहे.
वाट पहात आहे.

सचिन उथळे-पाटील said...

दोन्ही अनुवाद मस्त झालेत.

अमृता प्रीतम ची मुळ कविता मला समजलीच नाही(पंजाबी भाषेत आहे ना?) पण त्याची मराठी
कविता आवडली.(आता मुळ कविता न समजल्याने तु लिहलेला अनुवाद माझ्यासाठी नवी कविता आहे.)

गुलजारच्या नम्ज साठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
(तसंही मुळात गुलजारच शब्दापलीकडचे आहेत.)
गुपचुप संततधार पाऊस.........मस्त.

मीनल said...

धन्यवाद सचिन,
अमृता प्रीतम ची कविता हिंदीमधे सुध्दा उपलब्ध आहे. त्यावरुनच अनुवाद केला आहे.
मुसलसल पानी..
मुसळधार पाणी असं हवं खरं म्हणजे, पण ’ते’ पाणी म्हटले तर मूळ लय बिघडते. आणि मुसळधार म्हटले तर ’गुपचुप मुसळधार’ हे शब्द विरुध्द वाटतात.

THE PROPHET said...

फारच मस्त!
तुला खो देऊन, मी माझ्या अनुवादपापाचं परिमार्जन केल्यागत वाटतंय!
>>रस्ते-निरर्थक म्हणणं मांडल्यासारखे
आणि गल्ल्या तर अशा की,
जसं एकाच गोष्टीला कुणी इकडे खेचतयं, कुणी तिकडे
हे मला खासकरून जाम आवडलं!
आणि गुलज़ार...काय बोलू मी...मला माझी पोस्ट एकदम समोरच्या कोनाड्यात उभ्या असलेल्या केरसुणीसारखी भासू लागली.

बाकी, तळटीपेबद्दल धन्यवाद...मी जबाबदारीमुक्त आहे! :)

सचिन उथळे-पाटील said...

अमृता प्रीतम ची कविता हिंदीमधे सुध्दा उपलब्ध आहे.

तुझ्याकडे असेल तर ताबडतोब पाठवून दे किंवा
ब्लोगवरच हिंदी कविता देखील दे.

मीनल said...

विद्याधर,

खो बद्दल आधी तुझे आभार. मुळातच सुंदर गोष्टींचं एक बरं असतं, रुपांतर वगैरे गोष्टींचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. नुसता आंबा खाल्ला काय, मॅंगो शेक पिला काय, आंबा वडी खाल्ली काय गोडी तिच राहते. इथेही मूळ कवितेची गोडीच छान वाटते आहे.
विनय पोहोचला. पण तो मान्य असावाच अशी अट नसल्याने आम्ही केरसुणीची उपमा झटकून टाकत आहोत.

सचिन,
तुला विरोप पाठवला आहे.

yog said...

Post साठी केलेले अनुमोदन सहीच आहे..
आणि दोन कवितांचा सुरेख परिचय आवडला, गुलझार विशेष!
टीप कळली नाही..;]
well, u must write such posts more-n-more...............!!!!

मीनल said...

धन्यवाद योगेश,
पण तू ज्या सहजतेने भावानुवाद करतोस त्याहून हे काहीच नाही. फरहत शहजाद यांची एक बस तू ही विशेष लक्षात राहिलेली आहे..
त्यांची आणखी एक पोस्ट मूळ कवितेसह प्रसिध्द करशील का?

आणि, टीप खरच कळली नाही? ;)

हेरंब said...

सचिन +१

माझ्या दृष्टीने ही नवीन कविताच झाली. खूप आवडली छान आहे.


शेर : नेहमीचा शब्द
नज्म : हम्म्म्म, ऐकलाय हा शब्द
उला : हे काय आनी?
सानी : हे अजून एक

या शब्दांशी इतपत ओळख असणाऱ्या माणसाने त्याबद्दल काय लिहावं. खरंच, 'उला' आणि 'सानी' हे तर मला माहितही नव्हतं.

पण

>> किती आवाज आहेत, हे लोक आहेत, गप्पागोष्टी आहेत पण

खोल मनात वेगळ्याच कुठल्यातरी पटलावर कुठेतरी

जसा गुपचुप तुझा आठव बरसत असतो.

हे जाम जाम आवडलं !!

मीनल said...

हेरंब,
मावस भाषांमधे बंगाली भाषा गोड आहे ही समजूत पंजाबी भाषेने मोडली. काही समजले नाही तरी, नुसते वाचतानाही छान लय सापडते म्हणून तशीच मूळ कविता दिली आहे.

शायरीच्या बाबतीत म्हणशील तर माझीही उडी याच्या पुढे नाही. जास्तीत जास्त शेरो-शायरी आणि नज़्मला शेंडी तुटली..
पुस्तकाच्या प्रस्तावनेत उला आणि सानी बद्दल स्पष्टीकरण वाचले. तेच इथे शेअर केले. (म्हणजे प्रस्तावनेचाही अनुवाद झाला म्हणायचा)

तुझ्या डोळ्यांचा दाह झाला नाही हे वाचून बरं वाटलं.. :)

अपर्णा said...

मीन्ये, तुझा खो मिळाला आहे..पण तुला साधारण कल्पना देते मी आणि कविता म्हणजे काला अक्षर भैस बराबर...(कविता नावाची एखादी मैत्रीण पण नाही माझी म्हंजे बगा....) पण तू आठवणीत ठेवलंस मला तर (कधीतरी) प र य त्न करेन....:)

मीनल said...

अपर्णा,

म्हशी पळवच.. :)
तुला जमणार नाही असं वाटत नाही. आम्हालाही नविन कविता वाचायला मिळेल.

Maithili said...

आई ग... :-(
मला तर खूप राग येतो असे काही झाले की...मी जीवापाड जपलेल्या गोष्टीची जर अशी कोणी नासधुस केली ना..तर संताप होतो अगदी...
मी हौस म्हणून जमवलेल्या गोष्टींचा अगदी दारुण अंत केलाय अशा काही उप्द्व्यापी मुलांनी.
रोहन दादा शी १००% सहमत...

सुहास झेले said...

अप्रतिम...कस जमत तुला गुलजार यांचे क्रियेशन मराठीत अनुवादित करायला :) तू एक नवी कविताच केलीस..
हॅट्स ऑफ :)

मीनल said...

मैथिली,
पब्लिक भलत्याच गल्लीत शिरायला लागलं, म्हणून टेंप्लेट बदललेले आहे.

सुहास,
कसंच कसंच.. गुलजार वाचण्यापेक्षा अनुभवता जास्त येतात म्हणून असेल रे.. जे काही क्रेडिट असेल ते गोज टू हिम.