Saturday, November 20, 2010

अंजिर फिरनी

अंजिर फिरनी

साहित्य:-

दूध-१ लिटर,
बासमती तांदूळ- ४ चमचे,
साखर- ५ चमचे,
अंजिर- १
काजू- १०,१२
पिस्ता, बदाम- ८,१०
वेलदोडे- ३

(चमचा-मोठा टे.स्पून)


कॄती-

प्रथम तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. नंतर खरबरीत वाटून घेऊन अर्धा वाटी पाणी घालून ठेवावे.
अंजिर बारीक तुकडे करुन अर्धा वाटी दूधाबरोबर मिक्सर मधून काढावे. त्याची थोडी पेस्ट होईल, थोडे तुकडे तसेच राहतील. हे वाटीभर मिश्रण तसेच बाजूला ठेवावे.
काजू, पिस्ता, बदाम चिरुन ठेवावे. साधारण अर्धा चमचा पूड होईल इतके वेलदोडे कुटून ठेवावे.
शक्यतो नॉनस्टीक भांड्यात दुध तापत ठेवावे. त्याला उकळी आल्यानंतर तांदूळ दूधात घालावेत. नंतर साखर, वेलची पावडर घालावी. ती विरघळल्यावर काजू, बदाम, पिस्ते घालावेत. मंद आचेवर मिश्रण सतत ढवळावे. सर्वात शेवटी अंजिर पेस्ट घालावी. ५ मिनिटे किंवा साधारण दाट होत आले की गॅस बंद करावा. फिरनी थंड होत आली की आणखी थोडी आळते. अशी दाट खीर वरुन थोडे काजू घालून वाढावी.टीप-
अंजिर ऎवजी स्ट्रॉबेरी किंवा दूधाबरोबर सूट होणारी इतर फळे घालूनही छान लागते. स्ट्रॉबेरी वापरताना बारीक तुकडेच करावेत. मिक्सरमधून काढू नये.
साखरेचे प्रमाण इथे कमी घेतले आहे कारण अंजिराचाही गोडवा त्यात अधिक होतो. फळानुसार साखर कमी जास्त करावी.

Tuesday, November 2, 2010

अशांतीच कार्टं

भारतने ओरिगामी हंसाची लिंक दिली आणि नव्या छंदाला सुरवात झाली. यासाठी ४८४ लहान त्रिकोण दुमडावे लागत होते. दोन दिवसातच घरभर कागदाचे कपटे पसरले. घरच्या मंडळींच्या कोणतेही टेबल रिकामे न ठेवल्याच्या कुरकुरीकडे साफ दुर्लक्ष करुन हे काम पूर्ण करणे थोडे ट्रिकी आहे. मग जसे त्रिकोण पुर्ण होतील, तसे जोडायला सुरवात केली. पाच-सहा दिवसांत झाला एकदाचा पूर्ण तो हंस! मग ’इथे नको तिथे ठेव, त्याच्या मानेला हात लावू नकोस, उंच जागी ठेव’ असली इतरांवर माझी दमदाटी सुरु झाली. दमदाटी संपायला एक कारण घडले आणि काही दृष्टीकोनही बदलले.

पूर्वकल्पना न देता गडबडीच्या वेळी, किंवा वेळ काढायला, अचानक चाल करुन येणारी बरीच मंडळी आहेत. अशाच एका आख्ख्या कुटुंबाला आम्ही भितो.. वाट फुटेल तिथे (दोनच वाटा आहेत) पळून गेलेल्या मंडळींपैकी जो बाहेरच्या खोलीत उरेल, त्याने त्यांना तोंड द्यायचे असा अलिखित नियम आहे. (मी ९०% वेळा माडीवर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे) तर, त्या दिवशी आम्ही संध्याकाळी बाहेर पडणारच होतो तोपर्यंत ती मंडळी घरी आली. पैकी दोन लहान मुलांनी काही मिनिटांतच मोठ्या आवाजात भांडणं करण्यास सुरवात केली. त्यांच्या आरडाओरडीकडे यत्किंचित लक्ष न देता, बाईंनी त्याहून मोठ्या आवाजात गप्पा मारण्यास सुरवात केली. नुकतीच व्यवस्थित लावलेली, साडीतल्या हेमामालिनी सारखी दिसणारी खोली नजरेसमोर आली, आणि आता बाहेर गेल्यावर तिची अवस्था शमिता शेट्टी पेक्षाही (हो, ही नटी आहे) गईगुजरी झाली असणार याची खात्रीच पटली.

" अरे, अशा उश्या फेकू नकोस, कोचवर नाचू नकोस. " आमच्याच घरातल्या व्यक्तीचा केविलवाणा आवाज ऎकू आला.
" आणि तो हत्तीचा शो पीस ओढू नकोस तुटेल, नाजूक आहे, दिल्लीहून..." तो शो पिस आणणार्‍या व्यक्तीचे पुढचे शब्द हवेतच विरुन गेले. मुलांबरोबर आलेल्या बाई नक्की तिथेच आहेत ना, याची खात्री करुन घ्यावी आणि जमलं तर एखाद्याच्या पाठीत धपाटा मारता आला तर पहावा म्हणून मी जाणार एवढ्यात बाईंचा आवाज आलाच,
" ए, ऎकले ना त्यांनी काय सांगितले ते? पिल्लू गं माझं.. जा खेळ जा! तर, मी काय म्हणत होते...."
मुलांनी नव्या उत्साहाने मोडतोडीस आपलं, खेळण्यास प्रारंभ केला. दृष्टीआड सृष्टी नात्याने, मी लपून असले तरी, येणार्‍या आवाजाला कोणतीच भिंत रोखू शकत नव्हती.

" माला हे पायजे, माला ते पन पायजे "

" मी राक्षस आहे, मी तुला खानार "

लहान मुलाला स्वतःची ओळख एवढ्या लवकर कशी पटली याचे नवल करेपर्यंत एक वाक्य कानावर आले आणि एकदम काहीतरी लक्षात आले.

" हे काय कागदाचं आहे ? "

दोन दिवसांपूर्वी ओरिगामी हंस किरकोळ दुरुस्तीसाठी टेबलावर ठेवला होता. त्या मुलाने त्यावर झडप घातलेला, हंस खाली पडलेला आणि मुलाच्या खिदळण्याचा आवाज तेवढा ऎकू आला. माझ्या आईचे संतापाने त्याला काही बोललेलेही ऎकू आले. एक आठवडा खपून तयार केलेले सगळे विस्कटून गेले. अगदीच रहावले नाही म्हणून मीही बाहेर गेले. आणि पसरलेले तुकडे गोळा करु लागले.

"तू आहेस होय घरी? मला वाटलं, बाहेर गेलीस की काय? अगं, ते त्याला सांगेपर्यंत तुटलंच! "- बाई.

बाईंचा मुलांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न मला मुळीच आवडला नाही. कुणाला काही वाटण्याची पर्वा न करता त्या मुलाला समोर बोलवून मी ५ मिनिटे रागावून बोलले. त्या बाईंना ते आवडले नसावे, त्यांनी काढता पाय घेतला.. पण लपून बसण्यापेक्षा हे पुष्कळ बरे होते. प्रश्न फक्त ती वस्तू तुटण्याचा नव्ह्ता. मुले दंगा करणारच, काही मोडतोड करणारच! आपल्या सर्वांच्याच घरी लहान मुले असतात. पण इतकी विध्वंसक मुले आणि त्याहूनही त्यांना काहीही न बोलता, सांगता त्याकडे कौतुकाने बघत बसणारी वडील माणसे आश्चर्यचकित करतात. बरे, मुलांना आपण काही सांगावे तर त्यांना आवडत नाही.
असो, यातूनही चांगल्या गोष्टी घडल्या म्हणजे, मला परत नविन हंस बनवता येईल आणि तो मुलगाही मला टरकून असेल. :)

त्याच्यानिमित्याने तरी, बोळा निघाला आणि अक्षरे वाहती झाली.

********************************************************************

आपल्या सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!