Tuesday, November 2, 2010

अशांतीच कार्टं

भारतने ओरिगामी हंसाची लिंक दिली आणि नव्या छंदाला सुरवात झाली. यासाठी ४८४ लहान त्रिकोण दुमडावे लागत होते. दोन दिवसातच घरभर कागदाचे कपटे पसरले. घरच्या मंडळींच्या कोणतेही टेबल रिकामे न ठेवल्याच्या कुरकुरीकडे साफ दुर्लक्ष करुन हे काम पूर्ण करणे थोडे ट्रिकी आहे. मग जसे त्रिकोण पुर्ण होतील, तसे जोडायला सुरवात केली. पाच-सहा दिवसांत झाला एकदाचा पूर्ण तो हंस! मग ’इथे नको तिथे ठेव, त्याच्या मानेला हात लावू नकोस, उंच जागी ठेव’ असली इतरांवर माझी दमदाटी सुरु झाली. दमदाटी संपायला एक कारण घडले आणि काही दृष्टीकोनही बदलले.

पूर्वकल्पना न देता गडबडीच्या वेळी, किंवा वेळ काढायला, अचानक चाल करुन येणारी बरीच मंडळी आहेत. अशाच एका आख्ख्या कुटुंबाला आम्ही भितो.. वाट फुटेल तिथे (दोनच वाटा आहेत) पळून गेलेल्या मंडळींपैकी जो बाहेरच्या खोलीत उरेल, त्याने त्यांना तोंड द्यायचे असा अलिखित नियम आहे. (मी ९०% वेळा माडीवर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे) तर, त्या दिवशी आम्ही संध्याकाळी बाहेर पडणारच होतो तोपर्यंत ती मंडळी घरी आली. पैकी दोन लहान मुलांनी काही मिनिटांतच मोठ्या आवाजात भांडणं करण्यास सुरवात केली. त्यांच्या आरडाओरडीकडे यत्किंचित लक्ष न देता, बाईंनी त्याहून मोठ्या आवाजात गप्पा मारण्यास सुरवात केली. नुकतीच व्यवस्थित लावलेली, साडीतल्या हेमामालिनी सारखी दिसणारी खोली नजरेसमोर आली, आणि आता बाहेर गेल्यावर तिची अवस्था शमिता शेट्टी पेक्षाही (हो, ही नटी आहे) गईगुजरी झाली असणार याची खात्रीच पटली.

" अरे, अशा उश्या फेकू नकोस, कोचवर नाचू नकोस. " आमच्याच घरातल्या व्यक्तीचा केविलवाणा आवाज ऎकू आला.
" आणि तो हत्तीचा शो पीस ओढू नकोस तुटेल, नाजूक आहे, दिल्लीहून..." तो शो पिस आणणार्‍या व्यक्तीचे पुढचे शब्द हवेतच विरुन गेले. मुलांबरोबर आलेल्या बाई नक्की तिथेच आहेत ना, याची खात्री करुन घ्यावी आणि जमलं तर एखाद्याच्या पाठीत धपाटा मारता आला तर पहावा म्हणून मी जाणार एवढ्यात बाईंचा आवाज आलाच,
" ए, ऎकले ना त्यांनी काय सांगितले ते? पिल्लू गं माझं.. जा खेळ जा! तर, मी काय म्हणत होते...."
मुलांनी नव्या उत्साहाने मोडतोडीस आपलं, खेळण्यास प्रारंभ केला. दृष्टीआड सृष्टी नात्याने, मी लपून असले तरी, येणार्‍या आवाजाला कोणतीच भिंत रोखू शकत नव्हती.

" माला हे पायजे, माला ते पन पायजे "

" मी राक्षस आहे, मी तुला खानार "

लहान मुलाला स्वतःची ओळख एवढ्या लवकर कशी पटली याचे नवल करेपर्यंत एक वाक्य कानावर आले आणि एकदम काहीतरी लक्षात आले.

" हे काय कागदाचं आहे ? "

दोन दिवसांपूर्वी ओरिगामी हंस किरकोळ दुरुस्तीसाठी टेबलावर ठेवला होता. त्या मुलाने त्यावर झडप घातलेला, हंस खाली पडलेला आणि मुलाच्या खिदळण्याचा आवाज तेवढा ऎकू आला. माझ्या आईचे संतापाने त्याला काही बोललेलेही ऎकू आले. एक आठवडा खपून तयार केलेले सगळे विस्कटून गेले. अगदीच रहावले नाही म्हणून मीही बाहेर गेले. आणि पसरलेले तुकडे गोळा करु लागले.

"तू आहेस होय घरी? मला वाटलं, बाहेर गेलीस की काय? अगं, ते त्याला सांगेपर्यंत तुटलंच! "- बाई.

बाईंचा मुलांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न मला मुळीच आवडला नाही. कुणाला काही वाटण्याची पर्वा न करता त्या मुलाला समोर बोलवून मी ५ मिनिटे रागावून बोलले. त्या बाईंना ते आवडले नसावे, त्यांनी काढता पाय घेतला.. पण लपून बसण्यापेक्षा हे पुष्कळ बरे होते. प्रश्न फक्त ती वस्तू तुटण्याचा नव्ह्ता. मुले दंगा करणारच, काही मोडतोड करणारच! आपल्या सर्वांच्याच घरी लहान मुले असतात. पण इतकी विध्वंसक मुले आणि त्याहूनही त्यांना काहीही न बोलता, सांगता त्याकडे कौतुकाने बघत बसणारी वडील माणसे आश्चर्यचकित करतात. बरे, मुलांना आपण काही सांगावे तर त्यांना आवडत नाही.
असो, यातूनही चांगल्या गोष्टी घडल्या म्हणजे, मला परत नविन हंस बनवता येईल आणि तो मुलगाही मला टरकून असेल. :)

त्याच्यानिमित्याने तरी, बोळा निघाला आणि अक्षरे वाहती झाली.

********************************************************************

आपल्या सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

31 comments:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

असेपण काही नमुने असतात, आपल्यालाच मग फ्रंट फुटावर येवून त्यांना झापायला लागत, असो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा _()_()_

Ajay Sonawane said...

:-) अक्षरे वाहती झाली...मस्त !!!

मुक्त कलंदर said...

मीनल असल्या कार्ट्यांना त्यांच्या आईबापासमोर कान धरून समजवावं लागतं.. कारण मला आठवत अशा कार्ट्यांनी माझा १००० पांढऱ्या गोट्यांचा संग्रह साफ केला होता..

मुक्त कलंदर said...

मीनल असल्या कार्ट्यांना त्यांच्या आईबापासमोर कान धरून समजवावं लागतं.. कारण मला आठवत अशा कार्ट्यांनी माझा १००० पांढऱ्या गोट्यांचा संग्रह साफ केला होता..

मीनल said...

स्वागत प्रसिक,
हो ना, आपणच त्यांना बोलण्यावाचून पर्याय नसतो. त्यांच्या बरोबरचे नुसते बघत असतात..

मीनल said...

अजय,
तूही काही अक्षरे वाहती करावीस.. :)

मीनल said...

भारत,
तुला कल्पना आहेच, परत जोडता येईलही ते, पण जाता जाता ती बाई म्हणाली, ’काय, व्हायचच! इलाज नाही’
इलाज होता तो वेळेवर केला नाही म्हणूनच असे झाले आहे.. इतरही नासधूस झाली होती त्याबद्दल काडीची खंत नाही, की मुलाला दटावणे नाही.

Anonymous said...

मस्त लेख !
लहानपणी आम्हीही-मी आणि मंदार खुप दंगा करायचो पण लोकांना त्रास होईल असा नाही. असली 'माकडं' घरी घरी आली की एक हुकमी एक्का आहे आमच्याकडे - त्या मुलाचा नाकाचा शेन्डा चिमटीत धरून 'नाजूक' चिमटा काधायचा .. अगदी गुपचूप ! ... :)

Anonymous said...

खूप मेहनत लागते ग तो हंस बनवायला..तो असा तुटताना बघून तुला कस वाटला असेल :(

असो, आता परत नाहीत येणार तुझ्या वाटेला ती कार्टी, परत बनव...दिवाळीच्या खूप खूप खूप शुभेच्छा :)

अपर्णा said...

कुठे गेल्यावर जर माझ्याच मुलाने अस केलं तर मला किती लाज वाटेल असं विचार पहिल्यांदी मनात येतो आणि असे निर्ढावलेले पालक पहिले की नवल वाटते.....
आता तो बोळा फेकून दिला असशील आणि स्वत:च्या (आणि अर्थात इतर ब्लॉगरच्याही ) ब्लॉगवर अक्षरे फिरती राहतील अशी आशा....बाकी कुणी स्वत:ला गटणे म्हणताय म्हणजे....:)

रोहन चौधरी ... said...

नुकतीच व्यवस्थित लावलेली, साडीतल्या हेमामालिनी सारखी दिसणारी खोली नजरेसमोर आली, आणि आता बाहेर गेल्यावर तिची अवस्था शमिता शेट्टी पेक्षाही (हो, ही नटी आहे) गईगुजरी झाली असणार याची खात्रीच पटली.... >>> मीनल कैच्याकै भारी!!! :D

आणि हो लहान मुलांना धाक असायलाच हवा... मारायची गरज नसते पण शाब्दिक धाकात ठेवता येते किमान काही वर्षे तरी... :D

मीनल said...

सोमेश,
खेळ,दंगा या बालपणाच्या बरोबरीने वावरणार्‍या गोष्टी आहेत. पण तू म्हणतोस तसं, दुसर्‍याला त्रास होऊ शकतो ही संकल्पना काही मुलांच्याच काय, पण मोठ्यांच्याही गावी नसते.
तुझा जालिम उपाय, आता अमलात आणेन ;)

मीनल said...

सुहास,
हो रे, खूप वाईट वाटलं.. मी रात्री उशीरापर्यंत जागून तो पूर्ण केला होता. :(
आता ती माझ्या वाटेला आली तरी, सोमेशचा उपाय आहेच की!
तुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

मीनल said...

अपर्णा,
नव्वद टक्के मुलं निरागसतेनं किती सहज गोड वागतात! पण ही अशी अति लाडावलेली मुले आणि पालक खरंच डोक्यात जातात. आणखी एका ओळखीच्या गृहस्थांची मुलगी त्यांच्या हातातील घड्य़ाळ काढून जमिनीवर जोरजोरात आपटत होती. तिने माझ्याकडे मोर्चा वळवल्यावर मी काढता पाय घेतला. ;)
अगं आपण सगळेच ’त्यांचे’ भक्त.. पर्यायी गटणेच!

मीनल said...

रोहन,
एका तासाने ती खोली खरचं अस्ताव्यस्त, कशाचाही धरबंध नसलेली पर्यायी श.शे सारखीच दिसत होती.. :)
तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, मारायची गरजच नसते पण शाब्दिक धाक हवा.. निदान कुणी सांगत असेल तर ऎकायला हवे.. काही वर्षे तरी! :D

Gouri said...

मीनल, त्या हंसाचा फोटो बघून कल्पना आली किती मेहनतीचं काम असणार हे याची. इतकं मन लावून काही बनवावं आणि कुणीतरी धसमुसळेपणाने त्याची नासधूस करावी याचा किती त्रास झाला असेल याची कल्पना आली :(

Maithili said...

आई ग... :-(
मला तर खूप राग येतो असे काही झाले की...मी जीवापाड जपलेल्या गोष्टीची जर अशी कोणी नासधुस केली ना..तर संताप होतो अगदी...
मी हौस म्हणून जमवलेल्या गोष्टींचा अगदी दारुण अंत केलाय अशा काही उप्द्व्यापी मुलांनी.
रोहन दादा शी १००% सहमत...

Anonymous said...

मीनल कठीण आहे गं!!!

नाही जमत गं आपल्याला असे रागावणे आणि या मुलांचे आई-वडील शांत पाहून आणि तगमग होते....

मीनल said...

गौरी,
नासधूस झालेली पाहून त्रास तर झालाच, पण त्यावर पालकांच्या कौतुक करण्याने जास्त त्रास झाला..

मीनल said...

मैथिली,
हो गं, कसंसच वाटतं.. वस्तू आपल्याच असतात म्हणूनही नाही म्हणत मी.. एकदा त्यांच्याच घरात त्यांच्याच पुस्तकांचा जिना करुन त्यावर हाच मुलगा नाचत होता, पाने फाटत होती, पुस्तके घाण होत होती आणि ’बाई’ कौतुकाने पहात होत्या..

मीनल said...

तन्वीताई,
हो गं, आपण कसे त्यांना काही सांगणार? तगमग होते खरी!

yog said...

दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा..

yog said...

post करायला छान break down मिळाला ..मस्तच..

हेरंब said...

खरंच कम्माल आहे अशा आईबापांची... या सगळ्या बाबतीत बिचार्‍या पोरांची काहीच चूक नसते. सगळं अवलंबून असतं ते त्यांच्या पालकांवर. काय केलं की आपले आई-बाबा ओरडतात आणि काय केलेलं त्यांना चालतं या असल्या गोष्टी पोरं फार पटकन शिकतात. पण या अशांतीच्या कार्ट्याला या अशांती-बाई कधीच रागवत नसणार.. आमच्या आजूबाजूला पण बरीच उदाहरणं बघतो अशी. अपर्णा म्हणते त्याप्रमाणे माझ्या पोराने हे असलं काही कधी चुकून जरी केलं तर मला असली लाज वाटेल ! तिथल्या तिथे दोन फटके खाईल तो माझ्या हातचे..

तुझा हंस मोडला याचं वाईट वाटतंच पण अक्षरं वाहती झाली याचा आनंदच आहे. :)

मीनल said...

धन्यवाद योगेश! :)

मीनल said...

हेरंब,
हो रे, मला त्या मुलाचा नाही, अशांती बाईचाच राग आला होता.. चालायचंच!
रच्याक, हंसाच्या आता मिसेस हंस पण आल्या आहेत.. :)

आनंद पत्रे said...

छ्या! मुर्खपणा त्या पालकांचा.. तुझी मेहनत फुकट गेली उगाच... मी तर नक्की फटके दिले असते त्यांना काय वाटायचं ते वाटो... तू बरीच सहनशील आहेस...

दिवाळीच्या (उशीराने) शुभेच्छा...
(तुळशीच्या लग्नापर्यंत व्हॅलिडीटी असते असं आपणंच जाहीर केलंय ;) )

मीनल said...

आनंद,
मी तर फटके दिलेसुध्दा! (मनातल्या मनात)
तुलाही (डबल)शुभेच्छा!

THE PROPHET said...

ही पोस्ट कशी सुटली नजरेतून ठाऊक नाही. फिरनीच्या निमित्तानं इथे फिरनं (मुद्दाम लिहिलंय) झालं.
अशी 'आवरा' मुलं असतातच, ज्यांना योग्य वेळी न 'आवर'ल्यानं ती अनावर झालेली असतात. पण बरेचदा भिडस्तपणामुळे आपण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतो..
असो..चांगलंच केलंस...त्याला आवरून आणि ब्लॉग जागा करून...

मीनल said...

हाहा,
इथे फिरकलास ते बरं झालं! :)
हो ना, एवढी आवरा आवरी केलेली आवरामुलाने विस्कटली.. जाऊ दे! अजून आला नाहीये घरी!

Yashodhan Walimbe said...
This comment has been removed by the author.