Friday, December 3, 2010

क्षणमात्र

वेळ तशी रहदारीची होती पण तो रोड फारसा गजबजलेला नव्हता. नसतोस बरेचदा! घरी जाताना नकळत वेग वाढलेला..मुख्य रस्त्याला थोड्या अंतराने दोन फाटे फुटतात त्यातल्या पहिल्या फाटयातून रहदारीच्या सर्व नियमांना फाटा देवून एक गाडी, बहुदा बोलेरो, जोरात वळण देऊन पुढे गेली. गाडीतल्या डॅशबोर्डवरचा छोटा टेडी आणि अंगावर येणारा करडा रंग मला स्मरतो. क्षणाचा अर्धा, पाव जो काही भाग असेल त्यात एक विचित्र जाणीव इतकी तिव्रतेने झाली, की तो लहानसा काळही तासभर घडत असल्यासारखा वाटला. मृत्यूची भिती असेल, अनपेक्षित गोष्टीचा धक्का असेल, इतक्या वेळेत नक्की काय करायचे न सुचून आलेली हतबलता असेल.. मी पडले नव्हते, पण काहीतरी मोठे घडल्यासारखे वाटत होते. थोडी थरथर थांबली, तेव्हा समोर पाहिले तो, पुढे जाऊन काही अंतरावर ती गाडी थांबली होती. मी जिवंत आहे व हालचाल करीत आहेसे पाहून पुढे निघून गेली. मला त्याला गाठून भांडायची ताकतच नव्हती. जाऊ दे, म्हणून तशीच घरी आले.

काल, दिवसभराच्या शेवटच्या उजळणीत तो प्रसंग आला आणि मनातल्या मनात काही अ‍ॅनालिसिस सुरु झाले. एखाद्या क्षणार्धात एवढा वेळ असेल असे कधी वाटले नव्हते. ’तो क्षण युगासारखा भासला ’, ’रात्र सरता सरत नव्हती ’, ’काळ थांबून राहिला होता ’ वगैरे वाक्ये पुस्तकात लय भारी वाटतात. तसे होते म्हणजे नक्की काय कधी समजले नव्ह्ते. हाही क्षण म्हणजे हीच वाक्ये असेही नाही पण बरिचशी जवळपास.. होय असंच काहीसं..

त्या अर्ध्या क्षणाचे आणखी तुकडे केले तर प्रत्येक तुकडा काही आठवणींचा होता. मला घर आठवले, काही काळज्या आणि एक मैत्रिण! स्पष्ट, लख्ख आठवण नाहीच म्हणता येणार, पण एखाद्या कडक शिस्तिच्या शाळेत मुलांची रांग लावताना पहिल्या मुलाला उभं केल्यावर मागच्यांनी आपोआपच पटापट मागे उभं रहावं, तशीच काहीशी , आठवणींची रांग! नुसते संदर्भ होते. स्प्ष्टीकरण मी मागाहून घुसडलं :)

परतीच्या वेळेत मला आठवला तृप्तीचा अपघात! तो खूपच वेदनादायी होता. नंतर महिनाभराच्या विश्रांतीसाठी ती इकडेच आली होती. तिचा हात प्लॅस्टरमधे होता, व्यवस्थित उपचार झाले होते. आठवड्याभरापूर्वीच्या अपघाताचे वर्णन सांगताना तेच ते प्रश्न उत्तर चालू होतं.. कधी, कुठे, कसं?? ट्रॅफिकचा काय भरवसा नाही वगैरे.. सगळी प्रश्नोत्तरे झाल्यावर ती माझ्याकडे आली. "काय म्हणतीस?" नेहमीचा सूचक प्रश्न टाकून झाल्यावर सूचक हसली. (या प्रश्नात आणखीही बरेच प्रश्न दडलेले असतात)
"खूप दुखतं आहे का गं?"

"आत्ता नाही, पण तेव्हा.. मला जाणवत होतं, आपलं हाड फ्रॅक्चर झालयं.. आणि हॉस्पिटलमधे ऑपरेशनपूर्वी तात्पुरतं प्लॅस्टर घालताना तर.. प्रचंड.. ब्रह्म आठवलं गं मीनू "
तिच्या काळ्या काळ्या डोळ्यात त्यावेळेच्या वेदनेचं पाणी आलं. तिला तो क्षण परत जागवून दिल्याबद्दल मला खूप अपराधी वाटलं. मग मात्र एकही प्रश्न न विचारता टिपी करत तिच्या हातावर झोकदार सही करुन शल्य कमी करण्याचा मी प्रयत्न केला.

तिला एका क्षणाचं जे ब्रह्म आठवलं, ते वेदनेच होत. माझ्या एका क्षणात आठवलेल्या ब्रह्माचा संदर्भ केवळ भितीशी होता का? माहित नाही...

विकल्या न गेलेल्या फुग्यांच्या एकत्र गाठी बांधून संध्याकाळी कुणी फुगेवाला सायकलवरुन परत जावा, आणि त्याच्यामागे हाss मुलांचा घोळका गलबल करत जाव तसं काहीसं झालं.. संध्याकाळच्या उजळणीत अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या गोष्टीही घोळका करुन कलकलाट करत आल्या. हेही आठवलं की प्लॅस्टर उतरवून आता तिला एक महिना होईल. आपण साधा फोनही केलेला नाही..

" मग, आणि काय म्हणतीस?"

तिचा फोनवरचा निरोप, सुरवातीच्या प्रश्नासारखाच असतो. तिला खूप आनंद झालेला दिसला.

"सांगते ना, येशिल तर खरं! जपून रहा गं.."

त्या एका क्षणाच्या नंतर शेपट्या फारच वाढल्या पण त्यामुळे जे मंथन झालं, ते नक्की लिहिता येणार नाही. आपल्या बाबतीत घडणार्‍या अघटिताचा आपण असा कितीसा विचार करतो? आणि का करावा? माहिती नसतं काय होणार आहे म्हणूनच ’अनपेक्षित’ शब्द वापरतात ना! पण असे काही प्रसंग दैनंदिन कामाच्या घोळात कुठेतरी लपून बसलेल्या महत्वाच्या गोष्टींना बाहेर ओढून काढतात. किंबहुना त्यासाठीच ते अनपेक्षितरित्या घडत असावेत का?  
हे फारसं लॉजिकल नाहीये, पण असंच होत असावं..

17 comments:

THE PROPHET said...

विचारांची साखळी कुठून कुठे नेऊ शकते...आणि त्यातही कधीकधी एखादी घटना स्वतःच्याच आतमध्ये डोकावायला भाग पाडते आणि आपल्याला अचानक काहीतरी वेगळंच गवसतं. छान!

माऊ said...

खुप सुंदर सहज लिहिले आहेस मीनल तु..कळत नकळत बरच काही आठवुन गेलं..

मीनल said...

विद्याधर,
वैचारीक साखळ्या आणि योगायोग खरचं, कुठे नेतिल सांगता येत नाही. ते जे वेगळं गवसत, ते त्यावेळी दिसत नसत हेच आश्चर्य आहे.

मीनल said...

माऊताई,
थॅंक्स गं.. बरच काही तुटक आहे पण तुला आवडले वाचून बर वाटलं.. :)

सचिन उथळे-पाटील said...

अगदी खर,
लॉजिकल नसल तरी....
असे बरेचसे क्षण येतात ज्यामुळे घडलेल्या घटनांची साखळी नजरेसमोर येते.

*पोहायला शिकल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा विहिरीत वरून उडी मारली तेव्हाही पाण्यात असच एकामागे एक बरच काही आठवल होत.

भानस said...

क्षणात भूईवर क्षणात आकाशी... हे असच वेड्ं कठेही भरकटवत नेत बघ... त्यामुळेच डोळ्यासमोर किती काय आणि किती माणसेही तरळून गेली ना... :)
मीनल,मंथन आवडलं.

हेरंब said...

मीनल, आठवणींतचे तुकडे छान वेचले आहेस.. आवड्या !

मीनल said...

सचिन,
खरंय, पुरेसे स्पष्ट नसले तरी, बरेच विचार एकदम मनात येतात कधीकधी..
विहिरीतली उडी आवडली.. :)

मीनल said...

श्रीताई,
थॅंक्यू गं,
हो, डोळ्यासमोर बरेच काही तरळून गेले. मागाहून जोडलेलं स्पष्टीकरण उगाच आहे, पण तरीही.. :)

मीनल said...

हेरंब,
धन्यवाद रे!
(माझा जीव वाचला हेच मला आवड्या! :))

अपर्णा said...

मीनल खरच आठवणीचे तुकडे खूप छान वेचले आहेस...काल परवाच लेन बदलताना माझा blind spot पहायचा राहिला नशीब मागचा सावध होता....एक हॉर्न खाल्ला पण जीव वाचला...तू आठवण करून दिलीस.....

आनंद पत्रे said...

.

मीनल said...

Aparna,
thodkyat vachalyane kase vatte, samju shakte.. ;)

मीनल said...

Anand,

BHAPO.. :)

Yogesh said...

नकळत बरच आठवुन गेलं...आवड्या

मीनल said...

योगेश,
खूप आभार!

Anonymous said...

भन्नाट.. विचारांचा वेग प्रकाशापेक्षा कितीतरी जास्त असतो ना..