Tuesday, March 15, 2011

पडद्यामागचा पडदा

माध्यम हा एक अजब प्रकार आहे. जो केमिस्ट्रीमधे वापरतो आणि मानवी नातेसंबंधामधेही!मला एक फार गोड माध्यम मिळाले काही दिवसांपूर्वी! कर्नाटकातल्या एका लहानशा गावी जाणे झाले. मी बर्‍याच वर्षांपूर्वी आणि एक दोनदाच तिथे गेले असेन. आईच्या माहेरचे दुसरे गाव. तिथला मोठ्ठा वाडा आठवायचा मलाही अधून मधून.. धुळीने भरलेल्या निमुळत्या वाटेवरुन आणि निळी बस आली की मुकाट्याने रस्त्याबाहेर जाऊन थांबण्याची कसरत करत आम्ही पोहोचलो. वाटेत जरा मोकळे रान दिसले, की ’हा बाळोबाचा माळ! इथे रात्री भुते येतात असे आम्हाला सारुक्का सांगायच्या लहानपणी!’ इथून स्टोरीला सुरवात झाली. नंतर आधीच्याहून मोठे आणि वैराण असे तीन माळ आम्ही मागे टाकले आणि प्रत्येक वेळी आधीचा बाळोबाचा नव्हे हाच तो! हे कन्फर्म होत गेले. तिसर्‍या आणि शेवटच्या माळावर कुणीही वाद घातला नाही आणि तिथेच येऊन भुते नाचतात यावर शिक्कामोर्तब झाले.
’इथून वळून सरळ आलं लगेच!’ मधल्या ’लगेच’चा अर्थ दिड तास हे लवकरच कळून चुकले. दिड तासात शक्य तितकी धूळ आणि उन खात आम्ही मुक्कामापर्यंत पोहोचलो. फारसं काही बदललेलं नव्हतं. सरकारी योजना तळागाळात जाऊन जितके बदल करता येणं शक्य होतं तितकच! तोच रस्ता, निमुळता, रस्ता नसलेला रस्ता.. समोर वाडा.. या वेळी वाडा थोडा भकास वाटला. आम्ही आत गेलो.

थोडा वेळ गेल्यावर आजूबाजूचे बदल टिपत आईच्या गप्पा सुरु झाल्या. इथे आम्ही हे करत होतो, तिथे ते खेळत असायचो.. वगैरे.. घर दाखवताना मधल्या लहान सोप्यापाशी आलो. तिथे गौरी बसायच्या म्हणे! त्यांना करत असलेल्या कमानीची उंची हाताने दाखवत ती भराभर दारं उघडत आत गेली. काहीतरी शोधत, ते तिथे आहे का चाचपडत असल्यासारखी! काही गोष्टी मिळाल्या असतील.. बर्‍याच दिसल्या नसतील.

"हे आज्जीच कपाट! अजूनही आहे; लाकडी आणि मजबूत!"

ते पिवळट लाकडी कपाट, अडगळीत जाण्याच्या मार्गावर असलेलं.. तोंडावर भलमोठं कुलुप घेऊन कोपर्‍यात तिरकं बसल्यासारखं.. कधी आज्जीच्या बर्‍याच गोष्टी पोटात दडवल्या असतील त्याने! आकडे, मेणाचं कुंकू, हस्तिदंती पिना, नऊवारी कडक पोताच्या साड्या, क्वचित सोन्या-चांदीच्या वस्तूही.. घरातल्या मुली परकरात होत्या तेव्हाच एकदम नऊ बाळकृष्ण आणले होते म्हणे तिने.. सख्खं, चुलत वगैरे काही न मानता, सगळ्या मुलींचे जे असेल ते एकदमच! मुलांच्याही काही गोष्टी कधी दडल्या असतील त्यात! जमवलेल्या बिट्ट्या, गोटे, हातातले नाजूक कांकण.. आवडते पुस्तक किंवा लहान भावासाठी खाऊ!

"ही लहान खिडकी म्हणजे आमची हेरगिरी करण्याची जागा.. बाहेरचं सगळं दिसायच इथून.. पण बाहेरुन आत काहीच नाही.. चिकाचा पडदा असल्यासारखं!"

त्या खिडकीला आता जळमटांनी वेढले आहे. प्रयत्न करुन बघूयात म्हटले तरी, आतून आता बाहेर काही दिसणार नाही. बाहेरुन मात्र विणकाम करुन भरलेला मोर वरती लावलेला दिसतो.

"इथे आत्ता नुसती मोकळी जागा आहे, पण जुनं स्वयंपाकघर इथेच होतं. आणि सकाळची न्याहरी, पंगत इथेच असायची. आम्ही सगळे एकत्र..."

'एकत्रनंतरची पाच सेकंदांची इनोसंट गॅप मोठी आहे आणि उदास आहे.

"आणि हे देवघर! इथे रोज परसातल्या फुलांचा ढीग असायचा. आणि शेजारी हा लोण्याचा खांब"
"लोण्याचा? कुठे ते? काय ते?"
"म्हणजे ताक घुसळायचा खांब. तुझी आज्जी इथे ताक घुसळून झाल्यावर थोडे लोणी काढून या खांबाला लावून ठेवायची आणि मग नंतर ते लोणी खाण्यासाठी आम्ही ती जाण्याची वाट बघत बसायचो. तिने जास्तित जास्त लोणी खांबाला लावावे असे आम्हाला वाटायचे!"

तो सुबक नक्षिदार खांब अजूनही तुपकट होवून चमकतोय असं वाटलं. देवघरा शेजारीच त्याची जागा आहे.
"आणि मागे पाहिलंस का? खूप मोठ्ठी जागा आहे, म्हणजे होती.. आता काय झालंय कुणास ठाऊक!"

वाड्यामागची मोठ्ठी जागा मलाही आठवत होती.. संध्याकाळी सातनंतर तिथे भूत येते असं काहीस आमच्या मनावर ठसवण्यात आलं होतं मग खेळ अर्धवट सोडून आत यावे लागायचे.

"अग्गोबाई, चाफा आहे तसाच आहे, चैत्रात या चाफ्याची फुले वाहतात. आपल्या मळ्यातला लाल चाफा, तसा हा पांढरा चाफा! आणि ती बटणगुलाबाची फुले, आणि अबोली, मिरचीची रोपं.."

दिसेल त्या सगळ्या सोयर्‍यांना नावाने हाका मारुन झाल्या. त्यांचा ही पोहोचला असेल तिच्यापर्यंत!

"इथे कुठेतरी खरं का खोटं आज्जीचे घर होते ना आई?"
"हो.. तेच ते लहान खिडकी दिसतेय ते घर"
जवळच राहणार्‍या आज्जी.. प्रत्येक दोन वाक्यांनंतर त्यांना खरं का खोटं?’ असं विचारायची सवय होती.. त्याच नावाने त्या ओळखल्या जायच्या. लांबलचक असलं तरी बाकी मंडळींनी किंवा आम्ही त्यांचे पेट नेम घेण्यास कधीच कंटाळा केला नाही.

"झालं आता, बरीच वर्षे झाली त्यांना जाऊन! हे पाहिलंस का? टेबल टेनिसचं टेबल? आणि बंदूक?"
आजोबांच्या खास खेळाच्या खोलीत जुन्या भिंतीला मुटकुळं करुन टेकलेलं हिरवं टेबल आणि कोपर्‍यातली बंदूक.. त्या खोलीतल्या जुनेपणाच्या खुणा फ़्लॅट स्क्रिन टिव्हीला आणि नविन सजावटीला मुळीच सामावून घेत नव्हत्या. बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा इथे आले होते. तेव्हाही काही बदल असतील कदाचित, निरखून पाहिले नव्हते इतकंच!

आपण आपलं नॉस्टॅल्जिक होणं बरेचदा पाहतो.. कुणा माध्यमातून हे पाहणं, जसं रंगिबेरंगी धागे विणताना पहात त्यातलीच एक नक्षी होऊन जाणं.. तिच्या सांगण्यात मी कुठेच नव्हते पण तिथे फक्त मीच होते. घरभर फिरुन ओळखीचे काही नाद, रंग, हेरगिरीची खिडकी जिथे उघडते, त्या सोप्यातले काही उन्हाळ्याचे दिवस, माजघरातल्या पावसाळी रात्री, लाकडी जुन्या झोपाळ्याचे चार दोन झोके सगळं सगळं गोळा करुन ती म्हणाली, "आता जाऊयात आपण! उशिर होतोय.. "
थकलेल्या,वाकलेल्या काकी परत येण्याबद्दल बजावत होत्या. बाहेर दारातच मस्त अबोली फुलून आली होती.

"अबोली जरा जास्तच बोलतेय! "

आणि परतीच्या प्रवासात आईच्या गाठोड्यात आणखी एक बोलणारा रंग अधिक झाला होता. 24 comments:

अपर्णा said...

मीनल पोस्ट खूप हृद झालीय ग...माझीच आईबरोबरची आजोळची ट्रीप आहे अस वाटत होत काही गावाचे संदर्भ वगळता..कधी कधी वाटतं गाव बदलली माणसं बदलली तरी आठवणी त्याच नाही का??

रवींद्र said...

मीनल
नमस्कार!
खरेतर 'गजाली' नजरे समोरून अनेकदा सरकली होती. पण नाद आज ऐकला. "पडद्यामागचा पडदा" असा काही हळुवार सरकवला कि, ज्याने आजोळ अनुभवले आहे तो प्रत्येकजण हळवा होईल.
बाकीचा ब्लॉग आता वाचून काढतोच. पण आज 'गाजली' जावून पोहचले ..... Blogs I follows मध्ये.

भानस said...

मीनल, अगदी गुंगून गेले बघ. वाटले मीच माझ्या आजोळी सगळ्या जागा हुडकत, स्पर्शत, जुने जुने संदर्भ, घटना पुन्हा एकवार जगत फिरतेय. :)

भापो!

Anonymous said...

सुंदर लिहिले आहेस, मला पण माझं आजोळ आठवलं. मेणाचं कुंकु माझी पण आज्जी वापरायची. ते ढब्बू पैसा कपाळावर ठेऊन त्यावर मेण लावल्यावर मग बोटानेच कोरडे कुंकु चिकटवायचे त्या मेणावर.
मस्त आहे पोस्ट.

मीनल said...

अपर्णा,
थॅंक्स गं! :)
होय.. गाव, माणसं आणि वेळही बदलते; बदलणारच असते.. पण आठवणी तशाच राहतात.

मीनल said...

रवींद्र,
नमस्कार!
तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार.
नविन प्रतिक्रिया नविन संवादाची सुरवात करुन देते. ब्लॉग फॉलोईंगसाठी धन्यवाद!

मीनल said...

श्रीताई,

तूही जाऊन आलीस आजोळी? :)
थॅंक्स गं.. आणि भापो हे महत्वाचे आहे. :D

Anonymous said...

मीनल सुंदर झालेय गं पोस्ट...

खरय किती आठवणी असतात ना आपल्या आजोळच्या.... मी या भारववारीत मुद्दामहून आमच्या आजीच्या इगतपुरीच्या घरी जाऊन आले... असेच प्रत्येक कानाकोपऱ्याला मी हात लावत होते, जुन्या काळाला स्पर्श करायचा प्रयत्न सुरू होता नुसता... आजीच्या घरात आता जे रहातात त्या बाईही मग त्यांच्या बालपणाच्या गप्पा मारू लागल्या... वेगळाच हळवा अनूभव सारा!!

सुंदर पोस्ट इतकच म्हणेन आत्ता :)

मीनल said...

काका,
हो.. मेणाच कुंकू मजेशिर प्रकार आहे, गोलाच्या इकडेतिकडे झालं की परत नखाने कोरुन पूर्ण गोल होईपर्यंत ती चिकाटीने ते पूर्ण करायची..
Sweet memories indeed!

मीनल said...

तन्वीताई,
तुझी कमेंट म्हणजे एक अप्रुप असते. ठाऊक आहे तुला? भरभरुन..
थॅंक्स.. इतकच म्हणेन आत्ता! ;)

THE PROPHET said...

तुझ्याबरोबर आम्हीही फिरून आलो... मलाच नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटलं! :)
सुंदर!!

Anonymous said...

एक एक वस्तूंचे संदर्भ देत आठवणीची पान उलगडत मध्येच हळव करत आईच्या गप्पांच्या माध्यमातून मस्त सैर करवलीस आजोळची ...तुझ्या पोस्ट मध्येही मी कुठेच नव्हतो पण काही दुश्य समोर दिसली तिथे मीच मी होतो... छान पोस्ट ...!!!

मीनल said...

विद्याधर,
ट्रिप ऑलवेज रॉक्स! मग व्हर्च्युअल का असेना! :)
थॅंक्स रे!

मीनल said...

देवेंद्र,
अरे खरंच, इतके वर्षांनंतर त्याठिकाणी जाणे झाले. चुलत आजोळ! बर्‍याच गोष्टी आधीही सांगितल्या गेल्या असतील, तेव्हा मी लक्ष दिले नसावे किंवा काही लक्षात आले नसावे. यावेळी जरा जास्त समजले.. :D
थॅंक्स रे!

yog said...

प्रासादिक आणि प्रासंगिक ...सुंदर..
रम्य आठवणी...
किती काळानंतर गज़ाली बोलू लागलीय..

इंद्रधनू said...

खूप छान वाटले वाचून.. गावी जाण्याची इच्छा झाली......

मीनल said...

योगेश,
होय.. जवळपास तीन महिन्यांनंतर..
थॅंक्यू रे! :)

मीनल said...

इंद्रधनू,
प्रतिक्रियेसाठी खूप आभार. :)

आनंद पत्रे said...

मीनल, खुपंच सुंदर झालीए पोस्ट .. अतिशय आवडली

मी अत्त्यानंद said...

अक्षरश: चित्रमय जगत डोळ्यासमोर उभं केलंस. मीनल तुझ्या शब्दात खूप जादू आहे.
अशीच लिहिती राहा.

मीनल said...

आनंद,
थॅंक्स रे! :)

काका,
खूप खूप आभार.. :)

Santosh said...

Ya post madhe ek visual impact watla... faar chaan mhanje itka ki dole nakalat ole zalech!!!

Athawani mhanje ek wegla jag asta nahi ka??? :')

Thanks!

Ninad Kulkarni said...

मला गावाकडचे आजोळ नाही. कारण चार पिढ्यापासून आम्ही मुंबईच्या बटाट्याच्या चाळीत राहत आहोत.
हि पोस्ट वाचून आपले सुद्धा खेड्यामध्ये घर कौलारू असते तर असे प्रकर्षाने वाटून गेले.

मीनल said...

निनाद,
गावात आजोळ असण्याची मजा वेगळी असते खरी..
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.