Thursday, May 12, 2011

मुक्तांगण


चैत्रांगणातल्या तोरणाची पाने काढताना हाक आलेली, " अगं ए, काय चाल्लय?" तापू लागलेल्या अंगणात चटचटणारे पाय गुलाबी झाक चढवू लागलेले. रांगोळीचा शेवटचा उकार काढायचा राहिला होता. लक्ष सगळं तिकडेच! प्रश्नकर्तीकडे ओळखीच हासू आणि आणखी एक उलट प्रश्न फेकून परत शेवटच्या पानाकडे! इथे आणखी काय असत बरं? हो, वेल. परत पानेच! तो वेल चौकटीला बिलगून वरपर्यंत चढतो. आणखी काय राहिलेय? मोरपिस? रणछॊडदास.. उगाचच लांबलचक नाव आठवते. सरळ सरळ श्रीकृष्ण म्हणायला काय जाते? नाहीच! रणछॊडदास.. कुण्या काळी माघार घ्यावी लागली म्हणून कायमचेच चिकटलेले बिरुद! मग, सहस्त्र वेळचा विजयही इथे ते नाव पुसू शकत नाही. बापरे! सहस्त्र बायका, प्रत्येकीची कशी तर्‍हा असेल? त्याने त्यांची सुटका केली, आणि मग पालनकर्ता म्हणून आपले नाव दिले वगैरे ठिक आहे, पण मग आठ बायका कशा सांभाळल्या असतील? पैकी खरंच ह्रदयातली कोणती आणि राजकारणातली कोणती? गरुड तर कधी नीट जमतच नाही. रणछोडदासाचेच वाहन! तुळशीकट्ट्यातली तुळस जरा जास्तच दणकट आलीय. कुंडी त्यामानाने केविलवाणी दिसतेय! कुणी केलीच चेष्टा तर सांगायचे, पाणी जास्त घातले म्हणून! नाग प्रकरण चांगले आहे. सोपे, सुटसुटीत. नागपंचमीत काढलेल्या रांगोळीचे बोन्साय वाटतेय!
चंद्र, चांदणी, शंख, चक्र कुठेही अ‍ॅडजस्ट होवून जाते. चंद्र पूर्ण काढतच नाही ना कधी.. चंद्रकोर असते नेहमी.. ओढाळ मनाचे प्रतिक! हे टिपीकल चक्र पाहिले की, बुध्दाचे दगडी वेटोळ्याचे केस आठवतात. खास तीच मूर्ती, तेच आकार. उभ्या संपन्न संसारातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पूर्ण रिता झालेला सिध्दार्थ! आणि संपूर्ण अर्थ उमगल्यागत दगडी मूर्तीतही गूढ भाव तसेच ठेवणारा बुध्द.. तो सगळंच सोडून आत कुठेतरी निघून गेला असावा.

When I give up the helm
I know that the time has come for thee to take it.
What there is to do will be instantly done.
Vain is this struggle

य़ेस.. वेन इज धिस स्ट्रगल! शेवटी काय मिळते यावरच स्ट्रगलची किंमत ठरत असेल तर, हे व्यर्थच आहे. & the sky gazes on its own endless blue and dreams. एन्डलेस ब्लू.. मस्त शब्द आहे.
बाकी काय उरले? कासव.. सोमेश्वर देवळाच्या चौकोनी तलावात कित्ती कासवे होती. छोटी, छोटी. फारशी गर्दी नसते तिथे. हिरव्या पाण्याचे चौकोनी कुंड, त्यात मध्यभागी देऊळ! देवळात जायला लहान रस्ता.. या कुंडात कुठेतरी जिवंत झरा असेलच. जिवंत झरा? हे काय प्रकरण आहे? मृत झरा कसा असतो आणि? जर पाणीच नसेल तर झरा म्हणणारच नाही ना..
"लई उश्शीर झालाय.. आत जा गो बाय.. "
होय. रांगोळी आवरली आहे. बाकी फाफटपसाराही आवरता घ्यायला हवा.. मनातल्या रांगोळ्य़ा काय; पसरत, फिस्कटत असतातच!