Sunday, May 13, 2012

आईची आई

ती अगदी म्हणजे कमालीचीच मऊसूत होती. नऊवारी साड्याही अशाच नेसायची; सुती, मऊ.. मखमल=लोणी=जिजाबाई हे समीकरणच बनलं आहे. तिची सर्वात मोठी नात, जिला आज्जी निटसं म्हणता येत नसे, ती तिला जीजी म्हणत असे. पुढे पुढे त्याचे जिजाई, जिजाबाई असे स्थित्यंतर होत गेले. पुढच्या सगळ्या नातवंडांनीही जिजाबाईचाच धोशा लावला आणि तेच नाव तोंडी झाले. ’आईची आई’ हे आजोळी पळण्याचे सर्वात मोठ्ठे आकर्षण होते.

’मळ्यातलं घर’ आणि गावातला वाडा दोन्ही गोष्टी तिने सांभाळल्या होत्या. आम्हाला जास्त आवडायचे ते मळ्यातले घरच! म्हणजे शेतीच्या जवळ असलेले घर! ज्याच्या अंगणात क्रिकेटच्या बाऊंड्री, सिक्सरच्या खुणा ठरवायला खूप वाव होता. चिक्कूच्या झाडापर्यंत चार रन्स, त्यापुढे पेरुपर्यंत सहा आणि फाटकाच्याही पुढे गेला, तर तुझा तू बॉल आणायचा! असे नियम होते. मोठ्ठ असलं तरी अंगण रोज व्यवस्थित स्वच्छ केलेले असे. बाहेर घराला जोडूनच आणखी छोटे घर बांधले होते. त्यालाही कौले होती. आई, मामा, मावशी मंडळी लहान असताना त्यांना खेळण्यासाठी म्हणून! मागच्या बाजूला जोडूनच गोठा, कडेला धान्याचे कोठार , परत त्याहीपलीकडे गवताचे भारे ठेवण्याची शेड.. या सगळ्याला निशिगंध आणि सदाफुलीची बॉर्डर.. हे सर्वच स्वच्छ, कमालीचे सुंदर आणि निर्मळ ठेवणारा हात माझ्या आजीचा होता. ती हाताला जितकी मऊ-मऊ लागे तितक्याच मऊसूत मनाची मालकीण होती. भोळेपणाकडे झुकणारा कोवळा स्वभाव होता तिचा. मी तिला कधीच कुणावर ओरडताना, रागवताना पाहिले नाही. फारतर पदराचे टोक डोळ्यांपर्यंत जाई, पण तिचा उंच स्वरातला आवाज आठवतच नाही. हाच शांतपणा, साधेपणा तिचे सौंदर्य बनून राहिला होता.

मे महिन्यातल्या एखाद्या रणरणत्या दुपारी, धूळ उडवत बस त्या ठराविक नाक्यापर्यंत आली की हुश्श्य होत असे. कोणीतरी न्यायला आलेले दुकानाच्या पत्र्याखाली उभे असे. मळ्यातले घर असे चट्कन दिसतच नाही. थोडे खोलगट भागात रानटी झाडांमधे लपलेले आहे. नैसर्गिक कंपाउंड! तिथल्या उतारावरुन जाताना वाढलेला वेग थेट दार येईपर्यंत कमी होत नसे. जाड्या माठातले थंड पाणी, सरबत, पन्हे सगळा मारा तिच्याकडून सुरु होई.

ऊन आणि सुट्टी चढत जाई, तश्या आमच्या करामतीही वाढत जात. तिने माझ्यासाठी स्वयंपाकघरातच एका कोपर्‍यात स्वतः छोटी चूल लिंपून दिली होती. ती पेटवण्यासाठी छोट्या काटक्या होत्या, फुंकणी होती. तिने मला पहिला चहा करायला शिकवला. कडवट झालेला, काळा चहा पिणारी जिजाबाई माझे पहिले गिर्‍हाईक होती.

नातवंडांमधे मुलांची मेजॉरिटी असल्याने मी एकटी पडले, तरी माझ्याशी कधीही खेळणारी ती माझी सख्खी मैत्रिण होती. दादा आणि अमोलदादा यांनी घरामागे भिंतीला लागूनच मुख्य पदार्थ-माती आणि इतरही बरेच चित्रविचित्र पदार्थ मिसळून एक छोटे घर केले होते. त्यावर कागद, काटक्या वगैरेंचे थरचे थर देऊन ते उन्हात वाळवले होते. त्यावर उभे राहून ’आमचे घर सर्वात मजबूत’ अशी आरोळीही ठोकली होती. या अनमोल कन्स्ट्रक्शन मधे मला सहभागी करुन घेण्यात आले नव्हते. त्या घराच्या मजबूतीवर जळून ’हे मला घेत नाहीत’ ची तक्रार मी जिजाबाईकडे नोंदवली होती. तिने परत अंगणात तिघांनी मिळून घर बांधण्याचे फर्मान काढले होते. त्याप्रमाणे ते तयार झालेही! यावेळी तर आत डायनिंग टेबल, खुर्च्याही केल्या होत्या. छोटा बल्ब आत सोडला होता. मला लहान बुटके होवून आत फेरफटका मारावा असे प्रकर्षाने तेव्हा वाटत असल्याचे अजूनही आठवते आहे.

रात्रीच्या वेळी चटया टाकून अंगणात गप्पाष्टके रंगत, तेव्हा जेवण झाले असले, तरी ती काहीबाही खायला आणायची. बडबडणार्‍या मुलां-नातवंडांकडे प्रेमाने बघत बसायची. ती मते मांडायची, पण वादविवाद घालणे तिच्या कोष्टकात बसतच नव्हते. मधेच कुणा लहानग्याच्या डोक्यावर हात ठेऊन ’ निजलीस काय?’ ची पृच्छा करायची. तिच्या मांडीवर झोपण्यासारखे सुख नव्हते. आयतीच मऊशार उशी! वरुन मुलायम हाताचे थोपटणे!

गोठ्याचे काम पहाणार्‍या बायका, गवळी, किराणा आणणारे कुणी-कुणी; काम झाले की निघाले, असे कधीच होत नसे. जिजाबाईची विचारपूस, सल्ले, भेटवस्तू आणि खाऊ कधी संपतच नसे. हे लोकं बराच वेळ रेंगाळत असत. आम्ही त्यांची गार्‍हाणी ऎकत असू. हा बहुदा सकाळचा वेळ असे. घराचे मुख्य दार पुढे असले तरी, स्वयंपाकघराचे दुसरे अंगणाला जोडून दार होते. जाळीचे आणि लाकडी. त्या जाळीच्या पायरीवर बसून सगळ्य़ांची तिच्याशी बडबड चाले. जिजाबाईचे सकाळचे आवरणेही पाहण्यासारखे असे. स्वच्छ साडी नेसलेली आज्जी तिचा पितळेचा पावडरीचा डबा काढत असे. या ठराविक हालचाली ठरलेल्या असायच्या.. लाकडी चौकटीत बसवलेला छोटा आरसा, त्या खालचा छॊटा ड्रॉवर, त्यातला डबा.. मग गोल मेण आणि कुंकू.. फणी काढून अंबाडा घालून ती त्यावर गोल जाळीही लावायची. असेल, तर एखादे फूल! गोरीगोरी जिजाबाई खूपच गोड दिसायची. दोन परड्या भरुन पूजेसाठी फुले काढायची. मग स्वयंपाक, जेवणे वगैरे आवरुन तिचा मोर्चा ’दुपारी पडायच्या’ खोलीकडे वळायचा. ही खोली अगदी टिपीकल झोपाळू खोली होती. स्वयंपाकघराला लागूनच! बाळंतिणीची खोली असते तशी.. अंधारी, गार आणि लगेच झोप आणणारी.. तिथे पडून मोठ्यांच्या 'गॉसिप्स’ ऎकण्यातली मजा वेगळीच!

खेळून थकल्यावर ’हातपाय धूवून देवापुढे बसा’ ची हाकाटी व्हायची. तिथे लाईट बरेचदा नसायचेच! देवघरापुढल्या पिवळ्या प्रकाशात शुभंकरोति, मंत्र म्हटले जायचे. प्रकाश, स्वर आणि सुवास यांचा निरामय मिलाफ सगळा शीण घालवून टाकायचा. देवघराजवळच असणार्‍या लोणी काढायच्या लाकडी खांबाला टेकून ती कधी वाती वळायची कधी काही वाचायची. तिच्या सात्विकतेने घर भरुन जायचे. ते बघूनच खूप छान वाटायचे.

तिचे जाणे, त्या मळ्यातल्या घराला अजिबतच रुचले नाही. त्यानेही मौन पत्करले. तिची आठवण म्हणून कदाचित, तिचा शांतपणा त्याने उचलला. अबोली, वाढायची म्हणून वाढते आहे. अजूनही फाटक ओलांडल्यावर दिसणारा समोरच्या कोपर्‍यातला चौकोनी हौद कधी पाण्याने भरुन वहात असेल, कधी कोरडा ठिक्क पडत असेल.. त्याला लागूनच असलेल्या मोठ्ठ्या, कठडा नसलेल्या विहीरीची तू मनात घालून दिलेली भिती कधीच जाणार नाही.. त्याच किर्रर्र भितीचे फक्त आता कारण बदलले आहे की आता तूच तिथे नसशील.

सौम्य, निर्मळ साईसारख्या जिजाबाईने आणि आजोबांनी आजोळचे सुख भरभरुन दिले. बालपण, सुट्टी, मजा, चर्चा, शिकवणी या सगळ्या गोष्टी मायेच्या गाठोड्य़ात गच्च बांधून समृध्द करुन दिल्या.
                 मातृदिनानिमित्य; माझ्या आईला बुध्दीमान मुलगी, अतिशय प्रेमळ, बहुश्रुत आणि कष्टाळू व्यक्ती, एक उत्तम स्त्री बनवणार्‍या तिच्या आईला लाख सलाम!

Wednesday, May 2, 2012

सय सावली

कुठल्या मातीवर कोणत्या सरी पडतील आणि कुण्या काळचा सुगंध दरवळू लागेल, सांगता यायच नाही. गुळासारखी साधीशी गोष्ट! तांबूस गोजिरवाणा, सुबक गूळ पाहून मी दुकानदाराला विचारले," अरे वा! कोल्हापूरचा गूळ आहे वाटतं!" तेव्हा शक्य तितक्या कुत्सितमिश्र कुचक्या स्वरात तो बोलता झाला " गूळ म्हणजे काय कोल्हापूरातूनच येतो की काय? इथे पण बरीच उसाची शेती आहे. आमाला काय म्हाईत कुटुन येतो? तुम्ही तरी ओळखू शकाल काय?"

"हो मग! नक्कीच ओळखेन.. असाच असतो तो! "
त्याच्यावर कुरघोडी करण्यासाठी काढलेल्या स्वराचा आणि शब्दांचा त्याच्यावर कोणताही परीणाम झालेला दिसला नाही. मख्खपणे त्याने पुढच्या गिर्‍हाईकाला हिणवण्याची तयारी सुरु केली. पण त्या छोट्याश्या वस्तूला पाहिल्यावर काय काय म्हणून तरळून जावे? शहराबाहेर दुतर्फा उसाची लांबच लांब शेती, गुर्‍हाळे, मंडईतल्या गुळाच्या वेगवेगळ्या आकाराच्या ढेपा, "घ्या की हो! खूप ग्वाड आहे आमचा गूळ!" चा आग्रह.. आणि गूळाचे मोदकही! थाळी प्रकारात भरपूर पदार्थ बर्‍याच प्रमाणात एकदम समोर आले की, गोंधळून काय खावं, आणि आपल्याला किती भूक आहे याचा अंदाजच येत नाही तसच काहीसं इथे होत असावं. मधुर,आंबट सगळ्या गोष्टी गोलाकार गर्दी करतात. हा संबंध निव्वळ वस्तूंशीही निगडीत नसतो. गंध, रंग, चव, स्वर, आवाज.. किती मोठा परीघ आहे! एकदा कुठल्या तरी घरी एका परिचित परफ़्यूमचा वास तरंगत आला, आणि कॉलेजचे दिवस उजळणी करुन गेले. त्यावेळी खूपच जपून वापरला होता तो! हाच.. सेम.. ह्या परफ्यूमची मूर्ती लहान असली, तरी किर्ती महान होती. घरातून निघण्याची तेव्हाची अकराची वेळ, उकळत्या आमटीचा वास, जेवणाची गडबड, आवडता निळा ड्रेस, छोट्या सॅकमधे कागद, झेरॉक्सची गर्दी, पर्समधले पैसे चेक करणे.. सनकोट, स्कार्फ वगैरे घालून डाकू बनून जाणे, हेss मोठ्ठ पार्कींग, रणरणत ऊन.. आणि तरीही गार झुळूकेसारखा, स्पेशल वाटायला लावणारा, आसपास घुटमळणारा मंद सुवास! त्यावेळची, आणि आता आऊट ऑफ टच असलेली मैत्रिण.. घरी येऊन फेसबुक चेक केले.. अजूनही तशीच गठ्ठ्या आहे..
अशाच जोड्या जुळवायच्या तर, प्रत्येक मुख्य वर्गिकरणाचे उपवर्गिकरण होईल आणि सगळे बाण शेवटी कोल्हापूरच्या आठवणींकडेच जातील.. सगळे मे महिने तर बालपणीच्या आठवणी खाऊन टाकतात.. आपल्या मर्जीचे आपण मालक असण्यातली श्रीमंती न कळण्याचे दिवस.. कोणत्याही वेळेचे वाटे नाहीत, बदलाचे प्रवाह बघत बसण्याची सक्ती नाही. फक्त आंब्यासारख्या रसरशीत, गोड आठवणी!
’आला गेला मनोगती’ मधे मारुतीच्या वेगाची तुलना मनाच्या वेगाशी केली आहे. भूत, भविष्यच्या पलीकडे, काल्पनिक काळातही संचार करुन क्षणभरात मन वर्तमानात परत येतं. आठवणीत फार काळ रमू नये म्हणतात.. असेलही कदाचित! पण या आठवणीच जर जिवाभावाच्या काही क्षणांची कडकडून भेट घडवून आणत असतील तर? अशी छटाकभर मिनिटेही तो पूर्ण प्रसंग, तो काळ; जिवंत करीत असतील तर?

चवीशी संबंधीत एक सुंदर प्रसंग Ratatouille मध्ये दाखवला आहे. रेस्टॉरंट क्रिटीक अ‍ॅन्टोन विशेष टिका-टिप्पणीसाठी शेफ गुस्ताँवच्या रेस्टॉरंटमधे येतो. तेव्हा छॊटा शेफ असलेल्या रेमी उंदराने बनवलेली Ratatouille डिश त्याला सर्व्ह करण्यात येते. ती दिमाखदार दिसत असते, रंगिबेरंगी दिसत असते.. तेव्हा आता हा साधासा पदार्थ बनवलाय तरी कसा, हे पहायला अ‍ॅन्टोन पहिला घास घेतो आणि थेट त्याच्या बालपणात जातो.. रडून, नाक पुसत घरी आलेल्या छोट्या अ‍ॅन्टोनपुढे गरमागरम Ratatouilleची डिश ठेवणारी त्याची आई त्याला आठवते आणि त्याचे कडक वाटणारे डोळे आठवणीत हरवून जातात. उंदरासारखा प्राणी इतकी ऑथेंटीक डिश बनवू शकतो ही कल्पना, त्याच्यातल्या टिकाकाराची तत्वे हलवून टाकते.

या आठवणींच्या मोहोळाला काही स्पर्शून गेले की बर्‍याच गोष्टी पंख फडफडवत येतात. काहीबाही परत शिकवूनही जातात. शेवटी वर्तुळ एकदाच थोडीच पूर्ण होते? ते गिरवत रहाण्यातली मजा वेगळीच आहे. रोजच्या उन्हातली ही एक इनोसन्ट सावलीच म्हणायची!