Wednesday, May 2, 2012

सय सावली

कुठल्या मातीवर कोणत्या सरी पडतील आणि कुण्या काळचा सुगंध दरवळू लागेल, सांगता यायच नाही. गुळासारखी साधीशी गोष्ट! तांबूस गोजिरवाणा, सुबक गूळ पाहून मी दुकानदाराला विचारले," अरे वा! कोल्हापूरचा गूळ आहे वाटतं!" तेव्हा शक्य तितक्या कुत्सितमिश्र कुचक्या स्वरात तो बोलता झाला " गूळ म्हणजे काय कोल्हापूरातूनच येतो की काय? इथे पण बरीच उसाची शेती आहे. आमाला काय म्हाईत कुटुन येतो? तुम्ही तरी ओळखू शकाल काय?"

"हो मग! नक्कीच ओळखेन.. असाच असतो तो! "
त्याच्यावर कुरघोडी करण्यासाठी काढलेल्या स्वराचा आणि शब्दांचा त्याच्यावर कोणताही परीणाम झालेला दिसला नाही. मख्खपणे त्याने पुढच्या गिर्‍हाईकाला हिणवण्याची तयारी सुरु केली. पण त्या छोट्याश्या वस्तूला पाहिल्यावर काय काय म्हणून तरळून जावे? शहराबाहेर दुतर्फा उसाची लांबच लांब शेती, गुर्‍हाळे, मंडईतल्या गुळाच्या वेगवेगळ्या आकाराच्या ढेपा, "घ्या की हो! खूप ग्वाड आहे आमचा गूळ!" चा आग्रह.. आणि गूळाचे मोदकही! थाळी प्रकारात भरपूर पदार्थ बर्‍याच प्रमाणात एकदम समोर आले की, गोंधळून काय खावं, आणि आपल्याला किती भूक आहे याचा अंदाजच येत नाही तसच काहीसं इथे होत असावं. मधुर,आंबट सगळ्या गोष्टी गोलाकार गर्दी करतात. हा संबंध निव्वळ वस्तूंशीही निगडीत नसतो. गंध, रंग, चव, स्वर, आवाज.. किती मोठा परीघ आहे! एकदा कुठल्या तरी घरी एका परिचित परफ़्यूमचा वास तरंगत आला, आणि कॉलेजचे दिवस उजळणी करुन गेले. त्यावेळी खूपच जपून वापरला होता तो! हाच.. सेम.. ह्या परफ्यूमची मूर्ती लहान असली, तरी किर्ती महान होती. घरातून निघण्याची तेव्हाची अकराची वेळ, उकळत्या आमटीचा वास, जेवणाची गडबड, आवडता निळा ड्रेस, छोट्या सॅकमधे कागद, झेरॉक्सची गर्दी, पर्समधले पैसे चेक करणे.. सनकोट, स्कार्फ वगैरे घालून डाकू बनून जाणे, हेss मोठ्ठ पार्कींग, रणरणत ऊन.. आणि तरीही गार झुळूकेसारखा, स्पेशल वाटायला लावणारा, आसपास घुटमळणारा मंद सुवास! त्यावेळची, आणि आता आऊट ऑफ टच असलेली मैत्रिण.. घरी येऊन फेसबुक चेक केले.. अजूनही तशीच गठ्ठ्या आहे..
अशाच जोड्या जुळवायच्या तर, प्रत्येक मुख्य वर्गिकरणाचे उपवर्गिकरण होईल आणि सगळे बाण शेवटी कोल्हापूरच्या आठवणींकडेच जातील.. सगळे मे महिने तर बालपणीच्या आठवणी खाऊन टाकतात.. आपल्या मर्जीचे आपण मालक असण्यातली श्रीमंती न कळण्याचे दिवस.. कोणत्याही वेळेचे वाटे नाहीत, बदलाचे प्रवाह बघत बसण्याची सक्ती नाही. फक्त आंब्यासारख्या रसरशीत, गोड आठवणी!
’आला गेला मनोगती’ मधे मारुतीच्या वेगाची तुलना मनाच्या वेगाशी केली आहे. भूत, भविष्यच्या पलीकडे, काल्पनिक काळातही संचार करुन क्षणभरात मन वर्तमानात परत येतं. आठवणीत फार काळ रमू नये म्हणतात.. असेलही कदाचित! पण या आठवणीच जर जिवाभावाच्या काही क्षणांची कडकडून भेट घडवून आणत असतील तर? अशी छटाकभर मिनिटेही तो पूर्ण प्रसंग, तो काळ; जिवंत करीत असतील तर?

चवीशी संबंधीत एक सुंदर प्रसंग Ratatouille मध्ये दाखवला आहे. रेस्टॉरंट क्रिटीक अ‍ॅन्टोन विशेष टिका-टिप्पणीसाठी शेफ गुस्ताँवच्या रेस्टॉरंटमधे येतो. तेव्हा छॊटा शेफ असलेल्या रेमी उंदराने बनवलेली Ratatouille डिश त्याला सर्व्ह करण्यात येते. ती दिमाखदार दिसत असते, रंगिबेरंगी दिसत असते.. तेव्हा आता हा साधासा पदार्थ बनवलाय तरी कसा, हे पहायला अ‍ॅन्टोन पहिला घास घेतो आणि थेट त्याच्या बालपणात जातो.. रडून, नाक पुसत घरी आलेल्या छोट्या अ‍ॅन्टोनपुढे गरमागरम Ratatouilleची डिश ठेवणारी त्याची आई त्याला आठवते आणि त्याचे कडक वाटणारे डोळे आठवणीत हरवून जातात. उंदरासारखा प्राणी इतकी ऑथेंटीक डिश बनवू शकतो ही कल्पना, त्याच्यातल्या टिकाकाराची तत्वे हलवून टाकते.

या आठवणींच्या मोहोळाला काही स्पर्शून गेले की बर्‍याच गोष्टी पंख फडफडवत येतात. काहीबाही परत शिकवूनही जातात. शेवटी वर्तुळ एकदाच थोडीच पूर्ण होते? ते गिरवत रहाण्यातली मजा वेगळीच आहे. रोजच्या उन्हातली ही एक इनोसन्ट सावलीच म्हणायची!

8 comments:

हेरंब said...

पहिला परिच्छेद वाचून तू पुण्याला मुव्ह झालीस की काय अशी शंका मनाला चाटून गेली ;)

अपर्णा said...

>> आठवणींच्या मोहोळाला काही स्पर्शून गेले की बर्‍याच गोष्टी पंख फडफडवत येतात. काहीबाही परत शिकवूनही जातात

मस्त....

हेरंब हे हे हे... :)

मीनल said...

हेरंब,
Bingo...!!
:D :D

अपर्णा,
असं होत खरं.. (BTW, हे हे हेरंबचा का? :))

हेरंब said...

मीनल, लोळालोळी कंस !!

Yogesh said...

मीणळ...तब्बल वर्षानंतर पोष्ट लिवली आहेस ...संकल्प होता का असा???

शेवट एकदम मस्त :) :)

yogesh joshi said...

निव्वळ अप्रतिम..

मीनल said...

योगेश,
संकल्प नव्हता, पण तसं झालं मात्र! लेखणीने प्रसन्न व्हायला वर्ष लावले.

योगेश जोशी,
:)

सौरभ said...

:D :)